Monday, April 26, 2010

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - ३

गरगॉयल, कायमेरा आणि ग्रोटेस्क याविषयी यापूर्वीच्या लेखांत माहिती दिली आहेच. गॉथिक बांधणीच्या एखाद्या चर्चच्या किंवा कॅथेड्रलच्या मनोर्‍यांवरून आणि खांबांवरून नजर फिरवली तर बर्‍याचदा ही गरगॉयल्स नजरेस पडतात. चर्चच्या भिंतींवर गरगॉयलचे अस्तित्व हे दुष्ट शक्ती चर्चच्या भिंतींबाहेर ठेवण्यासाठी आहे पासून ही गरगॉयल्स चर्चला सुरक्षितता देण्यासाठी आहेत अशा विविध कारणांसाठी असल्याचे सांगितले जाते. अधिक माहिती -

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - १
जपून! ते लक्ष ठेवून आहेत - २

वॉशिंग्टन डिसीतील नॅशनल कॅथेड्रल ही निओ-गॉथिक बांधणीची प्रसिद्ध इमारत. इमारतीची रचना, भव्यता, स्टेन्ड-ग्लासच्या प्रचंड खिडक्या यामुळे ही इमारत लक्षवेधी ठरते. केवळ बांधणीसाठीच नाही तर वॉशिंग्टन डिसी भागातील सर्वात लांब चाललेलं बांधकाम याच इमारतीचे. १९०७ साली सुरु झालेले हे बांधकाम १९९० साली संपुष्टात आले, म्हणजेच तब्बल ८३ वर्षे चालले. एम्पायर स्टेट बिल्डींग, व्हाईट हाऊस यांच्यानंतर अमेरिकन स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट इमारतींचा नमुना म्हणून नॅशनल कॅथेड्रलकडे बोट दाखवले जाते. भव्यतेच्या दृष्टीतून या कॅथेड्रलचा जगात सहावा क्रमांक लागतो. हा लेख नॅशनल कॅथेड्रलवर नसल्याने यापेक्षा अधिक माहिती येथे मिळेल.

नॅशनल कॅथेड्रलच्या भेटीत "गरगॉयलची सहल" करता येते. आम्ही ज्या वेळात तेथे पोहोचलो त्या वेळात अशी सहल नसल्याने आम्हीच दुपारी टळटळीत उन्हात आकाशाकडे बघत गरगॉयल शोधण्याचा प्रयत्न केला. ड्रॅगन, रानटी कुत्रे, सर्प, मगर अशी अनेक भयानक गरगॉयल्सनी ही इमारत सजली आहे परंतु इमारतीच्या उंचीमुळे सर्वच गरगॉयल जमिनीवरून दिसत नाहीत. काही इतक्या उंचीवर आहेत की माझ्याकडील कॅमेराचा झूम पुरेसा नव्हता त्यामुळे फोटो काढले तरी ते चांगले आले नाहीत. सातव्या माळ्यावरील सज्जातूनही काही सुरेख गरगॉयल आणि ग्रोटेस्क यावेळी नजरेस पडली. त्यापैकी आवडलेली काही येथे देत आहे.



DSC00127

गरगॉयलच्या संदर्भातील एक घटना येथे देत आहे. ८० च्या दशकात कॅथेड्रलच्या पश्चिमेकडील भागाचे काम सुरु होते. या भागाच्या सुशोभीकरण गरगॉयल्सनीच करायचे होते. या सुशोभीकरणासाठी स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले. नॅशनल जिओग्राफिकच्या मासिकातून ही माहिती देण्यात आली. ज्यांना त्यात पारितोषिके मिळाली त्यातील तिसर्‍या क्रमांकावरील गरगॉयल खाली दिले आहे.

चाणाक्ष वाचकांना हे गरगॉयल कोणाचे ते सांगण्याची गरज नाही.
Darth