रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांवर उहापोह करणार्यांची, त्याकडे इतिहास म्हणून बघणार्यांची आणि राम-कृष्ण यांची विष्णूचे अवतार म्हणून भक्ती करणार्यांची संख्या अमाप असावी. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेकांना या महाकाव्यांनी, त्यातील पात्रांनी आणि देवस्वरूप अवतारांनी भुरळ घातली आहे.
मध्यंतरी विसुनानांनी हेलिओडोरसच्या स्तंभाबद्दल लिहिलेल्या "गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१" या लेखातून कृष्णभक्तीची/ भागवत् धर्माची परंपरा भारतात किती पुरातन आहे त्यावर माहिती दिली होती. त्या लेखातून पुढे आलेल्या निष्कर्षात कृष्णभक्ती ही इ.स. पूर्व ३०० च्याही आधी केली जात असावी असा सहज निष्कर्ष निघतो. या निष्कर्षाला पुष्टी देण्यासाठी मेगॅस्थेनिसने इंडिकामध्ये शौरसेनींविषयी दिलेली माहिती, अलेक्झांडरने शिव आणि कृष्ण या दोन्ही देवता ग्रीकांना पूर्वापार माहित असल्याचा केलेला दावा, हेलिओडोरसचा गरुडध्वज हे पुढे करता येतात.
कृष्णाप्रमाणेच देवपदावर पोहोचलेल्या रामभक्तीची परंपरा किती जुनी असावी हा विचार मनात डोकावतो परंतु मूळ मुद्द्याला हात घालण्यापूर्वी राम आणि कृष्ण यांना प्रसिद्धी देणार्या रामायण आणि महाभारताकडे एकवार पाहू.
***
कोंबडी आधी की अंडे या प्रश्नाचे मनाजोगे उत्तर मिळालेले नसले तरी "रामायण आधी की महाभारत" या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडून चटकन "रामायण आधीचे" असे दिले जाते. याला प्रमाण म्हणून रामायणाचा काळ, त्यावेळी असणारे समाजजीवन, पौराणिक व्यक्ती, वेषभूषा अशा अनेक गोष्टींच्या आधारे रामायणच आधीचे असा निष्कर्ष काढला जातो. त्यापैकी प्रामुख्याने येणारे काही मुद्दे असे -
१. पौराणिक वंशावळीप्रमाणे राम किंवा त्याचा रघुवंश हा कुरुवंशाच्या आधी येतो.
२. रामायणात महाभारताचा उल्लेख नाही पण महाभारतात रामकथेचा आणि त्यातील पात्रांचा (उदा. हनुमान) उल्लेख/ कथा आहेत.
३. रामायणाचे कथानक त्रेतायुगात घडते आणि महाभारताचे द्वापारयुगात.
परंतु विचार केल्यास या विधानांतून राम ही व्यक्ती कुरुवंशाआधी जन्माला आली होती इतकेच कळते. रामायण हे महाभारताआधी रचले हे सिद्ध होत नाही. एखाद्या उत्तम लेखकासाठी त्याची कथा सद्य काळापेक्षा मागे जाऊन रचणे हे अशक्य कार्य नाही. उदा. लगान या चित्रपटात दाखवलेली पात्रे, काळ आणि कथा सांगते की क्रिकेट हा खेळ गुजराथमधील काही अडाणी गावकर्यांनी ब्रिटिशांसमवेत लीलयेने खेळून दाखवला. ही कथा २१ व्या शतकात लिहिलेली असेल तरी १००-१२५ वर्षांपूर्वीचा काळ निर्माण करणे, तत्कालीन इतिहासातील खर्या व्यक्तिंशी त्या कथानकाशी सांगड घालणे आणि एक नवे कथानक रचणे चांगल्या लेखकाला अवघड नसते.
एका वेगळ्या उदाहरणात, इलियडचा पूर्वभाग सायप्रिआ हा इलियडनंतर रचला गेल्याचा प्रवाद आहे. असे करताना लेखकांनी हे पूर्वभाग आहेत याची जाणीव ठेवून लेखन केल्याचे निर्वाळे तज्ज्ञ देतात. अगदी अलिकडल्या काळातील उदाहरण बघायचे झाले तर ट्वायलाइट या प्रसिद्ध कादंबरीत येणार्या ब्री टॅनर या संक्षेपाने येणार्या पात्रावर पुढे "द शॉर्ट सेकंड लाइफ ऑफ ब्री टॅनर" अशी कादंबरी लिहिण्यात आली.
अशाप्रकारे संक्षेपाने येणार्या पात्राचा किंवा कथानकाचा विस्तार करून नवे कथानक रचणारा लेखक योग्य काळ उभा करतो, त्या काळाशी सुसंगत मांडणी, समाजव्यवस्था, राजकारण यांचा समावेश करून कथेला सुसंगती आणतो.
महाभारताचा विचार करता, महाभारतात संक्षेपाने रामकथा
(रामोपाख्यान) येते. याला रामकथा असे म्हटले आहे कारण महाभारतात वाल्मिकीने रचलेल्या रामायणाचा उल्लेख नाही. इतकेच नाही तर या कथेत राम हा एक राजपुत्र म्हणून येतो. दैवी पुरुष म्हणून नाही. वाल्मिकी नावाच्या कोणत्याही ऋषींचा महाभारतात उल्लेख नाही. महाभारतात या रामकथेच्या संक्षेपाने येण्याबद्दल चार गृहितके मांडता येतील -
- रामायण महाभारता आधी रचले गेल्याने त्याचा संक्षेपाने महाभारतात रामकथा (रामोपाख्यान) उल्लेख येतो किंवा
- महाभारतात आलेली रामकथा ही नंतर फुलवून त्याचे वेगळे रामायण हे महाकाव्य निर्माण झाले.
- महाभारतात आलेली रामकथा ही वाल्मिकी रामायणाच्या पूर्वीच्या एखाद्या रामायणावर आधारित आहे.
- रामकथा आणि रामायण हे एका तिसर्याच रामस्रोतावरून निर्माण झाले आहेत.
यापैकी कोणते विधान खरे मानायचे हा गुंता होतो. विविध तज्ज्ञ वरीलपैकी विविध मते मांडून आपापले तर्क मांडतात. सध्या आपण केवळ दुसर्या विधानाबाबत विचार करू.
- महाभारतात आलेली रामकथा ही नंतर फुलवून त्याचे वेगळे रामायण हे महाकाव्य निर्माण झाले. -
या मुद्द्याच्या पुष्टर्थ काही गृहितके खाली मांडत आहे.
१. रामायणातील राम हा कथेचा नायक आहे तर कृष्ण महाभारतातील प्रमुख पात्र नाही. एकदा विष्णूच्या अवताराने नायकाचा अवतार घेतल्यावर त्या पुढील अवतारात तो नायक नसावा ही एक प्रकारची उतरंड वाटते.
२. रामकथेतील राम हा दैवी पुरुष नाही. अहल्येचे प्रसिद्ध प्रकरण रामकथेत येत नाही. तो दैवी पुरुष आहे असे दाखवण्यासाठी जे बालकांड आणि उत्तरकांड याचा वापर होतो ते दोन्ही अनेक तज्ज्ञांच्या मते मागाहून भरती झालेले असावे असे मानले जातात. या वरून मूळ कथेला ठिगळे जोडून रामाला दैवी बनवण्याचा घाट कालांतराने घालण्यात आला. पुराणांतून रामाला आणि कृष्णाला विष्णूचे अवतार मानून रामाला कृष्णापेक्षा पुरातन ठरवण्यात आले. हे सर्व बदल गुप्त काळात झाले असावे असा अंदाज मांडला जातो. पुराणांना गुप्तकाळात प्रमाणित करताना त्यात अनेक फेरफार केले गेले असे मानले जाते. रामालाही दैवत्व तेव्हाच प्राप्त झाले असावे का? बौद्ध काळानंतर जेव्हा हिंदू धर्म पुन्हा बळकट झाला तेव्हा हिंदू दैवतांना बळकटी आली असे तर नव्हे?
३. प्रचलित प्रवादांनुसार महाभारत हा इतिहास तर रामायण हे आदिकाव्य मानले गेले आहे. बहुधा यामुळेच रामायणाच्या अनेक आवृत्ती दिसून येतात. त्या मानाने महाभारताच्या आवृत्तींतील फरक लहान आहेत आणि आवृत्तींची संख्याही कमी आहे. येथे उदाहरण द्यायचे झाले तर काही रामायणांत सीता ही रामाची बहिण आहे तर काहींमध्ये ती रावणाची मुलगी आहे. काही रामायणांत रावणाचा वध लक्ष्मणाकडून होतो तर दशरथ जातकात किष्किंधा, लंका, सीतेचे अपहरण वगैरे नाही. अध्यात्मिक रामायण नावाचे एक रामायण खुद्द वेदव्यासांनी रचले असे सांगितले जाते परंतु गुप्तकाळात ज्या प्रमाणे सर्व पुराणांचा लेखक व्यास बनले त्यातलाच हा एक प्रकार असावा असे एक मत पडते. यावरून राम हा कथानायक म्हणून अधिक प्रसिद्ध असावा असे वाटते.
४. स्थळ-काळाचा विचार केल्यास सरस्वती नदीच्या खोर्यातून पूर्वेकडे गंगेच्या खोर्यात तत्कालीन जमातींचे स्थलांतर झाले असे मानले जाते. महाभारत हे गंगेच्या पश्चिमेकडील खोर्यात घडते. महाभारत काळात गंगेचे पूर्वेकडील खोरे त्यामानाने उपेक्षित वाटते. महाभारतात सरस्वती नदीचा उल्लेख अनेकदा येतो. रामायणात तो किष्किंधाकांडात इतका पुसटसा येतो की तो मागाहून घातला गेला असावा अशी शंका घेतली जाते. रामायणातील कोसल देश, अयोध्या नगरी वगैरे गंगा, शरयु नदीच्या आसपासच्या भागात वसलेले प्रदेश सप्तसिंधुंना महत्त्व देत नाहीत. याउलट, महाभारतात कोसल, किष्किंधा, दंडकारण्य वगैरे प्रदेशांना महत्त्व नाही.
५. इ.स.पूर्व ४५० मध्ये 'कृष्णवासुदेव' याची प्रस्थापना यमुना आणि (लुप्त?) सरस्वती यांच्या आसपासच्या राज्यांमध्ये प्रमुख दैवत म्हणून झालेली होती. (संदर्भः गरुडध्वज..लेख) या प्रकारे राम या दैवताची प्रस्थापना त्या काळात झाल्याचे ऐकिवात नाही. दुसर्या शब्दांत कृष्णाला ज्या काळी दैवताचे स्वरूप होते त्याकाळी रामही दैवी झाला होता असे स्पष्ट विधान करण्यास खात्रीशीर पुरावे मिळत नाहीत. कृष्ण हा त्यामानाने भारतात खोलवर रुजलेला दिसतो. कधी महाराष्ट्रात विठोबाच्या रुपात तर कधी ओरिसात जगन्नाथ म्हणून, राजस्थानात श्रीनाथजी म्हणून तर गुजराथेत रणछोडराय म्हणून. रामाचे असे लोकदैवतांत रुजलेले रुप दिसत नाही.
संस्कृती या पुस्तकात इरावती कर्वे म्हणतात की वाल्मिकी रामायणाची भाषा ही महाभारतातील भाषेपेक्षा अधिक अर्वाचीन वाटते. रामायणात येणारे अहिंसेचे उल्लेखही बौद्ध काळामुळे घातले गेले असावे अशी शंका त्यांना येते. हा लेख आणि उपक्रम या संकेतस्थळावर यावर सांगोपांग चर्चा झाल्यावर इरावती कर्वेंच्या संस्कृती या पुस्तकातील रामायण-महाभारतावरील लेख मला वाचायला मिळाले. रामायणाबाबत या लेखात घेतलेल्या शंका इरावतीबाईंनीही बहुतांशी उद्दृत केल्या आहेत.
***
या विषयावर सांगोपांग चर्चा उपक्रम या संकेतस्थळावर मध्यंतरी झाली आणि त्यातून रामाला दैवत्व बौद्ध सुवर्णकाळानंतर आणि कालिदासापूर्वी प्राप्त झाले असावे या निष्कर्षाप्रत मी पोहोचले आहे.
संदर्भः
लोकदैवतांचे विश्वः र. चिं. ढेरे
The Mahabharata, Volume 2: Book 2: The Book of Assembly; Book 3: The Book of the Forest - J. A. B. van Buitenen
एशियन वेरिएशन्स इन रामायणा