Monday, June 19, 2006

रेव्ह. चार्ली एन्ड्रूज

काल परवा रिचर्ड ऍटेनबरोंचा गांधी चित्रपट पुनश्च पाहिला. नक्की कितव्यांदा ते आठवत नाही पण दरवेळेला चित्रपट पाहताना एक प्रश्न नेहमीच पडायचा. संपूर्ण चित्रपटात गांधिजींना "मोहन" म्हणून हाक मारणारे आणि त्यांना भारतात परत आणण्यात काही अंशी कारणीभूत असलेले "रेव्ह. चार्ली एन्ड्रूज" हे महाशय नक्की कोण?

एखाद्या अपरिचित व्यक्तीची माहिती काढणे हे तसेही थोडे कठिण काम. त्यातून ती व्यक्ती विस्मृतीत गेलेली, माझ्याकडेही माहितीच्या महाजाला शिवाय दुसरे साधन नाही. पण महाजाला सारखं दुसरं प्रभावी साधन नाही असंही म्हणता येईल कारण प्रथमदर्शनी कठीण वाटणारा हा शोध अगदी सोपा झाला. सर्वप्रथम IMDB (Internet Movie Data Base) वर गांधी चित्रपट शोधला. त्यात रेव्ह. चार्ली एन्ड्रूज हे नाव दृष्टीस पडले त्यामुळे गुगलवर त्यांचा शोध घेणे खूप सोपे झाले. वाचलेल्या माहितीवरुन पुढील गोषवारा लिहीत आहे.

रेव्ह. चार्ल्स फ्रिर (चार्ली) एन्ड्रूज यांचा जन्म १८७१ साली न्यू कॅसल, इंग्लंड येथे झाला. चार्लींचे वडिल ही चर्च मिनीस्टर होते, त्यांनी लहानग्या चार्लीला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. पहिली, प्रार्थनेवर प्रेम आणि दुसरी गरीबांवर प्रेम. काही कौटुंबिक कारणांमुळे चार्लीचे कुटुंब गरीबीच्या खाईत लोटले गेले. चार्लीच्या आई वडिलांना कुटुंब चालवण्यासाठी जे अपार कष्ट घ्यावे लागले त्याचा लहानग्या चार्लीच्या मनावर खोल परिणाम झाला.

ख्रिस्ती धर्माचे शिक्षण घेऊन १८९७ साली चार्ली पाद्री बनले. याच काळात त्यांचा ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाच्या झगडयाशी संबंध आला आणि त्यातल्या त्यात भारतात सुरु असलेल्या लढयाविषयी त्यांना विशेष आत्मीयता वाटली. १९०४ साली दिल्ली येथिल से. स्टिफन कॉलेजमधे शिकवण्याची संधी चालून आली आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन चार्ली भारतात दाखल झाले.

भारतात ब्रिटिशांचे वर्णद्वेषी धोरण पाहून ते व्यथित झाले आणि स्वत: या लढयात सक्रिय व्हायचे त्यांनी ठरवले. लढयाला पाठिंबा देणारा ब्रिटिश पाद्री या नात्याने त्यांना भारतात एक आगळेच महत्त्व प्राप्त झाले. नॅशनल कॉंग्रेसच्या सभा व बैठकींना त्यांना आमंत्रित केले जाऊ लागले. पाद्री असल्याने त्यांनी ब्रिटिश व भारतीय या दोहोंचा विश्वास लवकरच संपादन केला. यानंतर चार्ली स्वत: लढयात सक्रिय झाले.

१९१३ साली कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळकृष्ण गोखले यांच्या आग्रहावरुन चार्ली साऊथ अफ्रिकेच्या भारतीय समाजाला वर्णद्वेषाविरुद्ध त्यांच्या लढयात मदत करण्यासाठी तिथे दाखल झाले. तेथिल वास्तव्यात त्यांची भेट गांधीजींशी झाली आणि गांधीजींच्या अहिंसेच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेने ते प्रभावित होऊन गेले. या दोघांतील अतूट मैत्रीला इथूनच सुरुवात झाली.

१९१६ साली चार्ली गांधींजींसमवेत भारतात परतले. चंपारण्याच्या सत्याग्रहाच्या कैदेत असताना गांधीजींनी त्यांना "फीजी" ला जाऊन तेथिल मजूर आणि कामगारांना आपल्या हक्कांविषयी जागृत करण्यास सुचवले. त्यानुसार चार्ली फिजीला गेले. फीजीला त्यांना "दीनबंधू " या विशेषणाने सन्मानित करण्यात आले.तिथून परतल्यावर १९२५ व १९२७ साली त्यांनी All India Trade Union चे अध्यक्षपद भूषवले. १९३१ साली गोल मेज परिषदेसाठी गांधीजींसमवेत ते ईंग्लंडला जाऊन आले.

सर्व धर्मांविषयी त्यांचा दृष्टीकोन सहिष्णू तर होताच पण अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९३३ साली त्यांनी बाबा साहेब आंबेडकरांना अस्पृश्यांच्या मागण्या अधोलिखित करण्यास मदतही केली. गुरुदेव टागोरांच्या शांतिनिकेतन मधे वेळ घालवण्यास त्यांना फार आवडायचे.

पुढे, भारताविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या ब्रिटिशांनी इंग्लंडला परतावे व स्वातंत्र्यलढा भारतीयांनाच लढू द्यावा असे गांधीजींनी चार्लींना सुचवले. त्या नुसार त्यांनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ ब्रिटनमधे व्यतित केला. तिथेही त्यांनी आपल्या लिखाणातून पाश्चिमात्य जगताला भारतीय स्वातंत्र्य लढा व गांधीजींच्या तत्वांची ओळख करुन दिली.

गांधीजींना "मोहन" या त्यांच्या प्रथम नावाने संबोधणारे चार्ली हे एकच असावेत. “Mahatma Gandhi: His Life and Ideas” हे पुस्तक त्यांनी लिहून प्रकाशित केले होते. ५ एप्रिल १९४० साली कलकत्ता भेटीवर असताना त्यांचे निधन झाले.

----------

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढयाला येन केन प्रकारे मदतीचा हातभार लावणाऱ्या अनेक मोहोऱ्यांविषयी आपण अनभिज्ञ असल्याचे वारंवार लक्षात येते. या छोटयाश्या गोषवाऱ्यातून वाचकांचे लक्ष वेधण्याचा हा एक लहानसा प्रयत्न.

2 comments:

hemant_surat said...

सूरतला ऍन्ड्रूज लायब्ररी खूप जुनी आहे. हे नाव का ठेवले होते ते आत्ता कळले. मनापासून थॅंक्स. अशीच माहीती देत जा.
हेमंत सूरत

Unknown said...

नमस्कार, आपला हा लेख आवडला व माझ्या प्रमाणे अनेक असे लोक असतील ज्यांना ह्या महान व्यक्ति बदल माहीती नसेल जर आपण परवानगी दिलीत तर मी हा लेख माझ्या संकेतस्थळावर ई-पुस्तक रुपामध्ये ठेवेन. अथवा आपण स्वत: www.anamika.co.in वे जाऊन आपला हा लेख तेथे ठेवा. आपल्या ह्या कार्या मुळे अनमिकाच्या वाचकांना नवीन माहीती मिळेल.

आपलाच मित्र,

राज जैन