Friday, September 08, 2006

कंबोडीयाचे हिंदू साम्राज्य (भारताची एक प्राचीन वसाहत)

हिंदू धर्म हा जरी जगातला एक पुरातन धर्म समजला गेला तरी इतर धर्मांसारखा या धर्माचा प्रसार मात्र भारताबाहेर फारसा झाला नसल्याचे अनेकदा ऐकू येते. त्यामानाने हिंदू धर्माची एक उपशाखा मानावी अशा बौद्ध धर्माचा प्रसार मात्र दूरपर्यंत झालेला दिसतो. हिंदू धर्म खरंच भारताबाहेर गेला की काय याचा विचार केला असता उत्तर 'तसा तो भारताबाहेरही पसरला' असे येते. हिंदू धर्म एके काळी पूर्वेकडील देशांत पसरला होता, समृद्धीस आणि भरभराटीस आला होता असे दिसून येते. यावर वाचनात आलेला वाल्मीकी रामायणातील एक संस्कृत श्लोक पुढे उद्धृत केला आहे.

यत्नवन्तो यव द्वीपम सप्त राज्य उपशोभितम ।
सुवर्ण रूप्यकम द्वीपम सुवर्ण आकर मण्डितम ॥ ४-४०-३०

किष्किंधा कांडात सुग्रीव वानरांना पूर्व दिशेस जाऊन सीतेचा शोध घेण्यास सांगतो, त्यावेळेस नक्की कुठल्या ठीकाणी शोध घ्यावा याची माहिती तो वरील श्लोकात देतो. यव द्वीप हे जावा बेटाचे आणि त्या भोवतीच्या इतर बेट समूहाचे वर्णन आहे असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजेच वाल्मीकींना ज्याअर्थी यव द्वीपाची माहिती होती त्याअर्थी त्याकाळी या भूभागाशी भारताचे संबंध असले पाहिजेत.

पूर्वेकडच्या अशा देशांत प्राचीन हिंदू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात त्यातला एक महत्त्वाचा देश म्हणजे कंबोडीया. कंबोडीयाचा नजिकच्या काळातला इतिहास ख्मेर रक्तक्रांती आणि हुकूमशहा पोल पॉटच्या बाबतीत वाचायला मिळतो. प्राचीन इतिहास वाचण्याच्या उद्देशाने मी कंबोडीया, ख्मेर राज्यकर्ते व एंगकोर वट यावर जे थोडे बहुत वाचन केले त्याचे संकलन या लेखाद्वारे करत आहे.

इसवी सनापूर्वी सुमारे २००० वर्षांच्या दरम्यान मुख्यत्वे भातशेतीची लागवड करण्यासाठी सुपीक जमीनींचा शोध सुरू झाला. यातूनच भारताच्या मुख्य भूमीवरून हळूहळू पूर्वेकडे स्थलांतर होऊ लागले. सुरुवातीच्या काळात स्थलांतरीतांनी स्वत:ची स्वतंत्र खेडी स्थापन करण्यास प्रारंभ केला. याच बरोबर भारत आणि चीन यांच्या दरम्यान होणाऱ्या व्यापारामुळे हा भूभाग हळूहळू माणसांनी आणि भारतीय संस्कृतीने व्यापला गेला. यालाच या भूभागाचे हिंदुत्वीकरण (इंडिअनायझेशन) म्हणून ओळखले जाते. खऱ्या अर्थाने हिंदुत्वीकरणाचा काळ इसवी सना पूर्वी ५०० (२००?) वर्षे मानला जातो. सर्वात जुनी संस्कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली. भारत- चीन यांच्या व्यापारामुळे वृद्धिंगत होणाऱ्या या संस्कृतीत हळू हळू हिंदू ब्राह्मण, बौद्ध भिक्षू, अन्य विद्वान, कारागीर, कलावंत यांची ये जा ही सुरू झाली. कंभोज (कंबुजा) राजघराण्याच्या उदया विषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती पुढील प्रमाणे --

कंभोज देशाचा ब्राह्मण राजपुत्र कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश?) मुलगी मीरा (Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले.

या राज्याला पुढे फुनानचे राज्य म्ह्टले जाऊ लागले. कालांतराने या भागात लहान मोठी बरीच हिंदू राज्ये वसली गेली. त्यापैकी चेन्लाचे (झेन्ला: चीनी उच्चार) त्यामानाने प्रबळ राष्ट्र बराच काळ फुनानचे मांडलिक होते पण पुढे जाऊन चेन्लाने फुनानवर स्वारी करून ते राज्य आपल्या अंकित केले.

फुनान: (इ. स. नंतर पहिले शतक - इ.स. नंतर ६१३) फुनानच्या शासकांनी भारतामधून बऱ्याच ब्राह्मणांना फुनानच्या राज्यात स्थलांतर करण्यास उद्युक्त केले असा उल्लेख वाचण्यास मिळतो. या ब्राह्मणांनी राज्यशासन, राज्य नियंत्रण व कलेच्या क्षेत्रात फुनानच्या शासकांना बहुमोल मदत केली. उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने या काळात कालवे काढून शेती केली जात होती असे दिसून येते. कंबोडीयाच्या बंदरावरून होणारा व्यापारही या काळात फुलून आला.

या राज्याची बरीचशी माहीती प्राचीन चिनी दस्तावैजांमधे मिळते. त्यामानाने प्रत्यक्ष कंबोडीया मधे ती फारशी उपलब्ध नाही.

चेन्ला: (इ. स. नंतर ५५० - सुमारे ८ वे शतक) चेन्लाचा सर्वप्रथम उल्लेख चिनी दस्तावैजात फुनानचे मांडलिक राज्य म्हणून आढळतो. इ.स.नंतर ५५० ला चेन्ला राज्य फुनान पासून वेगळे होऊन स्वतंत्र झाले. त्यानंतर ६० वर्षांत त्यांनी फुनान बळकावले. इशानपुरा ही चेन्ला राज्याची पहिली राजधानी मानली जाते. या शासकांनीही हिंदू संस्कृतीचा अंगिकार केला. पुढे या राज्याचे अनेक तुकडे पडून एक छत्री अंमल नाहीसा झाला.

जावा साम्राज्य: (८ वे शतक) खिळखिळ्या झालेल्या चेन्ला राज्यावर समुद्रापलीकडच्या जावा साम्राज्याने स्वाऱ्या करून त्याला अधिकच लुटले. जावा साम्राज्याशी दोन हात करायला असमर्थ असल्याने चेन्ला राज्यांची समुद्रतटांवरून पीछेहाट झाली व ते कंबोडीयाच्या अंतर्भागातील टोन्ला सॅप या सरोवराच्या आसपास जाऊन वसले.

एंगकोर साम्राज्य (इ.स.८०२- इ.स.१४३१): जयवर्मन दुसरा या चेन्ला राज्याच्या एका शासनकर्त्याला जावा साम्राज्यात बंदी ठेवले होते. बंदिवासातील सुटके नंतर त्याने सैन्याची जमवाजमव करून इ. स. ७९० पासून पुढे १२ वर्षे जावा साम्राज्याशी निकराने लढा दिला. इ.स. ८०२ मध्ये त्याने स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला आणि अशा प्रकारे ख्मेर घराण्याचा आणि एंगकोर राजवटीच्या सुवर्ण काळाचा आरंभ झाला. आपल्या राज्यकाळात त्याने कंबोडीयाच्या अनेक प्रांतांवर स्वाऱ्या करून आपला राज्य विस्तार केला आणि एकछत्री अंमल प्रस्थापित केला. याबरोबरच त्याने "देवराजा" ही महत्त्वाची प्रथा सुरू केली. राजा हा ईश्वरी अंश असतो, ही हिंदू संकल्पना त्याने प्रत्यक्ष अमलात आणली. निर्विवाद वर्चस्व आणि आधिपत्य स्थापन करून एंगकोर साम्राज्याची पाळेमुळे कंबोडीयात घट्ट रोवण्यास या प्रथेचा फार मोठा उपयोग झाला. इतिहासावरून दिसून येतं की जयवर्मन आणि त्यानंतरच्या पुढील देवराजांच्या मागे सर्व प्रजा एकजूटीने उभी राहिली आणि एका बळकट साम्राज्य निर्माण झाले. एंगकोरचे साम्राज्य सुमारे ६०० वर्षे टिकले.

बऱ्याचशा ख्मेर राजांच्या नावामागे लावली जाणारी "वर्मन" ही उपाधी रक्षणकर्ता या अर्थाने वापरली जाते.

याच वंशातील सूर्यवर्मन दुसरा (१११३ - ११५०) याने जगप्रसिद्ध एंगकोर वट या भव्य देवळाची निर्मिती केली. भगवान विष्णूंचे हे मंदिर स्थापत्यशास्त्राचे जगातील एक आश्चर्य मानले जाते. हे देऊळ पूर्ण करण्यास ३७ वर्षे लागली व याकामी सुमारे ५०,००० मजूर राबले असा संदर्भ वाचनात येतो. या वंशातील इतर कलाप्रेमी राजांनीही अशा अनेक मंदीरांची निर्मिती केली.

कालांतराने या वंशातील राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला. असं अनुमान काढलं जातं की बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर 'देवराजाची' प्रथा मोडीत निघाली व हळू हळू राज्य विस्तार, नियंत्रण या सर्वांना खीळ बसली. त्यातूनच पुढे हे साम्राज्य कमकुवत झाले.


मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ याहून वेगळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळालेल्या माहीतीवरून हा श्लोक उद्धृत केला आहे. तज्ज्ञांनी अधिक माहीती द्यावी. मी संस्कृत जाणकार नसल्याने श्लोक लिहीण्यात चूक झाली असेल तर चू. भू. दे. घे.

काही ठीकाणी या राजकन्येचे नाव सोमा असल्याचे वाचनात आले आहे.

एंगकोर वटचे मंदीर हा एक विस्तृत विषय असल्याने त्यावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. त्यामुळे अधिक माहीती दिलेली नाही.
वरील लेखासाठी वापरलेली माहीती महाजालावरील अनेक संकेतस्थळांवरून संकलित केली आहे आणि सर्व चित्रे विकिपिडीया मुक्तकोशाच्या सौजन्याने वापरली आहेत.