ज्ञानप्रसाराची मौखिक परंपरा
खालील लेख हा कोणताही वाद सुरू करण्याच्या हेतूने लिहीलेला नाही. लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखिकेचा दावा नाही. हा लेख कोणत्याही गोष्टीच्या समर्थनार्थ लिहिलेला नाही, तसेच, लेख परिपूर्ण आहे असाही लेखिकेचा दावा नाही. वाचकांकडे खाली दिलेल्या मुद्द्यांवर भर टाकण्याजोगे अथवा योग्य माहितीच्या आधारे लेखातील मुद्दे खोडून काढण्यासारखे काही असेल तर ते येथे जरूर द्यावे
“रुक मत जा" या वाक्यातील विरोधाभास बहुधा सर्वांनाच माहित असावा. "रुक, मत जा" यातील रुक नंतर आलेला स्वल्पविराम थोडेसे थांबणे सुचवतो, पण तोच जर "रुक मत, " नंतर "जा" आला तर वाक्याचा अर्थ बदलून टाकतो. जर या वाक्यात स्वल्पविराम आलाच नाही तर मात्र वाक्य दोहोंपैकी कोणत्या हेतूने लिहिले आहे याचा उलगडा होणे कठिण होऊन बसते. याउलट, बोलणारा ज्या हेतूने हे वाक्य बोलतो/ उच्चारतो तो हेतू सहज स्पष्ट होतो. विरामचिन्हांचा उपयोग होण्यापूर्वी मराठी, संस्कृतासारख्या भाषा योग्य रितीने कशा काय वाचल्या गेल्या असतील अशी शंका गेले अनेक दिवस डोक्यात घोळत होती. वाचन करत असताना लेखनकलेबद्दल काही विशेष नजरेस पडले ते येथे संकलित केले आहे.
इतिहासात डोकावून पाहिले आणि पूर्वापार चालत आलेले आणि अद्यापही अस्तित्वात असलेले साहित्य कोणते असा विचार केला असता, ते साहित्य म्हणजे 'लोककथा आणि पौराणिक कथा' असा निष्कर्ष काढला जातो. लोककथा/ पौराणिक कथा या नेमक्या कोणत्या काळात निर्मिल्या गेल्या हे सांगणे कठिण असले तरी त्या आजतागायत ऐकल्या/ ऐकवल्या जातात आणि अद्यापही प्रसिद्ध आहेत. इथे जर प्राचीन लिखित साहित्याचा विचार केला तर बरेचसे प्राचीन साहित्य हे काळाच्या ओघात वाहून गेले आहे किंवा मागे पडले आहे. अनेकदा ते ज्या लिपीत लिहिले गेले ती लिपी बदलल्याने किंवा नष्ट झाल्याने अशा लिखाणाचा अचूक अर्थ काढणे हे एक मोठे कठिण काम होऊन बसते, परंतु मौखिक परंपरेतून चालत आलेल्या बर्याच प्राचीन कथा आणि गोष्टी फुलवून सांगण्याची कला आजतागायत आहे.
भारतात मौखिक परंपरा म्हणून सर्वप्रथम वेदांकडे पाहिले जाते. वेद मौखिक का? पूर्वजांनी ते लिहून का ठेवले नाहीत? असा प्रश्न बरेचदा विचारला जातो. याचे अचूक उत्तर अद्याप सापडलेले नाही. अनेक तज्ज्ञांनी याबाबत अनेक मते मांडलेली दिसतात त्याप्रमाणे काही महत्त्वाची खाली दिली आहेत:
२. लेखनकला असावी फक्त ती साहित्यासाठी न वापरता, राज्यकारभारातील शिक्के किंवा इतर कामांसाठी वापरली जात असावी.
३. उपलब्ध अक्षरांत अचूक उच्चार लिहिणे अशक्य असल्याने आणि तसे लिहून चुकीचे उच्चार प्रचलित होऊन अयोग्य ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहचू नये म्हणून वेदांना मौखिक ठेवण्यात आले.
४. ज्ञान अनाधिकारी व्यक्तींच्या हाती जाऊ नये म्हणून.
बरेचदा चौथ्या मुद्द्याला अवास्तव महत्त्व दिल्याचे दिसून येते, तरीही बर्याच तज्ज्ञांच्या मते यांतील पहिला मुद्दा खरा मानला जातो कारण ऋग्वेदात लेखनाचा उल्लेख नाही असा निर्वाळा तज्ज्ञ देतात. (यावर वाद-प्रतिवाद आहेतच.) परंतु लेखनकला विकसित झाल्यावरही वेदांचे लेखन झालेले आढळत नाही हे येथे महत्त्वाचे वाटते.
महाभारताच्या सुरुवातीलाच येणारी व्यास आणि गणेश यांच्यातील कथाही येथे विचारात घेण्याजोगी आहे. व्यासांनी महाभारत लिहून काढण्याची गणेशाला विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन गणेशाने सांगितले, “मी हे लेखन करेन परंतु माझी लेखणी एक क्षणही थांबता कामा नये.” यावर आपल्याला रचना करण्यास थोडी उसंत मिळावी या हेतूने व्यासांनी गणेशाला पुन्हा विनंती केली, “जेव्हा एखाद्या रचनेचा योग्य अर्थ लागणार नाही तोपर्यंत ती आपण लिहून काढू नये.” गणेशाला व्यासांच्या रचनेचा अर्थ लावताना वेळ लागलाच. या गोष्टीबाबत काही तज्ज्ञांचे मत असे की येथे केवळ अर्थ लावण्यापुरती ही कथा थांबत नसून, व्यासांच्या रचना इतक्या जटिल होत्या की त्यांचे उच्चार शब्दांत लिहिणे साक्षात गणेशालाही कठिण होते.
यापुढे जाऊन मला बहुतांश तज्ज्ञांत एकवाक्यता दिसली की प्राचीन भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे, पूर्वापार चालत आलेले अनेक विधी, वेद, मंत्र, रीती-रिवाज, सण, समजुती, खेळ, नृत्यप्रकार अशा अनेक प्रकारांतून कायम आहे याचे कारण मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसर्या पिढीला ज्ञान देणे आणि हे पिढ्यान पिढ्या चालत आल्याने प्राचीन भारतीय संस्कृती आजही अस्तित्वात आहे. वेदांच्या उच्चारांबाबत प्रा. ग्रेगरी पोसेल यांची एक प्रतिक्रिया मला वाचायला मिळाली त्यातील काही भाग येथे नमूद करत आहे:
म्हणून मौखिक परंपराही इतरांपेक्षा वेगळी वाटते आणि आज लिखित स्वरूपात अस्तित्वात असलेले हे वेद प्राचीन मौखिक वेदांशी मिळते-जुळतेच असावेत असे वाटते.”
मौखिक ज्ञानसंवर्धनाला भारतीय संस्कृतीत असलेली ही मान्यता इतर संस्कृतीत दिसते का यावर तज्ज्ञ पुढील उदाहरण देतात.
सॉक्रेटिसबद्दल लिहिताना प्लेटो एके ठिकाणी एक सॉक्रेटियन प्रश्न उद्धृत करतो, “कोणते लक्षण लेखनाला योग्य किंवा अयोग्य ठरवते?” यावर सॉक्रेटिस सरळ उत्तर देण्याऐवजी एका इजिप्शियन पौराणिक कथेचे उदाहरण देतो.
असाच एकदा थॉथला लेखनकलेचा शोध लागला. आपले नूतन संशोधन घेऊन थॉथ अमुनकडे गेला आणि उत्साहाने त्याने आपले संशोधन अमुनला सांगण्यास सुरुवात केली, “हे राजा, मी एक नवीन कला शोधली आहे. जी एकदा शिकून घेतली की समस्त इजिप्तवासी शहाणे होतील, विद्वान होतील आणि त्यांची स्मृती द्विगुणित होईल. या कलेद्वारे मी बुद्धिमत्ता आणि स्मृती यांवर अचूक तोडगा शोधला आहे.”
यावर नेहमी थॉथची प्रशंसा करणार्या अमुनने काही वेगळेच उत्तर दिले, “हे थॉथ! एखाद्या कलेला जन्म देणारा हा ती कला फायद्याची आहे किंवा नाही हे उत्तमरीत्या ठरवू शकत नाही. ही पारख त्या कलेच्या वापरकर्त्यांनी करावी. आता, तू या लेखनकलेचा जनक असल्याने येथे तुझे पितृवत प्रेम बोलते आहे आणि ते सत्य परिणामांच्या विरुद्ध आहे. खरंतर, ही कला तिच्या अभ्यासकांना विस्मरणाचे दान देईल. जे ही कला शिकतील ते आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग करणे सोडून देतील कारण ते लेखनावर/ लिखाणावर आपली श्रद्धा कायम करतील. या चिन्हा-खुणांच्या बाह्यज्ञानामुळे माणसे आपल्या हृदयातून निर्माण होणार्या अंतर्ज्ञानाला विसरतील. आपापल्यापरीने वाचन केल्याने ते त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढतील. तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे. हे संशोधन ऐकवल्याने (वाचून दाखवल्याने) लोकांना एकाच गोष्टीचे अनेक अर्थ कळतील. त्यांना आपण ज्ञानी झाल्याचा भास होईल परंतु प्रत्यक्षात त्यांना योग्य गोष्ट कळेलच असे नाही.”
पाश्चात्य इतिहासातील दोन महत्त्वाची महाकाव्ये इलियड आणि ओडिसी यांची निर्मिती होमर या आंधळ्या आणि निरक्षर कवीने केल्याचे सांगितले जाते आणि मौखिक ज्ञान प्रसार परंपरेतील तो एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इतर अनेक संस्कृतीतही जसे नेटिव इंडियन मौखिक ज्ञानाची परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली दिसते.
10 comments:
नेहमी प्रमाणेच अभ्यासपुर्ण
Thanks a lot Harekrishnaji!
No further post ?
हा बॉग अजुनही तसा दुर्ल्क्षीतच राहीला आहे, आपले लेख खुप चांगले असतात.
ho to nehmi lihine hot naahi... tyasaathi kahitari nave wachaave laagte.. lavakarach lihaayalaa have.
छन आता सारे माहिती इथेच मिळेल :)
काळ्यावरच्या पांढर्याच्या किंवा युयुत्सुंच्या गॉ(गू)गलाच्या प्रभावाखाली नसाल तर रंगसंगती बदलावी ही विनंती.
तो (.)
जशी त्यांची आज्ञा. :)) धन्यवाद
Hi priyabhashini !!
maza email ID vaidehibhave@gmail.com
Post a Comment