Thursday, April 26, 2007

आर्य भारतात बाहेरून आले का?

उपक्रम या संकेतस्थळावरील एका चर्चेला प्रतिसाद देताना खालील प्रतिसाद लिहीला होता. त्याचा एक लहानसा लेख बनतो आहे असे वाटल्याने तो येथे टंकत आहे. खालील विचार माझे नसून मी नुकत्याच वाचत असलेल्या पुस्तकातील आहेत. लेखाच्या शेवटी पुस्तकाची माहिती दिली आहे. (या लेखातून कोणतेही वाद निर्माण करायची इच्छा नाही.)

आर्य भारतात बाहेरून आले का? या मुख्य मुद्द्यावर येण्यापूर्वी या प्रकाराची थोडीशी पार्श्वभूमी. जो समाज शहरे वसवतो तो इतर समाजापेक्षा अधिक सुसंसकृत गणला जातो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. येथे झपाट्याने अमर्याद फोफावलेल्या मुंबईसारख्या शहरीकरणाचा विचार करू नये. हे वाक्य का आले त्याचा उहापोह खाली केला आहे.


जगाच्या इतिहासात सर्वप्रथम शहरे वसवण्याचा मान मेसोपोटेमिया, इजिप्त आणि भारताकडे जातो. या तीनही संस्कृतींत इ.स. पूर्व ४००० ते ३००० च्या दरम्यान शहरांची निर्मिती करण्यात आली. भारतात हडप्पा, मोहेंजेदाडो, लोथल, ढोलवीरा अशी सुमारे २६०० पुरातन शहरांची ठिकाणे आढळतात. भारतातील या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हटले जाते, परंतु नवीन संशोधनाप्रमाणे ते पूर्ण सत्य नाही. वेदांत आणि इतर पुराणांत वर्णिलेली सरस्वती नदी जी या प्रदेशातून वाहत होती, ती या काळात सुकलेली नव्हती त्यामुळे हल्ली या संस्कृतीला सिंधू-सरस्वती संस्कृती असेही म्हटले जाते.

मॅक्स म्युल्लरने ऋग्वेदाचा काळ इ.स.पूर्व १५००-१२०० असा ठरवला परंतु त्यासोबत त्याने एक महत्त्वाची टिप्पणी केली - वेदांचा निश्चित काळ तो इ.स.पूर्व १०००-२००० की ३००० हे सांगणे पृथ्वीवर कोणालाही शक्य नाही. याचा एक अर्थ असाही घेता येईल की आर्यांनी वेदांची रचना केली असे सिद्ध होत नाही कारण इ.स. पूर्व २०००-३००० दरम्यान आर्य भारतात आलेच नव्हते. आर्य या नावाची व्युत्पत्ती अधिक खोलात जाऊन सांगायची गरज वाटत नाही. तत्कालिन पाश्चात्य संशोधकांनी ज्याला आर्य समाज हे नाव दिले ते वेदांत वर्णिलेल्या सुसंस्कृत पुरुषांना दिलेले संबोधन आहे इतकेच. म्युल्लरने आर्य भारतात आल्याचा काळही इ.स. पूर्वी १५०० वर्षांचा ठरवला. युरोपातून आलेल्या गोर्‍या लोकांच्याभटक्या जमातींनी एतद्देशीय समाजाला बळाच्या जोरावर हुसकावून दक्षिणेत जाण्यास भाग पाडले. आर्यांनी आपल्या सोबत जो सांस्कृतिक वारसा आणला तो संपन्न भाषेचा आणि त्यांनी भारतीय लोकांना सुसंकृत बनवले असे गृहितक मांडले गेले. या गृहितकावर, 'गोर्‍यांचे अबाधित वर्चस्व स्थापन करण्याच्या उद्देशाने' असा मलिन इतिहास लिहीला गेल्याचा ठपका लागतो.

आता जर मूळ मुद्दा पाहिला तर पहिले गृहितक युरोपीय वंशाच्या सुसंस्कृत लोकांनी भारतावर स्वारी करून तेथिल द्रविड लोकांना दक्षिणेत जाण्यास भाग पाडले असे ठरते. या गृहितकाला धक्का लागला तो हडप्पा आणि मोंहिजेदाडोच्या खोदकामानंतर. या शहरांचे बांधकाम आर्य येण्याच्या फार पूर्वीचे असल्याने तेथे सुसंकृत संस्कृती नांदत नव्हती या कल्पनेला तडा जातो कारण या शहरांचे बांधकाम, त्यातील विटांचा वापर, जलनि:सारण पद्धत, मूर्ती, खेळणी, शिक्के, भांडी पाहिली असता एका शहरे वसवून राहणार्‍या सुसंस्कृत समाजाला केवळ बळाच्या जोरावर घोड्यावर बसून आलेल्या भटक्या आर्यांनी पळवून लावले असे दुसरे गृहितक मांडले गेले. (या शहरांत कोणताही लिखित ठेवा का सापडत नाही त्याच्या शक्यतेबद्दल वेगळा लेख लिहीता येईल.) या गृहितकाने आर्यांचा बाहेरुन येऊन सुसंस्कृत संस्कृती भारतीय समाजाला देण्याचा दावा खोटा ठरवला जातो.

परंतु, पुढे हे ही गृहितक खोटे ठरते कारण या खोदकाम झालेल्या ठिकाणांत कोठेही युद्ध झाल्याचे, नासधूस, जाळपोळ, शहर बेचिराख झाल्याचे पुरावे सापडत नाहीत. इतकेच काय परंतु मिळालेल्या मानवी सांगाड्यांवरूनही त्यांचे मृत्यू लढाईत वार होऊन किंवा अपघातात झाले असे आढळून येत नाही. (असे काही सांगाडे आढळले तरी ते एका प्रसंगात आणि एका ठिकाणी आढळले नसल्याने या ठीकाणी युद्ध झाले अशी कोणतीही खूण मिळत नाही.)

भारतीय पुरातत्त्व खात्यानुसार लोथल शहराचे रूप



१९९९ ला डॉ. एस्. आर्. राव, ग्रेगरी पोसेल आणि इतर भारतीय आणि अभारतीय तज्ज्ञांनी असे गृहितक मांडले की आर्य नावाचा कोणताही वंश नाही, आर्य नावाची इंडो-युरोपीय भाषासमूहातील भाषा बोलणारी कोणतीही जमात भारतावर स्वारी करून आली नाही.

येथे काही इतर तज्ज्ञांचे मत असेही पडते की युरोप आणि मध्य आशियातून टोळ्या आल्या नाहीत असे नाही परंतु त्याचा काल फार पूर्वीचा असावा (अश्मयुगीन), ती घुसखोरी किंवा स्वारी नाही.

डॉ. आर्.एस्. बिश्त (भारतीय पुरातत्त्वखात्यातील एक संचालक) मते ऋग्वेदात वर्णन केलेली शहरे म्हणजेच सिंधू-सरस्वतीच्या खोर्‍यातील शहरे आहेत. या शहरांत गाई-गुरे आणि घोडे पाळल्याचे, यज्ञकर्म केल्याचे, तसेच या शहरांतून समुद्रप्रवास आणि व्यापार चालत असल्याचे पुरावे मिळतात. सरस्वती नदी सुकल्याने या शहरांतील लोकांनी स्थलांतर केले असेही एक गृहितक मांडले जाते.

हे आणि असे बरेचसे विचार ग्रॅहम हॅनकॉक यांच्या 'अंडरवर्ल्ड - द मिस्टेरिअस ओरिजिन्स ऑफ सिविलायझेशन' या पुस्तकांत मांडलेले आहेत. ग्रॅहम हॅनकॉक पुरातत्त्ववेत्ता नाही केवळ पत्रकार आहे. त्यांच्या बर्‍याचशा शक्यता खर्‍या असतील असे नाही परंतु ते बर्‍याचशा शक्यता स्वतः मांडण्यापेक्षा विषयांतील तज्ज्ञांचे विचार मांडतात त्यामुळे पुस्तक वाचनीय ठरते.

मोहेंजेदाडोचे एक चित्र येथे लावले आहे. त्याकडे लक्षपूर्वक पाहिले असता त्यातील सारखेपणा लक्षात येईल. उत्खनन केलेले हे शहर अतिशय मोनोटोनस दिसते. ज्यांना इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रात काहीही रस नाही ते हे स्थळ पाहून कंटाळून जातात असे वाचले आहे. (येथे अमेरिकेतील एखादा हायवे किंवा टाऊनशिप नजरेसमोर आणा. हायवेवरून तासन् तास गाडी हाकणारा माणूस कंटाळतो परंतु त्याच बरोबर हे हायवे बांधणार्‍यांची दूरदृष्टी आणि अभियांत्रिकी वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे आकार, वेगमर्यादा, रॅम्प्स्, आत-बाहेर करण्याच्या सुविधा, रस्त्यांवरील चिन्हे, माहिती, रस्त्यांच्या कडेला असणारे शोल्डर्स् वगैरे वगैरे) मोहेंजेदाडो शहरातील जलनि:सारण पद्धत, रस्त्यांचे बांधकाम, भाजलेल्या, सुकवलेल्या विटा आणि लाकडे यांची बांधकामे आणि त्यातील सारखेपणा हे सुसंस्कृतीचे लक्षण आहे कारण हे सर्व बांधकाम करण्यासाठी गणित, खगोलशास्त्र, भूमिती, यांत्रिकी अशा अनेक शाखांची खोलवर माहिती हवी.

यावर वर उल्लेखलेल्या पुस्तकातील एक उदाहरण देते.

ढोलवीरा या शहराची रचना अप्पर टाऊनशिप, मिडल टाऊनशिप आणि लोअर टाऊनशिप (परम्, मध्यम् आणि अवम्) अशा तर्‍हेची आहे. यातील एका स्थळाचे मोजमाप पुढील प्रमाणे - पूर्वेकडून पश्चिमेकडील लांबी ७७१ मीटर आणि उत्तरेकडून दक्षिणेची लांबी (किंवा रुंदी म्हणू) ६१६.८ यांतील अप्पर टाऊनशिपचा भाग पूर्व-पश्चिम ११४ मीटर आणि उत्तर-दक्षिण ९२.५ मीटर. दोन्हींचे गुणोत्तर येते ५:४. (इतकी अचूकता नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.) परंतु हेच परिमाण का याचे स्पष्टीकरण बिश्त आणि एक प्राध्यापक एस्.पी गुप्ता यांनी पुढीलप्रमाणे दिले आहे.

त्यांच्यामते हा योगायोग नाही. ऋग्वेद आणि इतर काही पुराणांत यज्ञवेदीच्या लांबी रुंदीविषयी लिहीले आहे.** त्याचे गुणोत्तर ५:४ असे आहे. (यावरूनही आर्यांनी वेदांची रचना केली नाही असा एक निष्कर्ष निघतो.) म्हणजेच जो समाज शहरे बांधू शकतो तो रानटी नाही, ज्यांना ही शहरे बांधायचे ज्ञान होते त्यांना इतर अनेक शाखांतील ज्ञानही नक्कीच होते.

** यज्ञवेदीचे अनेक प्रकार आहेत आणि त्यांची योग्य परिमाणे ऋग्वेदात (किंवा इतर प्राचीन पुराणांत) दिलेली आहेत अशा प्रकारचा सुभाष काक यांचा एक लेख वाचलेला आठवतो. त्यापैकी नक्की कोणती यज्ञवेदी याची मात्र कल्पना नाही.


येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवान विष्णू,शंकर, राम, कृष्ण, द्रौपदी, दमयंती यासारखी पुराणांतील अनेक प्रमुख पात्रे श्यामलवर्णी आहेत. कोणत्याही अंगाने गोरी नाहीत.

वरील प्रतिसाद मला पुस्तकातील हा भाग जसा समजला त्यावरून आणि काही इतर वाचनांवरुन (जो येथे अत्यल्प आहे.) थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील चर्चेत उल्लेखलेल्या मुद्द्यांना केवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ विषयाची व्याप्ती प्रचंड आहे आणि या लेखात त्रुटी आढळल्यास चू. भू. द्या. घ्या.

सर्व चित्रे विकिपिडियावरून.

Monday, April 16, 2007

ग्रामदैवत

हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते. अर्थात, या लेखाचा हेतू कुलाचाराबद्दल नाही.

ग्रामदैवत या संज्ञेचा विचार केला असता माझ्या तुटपुंज्या ज्ञानाने मला असे आठवते की गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे. हे दैवत पूर, दुष्काळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे, रोगराई इ. पासून गावाचे रक्षण करते असा सर्वसामान्य समज असतो. अशा दैवताला ग्रामदैवताचा मान का मिळाला याबाबतही अनेकदा विविध कथा, आख्यायिका ऐकण्यास मिळतात. उदा.

रामायणातील सुंदरकांडात हनुमान लंकानगरीत प्रवेश करताना त्याची भेट साक्षात लंकादेवीशी होते. ती हनुमानाचा मार्ग अडवून उभी असल्याने हनुमान तिला आपली ओळख विचारतो. त्यावेळेस ती त्याला पुढील उत्तर देते.


अहं राक्षसराजस्य् रावणस्य् महात्मन:
आज्ञाप्रतीक्षा दुर्धर्षा रक्षामि नगरीमिमाम्॥ ५-३-२८

श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की मी राक्षसराज रावणाच्या आज्ञा पाळते आणि या नगराचे पराजित होण्यापासून संरक्षण करते. यापुढील श्लोकांवरून असे दिसते की मुष्टीप्रहार करून हनुमान लंकादेवीचा पराभव करतो आणि त्यावर दु:खी होऊन लंकादेवी सांगते की ब्रह्मदेवाने मला सांगितले होते की ज्या दिवशी एक वानर तुझा पराभव करेल त्यानंतर लंकानगरी आणि राक्षसांचा पराभव अटळ आहे.

पौराणिक कथा सोडून इतिहासात पाहायचे झाल्यास ग्रामदैवताची अनेक उदाहरणे मिळतात. जसे, पुणे गाव नव्याने वसवताना जिजाबाईंनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची स्थापना केली. मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी ही मूळ कोळी समाजाची देवता. मुंबादेवीचे मंदिर १७ व्या शतकात बांधले गेल्याचा पुरावा सापडतो.(नक्की काळाबद्दल अनेक मतप्रवाह दिसले. हे मंदिर सुमारे ६०० वर्षांपूर्वी बांधले गेल्याचेही वाचण्यास मिळते.) मुंबा हे महाअंबा या नावाचे भ्रष्ट स्वरूप असल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिराची स्थापना मुंबा नावाच्या स्त्रीने केल्याने त्याला मुंबादेवी असे नाव पडल्याची गोष्टही ऐकवली जाते.

एका आख्यायिकेनुसार मुंबारक नावाचा राक्षस गावातील नागरिकांना त्रास देत असे. त्याचा धुमाकूळ वाढत चालल्याने त्रस्त नागरिकांनी ब्रह्मदेवाची उपासना केली. प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आपल्या दिव्यशक्तीने एका आठ भुजांच्या देवीची निर्मिती केली. या देवीने मुंबारकाचा नि:पात केला. पश्चात्तापदग्ध मुंबारकाने देवीला शरण जाऊन आपल्या नावाने तिचे मंदिर उभारण्याचा पण केला, आणि अशा रीतीने मुंबादेवी हे नाव आणि मंदिर अस्तित्वात आले.

शहरे वगळून जर लहान गावांकडे किंवा खेड्यांकडे वळले, तर ग्रामदैवताची संकल्पना थोडी बदलते. बरेच ठिकाणी अकाली आणि अनैसर्गिक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे, नागाचे किंवा ज्या मूळ पुरुषामुळे गाव अस्तित्वात आले अशा व्यक्तीचे मंदिर स्थापले जाते. बर्‍याचदा अशी मंदिरे एखाद्या झाडाच्या पारावर, दगडांना शेंदूर लावून बनवलेलीही आढळतात.

प्रकार कसेही असोत, बाह्य आणि अंतर्गत दुष्ट शक्तींपासून त्या गावाचे किंवा नगराचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूच्या किंवा ग्रामस्थांच्या मनात एका प्रकारचे आदरयुक्त भय निर्माण व्हावे या हेतूने ग्रामदैवताची स्थापना केली जात असे. याच पार्श्वभूमीवर इतर संस्कृतींत ही प्रथा होती का याचा शोध घेतला असता, आग्नेय आशियातील बौद्ध संस्कृतीत ती होतीच, असे दिसते. याखेरीज पाश्चिमात्य संस्कृतींतही ती असल्याचे आढळते. या लेखात ग्रीक संस्कृतीतील एका ग्रामदैवताबद्दल थोडीफार माहिती लिहीत आहे.

अथेना ही बुद्धीचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराची ग्रामदेवता आहे. या शहराला अथेन्स हे नाव या देवतेवरूनच पडल्याचे सांगितले जाते. प्राचीन अथेन्समध्ये ख्रि.पू.५०० च्या सुमारास पार्थेनॉन या अथेनाच्या देवळाची स्थापना केली गेल्याचे सांगितले जाते.

ग्रीक कलाकुसरीचा अप्रतिम नमुना आणि अद्याप व्यवस्थित असणारी एक प्राचीन वास्तू म्हणून पार्थेनॉनला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. पार्थेनॉनची रचना आयताकृती असून ८ स्तंभ x १७ स्तंभ अशा रचनेवर संपूर्ण मंदिर उभे आहे. हे मंदिर पूर्ण करण्यास सुमारे १६ वर्षांचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते. फिडिअस नावाच्या शिल्पकाराने या मंदिराचे बांधकाम केल्याचे कळते.

अमेरिकेत टेनसी राज्यातील नॅशविल या शहरात पार्थेनॉनच्या मंदिराची पूर्णाकृती प्रतिकृती १८९७ साली बनवली गेली. या वास्तूला भेट देण्याचा हल्लीच योग आला. टेनसी राज्याच्या शताब्दीप्रीत्यर्थ या इमारतीची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या इमारतीचा कलादालन म्हणून उपयोग केला जातो. अनेक ग्रीक शिल्पांच्या अप्रतिम प्रतिकृतींनी या इमारतीतील दालने सजलेली आहेत. सर्वात भव्य मूर्ती अर्थातच अथेनाची. पाश्चिमात्य जगतातील बंदिस्त आवारातील ही सर्वात मोठी मूर्ती गणली जाते.





नॅशविलचे पार्थेनॉन
नॅशविलचे पार्थेनॉन


मूळ मंदिरात असणारी अथेनाची मूर्ती फिडिअस या शिल्पकाराने संपूर्णत: सोन्यात आणि हस्तिदंतात बनवली असल्याचे परंतु ग्रीसवरील अनेक परकीय स्वार्‍यांत या मूर्तीची लूट केली गेल्याचे आणि कालांतराने मंदिराला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक अभ्यासावरून १९९० साली नॅशविलच्या प्रतिकृती मंदिरात सुमारे ४२ फुटांची अथेनाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि २००२ साली तिला सुवर्णवर्खाने सजवण्यात आले.





अथेना
अथेना


मूर्तीचे सर्वसाधारण वर्णन करायचे झाल्यास या मूर्तीच्या उजव्या हातात अथेनाची सहकारी ग्रीक देवता नाइकी (Nike) अथेनाच्या डोक्यावर चढवण्यासाठी विजयी मुगुट घेऊन उभी आहे. अथेनाच्या डाव्या हातात प्रचंड आकाराची ढाल असून त्यावर ग्रीक देव आणि दानव यांच्यातील युद्धाची चित्रे कोरलेली आहेत. तिच्या डाव्या खांद्यावर रेललेला भाला आणि पायाशी सर्प आहे. हा सर्प म्हणजे एरिकथोनिअस हा अथेनाचा मानसपुत्र. आपल्या ढालीमागे त्याला दडवून ती एरिकथोनिअसचे रक्षण करते असे सांगितले जाते. अथेनाच्या चिलखतावर मेडुसा या राक्षसीचे मुंडके लावलेले आढळते. ग्रीक पुराणांनुसार पर्सिअस या योद्ध्याला अथेनाने मेडुसाचा नि:पात करण्यात मदत केली होती. विजयी झाल्यावर पर्सिअसने ते मुंडके अथेनाला भेट दिल्याचे सांगितले जाते. अथेनाच्या ढालीवरही मध्यभागी हे मुंडके दाखवले आहे.


मूर्तीची वस्त्रे आणि आभूषणे सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. भाला, ढाल, सर्प आणि नाइकी देखील सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. अथेनाचा चेहरा त्यामानाने बराच भडक रंगवलेला दिसतो. याचे स्पष्टीकरण जवळच वाचता येते. अनेक पौराणिक कथा आणि पुराव्यांच्या आधारे मूर्तिकाराने मूर्तीला असे स्वरूप दिल्याचे सांगितले जाते.

अमेरिकेतील रहिवाशांना नॅशविलला जाण्याची संधी मिळाल्यास या अप्रतिम कलादालनाला जरूर भेट द्यावी.


अवांतर: या कलादालनात एका छायाचित्रकाराने काश्गर, चीन येथे काढलेली काही अप्रतिम प्रकाशचित्रे पाहण्यास मिळाली. पिवळ्या कांतीच्या आणि नाजूक शरीरयष्टीच्या चिनी लोकांपेक्षा बरेच वेगळे दिसणारे हे लोक, त्यांच्या भटक्या जमाती, जत्रा, गाढवांचा बाजार इ. ची अप्रतिम प्रकाश/छायाचित्रे येथे लावली होती. भारतातील कुशाण राजे याच भागातून आले होते. याशिवाय या कलादालनात अतिशय अप्रतिम तैलचित्रांचा समावेश आहे.




संदर्भसूची:
इंग्रजी विकिपीडियावर पार्थेनॉन
नॅशविलचे पार्थेनॉन
ग्रीक दैवते

खुलासा: वरील लेख परिपूर्ण असल्याचा दावा नाही. रामायणातील संस्कृत श्लोक जसा मिळाला तसा टंकित केला आहे. जाणकारांना या लेखात त्रुटी आढळल्यास सुधारणा करण्यास मदत करावी. लेखासंदर्भात इतर माहिती प्रतिसादांतून लिहावी अशी विनंती.