वेडात वीर दौडले... तीनशे सात
म्यानातून उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात
वेडात मराठे वीर दौडले सात
कुसुमाग्रजांच्या या अप्रतिम पंक्तींनी मराठी मानसात आणि मराठी साहित्यात प्रतापराव गुजर आणि त्यांच्या साथीदारांना मानाचे पान दिलेले आहे. इतिहासात मात्र पावनखिंडीला जे स्थान आहे ते नेसरीच्या खिंडीला नाही असे दिसते. महाराजांचा शब्द पाळण्यात सरसेनापती चुकले. त्यांनी भावनेच्या भरात आपले प्राण खर्ची घातले. राज्याभिषेकाआधी काही थोडक्या दिवसांत राज्याला सेनापती नाही अशी स्थिती राज्यात निर्माण झाली. असे नेमके काय झाले होते प्रतापरावांकडून, याविषयी सर्वश्रुत असणारी कहाणी पुढीलप्रमाणे -
सन १६७३ साली शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते. याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली की "खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. ”
महाराजांची आज्ञा घेऊन प्रतापराव आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले. बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने खानाला पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला चढवला. त्यानंतर झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली. पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्याने प्रतापरावांकडे आपला वकील पाठवला. वकिलाच्या रदबदलीने आणि गोड शब्दांनी प्रतापरावांचे मन द्रवले. खानाला असा हिसका दाखवल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी खात्री त्यांना वाटली आणि त्यांनी वकिलाच्या प्रार्थनेचा स्वीकार करून खानाला अभय दिले. इतकेच नाही तर त्याला कैद न करता, मुक्काम हलवण्यास वाट करून दिली.
या लढाईची बातमी महाराजांना कळल्यावर ते साहजिकच चिडले. महाराजांच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका त्यांना होतीच. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून "सला काय निमित्य केला? ” असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले.
महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच बहलोलने हल्ले पुन्हा सुरू केले. शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली होती. यांत होणारे बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते. त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, “हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे. ” महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर त्यांना लागली आणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह ते खानावर चालून गेले. खानाच्या अफाट सैन्यासमोर या सात वीरांचा निभाव लागणे केवळ अशक्य होते आणि परिणामी धाडस आणि शौर्याची परिसीमा गाठणारे हे वीर धारातीर्थी पडले. महाराजांना ही वार्ता कळल्यावर ते अतिशय दु:खी झाले. राज्याच्या सरसेनापतीला दूरदृष्टी हवी ही अपेक्षा महाराजांनी करणे स्वाभाविक होते परंतु भावनेच्या भरात प्रतापरावांसारखा निधड्या छातीचा वीर दुसरी चूक करून बसला.
प्रतापरावांच्या मृत्यूचे मराठाशाहीवर नेमके परिणाम कसे झाले याबाबत मला फारसे वाचायला मिळाले नाही परंतु सर्वसामान्य अंदाज लावायचा झाला तर राज्याचा सरसेनापती अशा रितीने मृत्यूला कवटाळतो तेव्हा सैन्यात बेबंदशाही माजण्याची शक्यता असते. राजा, प्रजा, राज्य आणि सैन्य यांचे खच्चीकरण होण्याची शक्यताही असते. २४ फेब्रुवारी १६७४ ला प्रतापरावांना वीरमरण आले आणि १६ जूनला राजांना राज्याभिषेक झाला. शिवराज्याभिषेक जवळ आला असता सरसेनापतीचा मृत्यू होणे ही घटना राज्यस्थापनेसाठी नक्कीच पूरक नसावी. निश्चलपुरी महाराजांनी अपशकुन म्हणून प्रतापरावांच्या मृत्यूचे कारण दाखवल्याची घटनाही वाचनात येते.
उतावळा, भावनाप्रधान स्वभाव आणि दूरदृष्टीचा अभाव ही कारणे राज्याचा सरसेनापती हिरावून घेण्यास कारणीभूत ठरली. इतके सर्व असूनही, प्रतापरावांच्या अतुलनीय धाडसाचे कोठेतरी कौतुक करावेसे वाटते. गैरजबाबदार कृत्य हातातून घडले तरी त्यांची स्वामीनिष्ठा वाखाणण्याजोगी होती. खुद्द महाराजांना त्याविषयी शंका असावी असे वाटत नाही. आपल्या जिवाचा, घरादाराचा, कुटुंबाचा विचार न करता केवळ स्वाभिमानाला ठेच लागली म्हणून स्वामीनिष्ठेपायी आपला जीव ओतून टाकणाऱ्या या वीरांच्या धमन्यांतील रक्तात असा कोणता गुण असावा की कोणताही इतर विचार न करता त्यांनी बहलोलखानाच्या सैन्यावर चालून जाण्याचा निर्णय घेतला; यामागील नेमकी मानसिकता समजून घेणे कठिण वाटते.
तरीही, नेसरीच्या खिंडीला पावनखिंडीचे महत्त्व नाही याचे कारण प्राणार्पण कोणी, कधी आणि नेमके कशासाठी केले याला इतिहासात महत्त्व आहे. बाजीप्रभूंचे प्राणार्पण आणि प्रतापरावांचे प्राणार्पण यांत फरक दिसून येतो. युद्धात बरेचदा हार-जीत यांच्यापेक्षाही मागाहून होणारे परिणाम महत्त्वाचे ठरतात. बाजीप्रभूंचे बलिदान महाराजांना सुखरूप ठेवण्याकामी आले. बहुधा, मूठभर सैनिकांसह बाजीप्रभू मागे राहिले तेव्हाच त्यांचा मृत्यू अटळ आहे हे सर्वांना माहित असावे. प्रतापरावांच्या बाबत तसे होत नाही. कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितेने मात्र प्रतापरावांच्या प्राणार्पणाचे उदात्तीकरण झाले. या कथेसारखी भासणारी पाश्चात्य इतिहासातील एक प्रचलित कथा पुढे देता येईल. ती म्हणजे थर्मापलैयच्या लढाईची.
प्राचीन ग्रीकमधील अथेन्स आणि स्पार्टा ही दोन प्रसिद्ध शहर-राज्ये गणली जातात. अथेन्स आणि स्पार्टा एकमेकांपासून फार लांब नाहीत परंतु या दोन्ही राज्यांचे नीतिनियम, कायदे भिन्न होते. अथेन्स हे समुद्राजवळ असल्याने समुद्र व्यापारात हे राज्य अग्रेसर होते. व्यापाराच्या निमित्ताने अनेकविध संस्कृतींशी आलेल्या संबंधातून अथेन्सवासीयांचा सामाजिक, राजकीय दृष्टीकोण पुरोगामी होता. या उलट, स्पार्टा हे ग्रीक प्रदेशात आतवर वसलेले शहर-राज्य. सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले. शत्रूराज्यांमुळे सतत सावध असलेले आणि त्यामुळे सांस्कृतिक बाबींमध्ये संकुचित राहिलेले. स्पार्टाचे कायदे आणि नीतिनियम हे अथेन्सपेक्षा क्रूर होते. केवळ सुदृढ मुलांना येथे वाचवले जाई. अशक्त आणि अपंग बालकांना मारले जाई. लष्करी प्रशिक्षण सक्तीचे होते. दोन्ही शहरांत गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. यापैकी, स्पार्टातील गुलामांना हेलॉट असे संबोधले जाई. इतर राज्यांतील गुलामांपेक्षा हेलॉटांना थोड्या अधिक सवलती होत्या. त्यांना जमीन कसता येई पण इतर नागरिकांपेक्षा अधिक शेतसारा भरावा लागे. स्पार्टाच्या नागरिकांकडून हेलॉटचा मृत्यू हा दखलपात्र गुन्हा नसे. प्रामुख्याने हेलॉट हे कामगार किंवा कलाकार असत. सैन्यातही त्यांची भरणा होई. आपले स्वातंत्र्य त्यांना विकत घेण्याची मुभा होती.
अथेन्स आणि स्पार्टाप्रमाणेच ग्रीसमध्ये इतर अनेक लहान-मोठी राज्ये होती. ग्रीसच्या जवळचे प्रबळ राष्ट्र पर्शियाचे. पर्शियाचा सम्राट झेरेक्सिस याने इ.स.पूर्व ४८३ पासून सैन्याची मोठी जमवाजमव केली आणि इ.स.पूर्व. ४८० मध्ये ग्रीसवर भूमार्गे आणि समुद्रमार्गे लाखोंच्या सैन्यानिशी हल्ला चढवला. झेरेक्सिसने हल्ल्याची वेळ ऑलिंपिक्सचे खेळ आणि कार्निया या ग्रीक सणाच्या सुमारास ठरवली होती. याचे कारण या काळात ग्रीक शस्त्रे उचलत नसत. कार्नियाच्या दिवसांत शस्त्र उचलणे दैवी कोपास कारण होऊ शकते अशी प्रचलित श्रद्धाही होती. ग्रीकांना झेरेक्सिसच्या स्वारीचा सुगावा लागताच त्यांनी आपापसांतील वैर बाजूला ठेवून एकत्रित होऊन लढायचे ठरवले. त्यानुसार समुद्रमार्गे येणारा पर्शियन सैन्याचा ताफा रोखण्यास ग्रीक सेना आर्टेमिसिअमच्या सामुद्रधुनीत एकत्रित झाल्या. स्पार्टावर या काळात लिओनायडस या राजाचे राज्य होते. त्याची सेनाही मित्र ग्रीक सेनेत सहभागी होती. असे म्हणतात की स्वारीपूर्वी लिओनायडस डेल्फायच्या पुजारीणीचा सल्ला घेण्यास गेला असता तिने त्याला भविष्य सांगितले होते की "पर्शियन युद्धात एकतर स्पार्टाचा विनाश होईल आणि तसे न होता राज्य वाचले तर राजाचा विनाश नक्की होईल. "

संदर्भः
द स्पार्टन्स - द वर्ल्ड ऑफ द वॉरिअर हिरोज ऑफ एन्शंट ग्रीक्स डिसिजीव बॅटल्स - थर्मापलै - हिस्टरी चॅनेल
विकिवर लिओनायडस प्रतापरावांवरील मटामधील लेख याखेरीज वर्तमानपत्रांतील अनेक लेखांचा संदर्भ. १ चित्रे: सर्व चित्रे विकिपिडीयावरून
3 comments:
'विखुरलेले मोती' मागची कल्पना खूपच चांगली आहे. संगीतक्षेत्रात महाराष्ट्रात मागल्या शतकाच्या पूर्वार्धात इतकी कामगिरी घडली की अनेक गुणी कलाकार तुलनेने झाकोळले गेले. अगदी १९७०-च्या सुमारासही राम मराठे, भालचंद्र पेंढारकर (भालजी नाहीत, तर बापू पेंढारकरांचे चिरंजीव), प्रसाद सावकार ही मंडळी संगीतनाटकाच्या क्षेत्रात कामगिरी बज़ावत होती. यातला कोणीच वसन्तराव देशपांडे यांच्या तोडीचा नव्हता; पण आपण वसंतराव एके वसंतराव करतो, ते बरोबर नाही.
कोल्हापूरच्या कै आनन्दराव लिमये यांचे नावही झाले नाही. ग्वाल्हेर घराण्याचे कृष्णराव शंकर पंडित, यशवंतबुवा ज़ोशी यांना योग्य प्रसिद्धी मिळाली नाही. तीच गत जगन्नाथबुवा पुरोहित, गजाननबुवा ज़ोशी, वामनराव पाध्ये यांची. अण्णासाहेब रातंजनकर, के जी गिंडे या वाग्गेयकारांना शास्त्रीय संगीताचे अभ्यासक मानतात; पण अभिजात संगीतात रस नसलेला सर्वसामान्य माणूस तर सोडाच, मैफ़िलींतही फक्त बड्या धेंडांचीच गाणी ऐकणार्या लोकांच्या संकुचितपणामुळे या कलाकारांची जनमानसानी उपेक्षाच केली.
आणि साहित्यात निव्वळ ललितच वाचण्याच्या वेडापायी (पु ल एके पु ल) वि ल भावे, शं गो तुळपुळे, राजवाडे, शेजवलकर, गणेश हरी खरे, न र फाटक, डॉ केतकर, ल रा पांगारकर या संशोधक विद्वानांची पुस्तके कोणी वाचतच नाही. वाचनालयांमधे हज़ारो पुस्तके धूळ खात पडली आहे, आणि वाचनालये चालवायला समाज़ाभिमुख कार्यकर्ते मिळेनासे झाले आहेत.
याउलट आशा भोसले तिची वाईटातली वाईट गाणी निवडून गाते, आणि हज़ारो लोक महागडी तिकीटे काढून ज़ातात. आशाची म्हणे तक्रार आहे की लोकांनाच भंकस गाणी आवडतात, तर गायक काय करणार? गायक घरी बसू शकतात. मंगेशकर भगिनींसारखे पैशाची गरज़ नसलेले आणि पुढच्या कारकीर्दीची चिंता नसलेले तर नक्कीच शांत बसू शकतात. पण महाराष्ट्रात सध्या फक्त सवंग कलांची चलती आहे.
I like your posts. They are very informative and authentic. Where did you find all this information on mahabalipuram and history of maharashtra before shivaji raje?
Leena, I usually give references along with the article. I have read articles and watched a documentary on Mahabalipuram. History before Shivaji is available on internet and all.
Thanks for your comment.
Post a Comment