Friday, December 18, 2009

वेडात वीर दौडले... तीनशे सात

म्यानातून उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

कुसुमाग्रजांच्या या अप्रतिम पंक्तींनी मराठी मानसात आणि मराठी साहित्यात प्रतापराव गुजर आणि त्यांच्या साथीदारांना मानाचे पान दिलेले आहे. इतिहासात मात्र पावनखिंडीला जे स्थान आहे ते नेसरीच्या खिंडीला नाही असे दिसते. महाराजांचा शब्द पाळण्यात सरसेनापती चुकले. त्यांनी भावनेच्या भरात आपले प्राण खर्ची घातले. राज्याभिषेकाआधी काही थोडक्या दिवसांत राज्याला सेनापती नाही अशी स्थिती राज्यात निर्माण झाली. असे नेमके काय झाले होते प्रतापरावांकडून, याविषयी सर्वश्रुत असणारी कहाणी पुढीलप्रमाणे -

सन १६७३ साली शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते. याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली की "खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. ”

महाराजांची आज्ञा घेऊन प्रतापराव आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले. बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने खानाला पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला चढवला. त्यानंतर झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली. पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्याने प्रतापरावांकडे आपला वकील पाठवला. वकिलाच्या रदबदलीने आणि गोड शब्दांनी प्रतापरावांचे मन द्रवले. खानाला असा हिसका दाखवल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी खात्री त्यांना वाटली आणि त्यांनी वकिलाच्या प्रार्थनेचा स्वीकार करून खानाला अभय दिले. इतकेच नाही तर त्याला कैद न करता, मुक्काम हलवण्यास वाट करून दिली.

या लढाईची बातमी महाराजांना कळल्यावर ते साहजिकच चिडले. महाराजांच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका त्यांना होतीच. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून "सला काय निमित्य केला? ” असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले.

महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच बहलोलने हल्ले पुन्हा सुरू केले. शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली होती. यांत होणारे बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते. त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, “हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे. ” महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर त्यांना लागली आणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह ते खानावर चालून गेले. खानाच्या अफाट सैन्यासमोर या सात वीरांचा निभाव लागणे केवळ अशक्य होते आणि परिणामी धाडस आणि शौर्याची परिसीमा गाठणारे हे वीर धारातीर्थी पडले. महाराजांना ही वार्ता कळल्यावर ते अतिशय दु:खी झाले. राज्याच्या सरसेनापतीला दूरदृष्टी हवी ही अपेक्षा महाराजांनी करणे स्वाभाविक होते परंतु भावनेच्या भरात प्रतापरावांसारखा निधड्या छातीचा वीर दुसरी चूक करून बसला.

प्रतापरावांच्या मृत्यूचे मराठाशाहीवर नेमके परिणाम कसे झाले याबाबत मला फारसे वाचायला मिळाले नाही परंतु सर्वसामान्य अंदाज लावायचा झाला तर राज्याचा सरसेनापती अशा रितीने मृत्यूला कवटाळतो तेव्हा सैन्यात बेबंदशाही माजण्याची शक्यता असते. राजा, प्रजा, राज्य आणि सैन्य यांचे खच्चीकरण होण्याची शक्यताही असते. २४ फेब्रुवारी १६७४ ला प्रतापरावांना वीरमरण आले आणि १६ जूनला राजांना राज्याभिषेक झाला. शिवराज्याभिषेक जवळ आला असता सरसेनापतीचा मृत्यू होणे ही घटना राज्यस्थापनेसाठी नक्कीच पूरक नसावी. निश्चलपुरी महाराजांनी अपशकुन म्हणून प्रतापरावांच्या मृत्यूचे कारण दाखवल्याची घटनाही वाचनात येते.

उतावळा, भावनाप्रधान स्वभाव आणि दूरदृष्टीचा अभाव ही कारणे राज्याचा सरसेनापती हिरावून घेण्यास कारणीभूत ठरली. इतके सर्व असूनही, प्रतापरावांच्या अतुलनीय धाडसाचे कोठेतरी कौतुक करावेसे वाटते. गैरजबाबदार कृत्य हातातून घडले तरी त्यांची स्वामीनिष्ठा वाखाणण्याजोगी होती. खुद्द महाराजांना त्याविषयी शंका असावी असे वाटत नाही. आपल्या जिवाचा, घरादाराचा, कुटुंबाचा विचार न करता केवळ स्वाभिमानाला ठेच लागली म्हणून स्वामीनिष्ठेपायी आपला जीव ओतून टाकणाऱ्या या वीरांच्या धमन्यांतील रक्तात असा कोणता गुण असावा की कोणताही इतर विचार न करता त्यांनी बहलोलखानाच्या सैन्यावर चालून जाण्याचा निर्णय घेतला; यामागील नेमकी मानसिकता समजून घेणे कठिण वाटते.

तरीही, नेसरीच्या खिंडीला पावनखिंडीचे महत्त्व नाही याचे कारण प्राणार्पण कोणी, कधी आणि नेमके कशासाठी केले याला इतिहासात महत्त्व आहे. बाजीप्रभूंचे प्राणार्पण आणि प्रतापरावांचे प्राणार्पण यांत फरक दिसून येतो. युद्धात बरेचदा हार-जीत यांच्यापेक्षाही मागाहून होणारे परिणाम महत्त्वाचे ठरतात. बाजीप्रभूंचे बलिदान महाराजांना सुखरूप ठेवण्याकामी आले. बहुधा, मूठभर सैनिकांसह बाजीप्रभू मागे राहिले तेव्हाच त्यांचा मृत्यू अटळ आहे हे सर्वांना माहित असावे. प्रतापरावांच्या बाबत तसे होत नाही. कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितेने मात्र प्रतापरावांच्या प्राणार्पणाचे उदात्तीकरण झाले. या कथेसारखी भासणारी पाश्चात्य इतिहासातील एक प्रचलित कथा पुढे देता येईल. ती म्हणजे थर्मापलैयच्या लढाईची.

प्राचीन ग्रीकमधील अथेन्स आणि स्पार्टा ही दोन प्रसिद्ध शहर-राज्ये गणली जातात. अथेन्स आणि स्पार्टा एकमेकांपासून फार लांब नाहीत परंतु या दोन्ही राज्यांचे नीतिनियम, कायदे भिन्न होते. अथेन्स हे समुद्राजवळ असल्याने समुद्र व्यापारात हे राज्य अग्रेसर होते. व्यापाराच्या निमित्ताने अनेकविध संस्कृतींशी आलेल्या संबंधातून अथेन्सवासीयांचा सामाजिक, राजकीय दृष्टीकोण पुरोगामी होता. या उलट, स्पार्टा हे ग्रीक प्रदेशात आतवर वसलेले शहर-राज्य. सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले. शत्रूराज्यांमुळे सतत सावध असलेले आणि त्यामुळे सांस्कृतिक बाबींमध्ये संकुचित राहिलेले. स्पार्टाचे कायदे आणि नीतिनियम हे अथेन्सपेक्षा क्रूर होते. केवळ सुदृढ मुलांना येथे वाचवले जाई. अशक्त आणि अपंग बालकांना मारले जाई. लष्करी प्रशिक्षण सक्तीचे होते. दोन्ही शहरांत गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. यापैकी, स्पार्टातील गुलामांना हेलॉट असे संबोधले जाई. इतर राज्यांतील गुलामांपेक्षा हेलॉटांना थोड्या अधिक सवलती होत्या. त्यांना जमीन कसता येई पण इतर नागरिकांपेक्षा अधिक शेतसारा भरावा लागे. स्पार्टाच्या नागरिकांकडून हेलॉटचा मृत्यू हा दखलपात्र गुन्हा नसे. प्रामुख्याने हेलॉट हे कामगार किंवा कलाकार असत. सैन्यातही त्यांची भरणा होई. आपले स्वातंत्र्य त्यांना विकत घेण्याची मुभा होती.

अथेन्स आणि स्पार्टाप्रमाणेच ग्रीसमध्ये इतर अनेक लहान-मोठी राज्ये होती. ग्रीसच्या जवळचे प्रबळ राष्ट्र पर्शियाचे. पर्शियाचा सम्राट झेरेक्सिस याने इ.स.पूर्व ४८३ पासून सैन्याची मोठी जमवाजमव केली आणि इ.स.पूर्व. ४८० मध्ये ग्रीसवर भूमार्गे आणि समुद्रमार्गे लाखोंच्या सैन्यानिशी हल्ला चढवला. झेरेक्सिसने हल्ल्याची वेळ ऑलिंपिक्सचे खेळ आणि कार्निया या ग्रीक सणाच्या सुमारास ठरवली होती. याचे कारण या काळात ग्रीक शस्त्रे उचलत नसत. कार्नियाच्या दिवसांत शस्त्र उचलणे दैवी कोपास कारण होऊ शकते अशी प्रचलित श्रद्धाही होती. ग्रीकांना झेरेक्सिसच्या स्वारीचा सुगावा लागताच त्यांनी आपापसांतील वैर बाजूला ठेवून एकत्रित होऊन लढायचे ठरवले. त्यानुसार समुद्रमार्गे येणारा पर्शियन सैन्याचा ताफा रोखण्यास ग्रीक सेना आर्टेमिसिअमच्या सामुद्रधुनीत एकत्रित झाल्या. स्पार्टावर या काळात लिओनायडस या राजाचे राज्य होते. त्याची सेनाही मित्र ग्रीक सेनेत सहभागी होती. असे म्हणतात की स्वारीपूर्वी लिओनायडस डेल्फायच्या पुजारीणीचा सल्ला घेण्यास गेला असता तिने त्याला भविष्य सांगितले होते की "पर्शियन युद्धात एकतर स्पार्टाचा विनाश होईल आणि तसे न होता राज्य वाचले तर राजाचा विनाश नक्की होईल. " झेरेक्सिसचे खरे शत्रू होते अथेन्स आणि स्पार्टा. अथेन्सवर स्वारी करायची झाली तर त्याच्या भूमार्गावरील सैन्याला दक्षिणेकडे अथेन्स गाठण्यासाठी थर्मापलैची अरुंद वाट पार करून येणे क्रमप्राप्त होते. डोंगरातून जाणाऱ्या या अरुंद वाटेच्या एका बाजूस समुद्र होता तर दुसऱ्या बाजूस कपारी. ही वाट इतकी अरुंद होती की एकावेळेस एक रथ कसाबसा जाऊ शके. पर्शियन सैन्याला खिंडीत गाठण्यास यापेक्षा बरी जागा मिळाली नसती. सुमारे २ लाखांचे सैन्य घेऊन झेरेक्सिस येत होता. स्पार्टाचा राजा लिओनायडसच्या नेतृत्वाखाली पर्शियन सेनेवर हल्ला करण्याचे मित्र ग्रीक सेनेने ठरवले. परंतु स्पार्टाचे मुख्य सैन्य आर्टेमिसियमच्या सामुद्रधुनीत गुंतले होते. लिओनायडसने त्याचे ३०० शूर अंगरक्षक आणि स्पार्टातील दुय्यम सेना, ज्यांत हेलॉटसही सामील होते यांच्यासह थर्मापलैकडे कूच केले. वाटेत त्यांना इतर सैन्येही मिळत गेली परंतु त्यांची एकूण संख्या ५-७ हजारांच्या घरात होती. पर्शियाच्या प्रचंड सेनेसमोर लिओनायडसच्या लहानशा सैन्याचा टिकाव लागणे अशक्य होते. तरीही तीन दिवस प्राणांची बाजी लढवत ग्रीक सैन्य लढले आणि त्यांनी पर्शियन सेनेला सळो की पळो करून सोडले. तिसऱ्या दिवशी फितुरी होऊन पर्शियन सैन्याला डोंगरातून ग्रीक सेनेला गाठण्याचा दुसरा मार्ग दाखवला गेला आणि ग्रीक सेना पुढून आणि मागून पर्शियन सेनेच्या तावडीत सापडली. लिओनायडसला आपला पराभव दिसू लागल्यावर त्याने इतर ग्रीक राज्यांच्या सेनेला परतायचा हुकूम दिला. त्याच्या हुकुमानुसार इतर ग्रीक सेना माघारी फिरली. लिओनायडस स्वत: मात्र त्याच्या तीनशे अंगरक्षकांसह पर्शियन सैन्याला तोंड देण्यास मागे राहिला. यानंतरची कहाणी लिओनायडसच्या आणि त्याच्या तीनशे वीरांच्या अतुलनीय कामगिरीची आहे. पहाटे देवतांना अर्ध्य वाहून लिओनायडस आणि त्याचे तीनशे वीर लाखोंच्या पर्शियन सैन्याला सरळ सामोरे गेले. वाटेत येणाऱ्या एकेकाला कापून काढत, प्रत्येक वीर त्याच्या हातातील भाल्याचे तुकडे होईपर्यंत लढला. भाल्यांचे झालेले तुकडे घेऊनही ते पर्शियन सैन्यावर वार करत राहिले. लढाईत लिओनायडसचा मृत्यू झाला हे कळून आले तरी ते ३०० वीर मागे फिरले नाहीत. त्याच्या मृत शरीराला तुडवत लढाई सुरूच राहीली. शेवटी पर्शियन सैन्याने बाणांचा वर्षाव करून सर्वांना कंठस्नान घातले. एकही वीर मागे उरला नाही. संतप्त झेरेक्सिसने लिओनायडसच्या मृत शरीराचे मुंडके कापून धड क्रूसावर चढवले आणि विजय साजरा केला. या लढाईनंतर आर्टेमिसियमलाही ग्रीकांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आणि त्यांनी माघार घेतली. येथून पर्शियन सेना अथेन्सवर चालून गेली परंतु लिओनायडसच्या तीनशे वीरांनी पर्शियन सेनेचा मार्ग आठवड्याभरापेक्षा जास्त रोखून धरल्याने अथेन्सवासियांना शहर रिकामे करण्याची संधी मिळाली. झेरेक्सिसने अथेन्सला आग लावून बेचिराख केले पण नगरवासीयांचे प्राण लिओनायडसच्या पराक्रमाने वाचले. लिओनायडसच्या पराक्रमामुळे नंतर झालेल्या सलामिस येथील युद्धात मित्र-ग्रीक सैन्य निकराने लढले आणि त्यांनी पर्शियन सेनेवर विजय मिळवला. पाश्चात्य इतिहासात या कथेला फार मोठे महत्त्व आहे. या कथेवरून साहित्यात काव्य, चित्रपट यांची निर्मिती झाली आहे. “तीनशेंची लढाई" (battle of 300) या नावाने हे युद्ध अनेक वर्षे सर्वांना प्रेरणा देत आले आहे. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातही या लढाईवर एक पाठ अवश्य दिसतो. प्रत्यक्षात २ लाखांच्या सेनेसमोर स्पार्टाच्या राजाने आपले प्राणार्पण करण्यात फार मोठे डावपेच दिसत नाहीत. या तीनशेंसह मागे राहिलेल्या सुमारे १००० हेलॉटांचा आणि थेस्पियन सैन्याचा उल्लेखही सहसा दिसत नाही. या लढाईत पर्शियन सैन्याचा मार्ग रोखून धरल्याने सलामिस येथे सैन्याची जमवाजमव करण्याची संधी मिळाली असाही गैरसमज अनेकांचा दिसतो. त्यात फारसे तथ्य नाही. स्पार्टाच्या राजाने अशाप्रकारे मागचा-पुढचा विचार न करता किंवा दुसरी युद्धनीती न आखता शत्रूवर सरळ चाल करणे कितपत शहाणपणाचे होते हे सांगता येत नाही. येथे या वीरांचे स्पार्टात मिळालेले खडतर प्रशिक्षण आड आले किंवा डेल्फायच्या भविष्यकर्तीवर असलेला अवास्तव विश्वास लिओनायडला असा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरला असे सांगितले जाते. परंतु, लिओनायडसचे प्राणार्पण शत्रूसमोर माघार न घेता त्वेषाने लढण्यास अनेकांना पुढे प्रेरणादायी ठरले हे खरेच. पावनखिंडीची लढाई, नेसरीची लढाई आणि थर्मापलैच्या लढाईत मला साम्य दिसल्याने आमचा त्यांचा इतिहास या सदरात या लेखाची भरती केली आहे. पूरक माहिती: तीनशेंच्या लढाईवर ३०० नावाचा एक सुप्रसिद्ध परंतु बंडल चित्रपट मध्यंतरी येऊन गेला. चित्रपटातील पात्रांचे, विशेषतः झेरेक्सिसचे विपर्यस्त चित्रण उबगवाणे आहे. तरीही पूरक माहिती म्हणून चित्रपट पाहण्यासारखा आहे.
संदर्भः
द स्पार्टन्स - द वर्ल्ड ऑफ द वॉरिअर हिरोज ऑफ एन्शंट ग्रीक्स डिसिजीव बॅटल्स - थर्मापलै - हिस्टरी चॅनेल
विकिवर लिओनायडस प्रतापरावांवरील मटामधील लेख याखेरीज वर्तमानपत्रांतील अनेक लेखांचा संदर्भ. चित्रे: सर्व चित्रे विकिपिडीयावरून

Thursday, September 03, 2009

एक डॉलरचे रहस्य

दा विंची कोड ही डॅन ब्राऊनची सुप्रसिद्ध कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल किंवा तिच्याबद्दल ऐकले असेल. काही प्राचीन रहस्यांचा शोध, ऐतिहासिक रहस्यांचा पाठपुरावा आणि काही प्राचीन गुप्तसंस्थांचे कामकाज असा साचा डॅन ब्राऊनच्या कादंबर्‍यांत सहसा आढळून येतो. दा विंची कोडमधील प्रायॉरी ऑफ झायन आणि एंजल अँड डिमन्स या दुसर्‍या कादंबरीतील इल्युमिनाती या गुप्तसंस्था या कादंबऱ्यांचा गाभा आहेत. एंजल्स अँड डिमन्स मधील एका प्रसंगात, कादंबरीची नायिका वित्तोरिया वेत्रा, रॉबर्ट लॅंग्डनला विचारते की "तू प्राचीन चिन्हशास्त्राकडे कसा काय वळलास? " याचे उत्तर देताना तो सांगतो "मला या शास्त्राबद्दल आवड उत्पन्न झाली ती एक डॉलरच्या नोटेमुळे! "

आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अमेरिकन डॉलरची नोट किंवा अमेरिकन पद्धतीत म्हणतात तसे, डॉलर-बिल हाताळले असावे. अमेरिकन डॉलर वापरून व्यवहार केला असावा, आपल्या खिशात, पाकिटात, पर्समध्ये डॉलर-बिल ठेवले असावे. परंतु हे करताना आपण एक प्राचीन रहस्य आपल्यासोबत बाळगतो आहोत याची जाणीव फार कमीजणांना असावी. एक डॉलरच्या नोटेकडे निरखून पाहिले तर एक गोष्ट दिसून येईल की नोटेच्या एका बाजूस संयुक्त संस्थानांचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चित्र असून दुसर्‍या बाजूस अमेरिका किंवा अमेरिकन इतिहासाशी दूरवर संबंधीत नसणारा एक वर्तुळाकार शिक्का आहे. या वर्तुळात एक इजिप्शियन पिरॅमिड दिसते. हे पिरॅमिडही पूर्ण नाही. मध्येच कापलेले आहे. त्याच्या शिखरावरील भागात एक प्रकाशमान डोळा असून पायथ्याशी रोमन आकडे दिसतात. पिरॅमिडच्या वर आणि खाली लॅटीन भाषेतील मजकूर आहे. गेली कित्येक वर्षे लोकांना हे चिन्ह नेमके का निवडले गेले हे गूढ उलगडलेले नाही आणि यामागे एक प्राचीन "काँस्पिरसी थेअरी" असल्याची आख्यायिका सुप्रसिद्ध आहे. अनेकांच्या मते हे चिन्ह फ्री-मेसन्स या प्राचीन गुप्तसंघटनेची देणगी असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि फ्री-मेसन संघटनेचे कार्यकर्ते फ्रॅंकलीन रूझवेल्ट यांनी त्याला डॉलरच्या नोटेवर स्थानापन्न केले आहे.



सर्वसाधारणत: या चिन्हाची माहिती काढायला गेले असता केवळ प्रेसिडेंट रूझवेल्ट यांचा या प्रकारात समावेश नसून हे चिन्ह अमेरिकेच्या राष्ट्रीय शिक्क्यावरही (Great Seal) असल्याचे सांगितले जाते. या शिक्क्याची निर्मिती १८ व्या शतकात करण्यात आली असून तिचा संबंध अमेरिकेचे आद्य संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंजामीन फ्रॅंकलीन यांच्याशी जोडला जातो. शिक्क्यावर असणार्‍या या चिन्हाची माहिती पुढीलप्रमाणे मिळते -

चिन्हातील खालचा अपूर्ण पिरॅमिड हा १३ पायऱ्यांचा बनलेला असून नंतर कापलेला आहे. पिरॅमिडच्या वरील भागात एक सर्वदर्शी नेत्र आहे. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीप्रमाणे हे ईश्वराचे सर्वव्यापी आणि संपूर्ण मानवजातीवर देखरेख करणारे नेत्र असल्याचे मानले जाते. पिरॅमिडच्या पायथ्याशी रोमन क्रमांक दिसतो. या पिरॅमिडच्या वर Annuit Coeptis ही लॅटीन वाक्यरचना आढळते तिचा अर्थ "कार्यारंभास त्याचा (देवाचा) आशीर्वाद आहे" आणि पिरॅमिडच्या खाली असणाऱ्या Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ "नव्या जगाची व्यवस्था" असा सांगितला जातो. इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा की बेंजामीन फ्रॅंकलीन हे देखिल फ्रीमेसन होते.

अशीच एक गोष्ट सांगितली जाते ती थोरले जॉर्ज बुश यांच्या संदर्भात आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी जॉर्ज बुश यांनी अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत आणि अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी. आय. ए. चे प्रमुख म्हणून पदे भूषविली होती. १९८९ च्या जानेवारी महिन्यात जॉर्ज बुश यांचा शपथविधी झाला तेव्हा सर्वसामान्यांच्या लक्षात न येईल अशी एक गोष्ट घडली होती. ती म्हणजे शपथविधी दरम्यान वापरली गेलेली बायबलची आवृत्ती हे नेहमीच्या बायबलपेक्षा वेगळी होती. ही आवृत्ती फ्रीमेसनांच्या गूढ आकृत्या आणि चित्रांनी सजलेली होती आणि हीच आवृत्ती अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी शपथविधीसाठी वापरली होती.

अमेरिकेचे चौदा अध्यक्ष हे फ्रीमेसन्स होते असे मानले जाते. जॉर्ज वॉशिंग्टन, थिओडोर रुझवेल्ट, अँड्रू विल्सन, फ्रॅंकलीन रुझवेल्ट, हॅरी ट्रुमन आणि थोरले जॉर्ज बुश हे त्यापैकी काही प्रमुख राष्ट्राध्यक्ष. यापैकी, ट्रुमन हे अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएचे जनक होत. बॉस्टन टी पार्टीतील सहभागापासून अमेरिकेची घटना लिहिणाऱ्यांपैकी अनेकजण फ्रीमेसन असल्याचे पुरावे सादर केले जातात. अब्राहम लिंकन यांनीही फ्रीमेसन संस्थेचे सदस्यत्व घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते आणि यावरून अमेरिकन सरकार नावाचे कळसूत्री बाहुले फ्रीमेसनांच्या गुप्तसंघटनेकडून नाचवले जाते अशी अटकळ बांधली जाते.

फ्रीमेसनांची संस्था ही एक अतिशय प्राचीन गुप्त बंधुभावसंवर्धिनी (Fraternal Organization) असून त्यात कोणत्याही जाती-धर्माचे लोक सामील होऊ शकतात याखेरीज या संस्थेची माहिती अनेकांना नसते. ही संघटना कशी अस्तित्वात आली, तीत सामील होण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते, त्यांनी राखून ठेवलेली प्राचीन गुपिते कोणती वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरे सहसा उपलब्ध नाहीत. माहिती शोधत जाता जे थोडेफार धागेदोरे हाती लागतात ते असे -

फ्रीमेसनरी या संस्थेचा उगम स्टोनमेसन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरवट आणि शिल्पकारांशी निगडित आहे. ही संस्था कधी अस्तित्वात आल्याचे कळत नसले तरी बायबलमधील प्रसिद्ध राजा सॉलोमन (सुलेमान) याचे मंदिर बांधताना त्याच्या हायरम अबीफ या प्रमुख स्थापत्यकाराची हत्या कोणतेतरी गुपित काढून घेण्यासाठी केली गेल्याचे सांगितले जाते आणि आपल्या प्राणांची किंमत देऊन ते गुपित जपणारा स्थापत्यकार, फ्रीमेसन असल्याचे सांगितले जाते. किंबहुना, फ्रीमेसनरीच्या घटनेतील एक प्रमुख मुद्दा - गुपिताचे रक्षण प्राण जाईस्तोवर करायचे असा असतो. ही प्राचीन गुपिते कोणती या बद्दल अनेक अटकळी आहेत. सुलेमानचा खजिना, होली ग्रेलचे गुपित, मध्ययुगात युरोपात मुसलमानांविरुद्ध काढल्या गेलेल्या धार्मिक युद्धमोहिमा (क्रुसेडस), अनेक मध्ययुगीन राज्यक्रांत्या, राजकीय स्थित्यंतरे आणि अशा अनेक ऐतिहासिक गुपितांचे रक्षणकर्ते फ्रीमेसन्स असल्याचे सांगितले जाते. डॅन ब्राऊनच्या दा विंची कोडमुळे प्रसिद्ध झालेले सरदार नाइट टेंप्लारही फ्रीमेसन्स असल्याचे समजले जाते. आख्यायिकांचा आणि दंतकथांचा भाग सोडल्यास फ्रीमेसन्स ही संस्था खरी असली तरी ही प्राचीन गुप्तसंस्था काळाच्या उदरात कधीतरी गडप झाली असे दिसते.

त्यानंतर इ.स. १७१७ साली किंवा त्या सुमारास इंग्लंडमध्ये फ्रीमेसन्स संस्थेचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ मेसन्स हे दगड कापणारे, घडवणारे आणि शिल्पकाम करणारे पाथरवट असले तरी १८ व्या शतकात या संस्थेचे पुनरुत्थान काही राजकारणी, उमराव, साहित्यिक, व्यावसायिक आणि कलाकारांनी केल्याचे सांगितले जाते. १८ व्या फ्रीमेसनरीची घटना, विधी,

गुपिते, कूटशब्द इतकेच नव्हे तर नवी लिपी तयार करण्यात आली. कूटशब्द आणि गुपिते राखून ठेवण्यासाठी प्राणांची शपथ घालण्याची प्रथा निर्माण करण्यात आली. मुख शहरांत फ्रीमेसन्सची आलिशान आणि ऐश्वर्यसंपन्न सभागृहे आहेत. यांना ग्रँड लॉजेस म्हणून ओळखले जाते. स्थापत्यशास्त्राची उपकरणे वापरून त्या मध्यभागी G लिहिलेले शेजारील चित्रातील हे बोधचिन्ह पाश्चात्य जगतात कुठेना कुठे नजरेस पडते. या अक्षराचे गूढही कोणाला सुटलेले नाही. God, Goodness, Geometry अशा अनेक अटकळी बांधल्या जातात. तरी, जगातील सर्वश्रेष्ठ स्थापत्यकार ईश्वराला मानवंदना देण्यासाठीच G हे अक्षर येते असे अनेकजण मानतात. युरोपातील आणि प्रामुख्याने अमेरिकन सरकारवर या संघटनेचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. फ्रीमेसनरी ही तिच्या राजकारणातील सहभागामुळे बऱ्यापैकी कुप्रसिद्धही गणली जाते. राजकीय हत्या, हल्ले, स्थित्यंतरे यांत या संस्थेचा सहभाग असल्याच्या वदंता प्रसिद्ध आहेत.

परंतु, या सर्व सांगोवांगीच्या कथा आहेत की यात काही तथ्यांशही आहे याचा मागोवा घेताना तज्ज्ञ ही कॉन्स्पिरसी थिअरी अर्थातच मोडीत काढतात. त्यांचे काही ठोस मुद्दे असे -

अमेरिकेचा शिक्का निश्चित करण्यात बेंजामीन फ्रँकलीन हे एकटेच नव्हते. त्यांच्यासोबत इतर अनेक होते आणि ते फ्रीमेसन असल्याचे पुरावे नाहीत. अमेरिकन शिक्क्यातील फ्रँकलीन यांनी सुचवलेला काही भाग नाकारण्यातही आला होता. बॉस्टन टी पार्टीची आखणी सर्वस्वी फ्रीमेसन्सनी केली होती याला पुष्टी देणारे संदर्भ सापडत नाहीत. फ्रीमेसन्स आणि इजिप्त व इजिप्तमधील पिरॅमिडस यांचा कोणताही संबंध असल्याचे दाखले नाहीत. हायरम अबीफच्या खुनाचा ऐतिहासिक पुरावा मिळत नाही आणि त्याच्यामुळे प्राणांची शपथ घालण्याचा विधी फ्रीमेसन संस्थेत रुजू झाल्याची कथा केवळ दंतकथा आहे. फ्रीमेसनरी ही कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाची संस्था असल्याचे सिद्ध झालेले नाही. काही विद्वानांनी एकत्र येऊन सुरू केलेली आणि स्वयंप्रेरणेने ज्यांना या संस्थेत सहभागी व्हावे असे वाटते त्यांना सभासदत्व देणारी ही संस्था आहे इतकेच.

याचप्रमाणे, एक डॉलरच्या रहस्याचा मागोवा घेता, या नोटेवरील १३ पायऱ्यांच्या पिरॅमिडमधील १३ हा आकडा अमेरिकेच्या १३ मूळ वसाहती दर्शवतो. हा अपूर्ण पिरॅमिड राष्ट्रबांधणीचे आणि एकजूटीचे काम अद्याप बाकी आहे असे सांगतो. या पिरॅमिडच्या पायथ्याशी असणारा MDCCLXXVI हा रोमन क्रमांक १७७६ हे वर्ष दर्शवतो. १७७६ मध्ये अमेरिकेच्या "डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडस"वर शिक्कामोर्तब झाले होते. Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ आहे "नव्या युगाची व्यवस्था" कारण ते १७७६ सालापासून सुरू झाले असे गणले जाते.

रहस्य, गुपिते, थरार यांचे मानवी मनाला अनादी कालापासून आकर्षण आहे. दंतकथा या सत्यापेक्षा अधिक आकर्षक असतात आणि लोकांच्या मनात घर करून राहतात. त्या सर्वस्वी खऱ्या असतीलच असे नाही पण तथ्यांश नक्कीच असू शकतो. आपल्याला विश्वासाचा कोणता धागा पकडून पुढे जायचे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, इतरांपेक्षा आपल्याला काकणभर अधिक ज्ञान आहे, वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहित आहेत आणि आपण त्या इतरांपासून सुरक्षित ठेवू शकतो ही भावना माणसाला लहानपणापासूनच सुखावत असते. इतिहासात अनेकदा अशा गुप्तसंस्थांचा उल्लेख आढळतो. प्रायॉरी ऑफ झायन नावाची राजवंशाचे किंवा येशूच्या वंशाचे पुरावे जपून ठेवणारी आणि त्यांना संरक्षण देणारी गुप्तसंथा, भक्त आणि श्रद्धाळूंच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेली नाइट टेंप्लार ही संघटना, रहस्यांचे राखण करून राजकारणात आपला ठसा उमटवणारी फ्रीमेसन्स ही संघटना आणि यापेक्षा थोड्या वेगळ्या गुन्हेगारी वाटेने जाणाऱ्या असॅसीन किंवा हश्शाशीन ही हशीशाच्या अंमलाखाली सदस्यांकडून गुन्हे करवून घेणारी संघटना आणि खुद्द भारतातील ठग या नावाने प्रसिद्ध पावलेली गुन्हेगारी संघटना अशा अनेक गुप्त संघटना जगाच्या इतिहासात कार्यरत असल्याचे आढळून येते. या संघटनांत सामील होण्यासाठी लागणारी सदस्य पात्रता, त्यांचे शपथविधी, गुप्त ठिकाणी गुप्ततेत पार पाडले जाणारे विधी, त्यांची कार्यपद्धती या सर्वांनी समाजाला वर्षानुवर्षे भुऱळ पाडली आहे. डॅन ब्राऊनची नवी कादंबरी लवकरच येत आहे आणि ती सुलेमान राजाने बांधलेले प्राचीन मंदिर आणि फ्रीमेसन्स या गुप्तसंस्थेवर आधारित आहे. त्या कादंबरीच्या निमित्ताने फ्रीमेसनरीवर पुनश्च चर्चा सुरू होईल. नवी माहिती बाहेर येईल. नवी संशोधने केली जातील. तूर्तास, ही संस्था अद्यापही जगभरात कार्यरत आहे आणि अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष फ्रीमेसन्स होते एवढे सत्य एक डॉलरच्या नोटेवरच्या या चिन्हामागील रहस्याचे गूढ कायम राखण्यास पुरेसे आहे.


--------------------------------------------------------------------------------
लेखासाठी वापरलेली सर्व चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.
संदर्भः
डोन्ट नो मच अबाऊट मायथॉलॉजी - केनेथ डेविस
एंजल्स अँड डिमन्स - डॅन ब्राऊन
सीक्रेट्स ऑफ फ्रीमेसनरी - डिस्कवरी चॅनेलवरील माहितीपट
फ्रीमेसनरी - विकिपीडिया
एक डॉलरचे अमेरिकन बिल

Monday, April 20, 2009

जपून! ते लक्ष ठेवून आहेत

Seeing this obscene thing is a shock; what is worse is seeing people passing to and fro beneath it, intent on either plotting their day's business or planning their evening's pleasure; they pass to and fro and do not look up.

None of them look up.

I hear him say it again: We don't see them... but they see us.

- Stephen King
Nightmares in the sky


सुप्रसिद्ध भयकथा लेखक स्टीफन किंग यालाही अंगावर शहारे आणणारे असे काही अस्तित्वात आहे ही कल्पनाच मोठी रोचक आहे. वर उद्धृत केलेली वाक्ये स्टीफन किंगच्या एखाद्या प्रसिद्ध कादंबरीतील नसून एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पकलेवरील चित्रांच्या पुस्तकासाठी किंग यांनी केलेले हे भाष्य आहे. मध्ययुगात प्रामुख्याने प्रसिद्ध झालेल्या परंतु पुरातन काळापासून सर्व संस्कृतीत चालत आलेल्या या शिल्पकलेला ढोबळमानाने गर्गॉयल्स , ग्रोटेस्क अशा नावांनी संबोधले जाते.


गरगॉयल म्हणजे काय?

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर गरगॉयल म्हणजे इमारतींवरील पाणी वाहून नेणारी आणि त्याचा निचरा करणारी नळकांडी. याला इंग्रजीत "गटर" असा शब्द आहे. ही प्रामुख्याने इमारतींच्या माथ्यावर स्थित असून नळकांड्याच्या तोटीला एखादा भयप्रद चेहरा किंवा अर्धपशूमानवी आकृतीचे शिल्प असते. यांचा मुख्य उपयोग इमारतीच्या भिंती आणि वास्तुचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करून हे पाणी इमारतीपासून थोड्या दूर अंतरावर फेकणे हा असतो. आपल्याकडेही थोडेफार यासाठीच परंतु वेगळ्या वापरासाठी देवळांमध्ये गोमुखे दिसतात.

चित्र १: पाणी ओकणारे गरगॉयल


गरगॉयल या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे "गार्गल" या शब्दावरून. घशातून गुळण्यांसारखे आवाज करत पाणी ओकणार्‍या या शिल्पांना गरगॉयल हा ध्वन्यानुसारी शब्द अगदी चपखल बसतो. अशाचप्रकारे, इमारतींवर स्थित चमत्कृतीपूर्ण परंतु पाण्याचा निचरा न करणार्‍या शिल्पांना ग्रोटेस्क, दोन किंवा अधिक प्राण्यांच्या संकराने तयार होणारे "कायमेरा" अशा अनेक प्रकारांनी संबोधले जाते. ही शिल्पे इमारतींचे कळस, प्रवेशद्वारे, खांब, कमानी यांवर स्थित दिसतात. कायमेरा, ग्रोटेस्क आणि गरगॉयल्स यांच्यात मूलभूत फरक असला तरी प्रामुख्याने ही शिल्पे गरगॉयल्स या नावाने अनेक माध्यमांतून प्रसिद्ध असल्याने लेखाच्या सुटसुटीतपणासाठी गरगॉयल असाच शब्द यापुढे वापरला आहे.

गरगॉयल, ग्रोटेस्क आणि याप्रकारची शिल्पे अस्तित्वात कशी आली असावीत याचा विचार करता अनेक संस्कृतींमध्ये समान आढळणारी आणि प्राचीन काळापासून चालत आलेली काही उदाहरणे येथे देता येतील.

माणसाला अनादी काळापासून त्याच्या आसपास वावरणारे प्राणी आणि त्यांच्या वर्तणूकीविषयी कमालीचे कुतूहल वाटत आले आहे. वाघाचे शौर्य, घारीची नजर, गरुडाची झेप, कोल्ह्याचे चातुर्य, लांडग्याचा लबाडपणा, सशाचे भित्रेपण यासर्वांमधून मानवी स्वभावाचे विशेष प्राण्यांना चिकटवलेले आढळतील आणि प्राण्यांचे विशेष मानवी स्वभावात उतरतात हे दर्शवलेले आढळेल. पक्ष्यांची आभाळातील भरारी पाहून माणसालाही आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पडले असावे ही गोष्ट जितकी सत्य आहे त्याचबरोबर, मनुष्य आणि प्राणी यांच्या संकराने चमत्कृतीपूर्ण अशी अर्धपशूमानवी व्यक्ती आणि शक्ती निर्माण करण्याचा मानवाचा मानसही पुरातन काळापासून स्पष्ट आहे.

काही पुरातन संस्कृतींचा विचार करता, ग्रीक संस्कृतीतील मिनोटॉर हा राक्षस, सापांचे केस डोक्यावर बाळगणारी मेड्युसा, भारतीय संस्कृतीतील हत्तीचे डोके चिकटवलेला गणपती, बोकडाचे डोके लावलेला दक्षराज, घोड्यांची तोंडे असणारे गंधर्व, शंकराचा नंदी, इजिप्शीयन संस्कृतीमधील कोल्ह्याचे तोंड चिकटवलेला मृत्युदेव अनुबीस, पक्ष्याचे डोके असणारा थॉथ आणि परिकथांतून समोर येणार्‍या मत्स्यकन्या, घोड्याचे धड असणारे धनुर्धर सेंटॉर, पंखधारी पर्‍या वगैरे या अर्धपशूमानवी गटात मोडतील. अगदी अर्वाचीन काळातही वटवाघळांसारखे पंख लावून फिरणारा बॅटमॅन, मनगटातून कोळ्याची जाळी काढणारा स्पायडरमॅन हे साय-फाय नायकही प्राण्यांचे गुणधर्म मानवी जीवनात अंतर्भूत करताना दिसतात आणि याच पार्श्वभूमीवर कुठेतरी चमत्कृतीपूर्ण गरगॉयल्सचीही भेट घडते. इमारतींच्या कळसांवरून तुमच्याकडे ते सतत पाहात असतात. नजर ठेवून असतात, तुमच्या लक्षात ते येवो किंवा न येवो.

चित्र २: पॅरिसमधील सुप्रसिद्ध नोत्र दाम चर्चवरील ग्रोटेस्क


एखाद्या जुन्या गॉथिक किंवा रोमन बांधणीच्या इमारतींवर भयप्रद किंवा हिंस्त्र चेहरे, अर्धपशूमानवी मुखवटे आणि शरीरे, आक्रमक आविर्भावातील पशू यांची शिल्पे तुमच्या पाहण्यात आली असावीत. युरोपमधील ऐतिहासिक इमारती, चर्चेस, न्यूयॉर्क, बॉस्टन, फिलाडेल्फिया, मुंबई अशा अनेक ठिकाणी अशी शिल्पे तुमच्या नजरेस पडतील. पडली नसतील, तर पाहून घ्या, आढळतील हे निश्चित. आकाशातून उंचावरून आपल्याकडे अशा हिडीस आकृत्या पाहात आहेत ही कल्पना मनाला हुरहुर लावणारी नक्कीच ठरावी. हॅलोवीनच्या सुमारास बाजारातही गरगॉयल्सच्या चमत्कारिक प्रतिकृती विकायला ठेवलेल्या आढळतील.

पशूंच्या आणि अर्धपशूमानवांच्या चमत्कृतीपूर्ण शिल्पांबरोबरच संपूर्ण मानवी परंतु हिडीस आणि भयप्रद स्वरूपातील गरगॉयल्सही अनेकदा इमारतींवर पाहण्यास मिळतात. एखाद्या रोमन किंवा गॉथिक बांधणीच्या इमारतींच्या कमानींवरील किंवा प्रवेशद्वारांवरील की-स्टोन्सवर असे हिडीस चेहरे सहज दृष्टीस पडतील. अशा भयप्रद चेहर्‍यांमुळे अनेकांना हे गरगॉयल्स एखाद्या सैतानी करणीचे, दुष्ट प्रवृत्तींचे प्रतिनिधी वाटतात आणि गरगॉयल्सच्या गूढपणात भर पडते. काहीजणांच्या मते वास्तुकडे सैतानी प्रवृत्तींची नजर पडू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी ही शिल्पे कोरलेली असतात तर काहींच्या मते शत्रूची मुंडकी प्रवेशद्वारांवर लावून विजय साजरा केला जातो. या ठिकाणी शौर्यवान विजेता राहतो असे सांगण्याची ही पद्धत असावी, इमारतीच्या मालकांचा किंवा त्यांच्या विजयांचा संबंध या शिरांशी जोडता येतो असे काहींना वाटते. भारतातही शत्रूचे शीर तोडून ते वेशीवर, किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जनतेला दिसावे असे ठेवले जाण्याची प्रथा होती तसेच काहीसे. काही तज्ज्ञांच्या मते हल्लीच्या काळात जसे एखाद्या चेहर्‍याचे व्यंगचित्र करण्याची पद्धत आहे त्याप्रमाणेच मध्ययुगात एखादा चेहरा अशा स्वरूपात लावण्याची पद्धत असावी. त्यात भयरसाची निर्मिती नसून केवळ विनोदनिर्मितीसाठी ही शिल्पे कोरली जात असावीत. कारणे काहीही असली तरी ही शिल्पे पाहून अंगावर शहारा आल्यास किंवा भीतीची भावना मनाला चाटून गेल्यास नवल नाही.

चित्र ३: हॅलोवीनच्या सुमारास अशी गरगॉयल्स बाजारात विकायला ठेवलेली आढळतात.



गरगॉयल्सची शिल्पकला मध्ययुगात प्रसिद्ध झाली असली तरी प्राचीन काळीही अशाप्रकारच्या शिल्पांचा आणि चित्रांचा वापर होत असे हे जाणवते. पुरातन इजिप्शियन स्थापत्त्यशास्त्रातील स्फिन्क्स, ग्रीक मडक्यांवर आढळणारे अर्धपशूमानव या सारख्या शिल्प आणि चित्रांना सुमारे ३-४ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. इजिप्शियन स्फिन्क्सला ग्रीकांनी आपली पौराणिक कथा जोडून भयनिर्मितीचा प्रयत्न केलेला आहे असे सांगितले जाते. एक आद्य गरगॉयल म्हणून याकडे पाहता यावे. याचप्रमाणे जुन्या काळातील उत्कृष्ट गरगॉयल कोणते यावर अनेक तज्ज्ञांचे एकमत होते ते म्हणजे अथीनाच्या ढालीवर असणारे मेड्युसाचे शीर. ग्रीक पुराणांत मेड्युसा या राक्षसीला गॉर्गॉन असे म्हटले गेले आहे.
चित्र ४: पार्थेनॉनची प्रतिकृती असलेल्या नॅशविलमधील अथीनाची ढाल येथे पाहता येईल.
गॉरगॉन या शब्दाचा अर्थ "घशांतून मोठ्याने आवाज काढणारे (डरकाळ्या फोडणारे) " असा होतो. प्राचीन ग्रीक संस्कृतीत दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी अशा शिरांचा वापर केला जाई. कपडे, चिलखते, ढाली, घरे, भिंती वगैरेंवर गॉरगॉनचे शीर रंगवलेले किंवा कोरलेले आढळत असे. अलेक्झांडर द ग्रेटच्या चिलखतावरही मेड्युसाचे शीर विराजमान असल्याचे पॉम्पै येथील कलाकृतीवरून कळते.

येथे एक गंमतीदार गोष्ट आठवते ती म्हणजे मेड्युसा ही पूर्वी अतिशय रूपवान होती. तिच्यावर रागावलेल्या अथीनाने तिला शाप दिल्यावर मेड्युसा भयंकर दिसू लागली. तिचे लांबसडक केस विषारी सापांत बदलले. ती इतकी हिडीस दिसू लागली की तिला पाहून भीतीने थरथरणार्‍या मनुष्याचे रुपांतर दगडात होई, म्हणजेच भीतीने आक्रसून घेतलेल्या किंवा वेडावाकडा चेहरा झालेले एक नवे गरगॉयल अस्तित्वात येई.

पाश्चात्य जगतातून सरकून भारताकडे नजर टाकल्यास भारतीय स्थापत्यशास्त्राला हजारो वर्षांचा इतिहास आहे हे लक्षात येते. परकीय आक्रमणे, कलेवरील परकीय प्रभाव या सर्वातून भारतीय कला फुललेली आहे.

भारतातील गरगॉयल्स

मुंबईत असताना छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारती समोरून तुम्ही अनेकदा गेला असाल तर वरील गरगॉयल्स तुमच्या पाहण्यात आली असतील. असे नसल्यास, यानंतर कधी जाणे झाले तर या स्थापत्यशास्त्राच्या उत्कृष्ट नमुन्यासमोर काही काळ अवश्य रेंगाळा. सुबक आणि घाटीव गरगॉयल्स इमारतीच्या माथ्यावरून तुमच्याकडेच रोखून पाहात आहेत याची प्रचीती येईल. तेथून पुढे फोर्ट विभागातील जुन्या इमारतींकडेही बघा, तिथेही गरगॉयल्स सापडण्याची शक्यता आहेच. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजमहालावरही अशाच प्रकारचे गरगॉयल्स आहेत अशी बातमी नुकतीच एका मित्रांशी बोलताना कळली. अर्थातच, हे पाश्चात्य स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत. लक्ष्मी विलास राजवाडा हा संपूर्ण पाश्चात्य धर्तीचा नसला तरी त्यावर काही पाश्चात्य धाटणीचे सोपस्कार पार पडले असावेत असे वाटते. यामुळेच अस्सल भारतीय स्थापत्यशास्त्रातील गरगॉयल्स म्हणून यांची गणना करता येणार नाहीत.

भारतातही गरगॉयलसारखी शिल्पे कोरली जात का? या प्रश्नाचे उत्तर "होय" आहे. गोमुख हे सर्वार्थाने योग्य गरगॉयल मानले तरी गरगॉयल या शब्दाचा हेतू ज्याप्रमाणे बदलला आहे त्या सदृश भय उत्पन्न करणारी शिल्पेही भारतात आढळतात. भारतातील कोरीवकामाने मढवलेल्या कोणत्याही मंदिरांकडे पाहिले तर अशा गरगॉयल सदृश मूर्ती सहज दिसून येतील. या ठिकाणी चटकन आठवलेले दोन शिल्प प्रकार म्हणजे दक्षिण भारतातील मंदिरांत आढळणारे याली आणि भारतभर सर्वत्र सहज आढळणारे कीर्तिमुख यांची माहिती पुढे दिली आहे.

शरभेश्वर (सरभ/ याली)

पुराणांतून पुढील कथा सांगितली जाते ती अशी, हिरण्यकश्यपूचा नायनाट झाल्यावरही विष्णूने घेतलेल्या नरसिंहावताराचा राग शांत होईना. नरसिंहावताराच्या रागाचा त्रास संपूर्ण जगाला होऊ लागला तेव्हा त्याचा नि:पात करण्यासाठी शिवाने सिंह, गरूड आणि मानव यांच्या संकराने बनलेला शरभेश्वर अवतार धारण केला आणि नरसिंहाशी घनघोर युद्ध केले. काही काळाने नरसिंहाला शरभेश्वराचे खरे स्वरूप कळले आणि त्याचा राग शांत झाला आणि तो शरभेश्वराचा परमभक्त बनला. यापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारे, शरभ उपनिषदात शरभाने नरसिंहाला मारून टाकले असा उल्लेख येतो.
चित्र ५: मैसूर सँडल सोपचे बोधचिन्ह असणारा शरभेश्वर


दक्षिण भारतात मंदिरांच्या खांबावर सिंह, गरूड यांच्या संकराने बनलेला अर्धपशूमानव कोरण्याची प्रथा मध्यकाळापासून प्रसिद्ध आहे. याला "याली" असे म्हटले जाते. भारतात इतरत्रही हे याली, शरभेश्वर किंवा सरभ या नावाने प्रसिद्ध आहेत. मंदिरांचे संरक्षण करणार्‍या देवता म्हणून त्यांना खांबावर कोरले जाते. सिंह-गरूड आणि मानव यांच्या संकराने दर्शवलेले पर्शियन सम्राट दरायसचे (दर्युश) चित्र, बॅबिलॉनचे पंखधारी सिंह आणि सुप्रसिद्ध इजिप्शियन स्फिन्क्स हे सर्व शरभेश्वराविषयी लिहिताना नजरेआड करवत नाही.

दिवाळीच्या दिवसांत उटण्यासारखा साबण म्हणून ज्या मैसूर सँडल सोपचा वापर केला जातो त्याचे बोधचिन्ह शरभेश्वर आहे.

चित्र ६: मदुराईमधील मंदिराच्या खांबावर कोरलेला याली






कीर्तिमुख

मध्यंतरी बिल मॉयर्स या प्रसिद्ध अमेरिकन पत्रकाराने जोसेफ कॅम्पबेल यांच्या घेतलेल्या मुलाखतींचे संकलन वाचताना शिवपुराणातील एक गोष्ट आढळली. ती काहीशी अशी -

कोण्या एका बलाढ्य राक्षसाने देवांचा पराभव करून स्वर्गावर आपले राज्य स्थापन केले आणि तेथून तो तडक कैलासावर पोहोचला आणि विजयोन्मादाच्या भरात त्याने शिवाकडे पार्वतीची मागणी केली. संतप्त शिवाने आपले तिसरे नेत्र उघडले आणि त्यातून विजेचा लोळ बाहेर पडला. त्या लोळातून पहिल्या राक्षसापेक्षाही बलवान आणि भयंकर असा दुसरा राक्षस निर्माण झाला. सिंहाचे डोके, त्यावर लांबलचक जटाधारी केस, प्रचंड शरीर असणार्‍या या राक्षसाची निर्मिती शिवाने पहिल्या राक्षसाला खाऊन टाकण्यासाठी केली होती. या राक्षसाला पाहून पहिला राक्षस थरथरा कापू लागला आणि शिवाकडे क्षमायाचना करू लागला. भोळ्या शिवाला याचनेचा अव्हेर करता येईना आणि त्याने या पहिल्या राक्षसाला क्षमा केली.

आता दुसर्‍या राक्षसाने शिवाला विचारले, "माझी निर्मिती या पहिल्या राक्षसाला खाण्यासाठी तुम्ही केलीत. मी प्रचंड भुकेला आहे. आता मी कोणाला खाऊ?" शिवाने उत्तरात म्हटले, "असं कर. तू स्वतःलाच खा." शिवाची आज्ञा शिरसावंद्य मानून या राक्षसाने प्रथम आपले पाय खाण्यास सुरूवात केली. मग पोट खाल्ले. नंतर हात खाल्ले, छाती, मान खाल्ली आणि असे करता करता केवळ डोके शिल्लक राहिले. राक्षसाच्या या आज्ञाधारकतेवर प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला तेथेच थांबवले आणि वर दिला, तो असा, "यापुढे तुला जग कीर्तिमुख म्हणून ओळखेल. माझ्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुझी स्थापना होईल. तुझ्यासमोर वाकल्याखेरीज माझे दर्शन लोकांना होणार नाही, त्यांना पुण्य प्राप्त होणार नाही."

कीर्तिमुखांची कथा पद्मपुराणातही आढळते परंतु त्यात थोडाफार बदल दिसतो. तो काहीसा असा, कीर्तिमुख हा शंकराच्या जटेतून निघालेला एक शिवगण. याला तीन तोंडे, तीन पाय, तीन शेपट्या आणि सात हात होते. शंकराच्या आज्ञेवरून याने प्रेत खाऊन दाखवले. त्याचे साहस पाहून शंकराने वर दिला की, 'तुझे स्मरण केल्याशिवाय माझे दर्शन करणार्‍याचा अध:पात होईल.'
sangameshwar - dhruv"
चित्र ७: संगमेश्वर मंदिरातील कीर्तिमुख


शंकराच्या शिवगणाची ही गोष्ट खरी मानली तरी विष्णूमंदिरातदेखील ही कीर्तिमुखे सहज दिसून येतात. वेंकटेश्वर बालाजीच्या मूर्तीवरही हे कीर्तिमुख दिसते. महाराष्ट्रातील काही शिवमंदिरांतील कीर्तिमुखे उपक्रमावरील ध्रुव या प्रकाशचित्रकारांनी मला वापरण्यासाठी दिली होती ती येथे लावत आहे. भयंकर चेहर्‍यांच्या या राक्षसांचे देवाच्या मंदिरांत स्थान गॅरगॉयल (ग्रोटेस्क) सदृशच असावे हा कयास येथे मांडता येतो.

ध्रुवने दिलेले कीर्तिमुखांचे काही फोटो येथे लावत आहे. फोटो काढण्यादरम्यान ध्रुवने निरीक्षण केले त्यात महाराष्ट्रात कीर्तिमुखे केवळ प्रवेशद्वारे किंवा कमानींवर न दिसता गर्भगृहाकडे जाणार्‍या पायर्‍यांवर, विशेषतः सर्वात वरच्या पायरीवरही दिसून येतात. वाचक्नवींनी पुरवलेल्या माहितीनुसार प्राचीन संस्कृतीत सिंह हे सामर्थ्याचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे राजद्वारावर, राजाच्या आसनावर, मंदिरात गाभार्‍याच्या दरवाज्यावर, देवाच्या प्रभावळीत, उंबर्‍यावर अथवा शिखरापासी एक विक्राळ सिंहमुख(कीर्तिमुख) कोरलेले असते. अशी आकृती असलेले भवन सुरक्षित राहते अशी भावना असते. जैन आणि बौद्ध संस्कृतीतही अशाप्रकारे कीर्तिमुखे कोरण्याची प्रथा आहे.

चित्र ८: वाटेश्वर मंदिरातील एक ग्रोटेस्क



जगातील विविध संस्कृतींची तुलना करत गेल्यास त्यांच्यातील साम्यस्थळे आश्चर्यचकीत करतात. गरगॉयल्स, ग्रोटेस्क, कायमेरा, स्फिन्क्स, याली, कीर्तिमुखे ही एकमेकांशी सांस्कृतिक दुव्यांतून बांधली गेली असावीत का? या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणारा अभ्यासक "होय" असेच देईल. ड्रॅगनसदृश प्राणी किंवा भयंकर दिसणारे डायनॅसोर, काळाच्या ओघात नष्ट पावलेले काही प्रचंड आकारांचे जीव हे तर या गरगॉयल्समागील प्रेरणा नसावेत. विषयाचा आणि या शिल्पांचा आवाका बराच मोठा आहे. या लेखातून या विविध शिल्पांना केवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या शांत संध्याकाळी वेळ काढून या गरगॉयल्सकडे अवश्य नजर टाका, तेही तुमच्याकडे इमारतींच्या छतांवरून कुतूहलाने पाहतील याबाबत शंका नाही.

grotesque - dhruv चित्र ९: महाराष्ट्रातील एक ग्रोटेस्क





तळटीपा:

उपक्रमावरील टंकात ग्यर्गॉयल या उच्चारात शब्द लिहिणे कठिण वाटल्याने सुटसुटीत गरगॉयल या शब्दाचा वापर लेखात केला आहे.

ग्रोटेस्क या शब्दाचे मूळ ग्रोट्टो या शब्दात दडलेले आहे. अधिक माहिती येथे मिळेल.

संदर्भ, अधिक माहिती, पूरक वाचनः


  1. गरगॉयल्स

  2. नाईटमेअर्स इन द स्काय : स्टिफन किंग

  3. अबाऊट गरगॉयल्स

  4. शरभ उपनिषद

  5. कीर्तिमुख

  6. जोसेफ कॅम्पबेल अँड पावर ऑफ मिथ


  7. याखेरीज, विकिपिडीयावर अनेक संदर्भ वाचनास मिळतील.


आभारः

कीर्तिमुखांच्या चित्रांसाठी ध्रुवची आभारी आहे. संदर्भांसाठी चित्राची आभारी आहे. इतर अनेक सुचवण्यांसाठी धनंजय, वाचक्नवी, विसुनाना, तो, चित्तरंजन यांची आभारी आहे. ही सर्व मंडळी उपक्रम.ऑर्ग या संकेतस्थळाचे सदस्य आहेत.


चित्रे:


  1. चित्र १ आणि चित्र २ ही विकिपिडीयावरून घेतलेली असून चित्र ३ www.frightcatalog.com येथून घेतले आहे.

  2. चित्र क्र. ५ www.mysoresandal.co.in येथून घेतले आहे.

  3. चित्र क्र. ६ www.art-and-archaeology.com येथून घेतले आहे.

  4. ध्रुवची चित्रे त्याच्या परवानगीने लावली आहेत.