Monday, November 24, 2008

महाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे

प्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खजुराहो, कोणार्क, हम्पी आणि चालुक्यांची बदामी येथील मंदिरे त्यांच्या स्थापत्य आणि शिल्पकामांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि पर्यटनस्थळेही गणली जातात।

महाराष्ट्रातही अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने सजवलेली प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत याची माहिती अनेकांना नसते. महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवलेली जी देवळे दिसतात ती बरेचदा हेमाडपंती या नावाने ओळखली जातात. वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर इत्यादी. हेमाडपंती पद्धतीत थोडा बदल करून सासवडचा संगमेश्वर व वटेश्वर, धावडशी येथील परशुरामाचे आणि पालीचे खंडोबाचे देऊळ इ. मंदिरे बांधली आहेत. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत हेमाडपंती मंदिरे आहेत. हयहैय, यादव, चालुक्य हे त
त्कालीन राजे शिवभक्त असल्याने महाराष्ट्रात हेमाडपंती बांधणीची शिवमंदिरे प्रामुख्याने दिसतात.sangameshwar


चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि पटईची छते या मंदिरांना एक आगळे रूप प्रदान करतात. या मंदिरांची बांधकामे यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण समज दिसतो. तज्ज्ञांच्या मते यादव काळापूर्वीही अनेक वर्षे असे बांधकाम झाल्याचे आढळते. उत्तरेत कोरड्या बांधकामाची मंदिरे बांधण्याची प्रथा पूर्वापार होती आणि बदामीच्या चालुक्यांच्या काळातही अशी मंदिरे बांधली गेल्याचे सांगितले जाते. पण हे बांधकाम फार मोठ्या प्रमाणात झालेले नसावे आणि महाराष्ट्रात त्याचा प्रसार झालेला नसावा असे मानले जाते. परंतु यादव काळात आणि त्या नंतर हेमाडपंती बांधकामाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याचे दिसते. याचे एक मुख्य कारण मूर्तिभंजक मुसलमानांचा महाराष्ट्राला होणारा उपद्रव हे असावे. हेमाडपंती मंदिरे पक्क्या बांधकामाची नसल्याने ही मंदिरे झटकन उभारणे शक्य होत असावे. अर्थातच, दर्जा भरून पक्के बांधकाम नसल्याने सद्यस्थितीत ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला नाही ती मोडकळीला आलेल्या अवस्थेत दिसतात. भूकंप, पूर, पावसाच्या मार्‍याने होणारी झीज, दगडांच्या भेगांतून पसरत जाणार्‍या झाडाझुडपांनी मंदिरांची दुर्दशा केली आहे.
Amruteshwar

यादव राजे कलाप्रेमी असल्याने हेमाडपंती धाटणीची अनेक मंदिरे या काळात निर्माण झाली. त्यांची धाटणी, शिल्पकाम, बांधकाम यांत कमालीचे साम्य आढळते आणि तरीही प्रत्येक मंदिराचे आपले स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य दिसून येते. या मंदिराचे स्थापत्यकार हेमाडपंत यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडे असले तरी या युगपुरुषाबद्दल फारशी माहिती महाराष्ट्राला नाही.

हेमाडपंत

हेमाडपंत हे हेमाद्री पंडित या नावानेही ओळखले जातात. हेमाडपंतांविषयी अनेक स्थानिक लोककथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक अशी:

हेमाडपंतांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या आईचा बाळंतपणात मृत्यू झाला. पोरका हेमाद्री अतिशय प्रतिभावान आणि विद्वान होता. त्याने भाषा आणि विविध शास्त्रांत प्रावीण्य प्राप्त केले. वैद्यकशास्त्रात त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता. असे सांगतात की रावणाचा भाऊ बिभीषण आजारी असताना हेमाद्रीने त्याची शुश्रूषा केली आणि त्याच्या बदल्यात प्रसन्न होऊन बिभीषणाने हेमाद्रीला वर मागण्यास सांगितले. लंकेच्या समृद्धीवर भाळलेल्या हेमाद्रीने लंकेसारखी मंदिरे राक्षसांकरवी आपल्या प्रदेशात बांधण्याचा वर मिळवला आणि बिभीषणाने तो आनंदाने देऊ केला. मात्र त्याने एक अट घातली. ती अशी की राक्षस फक्त एकच रात्र काम करतील. दर्जा भरून केलेले बांधकाम नसल्याने हेमाडपंतांनी एका रात्रीत सर्व मंदिरे उभी केली. या आख्यायिकेबरोबरच हेमाडपंत श्रीलंकेतून लिपी शिकून आल्याची दुसरी एक आख्यायिका ऐकायला मिळते. हीच लिपी मोडी म्हणून प्रसिद्ध झाल्याचे कळते. परंतु मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाहही दिसतो।

आख्यायिका बाजूला सारून ऐतिहासिक हेमाडपंतांचा शोध घेतला असता हेमाद्री पंडित हे यादवांच्या काळातील मुख्य प्रधान होते असे दिसून येते. यादव राजे महादेव (इ. स. १२६०-७०) आणि रामचंद्र (इ. स. १२७१-१३०९) यांच्या काळातील हे अतिशय विद्वान मंत्री असावेत. यादव साम्राज्याचे ते प्रधान, मुख्य सचिव असल्याने आणि याचबरोबर जमिनीची पाहणी करून महसूल ठरवणे, तो वसूल करणे, उत्पन्न ठरवणे इ. हेही करत असल्यामुळे त्यांना "श्रीकरणाधिप" (जमाबंदीचे प्रमुख) या पदवीनेही ओळखले जाते.

हेमाडपंतांचा जन्म द. कर्नाटकात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कामदेव होते. पुढे ते कर्नाटक सोडून महाराष्ट्रात स्थायिक झाल्याचे कळते. हेमाडपंत संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक तर होतेच, परंतु लेखक, कवी, स्थापत्यशास्त्रज्ञ आणि धन्वंतरीही होते. यादवांच्या दरबारातील एक विद्वान मुत्सद्दी म्हणून त्यांची गणना होते. धर्मशास्त्रावरील चर्तुर्वग चिंतामणी हा ग्रंथ, आयुर्वेदरसायन हे वाग्भटाच्या अष्टांगहृदय या ग्रंथावरील भाष्य, आणि इतरही अनेक साहित्यनिर्मिती त्यांनी केल्याचे सांगितले जाते. मराठी भाषेसाठी देवनागरीपूर्वी वापरण्यात येणार्‍या मोडी लिपीचा शोधही त्यांनी लावल्याचे सांगितले जाते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे व डॉ. भांडारकरांच्या मते ही लिपी हेमाडपंत श्रीलंकेतून घेऊन आल्याचे सांगितले जाते, परंतु इतर तज्ज्ञ ते ग्राह्य मानत नाहीत।

स्थापत्यशास्त्रात हेमाडपंतांनी चुना किंवा मातीचा दर्जा न भरता मध्यम आकाराचे दगड कापून, खालच्या दगडात खड्डा करून वरील दगडाची खुंटी एका विशिष्ट कोनात खालच्या दगडाच्या खड्ड्यात बसवून घडीव वास्तू बांधण्याची कलाही प्रसिद्ध केली. हे दगड तासून त्यावर कोरलेल्या शिल्पाकृती तत्कालीन संस्कृतीचे आणि कलाविष्काराचे उत्तम नमुने आहेत. थोड्याशा परावर्तित प्रकाशातही मंदिराच्या वास्तुयोजनेतील सौंदर्य कायम ठेवल्याचे दिसते आणि संपूर्ण वास्तूच्या उंचीचा किंवा वर झेपावत जाणार्‍या स्थापत्याच्या प्रभाव पडणे हे या मंदिर रचनांचे वैशिष्ट्य मानले जाते।

अशा अनेक मंदिरांच्या निर्मितीमुळे यादव साम्राज्याच्या आधीही अस्तित्वात असणाऱ्या या स्थापत्यकलेला हेमाडपंतांच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. या शैलीचे प्रसिद्ध उदाहरण म्हणून वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचे नाव घेता येईल आणि हेमाडपंती स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून नाशिकजवळील गोन्देश्वर मंदिराचे नाव घेता येईल.

घृष्णेश्वर मंदिर

औरंगाबादजवळील दौलताबादेपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर असणारे घृष्णेश्वराचे शिवमंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांतील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग गणले जाते. लाल पाषाणात अप्रतिम कोरीव काम केलेले हे मूळ मंदिर पुरातन असून, सोळाव्या शतकात शिवाजीराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आणि त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने ते अद्यापही चांगल्या अवस्थेत आहे.DSC_1253_resize
घृष्णेश्वराचे प्राचीन मंदिर कसे अस्तित्वात आले याबद्दलही अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार, घृष्मा (किंवा घृष्णा) नावाची एक शिवभक्त स्त्री दरदिवशी शिवलिंग बनवून नंतर ते भक्तिभावाने शिवतीर्थात विलीन करत असे. या बाईला घरात आपल्या सवतीकडून बराच जाच होता. एके दिवशी सवतीने घृष्मेच्या मुलाला कपटाने ठार केले. दु:खाने वेडीपिशी झालेली घृष्मा शिवतीर्थावर येऊन शंकराची पूजा करून आळवू लागली आणि त्याच शिवतीर्थातून तिचा मुलगा पुनर्जीवित होऊन परतला. यावेळेस शंकराने तिथे उपस्थितांना दर्शन दिले आणि गावकऱ्यांनी शंकराचे मंदिर त्या ठिकाणी बांधले, जे घृष्णेश्वराच्या नावाने प्रसिद्ध झाले।
DSC_1256_resize

अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आढळून येतो. त्यानुसार ' श्री शके १६९१ विरोधी वत्सरी माघ सुरी नाग बुध दिनी होळकर कुलाल वाल कल्पवल्ली श्री अहिल्याबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला असे श्रीरस्तू शिवमाकल्पं' हे कोरलेले आढळते. आज सुमारे एक एकर क्षेत्रफळात वसलेले हे मंदिर मालोजीराजे आणि अहिल्याबाईंनी केलेल्या जीर्णोद्धारामुळे सुस्थितीत आहे. मंदिराच्या चार दिशांना चार महादरवाजे असून चौरसाकृती शिवतीर्थासभोवती अष्टतीर्थांची आठ सुंदर आणि सुबक देवालये येथे आहेत. शिवमंदिराचे गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप असे तीन मुख्य भाग असून मंदिराचा आकाशाच्या दिशेने झेपावाणारा उंच कळस आणि त्यावरील अप्रतिम कोरीव काम लक्षवेधक आहे.


गोन्देश्वर मंदिर

नाशिकपासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर सिन्नर येथील गोन्देश्वराचे मंदिर हा हेमाडपंती स्थापत्यकलेचा आणखी एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. मध्ययुगीन काळातील अतिशय सुंदर आणि सुबक कारागिरीचा आविष्कार म्हणून गोन्देश्वर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे असाही कयास बांधला जातो. महाराष्ट्रात आढळणार्‍या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणती होते.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची वास्तू पायर्‍या पायर्‍यांनी बनलेल्या १२५ फूट x ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे.

हे मंदिर इतर हेमाडपंती मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झाक त्यावर दिसते. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोन्देश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. इतर मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर थोडे उंचावर असून मंदिराचे सभामंडप आणि गर्भगृह असे भाग आहेत. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पट्टईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्‍या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते।

नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते।

आभार: या लेखाला माहितीचा हातभार लावण्याबद्दल चित्तरंजन भट आणि शुद्ध मराठी यांची आभारी आहे. संगमेश्वर, अमृतेश्वर आणि घृष्णेश्वर मंदिरांची प्रकाशचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल ध्रुव मुळे यांची आणि गोन्देश्वर मंदिराचे प्रकाशचित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल पराग पुरंदरे यांची अतिशय आभारी आहे.