एक डॉलरचे रहस्य
दा विंची कोड ही डॅन ब्राऊनची सुप्रसिद्ध कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल किंवा तिच्याबद्दल ऐकले असेल. काही प्राचीन रहस्यांचा शोध, ऐतिहासिक रहस्यांचा पाठपुरावा आणि काही प्राचीन गुप्तसंस्थांचे कामकाज असा साचा डॅन ब्राऊनच्या कादंबर्यांत सहसा आढळून येतो. दा विंची कोडमधील प्रायॉरी ऑफ झायन आणि एंजल अँड डिमन्स या दुसर्या कादंबरीतील इल्युमिनाती या गुप्तसंस्था या कादंबऱ्यांचा गाभा आहेत. एंजल्स अँड डिमन्स मधील एका प्रसंगात, कादंबरीची नायिका वित्तोरिया वेत्रा, रॉबर्ट लॅंग्डनला विचारते की "तू प्राचीन चिन्हशास्त्राकडे कसा काय वळलास? " याचे उत्तर देताना तो सांगतो "मला या शास्त्राबद्दल आवड उत्पन्न झाली ती एक डॉलरच्या नोटेमुळे! "
आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अमेरिकन डॉलरची नोट किंवा अमेरिकन पद्धतीत म्हणतात तसे, डॉलर-बिल हाताळले असावे. अमेरिकन डॉलर वापरून व्यवहार केला असावा, आपल्या खिशात, पाकिटात, पर्समध्ये डॉलर-बिल ठेवले असावे. परंतु हे करताना आपण एक प्राचीन रहस्य आपल्यासोबत बाळगतो आहोत याची जाणीव फार कमीजणांना असावी. एक डॉलरच्या नोटेकडे निरखून पाहिले तर एक गोष्ट दिसून येईल की नोटेच्या एका बाजूस संयुक्त संस्थानांचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चित्र असून दुसर्या बाजूस अमेरिका किंवा अमेरिकन इतिहासाशी दूरवर संबंधीत नसणारा एक वर्तुळाकार शिक्का आहे. या वर्तुळात एक इजिप्शियन पिरॅमिड दिसते. हे पिरॅमिडही पूर्ण नाही. मध्येच कापलेले आहे. त्याच्या शिखरावरील भागात एक प्रकाशमान डोळा असून पायथ्याशी रोमन आकडे दिसतात. पिरॅमिडच्या वर आणि खाली लॅटीन भाषेतील मजकूर आहे. गेली कित्येक वर्षे लोकांना हे चिन्ह नेमके का निवडले गेले हे गूढ उलगडलेले नाही आणि यामागे एक प्राचीन "काँस्पिरसी थेअरी" असल्याची आख्यायिका सुप्रसिद्ध आहे. अनेकांच्या मते हे चिन्ह फ्री-मेसन्स या प्राचीन गुप्तसंघटनेची देणगी असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि फ्री-मेसन संघटनेचे कार्यकर्ते फ्रॅंकलीन रूझवेल्ट यांनी त्याला डॉलरच्या नोटेवर स्थानापन्न केले आहे.
सर्वसाधारणत: या चिन्हाची माहिती काढायला गेले असता केवळ प्रेसिडेंट रूझवेल्ट यांचा या प्रकारात समावेश नसून हे चिन्ह अमेरिकेच्या राष्ट्रीय शिक्क्यावरही (Great Seal) असल्याचे सांगितले जाते. या शिक्क्याची निर्मिती १८ व्या शतकात करण्यात आली असून तिचा संबंध अमेरिकेचे आद्य संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंजामीन फ्रॅंकलीन यांच्याशी जोडला जातो. शिक्क्यावर असणार्या या चिन्हाची माहिती पुढीलप्रमाणे मिळते -
चिन्हातील खालचा अपूर्ण पिरॅमिड हा १३ पायऱ्यांचा बनलेला असून नंतर कापलेला आहे. पिरॅमिडच्या वरील भागात एक सर्वदर्शी नेत्र आहे. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीप्रमाणे हे ईश्वराचे सर्वव्यापी आणि संपूर्ण मानवजातीवर देखरेख करणारे नेत्र असल्याचे मानले जाते. पिरॅमिडच्या पायथ्याशी रोमन क्रमांक दिसतो. या पिरॅमिडच्या वर Annuit Coeptis ही लॅटीन वाक्यरचना आढळते तिचा अर्थ "कार्यारंभास त्याचा (देवाचा) आशीर्वाद आहे" आणि पिरॅमिडच्या खाली असणाऱ्या Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ "नव्या जगाची व्यवस्था" असा सांगितला जातो. इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा की बेंजामीन फ्रॅंकलीन हे देखिल फ्रीमेसन होते.
अशीच एक गोष्ट सांगितली जाते ती थोरले जॉर्ज बुश यांच्या संदर्भात आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी जॉर्ज बुश यांनी अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत आणि अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी. आय. ए. चे प्रमुख म्हणून पदे भूषविली होती. १९८९ च्या जानेवारी महिन्यात जॉर्ज बुश यांचा शपथविधी झाला तेव्हा सर्वसामान्यांच्या लक्षात न येईल अशी एक गोष्ट घडली होती. ती म्हणजे शपथविधी दरम्यान वापरली गेलेली बायबलची आवृत्ती हे नेहमीच्या बायबलपेक्षा वेगळी होती. ही आवृत्ती फ्रीमेसनांच्या गूढ आकृत्या आणि चित्रांनी सजलेली होती आणि हीच आवृत्ती अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी शपथविधीसाठी वापरली होती.
अमेरिकेचे चौदा अध्यक्ष हे फ्रीमेसन्स होते असे मानले जाते. जॉर्ज वॉशिंग्टन, थिओडोर रुझवेल्ट, अँड्रू विल्सन, फ्रॅंकलीन रुझवेल्ट, हॅरी ट्रुमन आणि थोरले जॉर्ज बुश हे त्यापैकी काही प्रमुख राष्ट्राध्यक्ष. यापैकी, ट्रुमन हे अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएचे जनक होत. बॉस्टन टी पार्टीतील सहभागापासून अमेरिकेची घटना लिहिणाऱ्यांपैकी अनेकजण फ्रीमेसन असल्याचे पुरावे सादर केले जातात. अब्राहम लिंकन यांनीही फ्रीमेसन संस्थेचे सदस्यत्व घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते आणि यावरून अमेरिकन सरकार नावाचे कळसूत्री बाहुले फ्रीमेसनांच्या गुप्तसंघटनेकडून नाचवले जाते अशी अटकळ बांधली जाते.
फ्रीमेसनांची संस्था ही एक अतिशय प्राचीन गुप्त बंधुभावसंवर्धिनी (Fraternal Organization) असून त्यात कोणत्याही जाती-धर्माचे लोक सामील होऊ शकतात याखेरीज या संस्थेची माहिती अनेकांना नसते. ही संघटना कशी अस्तित्वात आली, तीत सामील होण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते, त्यांनी राखून ठेवलेली प्राचीन गुपिते कोणती वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरे सहसा उपलब्ध नाहीत. माहिती शोधत जाता जे थोडेफार धागेदोरे हाती लागतात ते असे -
फ्रीमेसनरी या संस्थेचा उगम स्टोनमेसन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरवट आणि शिल्पकारांशी निगडित आहे. ही संस्था कधी अस्तित्वात आल्याचे कळत नसले तरी बायबलमधील प्रसिद्ध राजा सॉलोमन (सुलेमान) याचे मंदिर बांधताना त्याच्या हायरम अबीफ या प्रमुख स्थापत्यकाराची हत्या कोणतेतरी गुपित काढून घेण्यासाठी केली गेल्याचे सांगितले जाते आणि आपल्या प्राणांची किंमत देऊन ते गुपित जपणारा स्थापत्यकार, फ्रीमेसन असल्याचे सांगितले जाते. किंबहुना, फ्रीमेसनरीच्या घटनेतील एक प्रमुख मुद्दा - गुपिताचे रक्षण प्राण जाईस्तोवर करायचे असा असतो. ही प्राचीन गुपिते कोणती या बद्दल अनेक अटकळी आहेत. सुलेमानचा खजिना, होली ग्रेलचे गुपित, मध्ययुगात युरोपात मुसलमानांविरुद्ध काढल्या गेलेल्या धार्मिक युद्धमोहिमा (क्रुसेडस), अनेक मध्ययुगीन राज्यक्रांत्या, राजकीय स्थित्यंतरे आणि अशा अनेक ऐतिहासिक गुपितांचे रक्षणकर्ते फ्रीमेसन्स असल्याचे सांगितले जाते. डॅन ब्राऊनच्या दा विंची कोडमुळे प्रसिद्ध झालेले सरदार नाइट टेंप्लारही फ्रीमेसन्स असल्याचे समजले जाते. आख्यायिकांचा आणि दंतकथांचा भाग सोडल्यास फ्रीमेसन्स ही संस्था खरी असली तरी ही प्राचीन गुप्तसंस्था काळाच्या उदरात कधीतरी गडप झाली असे दिसते.
त्यानंतर इ.स. १७१७ साली किंवा त्या सुमारास इंग्लंडमध्ये फ्रीमेसन्स संस्थेचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ मेसन्स हे दगड कापणारे, घडवणारे आणि शिल्पकाम करणारे पाथरवट असले तरी १८ व्या शतकात या संस्थेचे पुनरुत्थान काही राजकारणी, उमराव, साहित्यिक, व्यावसायिक आणि कलाकारांनी केल्याचे सांगितले जाते. १८ व्या फ्रीमेसनरीची घटना, विधी,
गुपिते, कूटशब्द इतकेच नव्हे तर नवी लिपी तयार करण्यात आली. कूटशब्द आणि गुपिते राखून ठेवण्यासाठी प्राणांची शपथ घालण्याची प्रथा निर्माण करण्यात आली. मुख शहरांत फ्रीमेसन्सची आलिशान आणि ऐश्वर्यसंपन्न सभागृहे आहेत. यांना ग्रँड लॉजेस म्हणून ओळखले जाते. स्थापत्यशास्त्राची उपकरणे वापरून त्या मध्यभागी G लिहिलेले शेजारील चित्रातील हे बोधचिन्ह पाश्चात्य जगतात कुठेना कुठे नजरेस पडते. या अक्षराचे गूढही कोणाला सुटलेले नाही. God, Goodness, Geometry अशा अनेक अटकळी बांधल्या जातात. तरी, जगातील सर्वश्रेष्ठ स्थापत्यकार ईश्वराला मानवंदना देण्यासाठीच G हे अक्षर येते असे अनेकजण मानतात. युरोपातील आणि प्रामुख्याने अमेरिकन सरकारवर या संघटनेचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. फ्रीमेसनरी ही तिच्या राजकारणातील सहभागामुळे बऱ्यापैकी कुप्रसिद्धही गणली जाते. राजकीय हत्या, हल्ले, स्थित्यंतरे यांत या संस्थेचा सहभाग असल्याच्या वदंता प्रसिद्ध आहेत.
परंतु, या सर्व सांगोवांगीच्या कथा आहेत की यात काही तथ्यांशही आहे याचा मागोवा घेताना तज्ज्ञ ही कॉन्स्पिरसी थिअरी अर्थातच मोडीत काढतात. त्यांचे काही ठोस मुद्दे असे -
अमेरिकेचा शिक्का निश्चित करण्यात बेंजामीन फ्रँकलीन हे एकटेच नव्हते. त्यांच्यासोबत इतर अनेक होते आणि ते फ्रीमेसन असल्याचे पुरावे नाहीत. अमेरिकन शिक्क्यातील फ्रँकलीन यांनी सुचवलेला काही भाग नाकारण्यातही आला होता. बॉस्टन टी पार्टीची आखणी सर्वस्वी फ्रीमेसन्सनी केली होती याला पुष्टी देणारे संदर्भ सापडत नाहीत. फ्रीमेसन्स आणि इजिप्त व इजिप्तमधील पिरॅमिडस यांचा कोणताही संबंध असल्याचे दाखले नाहीत. हायरम अबीफच्या खुनाचा ऐतिहासिक पुरावा मिळत नाही आणि त्याच्यामुळे प्राणांची शपथ घालण्याचा विधी फ्रीमेसन संस्थेत रुजू झाल्याची कथा केवळ दंतकथा आहे. फ्रीमेसनरी ही कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाची संस्था असल्याचे सिद्ध झालेले नाही. काही विद्वानांनी एकत्र येऊन सुरू केलेली आणि स्वयंप्रेरणेने ज्यांना या संस्थेत सहभागी व्हावे असे वाटते त्यांना सभासदत्व देणारी ही संस्था आहे इतकेच.
याचप्रमाणे, एक डॉलरच्या रहस्याचा मागोवा घेता, या नोटेवरील १३ पायऱ्यांच्या पिरॅमिडमधील १३ हा आकडा अमेरिकेच्या १३ मूळ वसाहती दर्शवतो. हा अपूर्ण पिरॅमिड राष्ट्रबांधणीचे आणि एकजूटीचे काम अद्याप बाकी आहे असे सांगतो. या पिरॅमिडच्या पायथ्याशी असणारा MDCCLXXVI हा रोमन क्रमांक १७७६ हे वर्ष दर्शवतो. १७७६ मध्ये अमेरिकेच्या "डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडस"वर शिक्कामोर्तब झाले होते. Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ आहे "नव्या युगाची व्यवस्था" कारण ते १७७६ सालापासून सुरू झाले असे गणले जाते.
रहस्य, गुपिते, थरार यांचे मानवी मनाला अनादी कालापासून आकर्षण आहे. दंतकथा या सत्यापेक्षा अधिक आकर्षक असतात आणि लोकांच्या मनात घर करून राहतात. त्या सर्वस्वी खऱ्या असतीलच असे नाही पण तथ्यांश नक्कीच असू शकतो. आपल्याला विश्वासाचा कोणता धागा पकडून पुढे जायचे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, इतरांपेक्षा आपल्याला काकणभर अधिक ज्ञान आहे, वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहित आहेत आणि आपण त्या इतरांपासून सुरक्षित ठेवू शकतो ही भावना माणसाला लहानपणापासूनच सुखावत असते. इतिहासात अनेकदा अशा गुप्तसंस्थांचा उल्लेख आढळतो. प्रायॉरी ऑफ झायन नावाची राजवंशाचे किंवा येशूच्या वंशाचे पुरावे जपून ठेवणारी आणि त्यांना संरक्षण देणारी गुप्तसंथा, भक्त आणि श्रद्धाळूंच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेली नाइट टेंप्लार ही संघटना, रहस्यांचे राखण करून राजकारणात आपला ठसा उमटवणारी फ्रीमेसन्स ही संघटना आणि यापेक्षा थोड्या वेगळ्या गुन्हेगारी वाटेने जाणाऱ्या असॅसीन किंवा हश्शाशीन ही हशीशाच्या अंमलाखाली सदस्यांकडून गुन्हे करवून घेणारी संघटना आणि खुद्द भारतातील ठग या नावाने प्रसिद्ध पावलेली गुन्हेगारी संघटना अशा अनेक गुप्त संघटना जगाच्या इतिहासात कार्यरत असल्याचे आढळून येते. या संघटनांत सामील होण्यासाठी लागणारी सदस्य पात्रता, त्यांचे शपथविधी, गुप्त ठिकाणी गुप्ततेत पार पाडले जाणारे विधी, त्यांची कार्यपद्धती या सर्वांनी समाजाला वर्षानुवर्षे भुऱळ पाडली आहे. डॅन ब्राऊनची नवी कादंबरी लवकरच येत आहे आणि ती सुलेमान राजाने बांधलेले प्राचीन मंदिर आणि फ्रीमेसन्स या गुप्तसंस्थेवर आधारित आहे. त्या कादंबरीच्या निमित्ताने फ्रीमेसनरीवर पुनश्च चर्चा सुरू होईल. नवी माहिती बाहेर येईल. नवी संशोधने केली जातील. तूर्तास, ही संस्था अद्यापही जगभरात कार्यरत आहे आणि अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष फ्रीमेसन्स होते एवढे सत्य एक डॉलरच्या नोटेवरच्या या चिन्हामागील रहस्याचे गूढ कायम राखण्यास पुरेसे आहे.
--------------------------------------------------------------------------------
लेखासाठी वापरलेली सर्व चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.
संदर्भः
डोन्ट नो मच अबाऊट मायथॉलॉजी - केनेथ डेविस
एंजल्स अँड डिमन्स - डॅन ब्राऊन
सीक्रेट्स ऑफ फ्रीमेसनरी - डिस्कवरी चॅनेलवरील माहितीपट
फ्रीमेसनरी - विकिपीडिया
एक डॉलरचे अमेरिकन बिल