Thursday, August 16, 2007

गौतमीपुत्र शातकर्णी

महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते. प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, यादव आणि सातवाहन राजघराण्याविषयी त्रोटक इतिहास नजरेस पडतो. या राजघराण्यांनीही आपापल्यापरीने आपले राज्य सांभाळले आणि वाढीस नेल्याचे दिसते परंतु समग्र इतिहास सहज नजरेस पडत नाही. बरेचदा, या राजांविषयी अधिक माहिती काढायची झाल्यास पुराणांचा आधार घ्यावा लागतो. मराठी साहित्यात या राज्यांविषयी लिहिले गेले असण्याची शक्यता आहे परंतु महाजालावर समग्र लेखन दिसत नाही.

यांतील सर्व राजघराण्यांपैकी सातवाहन राजघराण्याची आठवण आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नेहमीच काढत असतो. आजही वापरात असलेली शालिवाहन शके ही दिनमान पद्धती या राज्यकाळात सुरू झाल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या इतिहासात या राजघराण्याचे स्थान कोणते हे माहित करण्यासाठी काही वाचन केले त्याचा गोषवारा येथे देत आहे -

सातवाहन राजघराणे

सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिल्याचे पुरावे मिळतात. त्यानुसार मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले (बहुधा किल्ले) आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वत: अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.

सातवाहन राज्य



अधिक माहितीसाठी विकिपीडियाचा हा दुवा पाहावा. याच दुव्यात पुढे या राजघराण्याचा उल्लेख कोणकोणत्या पुराणांत आला आहे त्याची उदाहरणे दिसतात. या राजघराण्यातील महत्त्वांच्या राजांपैकी गौतमीपुत्र शातकर्णी एक महत्त्वाचा राजा मानला जातो.



गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. .

गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्लव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.

अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.

आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नाहपण राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नाहपणाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वागवत होता असे वाचायला मिळते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.

शातकर्णीचा चेहरा असलेली नाणी


गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. नंतर ७८ वर्षांनी ही कालगणना सुरू झाल्याने ग्रेगरीयन कॅलेंडरपेक्षा ७८ वर्षे उशीराने सुरू होते.

या राजाबद्दल नाशिक येथे खुद्द त्याची आई गौतमीच्या सांगण्यावरून आपल्या मुलाची स्तुती करणारा शिलालेख कोरलेला आढळतो, त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --

"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात (KShaharat) घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."

मराठी विकिपीडियावर मला या राजाची कथा सांगणारा एक भाग मिळाला. तो येथे चिकटवत आहे..

शालिवाहनाची राजधानी (आणि इतर सातवाहन राजांची राजधानी) पैठण होती. शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे वजन किती हे नक्की सांगता येईल का? ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. मग हत्तीला नावेत चढवले आणि पाणि नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढून त्याजागी माती भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेपर्यंत. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनासकट परत पाठवला. ह्या त्याच्या बौद्धिक विजयाने त्यानी सुरु केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात मान्य झाला.



उपक्रमावरील एका सदस्यांनी मला सातवाहन घराण्याची संपूर्ण वंशावळ काढून दिली होती. ती ही येथे चिकटवत आहे.

आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा:

  1. सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३
  2. कृष्ण(भात) १०
  3. श्रीशातकर्णी(श्रीमल्‍लकर्णी) १०
  4. पूर्णोत्संग(पौर्णमास) १८
  5. स्कंधस्तंभ १८
  6. शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६
  7. लंबोदर १८
  8. आपीतक(आपीलक, दिविलक) १२
  9. मेघस्वाति १८
  10. स्वाति(पतुमत्, अटमान्) १८
  11. स्कंदस्वाति ७
  12. मृगेंद्रस्वातिकर्ण ३
  13. कुंतलस्वातिकर्ण ८
  14. स्वातिवर्ण १
  15. पुलोमावी ३६
  16. अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५
  17. हाल ५
  18. मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७
  19. पुरिकषेण(प्रविल्‍लसेन, पुरीषभीरु) २१
  20. सुंदरशातकर्णी(सुनंदन) १
  21. चकोरशातकर्णी ६ महिने
  22. शिवस्वाति २८
  23. गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८
  24. पुलोमत् २८
  25. शातकर्णी(शिवशातकर्णी) २९
  26. शिवश्री ७
  27. शिवस्कंध ३
  28. यज्ञश्री शातकर्णी २९
  29. विजय ६
  30. चंडश्री १०
  31. पुलोमत् ७.

संदर्भ: सर्व संदर्भ आणि चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. याशिवाय, मेगॅस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ यावरूनही ही माहिती दिली आहे.

अधिक माहितीसाठी ही चर्चा पाहावी.