Tuesday, March 27, 2007

खूब लड़ी मर्दानी

सध्या मी The hero with a thousand faces हे जोसेफ कॅम्पबेल यांचे पुस्तक वाचत आहे. जगातील सर्व परीकथा, पौराणिक कथा आणि धार्मिक कथा यांतून येणार्‍या नायकांची (legendary heroes) कथा ही एकमेकांशी मोठ्या प्रमाणात साम्य दाखवते अशी या पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. स्टार वॉर्सचा निर्माता/ दिग्दर्शक जॉर्ज ल्युकस याने या संकल्पनेचे आपण ऋणी असल्याचे सांगितले असल्याचे वाचनात येते.


पौराणिक कथा आणि परीकथांप्रमाणेच बर्‍याचशा ऐतिहासिक व्यक्तींमध्ये आणि त्यांच्या जीवनकार्यातही एक विलक्षण साम्य दिसते. अनन्वित अन्याय, त्यातून निर्माण होणारा असंतोष, नायकाचा जन्म, त्याचे निराळे अनुभवविश्व आणि प्रस्थापित शक्तीविरुद्ध त्याने दिलेला लढा, त्यात मिळालेला अंतिम विजय किंवा प्राणांची आहुती. कथानायकांचे जीवन बरेचदा एकाच चाकोरीतून गेल्याचे आढळते.


मध्यंतरी अचानक सुभद्राकुमारी चौहान यांची 'खूब लड़ी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी।' ही कविता बर्‍याच वर्षांनी पुन्हा वाचण्याचा योग आला. आपल्यापैकी बरेचजण शाळेत ही कविता शिकले असतील. झाशीच्या राणीविषयी वेगळे काय लिहायचे? तिचे शौर्य, तिचा पराक्रम सर्वज्ञात आहे. भारतीय इतिहासात राणी लक्ष्मीबाईची कथा माहित नाही असा माणूस मिळणे कठिण. राजघराण्यात झालेला विवाह, अकाली वैधव्य, ब्रिटिशांकडून दत्तक विधान नाकारले जाणे, १८५७ चे बंड, 'मेरी झांसी नहीं दूंगी' असा राणीने घेतलेला कणखर पावित्रा, ब्रिटिशांशी निकराने दिलेली झुंज आणि पत्करलेले वीरमरण.


राणीची कहाणी शब्दांत बांधणार्‍या सुभद्राकुमारी चौहान या स्वत: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सत्याग्रही होत्या. त्यांची जालियांवाला बागेवरील कविताही प्रसिद्ध आहे. 'खूब लड़ी मर्दानी...' या कवितेत त्यांनी राणीच्या बालपणाचे, लग्नाचे, वैधव्याचे, ब्रिटिशांच्या मुजोरीचे, राणीने शर्थीने दिलेल्या झुंजीचे आणि तिच्या बलिदानाचे यथार्थ वर्णन केले आहे.


सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,

बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।


जे काही माझे आहे ते मी तुम्हाला कदापि देणार नाही या भावनेतून एक मध्ययुगीन स्त्री प्रबळ ब्रिटिश सैन्यासमोर उभी राहते, शर्थीने मुकाबला करते आणि त्या यज्ञात आपली आहुती देते. आपले प्रेतही ब्रिटिशांच्या हाती लागू नये अशी इच्छा बाळगणार्‍या राणी लक्ष्मीबाईची कहाणी स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणादायी ठरली.


याच धर्तीवर मला इ.स.६०-६१ साला दरम्यानच्या आयसेनी जमातीच्या केल्टिक राणी बूडिका (बोअडिसिया) हिची कहाणी वाचायला मिळाली आणि दोन्ही गोष्टींत साम्य जाणवले. बूडिका या शब्दाचा अर्थ विजयी (विजया) असा होतो. पूर्व इंग्लंडच्या नॉरफोक प्रांताचा राजा रोमन साम्राज्याला पाठिंबा देणारा परंतु स्वतंत्र राज्याचा राजा होता. आपल्या मृत्यूनंतर त्याने आपल्या राज्याची धुरा आपल्या दोन मुली आणि रोमन साम्राज्यावर यावी असे सुचवले होते. परंतु रोमन साम्राज्य मुलींना राज्याचा उत्तराधिकारी मानत नसल्याने त्यांनी हे राज्य खालसा केले आणि ते रोमन साम्राज्याच्या घशात घातले. राणी बूडिकाने या जुलुमाविरुद्ध आवाज उठवला असता तिच्या दोन्ही मुलींवर बलात्कार करण्याची आणि राणीला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. याप्रकाराने संतप्त झालेले आयसेनीचे नागरिक आपल्या राणीच्या बाजूने उभे राहिले आणि राणीने आपल्या मुलींना रथात आपल्या बाजूला उभे करून स्वत: जातीने या बंडखोरांच्या सैन्याचे नेतृत्व केले.



टॅसिटस या रोमन इतिहासकाराने राणीच्या तोंडी आवेशपूर्ण भाषण घातले आहे त्याचा गोषवारा पुढीलप्रमाणे - “मी माझी गमावलेली दौलत मिळवायला निघालेली राजस्त्री आहे असे कोणी समजू नये तर मी चाबकाच्या फटक्यांनी जखमी झालेली आणि माझ्या मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढणा‍र्‍यांविरुद्ध माझे गमावलेले स्वातंत्र्य मिळवायला पेटून उठलेली सामान्य नागरिक आहे. आपले ध्येय न्याय्य आहे आणि देव आपल्या पाठीशी आहे. मी एक स्त्री असूनही या युद्धात जिंकणे किंवा मरणेच पसंत करते, पुरुषांना गुलामगिरीत जगायचे असेल तर तो त्यांचा निर्णय असेल.”राणीच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या काही चकमकींत आयसेनीच्या सैन्याला विजय प्राप्त झाला परंतु पुढे जरी राणीच्या सैन्याची संख्या रोमन साम्राज्याच्या सैन्याहून अधिक असली तरीही आधुनिक शस्त्रांत्रांचा अभाव, शिस्त आणि मैदानी लढाई खेळण्याचा अनुभव नसलेल्या राणीच्या सैन्याचा रोमन साम्राज्याशी झालेल्या तुंबळ युद्धात पराभव झाला आणि शत्रूच्या हाती लागण्याऐवजी तिने विष खाऊन मरण पत्करले.


राणी विक्टोरियाच्या काळात विक्टोरिया बूडिकाला आपला आदर्श मानत असल्याने तिला असामान्य महत्त्व प्राप्त झाले. आजही इंग्लंडमध्ये तिला सांस्कृतिक प्रतिक मानले जाते.


कधीतरी एखादी गोष्ट वाचताना अचानक त्यातील प्रसंग आपण पूर्वी कधीतरी वाचले आहेत (deja vu) याची जाणीव आपल्याला होते. एखादे व्यक्तीविशेष वाचतानाही असाच भास बरेचदा होतो. इतिहास आमचा त्यांचा या समुदायासाठी लिहिलेला पहिला लेख मला एखाद्या कर्तृत्ववान ऐतिहासिक स्त्री विषयी लिहिण्याचे मनात होते, The hero with a thousand faces, बूडिका आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल एकाच वेळी वाचन करण्याचा योग आला. दोन्ही व्यक्तिंच्या जीवनकथेत विलक्षण साम्य दिसले आणि तारा आपोआप जुळत गेल्या.