Sunday, November 04, 2007

द्रौपदीचा पांडवांशी विवाह - आक्षेप आणि कारणमीमांसा

मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात. गांगुलींचे महाभारत हीच माझ्याकडील विश्वसनीय प्रत आहे. तिच्या अनुषंगाने खालील लेख लिहिला आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील महाभारताची सुधारित प्रत कोणी वाचली असल्यास आणि खालील लेखावर अधिक प्रकाश टाकू शकल्यास आभारी असेन.

चर्चेतील आक्षेप काहीसे असे होते.


 • द्रौपदी ही भीक होती का?
 • पांडवांनी बैलोबांप्रमाणे आईची आज्ञा शिरसावंद्य मानून द्रौपदीला वाटून कसे घेतले?
 • कुंतीने भावांभावांत एकी रहावी म्हणून पाचांचा विवाह द्रौपदीशी करण्याचा जलद निर्णय कसा काय घेतला?
 • अनेक प्रसंगांतून द्रौपदी उर्मट होती असे दिसते तर तिने पाचांची पत्नी बनणे कसे स्वीकारले?भिक्षा ही भिकार्‍याला दिलेली भीक नसून ब्राह्मणाची मिळकत समजली जाई. तत्कालीन स्त्रियांची सामाजिक स्थिती पाहता, स्त्रीही गोधनाप्रमाणेच पुरुषाची मिळकत असणे वावगे नसावे. आता वळू स्वयंवरपर्वाकडे - यातील स्वयंवराचा भाग सोडून, द्रौपदीला जिंकल्यावर ब्राह्मणवेशात पांडव तिला घेऊन कुंभाराच्या घरी येतात तिथपासून सुरुवात करू.

आपले पुत्र परतले नाहीत या काळजीत पाठमोऱ्या बसलेल्या कुंतीच्या समोर उभे राहून पांडव, आपण भिक्षा घेऊन आल्याचे सांगतात. 'जे काही मिळाले ते तुम्ही समान वाटून घ्या' असे कुंती सांगते आणि पुत्रांकडे वळते. समोर उभ्या असलेल्या याज्ञसेनीला पाहून कुंती चकित होते आणि तिला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो. 'हे मी काय केले?' असे मोठ्याने बोलून ती द्रौपदीचा हात पकडते आणि पापाचे क्षालन व्हावे म्हणून युधिष्ठीरासमोर उभी राहते आणि सुनावते ' द्रुपद राजाची कन्या तुझ्या धाकट्या भावांनी जिंकून आणून माझ्यासमोर उभी केली आणि वर भिक्षा आणली असे ओरडले तो त्यांचा निव्वळ मूर्खपणा आहे. हे राजा! भिक्षा आणली असे वाटल्याने मी काही चुकीचे बोलून गेले नाही पण आता तूच सांग की माझे बोलणे खोटे कसे पडावे? आपल्या हातून पाप कसे घडू नये आणि या नवपरिणित वधूला येथे अवघडल्यासारखे कसे वाटू नये?'

युधिष्ठीर आईची समजूत घालतो आणि अर्जुनाकडे वळून म्हणतो, 'याज्ञसेनीला तू पणात जिंकलेस, तेव्हा तिच्याशी लग्न केवळ तूच करावेस. तेच योग्य होईल.'

यावर अर्जुन म्हणतो, 'असे करून पापाचा घडा माझ्या नशिबी येणार. आपण सर्व काही वाटून घ्यायची शपथ घेतली होती, मातेने तशी आज्ञाही दिली. आता याज्ञसेनीशी सर्वप्रथम विवाह तुम्ही करावा, मग भीमाने, मी, नकुल आणि सहदेवाने विवाह करावेत असे मला वाटते. यानंतर, मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्व आपली आज्ञा मानू.'

अर्जुनाचे वक्तव्य ऐकून बाकीच्या पांडवांनी द्रौपदीकडे निरखून पाहिले आणि तिच्या अप्रतिम सौंदर्याकडे पाहून ती आपलीही पत्नी होऊ शकते या शिवाय कोणताही दुसरा विचार त्यांच्या मनात येईना. युधिष्टीराने हे सर्व पाहून जाणले की आपल्या भावांच्या मनात द्रौपदीविषयी लालसा निर्माण झाली आहे आणि ही गोष्ट भावांभावांत फूट पाडायला कारणीभूत होईल हे जाणून त्याने 'द्रौपदी ही पाचही पांडवांची बायको होईल' असे घोषित केले.

हे सर्व घडत असता आपल्या बहिणीला जिंकणारे हे ब्राह्मण कोण हे पाहण्यासाठी धृष्टद्युम्न कुंभाराच्या घराबाहेर लपला होता. लाक्षागृहाच्या कांडापासून नाहीसे झालेले पांडव हेच ते पाच ब्राह्मण असावेत अशी शंका आल्याने श्रीकृष्ण आणि बलराम कुंभाराच्या घरात येऊन पांडवांना भेटून सल्ला मसलत करून गेले. ती रात्र पांडवांनी आनंदात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी लपलेला धृष्टद्युम्न महालात परतला तसे द्रुपदाने उत्सुकतेने ब्राह्मणांविषयी विचारले तेव्हा धृष्टद्युम्नाने ते पांडव असल्याचा संशय व्यक्त केला. येथे द्रुपद विचारतो की त्या गरीबाच्या घरात द्रौपदी कशी राहिली आणि धृष्टद्युम्न सांगतो की अतिशय शालीन आणि मिळून मिसळून राहिली.

विवाहाची बोलणी करायला द्रुपद कुंभाराच्या घरी गेला आणि पांडवांना उत्सवासाठी आमंत्रित करून गेला. यानंतर मिरवणूक, भोजन इ. नंतर द्रुपदाने लग्नाची बोलणी सुरू केली. पांडवांनीही त्याला आपली खरी ओळख दिली आणि द्रुपदाकडे आश्रय मागितला. द्रुपद आणि पांडवांची कुरुराजघराण्यात चाललेल्या राजकारणाविषयी बोलणी झाली.

यानंतर द्रुपदाने युधिष्ठिराकडे विनंती केली की आता अर्जुन आणि द्रौपदीचा विवाह ठरावा. यावेळेस युधिष्ठिराने सांगितले की द्रौपदीशी विवाह प्रथम मी करणार. झाला प्रकार माहित नसल्याने द्रुपदाने युधिष्ठिराला म्हटले की 'द्रौपदीला अर्जुनाने जिंकले आहे. सर्वांची संमती असेल की आपण मोठे भाऊ असल्याने तिच्याशी विवाह करावा तर माझी काहीच हरकत नाही.' यावर युधिष्ठिराने त्याला घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते ऐकून द्रुपद काळजीत पडला आणि म्हणाला की 'एका पुरुषाने अनेक विवाह करणे ही आपली प्रथा आहे परंतु एका स्त्रीने अनेक पती करणे धर्मबाह्य ठरणार नाही काय? असे पाप कसे करता येईल? या प्रसंगाने तुमच्या किर्तीला काळिमा तर नाही लागणार? अशा प्रकारचे लग्न मला समाजात आणि वेदांत आढळून आलेले नाही. हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे.'

युधिष्ठिर उत्तरादाखल म्हणतो, 'नैतिकता हा फार नाजूक मामला आहे. तिचा पथ सतत बदलत असतो. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही. ज्येष्ठांचा अवमान केला नाही. आमच्या मातेने हे शब्द उच्चारले ते खोटे ठरावेत अशी तिची आणि माझी इच्छा नाही.'

यावरही द्रुपदाचे संपूर्ण समाधान झालेले दिसत नाही (असे माझे मत) तो उद्गारतो, 'हे कुंती, तू, तुझे पुत्र आणि माझा पुत्र धृष्टद्युम्न मिळून या गोष्टीवर निर्णय करा. तुम्ही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचलात ते मला कळवा. मी विवाहाची तयारी करेन.'

द्रुपद, पांडव, कुंती आणि धृष्टद्युम्न यांचा विचारविनिमय चालला असता तेथे व्यास पोहोचले. यानंतर द्रुपद, धृष्टद्युम्न, युधिष्ठीर आणि व्यास यांच्यात मोठी चर्चा झाली. त्या चर्चेचे फलीत असे निघाले की पूर्वीही एका स्त्रीला एकाहून अधिक नवरे असल्याचे दाखले आहेत. द्रौपदीही "श्री"चा पुनर्जन्म असून ती पूर्वजन्मी पाच इंद्रांची पत्नी होती. (ती गोष्ट विस्तारभयास्तव येथे देत नाही) तिचा जन्म एका विशिष्ट हेतूने झाल्याने तिला पाचांची पत्नी होऊ देणे धर्मबाह्य नाही. आणि या चर्चांचे फलीत धर्मानुसार द्रौपदीने पांडवांशी केलेल्या विवाहात झाले.

असो. आता माझी टिप्पणीः


 • भिक्षा म्हणजे भिकार्‍याला दिलेली भीक नाही.
 • कुंतीने एक दोन मिनिटांत निर्णय घेतला नाही किंबहुना, निर्णय कुंतीचा नाही हे सहज समजते.
 • युधिष्ठिराने लंपटपणे द्रौपदी मिळावी म्हणून प्रयत्न केले किंवा भावाभावांतील एकी राहावी म्हणून प्रयत्न केले हे मानणे ज्याच्या त्याच्या समजूतीवर अवलंबून आहे. मला दोन्हींशी वावडे नाही.राजकारणाचा विचार केला असता पांडवांची स्थिती त्यावेळी फार वाईट होती. त्यांना योग्य आश्रयदाता हवा होता आणि तो द्रुपदापेक्षा उत्तम मिळाला नसता. द्रुपदाचे आश्रित होण्यासाठी आणि त्याची कृपा आपल्यावर राहण्यासाठी द्रौपदीला जिंकणे आवश्यक होते. ते न होता, भावाभावांतच कलह उत्पन्न झाले तर गेलेले राज्य मिळणे कठिण होते आणि विनाश निश्चित होता. आईची आज्ञा न मानणे, मोठ्या भावाच्या आधी धाकट्या भावाने लग्न करणे, शब्द खोटा पाडणे इ. गोष्टीही धर्मबाह्यच ठरल्या असत्या. म्हणजेच, इथून नाहीतर तिथून पांडवांचाच दोष मानला गेला असता. द्रुपदालाही द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी प्रबळ मित्रांची आणि सहकार्‍यांची गरज होती. धर्मबाह्य वाटले तरी त्याने मान तुकवली असतीच. व्यासांनी तेथे येऊन धर्मचर्चा करून पांडव कोणतेही पाप करत नसल्याचा निर्वाळा दिला आणि द्रौपदीचा विवाह पाचांशी झाला.

द्रौपदी या प्रसंगात काहीच का बोलली नाही याचे एक कारण द्रौपदीला आपला जन्म कशासाठी झाला आहे याची कल्पना होती. श्रीकृष्णाच्या भेटीने हे ब्राह्मण पांडवच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. वडिलांच्या अपमानाचा बदला आणि त्यासाठीच आपला जन्म आहे आणि पांडवांशिवाय हे कार्य कोणीच करू शकत नाही हे माहित असल्याने तिने गप्प राहणे पसंत केले.

किंवा, दुसर कारण जे महाभारताबाहेरील असावे - बाईने पतिविरुद्ध बोलले की संस्कृतीचा ऱ्हास होतो अशी समजूत असल्याने कदाचित ते संवाद मूळ महाभारतात झालेल्या बदलांमध्ये काढून टाकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूर्याचा पुत्र म्हणून तेजस्वी कर्ण आणि यज्ञज्वालेतून बाहेर आलेले धृष्टद्युम्न आणि द्रौपदी दोघेही उर्मट असल्याचे दाखले महाभारतात दिसतात. तेव्हा या सर्व प्रसंगात द्रौपदीने आपली नाराजी दाखवली नसेल असे वाटत नाही. कदाचित, तिने ती आपल्या पित्याकडे व्यक्त केली असेल किंवा भावाकडे कारण त्या दोघांच्या संवादांत चिंता, काळजी, पापाची भीती दिसून येते.

संदर्भः द महाभारता ऑफ कृष्णद्वैपायन व्यास - के. एम. गांगुली (पाने २४७ ते २५६)

Thursday, August 16, 2007

गौतमीपुत्र शातकर्णी

महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते. प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, यादव आणि सातवाहन राजघराण्याविषयी त्रोटक इतिहास नजरेस पडतो. या राजघराण्यांनीही आपापल्यापरीने आपले राज्य सांभाळले आणि वाढीस नेल्याचे दिसते परंतु समग्र इतिहास सहज नजरेस पडत नाही. बरेचदा, या राजांविषयी अधिक माहिती काढायची झाल्यास पुराणांचा आधार घ्यावा लागतो. मराठी साहित्यात या राज्यांविषयी लिहिले गेले असण्याची शक्यता आहे परंतु महाजालावर समग्र लेखन दिसत नाही.

यांतील सर्व राजघराण्यांपैकी सातवाहन राजघराण्याची आठवण आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नेहमीच काढत असतो. आजही वापरात असलेली शालिवाहन शके ही दिनमान पद्धती या राज्यकाळात सुरू झाल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या इतिहासात या राजघराण्याचे स्थान कोणते हे माहित करण्यासाठी काही वाचन केले त्याचा गोषवारा येथे देत आहे -

सातवाहन राजघराणे

सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिल्याचे पुरावे मिळतात. त्यानुसार मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले (बहुधा किल्ले) आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वत: अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.

सातवाहन राज्यअधिक माहितीसाठी विकिपीडियाचा हा दुवा पाहावा. याच दुव्यात पुढे या राजघराण्याचा उल्लेख कोणकोणत्या पुराणांत आला आहे त्याची उदाहरणे दिसतात. या राजघराण्यातील महत्त्वांच्या राजांपैकी गौतमीपुत्र शातकर्णी एक महत्त्वाचा राजा मानला जातो.गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. .

गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्लव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.

अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.

आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नाहपण राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नाहपणाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वागवत होता असे वाचायला मिळते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.

शातकर्णीचा चेहरा असलेली नाणी


गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. नंतर ७८ वर्षांनी ही कालगणना सुरू झाल्याने ग्रेगरीयन कॅलेंडरपेक्षा ७८ वर्षे उशीराने सुरू होते.

या राजाबद्दल नाशिक येथे खुद्द त्याची आई गौतमीच्या सांगण्यावरून आपल्या मुलाची स्तुती करणारा शिलालेख कोरलेला आढळतो, त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --

"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात (KShaharat) घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."

मराठी विकिपीडियावर मला या राजाची कथा सांगणारा एक भाग मिळाला. तो येथे चिकटवत आहे..

शालिवाहनाची राजधानी (आणि इतर सातवाहन राजांची राजधानी) पैठण होती. शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे वजन किती हे नक्की सांगता येईल का? ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. मग हत्तीला नावेत चढवले आणि पाणि नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढून त्याजागी माती भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेपर्यंत. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनासकट परत पाठवला. ह्या त्याच्या बौद्धिक विजयाने त्यानी सुरु केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात मान्य झाला.उपक्रमावरील एका सदस्यांनी मला सातवाहन घराण्याची संपूर्ण वंशावळ काढून दिली होती. ती ही येथे चिकटवत आहे.

आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा:

 1. सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३
 2. कृष्ण(भात) १०
 3. श्रीशातकर्णी(श्रीमल्‍लकर्णी) १०
 4. पूर्णोत्संग(पौर्णमास) १८
 5. स्कंधस्तंभ १८
 6. शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६
 7. लंबोदर १८
 8. आपीतक(आपीलक, दिविलक) १२
 9. मेघस्वाति १८
 10. स्वाति(पतुमत्, अटमान्) १८
 11. स्कंदस्वाति ७
 12. मृगेंद्रस्वातिकर्ण ३
 13. कुंतलस्वातिकर्ण ८
 14. स्वातिवर्ण १
 15. पुलोमावी ३६
 16. अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५
 17. हाल ५
 18. मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७
 19. पुरिकषेण(प्रविल्‍लसेन, पुरीषभीरु) २१
 20. सुंदरशातकर्णी(सुनंदन) १
 21. चकोरशातकर्णी ६ महिने
 22. शिवस्वाति २८
 23. गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८
 24. पुलोमत् २८
 25. शातकर्णी(शिवशातकर्णी) २९
 26. शिवश्री ७
 27. शिवस्कंध ३
 28. यज्ञश्री शातकर्णी २९
 29. विजय ६
 30. चंडश्री १०
 31. पुलोमत् ७.

संदर्भ: सर्व संदर्भ आणि चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. याशिवाय, मेगॅस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ यावरूनही ही माहिती दिली आहे.

अधिक माहितीसाठी ही चर्चा पाहावी.

Monday, May 14, 2007

ज्ञानप्रसाराची मौखिक परंपरा

खालील लेख हा कोणताही वाद सुरू करण्याच्या हेतूने लिहीलेला नाही. लेखातील बरेचसे विचार प्राचीन असल्याने ते सद्य काळात लागू आहेत असा लेखिकेचा दावा नाही. हा लेख कोणत्याही गोष्टीच्या समर्थनार्थ लिहिलेला नाही, तसेच, लेख परिपूर्ण आहे असाही लेखिकेचा दावा नाही. वाचकांकडे खाली दिलेल्या मुद्द्यांवर भर टाकण्याजोगे अथवा योग्य माहितीच्या आधारे लेखातील मुद्दे खोडून काढण्यासारखे काही असेल तर ते येथे जरूर द्यावे


“रुक मत जा" या वाक्यातील विरोधाभास बहुधा सर्वांनाच माहित असावा. "रुक, मत जा" यातील रुक नंतर आलेला स्वल्पविराम थोडेसे थांबणे सुचवतो, पण तोच जर "रुक मत, " नंतर "जा" आला तर वाक्याचा अर्थ बदलून टाकतो. जर या वाक्यात स्वल्पविराम आलाच नाही तर मात्र वाक्य दोहोंपैकी कोणत्या हेतूने लिहिले आहे याचा उलगडा होणे कठिण होऊन बसते. याउलट, बोलणारा ज्या हेतूने हे वाक्य बोलतो/ उच्चारतो तो हेतू सहज स्पष्ट होतो. विरामचिन्हांचा उपयोग होण्यापूर्वी मराठी, संस्कृतासारख्या भाषा योग्य रितीने कशा काय वाचल्या गेल्या असतील अशी शंका गेले अनेक दिवस डोक्यात घोळत होती. वाचन करत असताना लेखनकलेबद्दल काही विशेष नजरेस पडले ते येथे संकलित केले आहे.

इतिहासात डोकावून पाहिले आणि पूर्वापार चालत आलेले आणि अद्यापही अस्तित्वात असलेले साहित्य कोणते असा विचार केला असता, ते साहित्य म्हणजे 'लोककथा आणि पौराणिक कथा' असा निष्कर्ष काढला जातो. लोककथा/ पौराणिक कथा या नेमक्या कोणत्या काळात निर्मिल्या गेल्या हे सांगणे कठिण असले तरी त्या आजतागायत ऐकल्या/ ऐकवल्या जातात आणि अद्यापही प्रसिद्ध आहेत. इथे जर प्राचीन लिखित साहित्याचा विचार केला तर बरेचसे प्राचीन साहित्य हे काळाच्या ओघात वाहून गेले आहे किंवा मागे पडले आहे. अनेकदा ते ज्या लिपीत लिहिले गेले ती लिपी बदलल्याने किंवा नष्ट झाल्याने अशा लिखाणाचा अचूक अर्थ काढणे हे एक मोठे कठिण काम होऊन बसते, परंतु मौखिक परंपरेतून चालत आलेल्या बर्‍याच प्राचीन कथा आणि गोष्टी फुलवून सांगण्याची कला आजतागायत आहे.

भारतात मौखिक परंपरा म्हणून सर्वप्रथम वेदांकडे पाहिले जाते. वेद मौखिक का? पूर्वजांनी ते लिहून का ठेवले नाहीत? असा प्रश्न बरेचदा विचारला जातो. याचे अचूक उत्तर अद्याप सापडलेले नाही. अनेक तज्ज्ञांनी याबाबत अनेक मते मांडलेली दिसतात त्याप्रमाणे काही महत्त्वाची खाली दिली आहेत:


१. त्याकाळी लेखनकला अस्तित्वात नसावी किंवा अतिशय प्राथमिक स्वरूपाची असावी.
२. लेखनकला असावी फक्त ती साहित्यासाठी न वापरता, राज्यकारभारातील शिक्के किंवा इतर कामांसाठी वापरली जात असावी.
३. उपलब्ध अक्षरांत अचूक उच्चार लिहिणे अशक्य असल्याने आणि तसे लिहून चुकीचे उच्चार प्रचलित होऊन अयोग्य ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहचू नये म्हणून वेदांना मौखिक ठेवण्यात आले.
४. ज्ञान अनाधिकारी व्यक्तींच्या हाती जाऊ नये म्हणून.

बरेचदा चौथ्या मुद्द्याला अवास्तव महत्त्व दिल्याचे दिसून येते, तरीही बर्‍याच तज्ज्ञांच्या मते यांतील पहिला मुद्दा खरा मानला जातो कारण ऋग्वेदात लेखनाचा उल्लेख नाही असा निर्वाळा तज्ज्ञ देतात. (यावर वाद-प्रतिवाद आहेतच.) परंतु लेखनकला विकसित झाल्यावरही वेदांचे लेखन झालेले आढळत नाही हे येथे महत्त्वाचे वाटते.

महाभारताच्या सुरुवातीलाच येणारी व्यास आणि गणेश यांच्यातील कथाही येथे विचारात घेण्याजोगी आहे. व्यासांनी महाभारत लिहून काढण्याची गणेशाला विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन गणेशाने सांगितले, “मी हे लेखन करेन परंतु माझी लेखणी एक क्षणही थांबता कामा नये.” यावर आपल्याला रचना करण्यास थोडी उसंत मिळावी या हेतूने व्यासांनी गणेशाला पुन्हा विनंती केली, “जेव्हा एखाद्या रचनेचा योग्य अर्थ लागणार नाही तोपर्यंत ती आपण लिहून काढू नये.” गणेशाला व्यासांच्या रचनेचा अर्थ लावताना वेळ लागलाच. या गोष्टीबाबत काही तज्ज्ञांचे मत असे की येथे केवळ अर्थ लावण्यापुरती ही कथा थांबत नसून, व्यासांच्या रचना इतक्या जटिल होत्या की त्यांचे उच्चार शब्दांत लिहिणे साक्षात गणेशालाही कठिण होते.

यापुढे जाऊन मला बहुतांश तज्ज्ञांत एकवाक्यता दिसली की प्राचीन भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे, पूर्वापार चालत आलेले अनेक विधी, वेद, मंत्र, रीती-रिवाज, सण, समजुती, खेळ, नृत्यप्रकार अशा अनेक प्रकारांतून कायम आहे याचे कारण मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला ज्ञान देणे आणि हे पिढ्यान पिढ्या चालत आल्याने प्राचीन भारतीय संस्कृती आजही अस्तित्वात आहे. वेदांच्या उच्चारांबाबत प्रा. ग्रेगरी पोसेल यांची एक प्रतिक्रिया मला वाचायला मिळाली त्यातील काही भाग येथे नमूद करत आहे:


"भारतीय ब्राह्मणांनी वेद मुखोद्गत करण्याचे कार्य अतिशय गांभीर्याने केले आणि त्यात पिढ्यान् पिढ्या सारखीच अचूकता आणि उच्चार राखले. उच्चारातील साधर्म्य हा श्रद्धेचा भाग होता. एक विद्वान संस्कृतज्ज्ञ जे. ए. बी. वॅन ब्युटेनन यांच्या सांगण्याप्रमाणे १८व्या आणि १९व्या शतकात ज्या युरोपीयांनी संस्कृत शिकायला सुरुवात केली त्यांच्या लक्षात असे आले की भारतातील कोणत्याही भागांत गेले असता जे मंत्रोच्चार कानी पडत असे ते सारखेच होते. पॉंडेचरीपासून पेशावरपर्यंत आणि कलकत्त्यापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या ब्राह्मणांचा एकमेकांशी कधीही संपर्क येण्याची शक्यता नाही.

म्हणून मौखिक परंपराही इतरांपेक्षा वेगळी वाटते आणि आज लिखित स्वरूपात अस्तित्वात असलेले हे वेद प्राचीन मौखिक वेदांशी मिळते-जुळतेच असावेत असे वाटते.”

मौखिक ज्ञानसंवर्धनाला भारतीय संस्कृतीत असलेली ही मान्यता इतर संस्कृतीत दिसते का यावर तज्ज्ञ पुढील उदाहरण देतात.

सॉक्रेटिसबद्दल लिहिताना प्लेटो एके ठिकाणी एक सॉक्रेटियन प्रश्न उद्धृत करतो, “कोणते लक्षण लेखनाला योग्य किंवा अयोग्य ठरवते?” यावर सॉक्रेटिस सरळ उत्तर देण्याऐवजी एका इजिप्शियन पौराणिक कथेचे उदाहरण देतो.


थॉथ हा कला आणि विद्येचा इजिप्शियन देव. त्याला नवनवीन कला शोधण्याचा छंद होता. आपले संशोधन तो अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाला आणि संपूर्ण इजिप्तच्या राजाला नेऊन दाखवत असे आणि त्याची प्रशंसा प्राप्त करत असे.

असाच एकदा थॉथला लेखनकलेचा शोध लागला. आपले नूतन संशोधन घेऊन थॉथ अमुनकडे गेला आणि उत्साहाने त्याने आपले संशोधन अमुनला सांगण्यास सुरुवात केली, “हे राजा, मी एक नवीन कला शोधली आहे. जी एकदा शिकून घेतली की समस्त इजिप्तवासी शहाणे होतील, विद्वान होतील आणि त्यांची स्मृती द्विगुणित होईल. या कलेद्वारे मी बुद्धिमत्ता आणि स्मृती यांवर अचूक तोडगा शोधला आहे.”

यावर नेहमी थॉथची प्रशंसा करणार्‍या अमुनने काही वेगळेच उत्तर दिले, “हे थॉथ! एखाद्या कलेला जन्म देणारा हा ती कला फायद्याची आहे किंवा नाही हे उत्तमरीत्या ठरवू शकत नाही. ही पारख त्या कलेच्या वापरकर्त्यांनी करावी. आता, तू या लेखनकलेचा जनक असल्याने येथे तुझे पितृवत प्रेम बोलते आहे आणि ते सत्य परिणामांच्या विरुद्ध आहे. खरंतर, ही कला तिच्या अभ्यासकांना विस्मरणाचे दान देईल. जे ही कला शिकतील ते आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग करणे सोडून देतील कारण ते लेखनावर/ लिखाणावर आपली श्रद्धा कायम करतील. या चिन्हा-खुणांच्या बाह्यज्ञानामुळे माणसे आपल्या हृदयातून निर्माण होणार्‍या अंतर्ज्ञानाला विसरतील. आपापल्यापरीने वाचन केल्याने ते त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढतील. तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे. हे संशोधन ऐकवल्याने (वाचून दाखवल्याने) लोकांना एकाच गोष्टीचे अनेक अर्थ कळतील. त्यांना आपण ज्ञानी झाल्याचा भास होईल परंतु प्रत्यक्षात त्यांना योग्य गोष्ट कळेलच असे नाही.”

पाश्चात्य इतिहासातील दोन महत्त्वाची महाकाव्ये इलियड आणि ओडिसी यांची निर्मिती होमर या आंधळ्या आणि निरक्षर कवीने केल्याचे सांगितले जाते आणि मौखिक ज्ञान प्रसार परंपरेतील तो एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इतर अनेक संस्कृतीतही जसे नेटिव इंडियन मौखिक ज्ञानाची परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली दिसते.

Thursday, April 26, 2007

आर्य भारतात बाहेरून आले का?

उपक्रम या संकेतस्थळावरील एका चर्चेला प्रतिसाद देताना खालील प्रतिसाद लिहीला होता. त्याचा एक लहानसा लेख बनतो आहे असे वाटल्याने तो येथे टंकत आहे. खालील विचार माझे नसून मी नुकत्याच वाचत असलेल्या पुस्तकातील आहेत. लेखाच्या शेवटी पुस्तकाची माहिती दिली आहे. (या लेखातून कोणतेही वाद निर्माण करायची इच्छा नाही.)

आर्य भारतात बाहेरून आले का? या मुख्य मुद्द्यावर येण्यापूर्वी या प्रकाराची थोडीशी पार्श्वभूमी. जो समाज शहरे वसवतो तो इतर समाजापेक्षा अधिक सुसंसकृत गणला जातो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. येथे झपाट्याने अमर्याद फोफावलेल्या मुंबईसारख्या शहरीकरणाचा विचार करू नये. हे वाक्य का आले त्याचा उहापोह खाली केला आहे.


जगाच्या इतिहासात सर्वप्रथम शहरे वसवण्याचा मान मेसोपोटेमिया, इजिप्त आणि भारताकडे जातो. या तीनही संस्कृतींत इ.स. पूर्व ४००० ते ३००० च्या दरम्यान शहरांची निर्मिती करण्यात आली. भारतात हडप्पा, मोहेंजेदाडो, लोथल, ढोलवीरा अशी सुमारे २६०० पुरातन शहरांची ठिकाणे आढळतात. भारतातील या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हटले जाते, परंतु नवीन संशोधनाप्रमाणे ते पूर्ण सत्य नाही. वेदांत आणि इतर पुराणांत वर्णिलेली सरस्वती नदी जी या प्रदेशातून वाहत होती, ती या काळात सुकलेली नव्हती त्यामुळे हल्ली या संस्कृतीला सिंधू-सरस्वती संस्कृती असेही म्हटले जाते.

मॅक्स म्युल्लरने ऋग्वेदाचा काळ इ.स.पूर्व १५००-१२०० असा ठरवला परंतु त्यासोबत त्याने एक महत्त्वाची टिप्पणी केली - वेदांचा निश्चित काळ तो इ.स.पूर्व १०००-२००० की ३००० हे सांगणे पृथ्वीवर कोणालाही शक्य नाही. याचा एक अर्थ असाही घेता येईल की आर्यांनी वेदांची रचना केली असे सिद्ध होत नाही कारण इ.स. पूर्व २०००-३००० दरम्यान आर्य भारतात आलेच नव्हते. आर्य या नावाची व्युत्पत्ती अधिक खोलात जाऊन सांगायची गरज वाटत नाही. तत्कालिन पाश्चात्य संशोधकांनी ज्याला आर्य समाज हे नाव दिले ते वेदांत वर्णिलेल्या सुसंस्कृत पुरुषांना दिलेले संबोधन आहे इतकेच. म्युल्लरने आर्य भारतात आल्याचा काळही इ.स. पूर्वी १५०० वर्षांचा ठरवला. युरोपातून आलेल्या गोर्‍या लोकांच्याभटक्या जमातींनी एतद्देशीय समाजाला बळाच्या जोरावर हुसकावून दक्षिणेत जाण्यास भाग पाडले. आर्यांनी आपल्या सोबत जो सांस्कृतिक वारसा आणला तो संपन्न भाषेचा आणि त्यांनी भारतीय लोकांना सुसंकृत बनवले असे गृहितक मांडले गेले. या गृहितकावर, 'गोर्‍यांचे अबाधित वर्चस्व स्थापन करण्याच्या उद्देशाने' असा मलिन इतिहास लिहीला गेल्याचा ठपका लागतो.

आता जर मूळ मुद्दा पाहिला तर पहिले गृहितक युरोपीय वंशाच्या सुसंस्कृत लोकांनी भारतावर स्वारी करून तेथिल द्रविड लोकांना दक्षिणेत जाण्यास भाग पाडले असे ठरते. या गृहितकाला धक्का लागला तो हडप्पा आणि मोंहिजेदाडोच्या खोदकामानंतर. या शहरांचे बांधकाम आर्य येण्याच्या फार पूर्वीचे असल्याने तेथे सुसंकृत संस्कृती नांदत नव्हती या कल्पनेला तडा जातो कारण या शहरांचे बांधकाम, त्यातील विटांचा वापर, जलनि:सारण पद्धत, मूर्ती, खेळणी, शिक्के, भांडी पाहिली असता एका शहरे वसवून राहणार्‍या सुसंस्कृत समाजाला केवळ बळाच्या जोरावर घोड्यावर बसून आलेल्या भटक्या आर्यांनी पळवून लावले असे दुसरे गृहितक मांडले गेले. (या शहरांत कोणताही लिखित ठेवा का सापडत नाही त्याच्या शक्यतेबद्दल वेगळा लेख लिहीता येईल.) या गृहितकाने आर्यांचा बाहेरुन येऊन सुसंस्कृत संस्कृती भारतीय समाजाला देण्याचा दावा खोटा ठरवला जातो.

परंतु, पुढे हे ही गृहितक खोटे ठरते कारण या खोदकाम झालेल्या ठिकाणांत कोठेही युद्ध झाल्याचे, नासधूस, जाळपोळ, शहर बेचिराख झाल्याचे पुरावे सापडत नाहीत. इतकेच काय परंतु मिळालेल्या मानवी सांगाड्यांवरूनही त्यांचे मृत्यू लढाईत वार होऊन किंवा अपघातात झाले असे आढळून येत नाही. (असे काही सांगाडे आढळले तरी ते एका प्रसंगात आणि एका ठिकाणी आढळले नसल्याने या ठीकाणी युद्ध झाले अशी कोणतीही खूण मिळत नाही.)

भारतीय पुरातत्त्व खात्यानुसार लोथल शहराचे रूप१९९९ ला डॉ. एस्. आर्. राव, ग्रेगरी पोसेल आणि इतर भारतीय आणि अभारतीय तज्ज्ञांनी असे गृहितक मांडले की आर्य नावाचा कोणताही वंश नाही, आर्य नावाची इंडो-युरोपीय भाषासमूहातील भाषा बोलणारी कोणतीही जमात भारतावर स्वारी करून आली नाही.

येथे काही इतर तज्ज्ञांचे मत असेही पडते की युरोप आणि मध्य आशियातून टोळ्या आल्या नाहीत असे नाही परंतु त्याचा काल फार पूर्वीचा असावा (अश्मयुगीन), ती घुसखोरी किंवा स्वारी नाही.

डॉ. आर्.एस्. बिश्त (भारतीय पुरातत्त्वखात्यातील एक संचालक) मते ऋग्वेदात वर्णन केलेली शहरे म्हणजेच सिंधू-सरस्वतीच्या खोर्‍यातील शहरे आहेत. या शहरांत गाई-गुरे आणि घोडे पाळल्याचे, यज्ञकर्म केल्याचे, तसेच या शहरांतून समुद्रप्रवास आणि व्यापार चालत असल्याचे पुरावे मिळतात. सरस्वती नदी सुकल्याने या शहरांतील लोकांनी स्थलांतर केले असेही एक गृहितक मांडले जाते.

हे आणि असे बरेचसे विचार ग्रॅहम हॅनकॉक यांच्या 'अंडरवर्ल्ड - द मिस्टेरिअस ओरिजिन्स ऑफ सिविलायझेशन' या पुस्तकांत मांडलेले आहेत. ग्रॅहम हॅनकॉक पुरातत्त्ववेत्ता नाही केवळ पत्रकार आहे. त्यांच्या बर्‍याचशा शक्यता खर्‍या असतील असे नाही परंतु ते बर्‍याचशा शक्यता स्वतः मांडण्यापेक्षा विषयांतील तज्ज्ञांचे विचार मांडतात त्यामुळे पुस्तक वाचनीय ठरते.

मोहेंजेदाडोचे एक चित्र येथे लावले आहे. त्याकडे लक्षपूर्वक पाहिले असता त्यातील सारखेपणा लक्षात येईल. उत्खनन केलेले हे शहर अतिशय मोनोटोनस दिसते. ज्यांना इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रात काहीही रस नाही ते हे स्थळ पाहून कंटाळून जातात असे वाचले आहे. (येथे अमेरिकेतील एखादा हायवे किंवा टाऊनशिप नजरेसमोर आणा. हायवेवरून तासन् तास गाडी हाकणारा माणूस कंटाळतो परंतु त्याच बरोबर हे हायवे बांधणार्‍यांची दूरदृष्टी आणि अभियांत्रिकी वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे आकार, वेगमर्यादा, रॅम्प्स्, आत-बाहेर करण्याच्या सुविधा, रस्त्यांवरील चिन्हे, माहिती, रस्त्यांच्या कडेला असणारे शोल्डर्स् वगैरे वगैरे) मोहेंजेदाडो शहरातील जलनि:सारण पद्धत, रस्त्यांचे बांधकाम, भाजलेल्या, सुकवलेल्या विटा आणि लाकडे यांची बांधकामे आणि त्यातील सारखेपणा हे सुसंस्कृतीचे लक्षण आहे कारण हे सर्व बांधकाम करण्यासाठी गणित, खगोलशास्त्र, भूमिती, यांत्रिकी अशा अनेक शाखांची खोलवर माहिती हवी.

यावर वर उल्लेखलेल्या पुस्तकातील एक उदाहरण देते.

ढोलवीरा या शहराची रचना अप्पर टाऊनशिप, मिडल टाऊनशिप आणि लोअर टाऊनशिप (परम्, मध्यम् आणि अवम्) अशा तर्‍हेची आहे. यातील एका स्थळाचे मोजमाप पुढील प्रमाणे - पूर्वेकडून पश्चिमेकडील लांबी ७७१ मीटर आणि उत्तरेकडून दक्षिणेची लांबी (किंवा रुंदी म्हणू) ६१६.८ यांतील अप्पर टाऊनशिपचा भाग पूर्व-पश्चिम ११४ मीटर आणि उत्तर-दक्षिण ९२.५ मीटर. दोन्हींचे गुणोत्तर येते ५:४. (इतकी अचूकता नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.) परंतु हेच परिमाण का याचे स्पष्टीकरण बिश्त आणि एक प्राध्यापक एस्.पी गुप्ता यांनी पुढीलप्रमाणे दिले आहे.

त्यांच्यामते हा योगायोग नाही. ऋग्वेद आणि इतर काही पुराणांत यज्ञवेदीच्या लांबी रुंदीविषयी लिहीले आहे.** त्याचे गुणोत्तर ५:४ असे आहे. (यावरूनही आर्यांनी वेदांची रचना केली नाही असा एक निष्कर्ष निघतो.) म्हणजेच जो समाज शहरे बांधू शकतो तो रानटी नाही, ज्यांना ही शहरे बांधायचे ज्ञान होते त्यांना इतर अनेक शाखांतील ज्ञानही नक्कीच होते.

** यज्ञवेदीचे अनेक प्रकार आहेत आणि त्यांची योग्य परिमाणे ऋग्वेदात (किंवा इतर प्राचीन पुराणांत) दिलेली आहेत अशा प्रकारचा सुभाष काक यांचा एक लेख वाचलेला आठवतो. त्यापैकी नक्की कोणती यज्ञवेदी याची मात्र कल्पना नाही.


येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवान विष्णू,शंकर, राम, कृष्ण, द्रौपदी, दमयंती यासारखी पुराणांतील अनेक प्रमुख पात्रे श्यामलवर्णी आहेत. कोणत्याही अंगाने गोरी नाहीत.

वरील प्रतिसाद मला पुस्तकातील हा भाग जसा समजला त्यावरून आणि काही इतर वाचनांवरुन (जो येथे अत्यल्प आहे.) थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील चर्चेत उल्लेखलेल्या मुद्द्यांना केवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ विषयाची व्याप्ती प्रचंड आहे आणि या लेखात त्रुटी आढळल्यास चू. भू. द्या. घ्या.

सर्व चित्रे विकिपिडियावरून.

Monday, April 16, 2007

ग्रामदैवत

हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते. अर्थात, या लेखाचा हेतू कुलाचाराबद्दल नाही.

ग्रामदैवत या संज्ञेचा विचार केला असता माझ्या तुटपुंज्या ज्ञानाने मला असे आठवते की गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे. हे दैवत पूर, दुष्काळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे, रोगराई इ. पासून गावाचे रक्षण करते असा सर्वसामान्य समज असतो. अशा दैवताला ग्रामदैवताचा मान का मिळाला याबाबतही अनेकदा विविध कथा, आख्यायिका ऐकण्यास मिळतात. उदा.

रामायणातील सुंदरकांडात हनुमान लंकानगरीत प्रवेश करताना त्याची भेट साक्षात लंकादेवीशी होते. ती हनुमानाचा मार्ग अडवून उभी असल्याने हनुमान तिला आपली ओळख विचारतो. त्यावेळेस ती त्याला पुढील उत्तर देते.


अहं राक्षसराजस्य् रावणस्य् महात्मन:
आज्ञाप्रतीक्षा दुर्धर्षा रक्षामि नगरीमिमाम्॥ ५-३-२८

श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की मी राक्षसराज रावणाच्या आज्ञा पाळते आणि या नगराचे पराजित होण्यापासून संरक्षण करते. यापुढील श्लोकांवरून असे दिसते की मुष्टीप्रहार करून हनुमान लंकादेवीचा पराभव करतो आणि त्यावर दु:खी होऊन लंकादेवी सांगते की ब्रह्मदेवाने मला सांगितले होते की ज्या दिवशी एक वानर तुझा पराभव करेल त्यानंतर लंकानगरी आणि राक्षसांचा पराभव अटळ आहे.

पौराणिक कथा सोडून इतिहासात पाहायचे झाल्यास ग्रामदैवताची अनेक उदाहरणे मिळतात. जसे, पुणे गाव नव्याने वसवताना जिजाबाईंनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची स्थापना केली. मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी ही मूळ कोळी समाजाची देवता. मुंबादेवीचे मंदिर १७ व्या शतकात बांधले गेल्याचा पुरावा सापडतो.(नक्की काळाबद्दल अनेक मतप्रवाह दिसले. हे मंदिर सुमारे ६०० वर्षांपूर्वी बांधले गेल्याचेही वाचण्यास मिळते.) मुंबा हे महाअंबा या नावाचे भ्रष्ट स्वरूप असल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिराची स्थापना मुंबा नावाच्या स्त्रीने केल्याने त्याला मुंबादेवी असे नाव पडल्याची गोष्टही ऐकवली जाते.

एका आख्यायिकेनुसार मुंबारक नावाचा राक्षस गावातील नागरिकांना त्रास देत असे. त्याचा धुमाकूळ वाढत चालल्याने त्रस्त नागरिकांनी ब्रह्मदेवाची उपासना केली. प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आपल्या दिव्यशक्तीने एका आठ भुजांच्या देवीची निर्मिती केली. या देवीने मुंबारकाचा नि:पात केला. पश्चात्तापदग्ध मुंबारकाने देवीला शरण जाऊन आपल्या नावाने तिचे मंदिर उभारण्याचा पण केला, आणि अशा रीतीने मुंबादेवी हे नाव आणि मंदिर अस्तित्वात आले.

शहरे वगळून जर लहान गावांकडे किंवा खेड्यांकडे वळले, तर ग्रामदैवताची संकल्पना थोडी बदलते. बरेच ठिकाणी अकाली आणि अनैसर्गिक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे, नागाचे किंवा ज्या मूळ पुरुषामुळे गाव अस्तित्वात आले अशा व्यक्तीचे मंदिर स्थापले जाते. बर्‍याचदा अशी मंदिरे एखाद्या झाडाच्या पारावर, दगडांना शेंदूर लावून बनवलेलीही आढळतात.

प्रकार कसेही असोत, बाह्य आणि अंतर्गत दुष्ट शक्तींपासून त्या गावाचे किंवा नगराचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूच्या किंवा ग्रामस्थांच्या मनात एका प्रकारचे आदरयुक्त भय निर्माण व्हावे या हेतूने ग्रामदैवताची स्थापना केली जात असे. याच पार्श्वभूमीवर इतर संस्कृतींत ही प्रथा होती का याचा शोध घेतला असता, आग्नेय आशियातील बौद्ध संस्कृतीत ती होतीच, असे दिसते. याखेरीज पाश्चिमात्य संस्कृतींतही ती असल्याचे आढळते. या लेखात ग्रीक संस्कृतीतील एका ग्रामदैवताबद्दल थोडीफार माहिती लिहीत आहे.

अथेना ही बुद्धीचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराची ग्रामदेवता आहे. या शहराला अथेन्स हे नाव या देवतेवरूनच पडल्याचे सांगितले जाते. प्राचीन अथेन्समध्ये ख्रि.पू.५०० च्या सुमारास पार्थेनॉन या अथेनाच्या देवळाची स्थापना केली गेल्याचे सांगितले जाते.

ग्रीक कलाकुसरीचा अप्रतिम नमुना आणि अद्याप व्यवस्थित असणारी एक प्राचीन वास्तू म्हणून पार्थेनॉनला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. पार्थेनॉनची रचना आयताकृती असून ८ स्तंभ x १७ स्तंभ अशा रचनेवर संपूर्ण मंदिर उभे आहे. हे मंदिर पूर्ण करण्यास सुमारे १६ वर्षांचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते. फिडिअस नावाच्या शिल्पकाराने या मंदिराचे बांधकाम केल्याचे कळते.

अमेरिकेत टेनसी राज्यातील नॅशविल या शहरात पार्थेनॉनच्या मंदिराची पूर्णाकृती प्रतिकृती १८९७ साली बनवली गेली. या वास्तूला भेट देण्याचा हल्लीच योग आला. टेनसी राज्याच्या शताब्दीप्रीत्यर्थ या इमारतीची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या इमारतीचा कलादालन म्हणून उपयोग केला जातो. अनेक ग्रीक शिल्पांच्या अप्रतिम प्रतिकृतींनी या इमारतीतील दालने सजलेली आहेत. सर्वात भव्य मूर्ती अर्थातच अथेनाची. पाश्चिमात्य जगतातील बंदिस्त आवारातील ही सर्वात मोठी मूर्ती गणली जाते.

नॅशविलचे पार्थेनॉन
नॅशविलचे पार्थेनॉन


मूळ मंदिरात असणारी अथेनाची मूर्ती फिडिअस या शिल्पकाराने संपूर्णत: सोन्यात आणि हस्तिदंतात बनवली असल्याचे परंतु ग्रीसवरील अनेक परकीय स्वार्‍यांत या मूर्तीची लूट केली गेल्याचे आणि कालांतराने मंदिराला लागलेल्या आगीत ती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक अभ्यासावरून १९९० साली नॅशविलच्या प्रतिकृती मंदिरात सुमारे ४२ फुटांची अथेनाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि २००२ साली तिला सुवर्णवर्खाने सजवण्यात आले.

अथेना
अथेना


मूर्तीचे सर्वसाधारण वर्णन करायचे झाल्यास या मूर्तीच्या उजव्या हातात अथेनाची सहकारी ग्रीक देवता नाइकी (Nike) अथेनाच्या डोक्यावर चढवण्यासाठी विजयी मुगुट घेऊन उभी आहे. अथेनाच्या डाव्या हातात प्रचंड आकाराची ढाल असून त्यावर ग्रीक देव आणि दानव यांच्यातील युद्धाची चित्रे कोरलेली आहेत. तिच्या डाव्या खांद्यावर रेललेला भाला आणि पायाशी सर्प आहे. हा सर्प म्हणजे एरिकथोनिअस हा अथेनाचा मानसपुत्र. आपल्या ढालीमागे त्याला दडवून ती एरिकथोनिअसचे रक्षण करते असे सांगितले जाते. अथेनाच्या चिलखतावर मेडुसा या राक्षसीचे मुंडके लावलेले आढळते. ग्रीक पुराणांनुसार पर्सिअस या योद्ध्याला अथेनाने मेडुसाचा नि:पात करण्यात मदत केली होती. विजयी झाल्यावर पर्सिअसने ते मुंडके अथेनाला भेट दिल्याचे सांगितले जाते. अथेनाच्या ढालीवरही मध्यभागी हे मुंडके दाखवले आहे.


मूर्तीची वस्त्रे आणि आभूषणे सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. भाला, ढाल, सर्प आणि नाइकी देखील सुवर्णवर्खाने मढवलेली आहेत. अथेनाचा चेहरा त्यामानाने बराच भडक रंगवलेला दिसतो. याचे स्पष्टीकरण जवळच वाचता येते. अनेक पौराणिक कथा आणि पुराव्यांच्या आधारे मूर्तिकाराने मूर्तीला असे स्वरूप दिल्याचे सांगितले जाते.

अमेरिकेतील रहिवाशांना नॅशविलला जाण्याची संधी मिळाल्यास या अप्रतिम कलादालनाला जरूर भेट द्यावी.


अवांतर: या कलादालनात एका छायाचित्रकाराने काश्गर, चीन येथे काढलेली काही अप्रतिम प्रकाशचित्रे पाहण्यास मिळाली. पिवळ्या कांतीच्या आणि नाजूक शरीरयष्टीच्या चिनी लोकांपेक्षा बरेच वेगळे दिसणारे हे लोक, त्यांच्या भटक्या जमाती, जत्रा, गाढवांचा बाजार इ. ची अप्रतिम प्रकाश/छायाचित्रे येथे लावली होती. भारतातील कुशाण राजे याच भागातून आले होते. याशिवाय या कलादालनात अतिशय अप्रतिम तैलचित्रांचा समावेश आहे.
संदर्भसूची:
इंग्रजी विकिपीडियावर पार्थेनॉन
नॅशविलचे पार्थेनॉन
ग्रीक दैवते

खुलासा: वरील लेख परिपूर्ण असल्याचा दावा नाही. रामायणातील संस्कृत श्लोक जसा मिळाला तसा टंकित केला आहे. जाणकारांना या लेखात त्रुटी आढळल्यास सुधारणा करण्यास मदत करावी. लेखासंदर्भात इतर माहिती प्रतिसादांतून लिहावी अशी विनंती.

Tuesday, March 27, 2007

खूब लड़ी मर्दानी

सध्या मी The hero with a thousand faces हे जोसेफ कॅम्पबेल यांचे पुस्तक वाचत आहे. जगातील सर्व परीकथा, पौराणिक कथा आणि धार्मिक कथा यांतून येणार्‍या नायकांची (legendary heroes) कथा ही एकमेकांशी मोठ्या प्रमाणात साम्य दाखवते अशी या पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. स्टार वॉर्सचा निर्माता/ दिग्दर्शक जॉर्ज ल्युकस याने या संकल्पनेचे आपण ऋणी असल्याचे सांगितले असल्याचे वाचनात येते.


पौराणिक कथा आणि परीकथांप्रमाणेच बर्‍याचशा ऐतिहासिक व्यक्तींमध्ये आणि त्यांच्या जीवनकार्यातही एक विलक्षण साम्य दिसते. अनन्वित अन्याय, त्यातून निर्माण होणारा असंतोष, नायकाचा जन्म, त्याचे निराळे अनुभवविश्व आणि प्रस्थापित शक्तीविरुद्ध त्याने दिलेला लढा, त्यात मिळालेला अंतिम विजय किंवा प्राणांची आहुती. कथानायकांचे जीवन बरेचदा एकाच चाकोरीतून गेल्याचे आढळते.


मध्यंतरी अचानक सुभद्राकुमारी चौहान यांची 'खूब लड़ी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी।' ही कविता बर्‍याच वर्षांनी पुन्हा वाचण्याचा योग आला. आपल्यापैकी बरेचजण शाळेत ही कविता शिकले असतील. झाशीच्या राणीविषयी वेगळे काय लिहायचे? तिचे शौर्य, तिचा पराक्रम सर्वज्ञात आहे. भारतीय इतिहासात राणी लक्ष्मीबाईची कथा माहित नाही असा माणूस मिळणे कठिण. राजघराण्यात झालेला विवाह, अकाली वैधव्य, ब्रिटिशांकडून दत्तक विधान नाकारले जाणे, १८५७ चे बंड, 'मेरी झांसी नहीं दूंगी' असा राणीने घेतलेला कणखर पावित्रा, ब्रिटिशांशी निकराने दिलेली झुंज आणि पत्करलेले वीरमरण.


राणीची कहाणी शब्दांत बांधणार्‍या सुभद्राकुमारी चौहान या स्वत: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सत्याग्रही होत्या. त्यांची जालियांवाला बागेवरील कविताही प्रसिद्ध आहे. 'खूब लड़ी मर्दानी...' या कवितेत त्यांनी राणीच्या बालपणाचे, लग्नाचे, वैधव्याचे, ब्रिटिशांच्या मुजोरीचे, राणीने शर्थीने दिलेल्या झुंजीचे आणि तिच्या बलिदानाचे यथार्थ वर्णन केले आहे.


सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,

बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।


जे काही माझे आहे ते मी तुम्हाला कदापि देणार नाही या भावनेतून एक मध्ययुगीन स्त्री प्रबळ ब्रिटिश सैन्यासमोर उभी राहते, शर्थीने मुकाबला करते आणि त्या यज्ञात आपली आहुती देते. आपले प्रेतही ब्रिटिशांच्या हाती लागू नये अशी इच्छा बाळगणार्‍या राणी लक्ष्मीबाईची कहाणी स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणादायी ठरली.


याच धर्तीवर मला इ.स.६०-६१ साला दरम्यानच्या आयसेनी जमातीच्या केल्टिक राणी बूडिका (बोअडिसिया) हिची कहाणी वाचायला मिळाली आणि दोन्ही गोष्टींत साम्य जाणवले. बूडिका या शब्दाचा अर्थ विजयी (विजया) असा होतो. पूर्व इंग्लंडच्या नॉरफोक प्रांताचा राजा रोमन साम्राज्याला पाठिंबा देणारा परंतु स्वतंत्र राज्याचा राजा होता. आपल्या मृत्यूनंतर त्याने आपल्या राज्याची धुरा आपल्या दोन मुली आणि रोमन साम्राज्यावर यावी असे सुचवले होते. परंतु रोमन साम्राज्य मुलींना राज्याचा उत्तराधिकारी मानत नसल्याने त्यांनी हे राज्य खालसा केले आणि ते रोमन साम्राज्याच्या घशात घातले. राणी बूडिकाने या जुलुमाविरुद्ध आवाज उठवला असता तिच्या दोन्ही मुलींवर बलात्कार करण्याची आणि राणीला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. याप्रकाराने संतप्त झालेले आयसेनीचे नागरिक आपल्या राणीच्या बाजूने उभे राहिले आणि राणीने आपल्या मुलींना रथात आपल्या बाजूला उभे करून स्वत: जातीने या बंडखोरांच्या सैन्याचे नेतृत्व केले.टॅसिटस या रोमन इतिहासकाराने राणीच्या तोंडी आवेशपूर्ण भाषण घातले आहे त्याचा गोषवारा पुढीलप्रमाणे - “मी माझी गमावलेली दौलत मिळवायला निघालेली राजस्त्री आहे असे कोणी समजू नये तर मी चाबकाच्या फटक्यांनी जखमी झालेली आणि माझ्या मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढणा‍र्‍यांविरुद्ध माझे गमावलेले स्वातंत्र्य मिळवायला पेटून उठलेली सामान्य नागरिक आहे. आपले ध्येय न्याय्य आहे आणि देव आपल्या पाठीशी आहे. मी एक स्त्री असूनही या युद्धात जिंकणे किंवा मरणेच पसंत करते, पुरुषांना गुलामगिरीत जगायचे असेल तर तो त्यांचा निर्णय असेल.”राणीच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या काही चकमकींत आयसेनीच्या सैन्याला विजय प्राप्त झाला परंतु पुढे जरी राणीच्या सैन्याची संख्या रोमन साम्राज्याच्या सैन्याहून अधिक असली तरीही आधुनिक शस्त्रांत्रांचा अभाव, शिस्त आणि मैदानी लढाई खेळण्याचा अनुभव नसलेल्या राणीच्या सैन्याचा रोमन साम्राज्याशी झालेल्या तुंबळ युद्धात पराभव झाला आणि शत्रूच्या हाती लागण्याऐवजी तिने विष खाऊन मरण पत्करले.


राणी विक्टोरियाच्या काळात विक्टोरिया बूडिकाला आपला आदर्श मानत असल्याने तिला असामान्य महत्त्व प्राप्त झाले. आजही इंग्लंडमध्ये तिला सांस्कृतिक प्रतिक मानले जाते.


कधीतरी एखादी गोष्ट वाचताना अचानक त्यातील प्रसंग आपण पूर्वी कधीतरी वाचले आहेत (deja vu) याची जाणीव आपल्याला होते. एखादे व्यक्तीविशेष वाचतानाही असाच भास बरेचदा होतो. इतिहास आमचा त्यांचा या समुदायासाठी लिहिलेला पहिला लेख मला एखाद्या कर्तृत्ववान ऐतिहासिक स्त्री विषयी लिहिण्याचे मनात होते, The hero with a thousand faces, बूडिका आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल एकाच वेळी वाचन करण्याचा योग आला. दोन्ही व्यक्तिंच्या जीवनकथेत विलक्षण साम्य दिसले आणि तारा आपोआप जुळत गेल्या.

Thursday, January 11, 2007

अप्सरा

खालील लेख विखुरलेला मोती म्हणता येईल का याची नक्की कल्पना नाही. कदाचित यावा, अप्सरांबद्दल माहिती गोळा करावी असे काही दिवसांपूर्वी डोक्यात आले परंतु ही माहिती आपल्या पुराणांत संकलित नसून सर्वत्र विखुरलेली आहे. ती एकत्र करणे हे माझ्या दृष्टीने कठीण कार्य होते कारण अमेरिकेत बसून इंटरनेट व्यतिरिक्त इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नसणे आणि संस्कृताच्या अत्यंत अल्प ज्ञानाचा उपयोग लेख लिहिण्यासाठी करणे हे महादिव्यच होते. मूळ लेख मराठी विकिपीडियासाठी लिहिला होता. तो अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे. सगळे संदर्भ शोधणे, त्यांचा पाठपुरावा करणे हे मला एकटीला संगणकासमोर बसून शक्य नाही तरी जितके शक्य झाले ते पुढे मांडले आहे.


अप्सरा

हिंदू पुराणांनुसार अप्सरा या स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबाराला नृत्यगायनाने रिझवणार्‍या स्वर्गीय सुंदर्‍या होत्या असे सांगितले जाते. ऋग्वेदानुसार अप्सरा या गंधर्वांच्या पत्नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांच्या नीतीमत्ता व तत्त्वे अप्सरांना लागू नव्हत्या असे अनेक कथांतून दिसते. इतर कोणतेही मर्त्य राजे, देव-दानव किंवा ऋषी-मुनी स्वत:पेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषी-मुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्देशापासून दूर सारण्यासाठी देवराज इंद्र या अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्याकामी वापरत असे असे पुराणांत दाखले मिळतात.भागवत पुराणानुसार कश्यप ऋषींच्या बारा पत्नींपैकी मुनी ही पत्नी या अप्सरांची माता असल्याचे दाखले दिले जातात. काही कथांमध्ये स्वत: ब्रह्मदेवांने अप्सरांची निर्मिती केल्याचे वाचायला मिळते. याशिवाय, मेरू पर्वताच्या समुद्रमंथनाच्या कथेतून अप्सरा हे रत्न निघाल्याचा उल्लेखही सापडतो.

हिंदू पुराणकथा, वेद, महाकाव्ये व नाट्यशास्त्राच्या आधारे काही अप्सरांची नावे दिली आहेत -

अद्रिका, अल्मविशा, अंबिका, अन्वद्या, अनुचना, अरूणा, असिता, बुदबुदा, देवी, घृताची, गुणमुख्या, गुणवरा, काम्या, कर्णिका, केशिनी, क्षेमा, चित्रलेखा, लता, लक्ष्मणा, मनोरमा, मरिची, मेनका, मिश्रकेशी, मिश्रस्थला, पूर्वचित्ती, रक्षिता, रंभा, रितुशाला, सहजन्या, समिची, सौदामिनी, सौरभेदी, शरद्वती, शुचिका, सोमा, सुवाहू, सुगंधा, सुप्रिया, सुरजा, सुरसा, सुरता, सुलोचना, तिलोत्तमा, उमलोचा, ऊर्वशी, वपु, वर्गा, विद्युत्पर्णा आणि विश्वची. या खेरीजही इतर अनेक अप्सरांचा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये दिसून येतो.

इंद्राच्या दरबारात २६ अप्सरा होत्या. त्यापैकी ऊर्वशी, मेनका, रंभा व तिलोत्तमा या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या. या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते.

इंद्राच्या दरबारात स्थान न दिलेल्या काही अप्सरा वनदेवी, जलकन्यांच्या स्वरूपांत पुराण कथेत स्थान मिळवतात. उदा. रामायणातील किष्किंधा कांडात 'हेमा' नावाच्या वनातील अप्सरेचा संदर्भ सापडतो. रामायण, महाभारत, भागवत् पुराण, वेद या सर्वांत अप्सरांचे उल्लेख व अनेक कथा आढळतात. कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका ऊर्वशी आहे.

भारताबाहेर आग्नेय आशियातील अनेक कथांमध्ये व विशेषत: आंग्कोर वाट मंदिराच्या कलाकुसरीत व कोरीव कामात या अप्सरा आढळतात. हिंदू पुराणकथांव्यतिरिक्त बौद्ध, ग्रीक, रोमन आणि नॉर्डिक पुराणांतही अप्सरांचा उल्लेख आढळतो. त्याकथांनुसारही मर्त्य मानवांना किंवा देवांना वश करण्याचे कार्य अप्सरा करत.

रामायणातील अप्सरांचे संदर्भ

रामायणात बर्‍याच ठिकाणी अप्सरांचे उल्लेख आढळतात. त्यापैकी काही श्लोक खाली दिले आहेत.

अप्सु निमर्थनात् एव रसात् तस्मात् वर स्त्रिय:।
उत्पेतु: मनुज श्रेष्ठ तस्मात् अप्सरसो अभवन् ॥ १-४५-३३

हा श्लोक बालकांडात येतो. राम-लक्ष्मणांना विश्वामित्र सम्रुद्रमंथनाची कथा सांगत असताना समुद्र मंथनातून अप्सरा हे रत्न निघाल्याचे सांगतात. यानंतर येणार्‍या श्लोकांतून अप्सरांच्या सौंदर्याचे वर्णन येते. तसेच विश्वामित्रांच्या कथेनुसार अप्सरांना आपला प्रियकर म्हणून देव, दानव, मानव यासर्वांची निवड करण्याची मुभा होती. लग्नबंधनाच्या नीतिनियमांपासून त्या मुक्त होत्या या अर्थांचे श्लोकही बालकांडात येतात.

घृताचीम् अथ विश्वाचीम् मिश्र केशीम् अलम्बुसाम् ।
नागदन्तां च हेमा च हिमामद्रिकृतस्थलाम् ॥ २-९१-१७

अयोध्याकांडातील या श्लोकांत भारद्वाज मुनीनी केलेल्या भरताच्या आदर सत्कारात घृताची, विश्वाची, मिश्रकेशी, अलम्बुसा, नागदंता, हेमा व हिमा या अप्सरांना पाचारण केल्याचा उल्लेख येतो. या सर्व नृत्य, गायन व वादन कलांत निपुण होत्या आणि त्यांनी भरत व अयोध्येच्या सेनेला रिझवण्यासाठी नृत्य-गायन केल्याचा उल्लेखही नंतरच्या श्लोकांतून येतो.

महाभारतातील अप्सरांचे संदर्भ

महाभारतात वनपर्वात अर्जुन व ऊर्वशीमधील संवाद येतो. ऊर्वशी ही कुरूवंशातील राजा पुरुरव्याची पत्नी असल्याने आणि अर्जुन हा पुरुरव्याचा वंशज असल्याने, कामातुर ऊर्वशीचा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर ऊर्वशी सांगते, "अप्सरा या नीतिनियमांतून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरूष निवडतात. यामुळे मी जरी कुरूकुलातील तुझी पूर्वज असले तरी पुरूरव्याची मुले-नातवंडे जी कालांतराने येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संग केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर."

अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो आणि संतप्त होऊन ऊर्वशी त्याला शाप देते, जो पुढे बृहन्नडेच्या रुपाने खरा ठरतो.

याप्रमाणे अनुशासनपर्वात पंचचुडा या अप्सरेची व शांतीपर्वात घृताची या अप्सरेची कथा येते. घृताचीच्या कथेत अप्सरांना आपले रूप पालटण्याची विद्या अवगत असल्याचे दिसते.

इतर संस्कृतीतील अप्सरांचे संदर्भ

कंबोडियातील अप्सरा

कंबोडियाच्या संस्कृतीवर हिंदू आणि बौद्ध धर्माचा पगडा असल्याने हिंदू देव-देवता तसेच गंधर्व, अप्सरा यांना कंबोडियाच्या संस्कृतीत एक वेगळे स्थान मिळाले आहे.

आंग्कोर वाट अप्सरा : आंग्कोर वाटच्या मंदिराच्या भींतींवर अनेक अप्सरा नृत्य व वादन करताना कोरलेल्या आढळतात. मंदिरातील देव देवतांना प्रसन्न राखण्यासाठी अप्सरांचे कोरीव काम करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

अप्सरा नृत्य: ख्मेर राज्यकाळापासून कंबोडियात अप्सरा नृत्य करण्याची प्रथा आहे. पूर्वी मंदिरात देवतांना प्रसन्न करण्याकरता हे अभिजात नृत्य केले जात असे. आज या नृत्याला कंबोडियाच्या पारंपारिक नृत्याचा दर्जा आहे. बरेचदा हे नृत्य, नृत्यनाट्य म्हणून सादर केले जाते. यक्ष, किन्नर, अप्सरा, गरूड, ऋषी अशा अनेक भूमिका या नृत्यातून फुलवल्या जातात.

रेशमी वस्त्रे, आभूषणे, नाजूक पदन्यास व नत्यमुद्रांद्वारे केल्या जाणार्‍या या नृत्यात आंग्कोर वाटच्या मंदिरातील भिंतींवर कोरलेल्या अप्सरांचे दर्शन होते.

थायलंडमध्येही असे नृत्य केले जाते परंतु त्याला अप्सरा नृत्य म्हणण्याचा प्रघात नाही.

चीन मधील मोगाओ गुहा

चीनमधील दुनहुआंग प्रांतात इ.स.पूर्व ४००व्या शतकातील बौद्ध भिक्षूंनी कोरलेल्या गुहा आहेत. हिंदू कलाकुसरीचा या गुहांवर मोठा प्रभाव दिसतो. यातील काही चित्रांत व लेण्यात अप्सरांचा समावेश आहे. या अप्सरा स्वर्गस्थ दाखविल्या असून त्या अवकाश विहार करतानाही दिसतात. काही ठिकाणी नृत्य, वादन करतानाही त्यांचे चित्रण केले आहे.

चीनमधून पुढे कोरियातही अप्सरांचा कलाकुसर व चित्रकलेत समावेश झालेला आढळतो.

जपानमधील अप्सरा

तेन्यो नावाच्या स्वर्गीय सुंदरी स्वर्गात बुद्ध व बोधिसत्त्वांसमवेत राहात असल्याचे संदर्भ मिळतात. तेन्योंचा उगम संस्कृतातील अप्सरांवरून झाल्याचे सांगितले जाते. पुढे बौद्ध धर्माच्या प्रसारासमवेत चीनमार्गे जपानात यांचा प्रसार झाल्याचे दिसते. पारंपारिक पंचरंगी किमोनो, उंची आभूषणे ल्यालेल्या या सुंदरींना जपानी चित्रकला, बौद्ध मंदिरातील कोरीवकामांत व इतर कलाकुसरींमध्ये एक आगळे स्थान आहे आणि त्यांच्या अनेक कथा जपानात सांगितल्या जातात.

विकिपीडियावरील लेखाचा दुवा