Wednesday, August 02, 2006

राजे सरफोजी आणि सरस्वती महाल ग्रंथालय

इजिप्त व मेसोपोटेमिया सारख्या ठिकाणी संस्कृतींचा (भाषा, लिपी वगैरे) उदय झाल्यावर माणसाला हळूहळू लिखित दस्तावैज तयार करण्याची गरज पडू लागली असा ज्ञात इतिहास आहे. पुरातत्त्ववेत्त्यांना हल्लीच सापडलेली ४०००(?) वर्षांपूर्वीची सुमेरियन मृत्तिका पट्टी ही लिखित दस्तावैजातील सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो.

इजिप्त मध्ये नाईल काठी उगवणार्‍या पपायरस या झाडापासून बनवल्या जाणा-या कागदावर, मेसोपोटेमियात चिकण मातीच्या पट्ट्यांवर आणि भारतात बेतुल वृक्षापासून बनवल्या जाणा-या भूर्जपत्रांवर लिखाणाला सुरुवात झाली. या बरोबरच हे हस्तलिखित जपून ठेवण्याची आणि इतरांना व पुढच्या पिढीला उपलब्ध करून देण्याची गरज भासू लागली. ज्ञान संचयासाठी लागणा-या या गरजेमुळेच नंतरच्या काळात ग्रंथालयाची उत्पत्ती झाली असावी.

ग्रंथालयाचा सर्वात जुना उल्लेख ग्रीक इतिहासात सापडतो. त्याकाळी ग्रंथालये ही शासनकर्ते व अधिकारी विद्वानांची खाजगी मालमत्ता असून त्यात सर्वसामान्य जनतेला प्रवेश नसावा असे वाचनात आले आहे. ख्रि. पू. तिसऱ्या शतकात टोलेमी दुसरा याच्या काळातले ऍलेक्झांड्रीयाचे ग्रंथालय त्या काळी जगातले सर्वात भव्य ग्रंथालय म्हणून गणले जायचे. भारतातही नालंदा व तक्षशीला सारख्या विद्यापीठांमध्ये अशी ग्रंथालये होती. नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय ९ मजली असल्याचे वाचनात आले आहे. ही ग्रंथालये केवळ विद्यार्थी व सन्माननिय पाहुणे केवळ यांच्यासाठीच होती. दुर्दैवाने त्याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या नंतरच्या इतिहासातही ग्रंथालयांविषयी फार माहिती दिसत नाही.

त्यानंतर मध्ययुगीन कालातही अशी अनेक खाजगी ग्रंथालये असण्याचा संभव आहे. कलाप्रेमी राजे व संस्थानिक यांनी आपल्या खाजगी ग्रंथालयांची स्थापना केली होती. यातील एका महत्वाच्या आणि सध्याही अस्तित्वात असणा-या "सरस्वती महाल ग्रंथालयाची" माहिती हल्लीच माझ्या वाचनात आली. शिवाजी राजांच्या वंशातले राजे सरफोजी यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली होती.

सरफोजी राजे (१७७७-१८३२): शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी (व्यंकोजी) राजे यांच्यापासून आठव्या पिढीत सरफोजी राजांचा जन्म झाला. (ते दत्तक पुत्र असल्याचे वाचनात आले आहे) १७९८ साली ते तंजावूरच्या गादीवर आले. सरफोजी राजे हे कलासक्त, साहित्यप्रेमी आणि विद्येचे आदर करणारे होते. त्यांच्या राज्यकालात तंजावूरला विद्येच्या माहेरघराचा दर्जा प्राप्त झाला. वाचन आणि ज्ञानसंचयाच्या विलक्षण आवडीतून त्यांनी सरस्वती महाल ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयासाठी त्यांनी परदेशातून विविध विषयांवरची सुमारे ४००० पुस्तके/ ग्रंथ खरेदी केली. अस म्हटलं जात की ही पुस्तके/ ग्रंथ त्यांनी स्वत: वाचले होते. या ग्रंथालयात नाट्यशास्त्र, नृत्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, हत्ती-घोडे यांचे प्रशिक्षण, वेदान्त, ज्योतिष, व्याकरण, संगीत अशा अनेक विषयांवरील ग्रंथ आढळतात.

सरफोजी राजांनी दक्षिणेत पहिला देवनागरी छापखाना टाकला. त्यात छपाईसाठी दगडाक्षरांचा वापर करण्यात आला. तसेच त्यांनी वैद्यक शास्त्रातील प्रगती करता धन्वंतरी महाल प्रयोगशाळेची स्थापना केली. यात ऍलोपथी, आयुर्वेद, युनानी, सिद्ध वैद्यांकडून संशोधन चालत असे. या प्रयोगशाळेत अनेक औषधी वनस्पतींचा अभ्यास करून त्यांची खुलासेवार वर्गवारी करण्यात आली. त्यांना चित्रकलेतही विशेष रस होता हे त्यांच्या दरबारातील तैलचित्रांवरून जाणवून येई. त्यांच्याकडे पुरातन दुर्मिळ नाण्यांचा संग्रह ही होता.

सरफोजी महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारने तंजावूरचे राज्य खालसा केले.

सरस्वती महाल ग्रंथालय: हे ग्रंथालय संपूर्ण जगात; मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते. या ग्रंथालयात सुमारे ४६००० हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील प्रती आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन १४६८ मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, अंबर होसैनी या मुसलमान कवीने केलेले भगवद्गीतेचे मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा बंगाली लिपीतील संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.

मराठी हस्तलिखिते: इसवी सन १६७६ ते १८५५ च्या मराठा राज्यकाळात लिहिली गेलेली मराठी हस्तलिखिते या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. त्यांची संख्या अदमासे १८५६ आहे. यात संतकवी रामदासी व दत्तात्रय मठातील विपुल साहित्य आहे. पुढे जेव्हा हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले गेले त्यावेळेस अनेक मराठी पंडित व विद्वानांनी लिहिलेल्या १२२० हस्तलिखितांची या संग्रहात भर घातली गेली. आता त्यांची संख्या ३०७६ इतकी आहे.

यातील बरेचसे साहित्य महाराष्ट्रात उपलब्ध नसल्याने त्याला दुर्मिळतेचे एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. माधव स्वामींचे रामायण, महाभारत, मेरू स्वामीचे अवधूत गीता टीका व रामसोहळा, मुकुंद स्वामींचे श्री रामकृपा विलास, राघव स्वामीचे आत्मबोध, आणि अनंत मुनी यांची भगवद् गीता यांचा या दुर्मिळ हस्तलिखितांत समावेश आहे.

याखेरीज तामीळ, संस्कृत, उर्दू हस्तलिखितांचाही या ग्रंथालयात समावेश आहे. मोडी लिपीतील राज्यकारभार विषयक दैनंदिनी, हिशेब, टिप्पणी, पत्र व्यवहार या सारखी लिखितेही या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. याखेरीज मराठी भाषेतील आणि मोडी लिपीत लिहिलेल्या चार प्राचीन ताम्रपट्टीका या ग्रंथालयात दर्शनी ठेवलेल्या आहेत. तसेच अनेक प्राचीन नकाशांचाही संग्रह केलेला आहे.

सध्या हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले असून त्यातील संग्रहाचा संदर्भकोश म्हणून वापर करता येतो.