Thursday, May 22, 2008

भारताचे अटलांटिस

अटलांटिस या समुद्रात लुप्त झालेल्या दंतकथेतील प्रसिद्ध बेटाचा परिचय अनेकांना आहे. अटलांटिसबद्दल ठोस माहिती देणारा उल्लेख ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने केल्याचे आढळते. अटलांटिसच्या राज्यात अनेक सुंदर इमारती, मंदिरे उभी होती. त्यातील काही सोन्या-चांदीने मढवलेली होती. राज्यात सुबत्ता नांदत होती. लोक सुसंस्कृत आणि कलाप्रेमी होते. लाखोंचे सैन्य आणि सुसज्ज आरमार बाळगणार्‍या या प्रगत राज्याने अथेन्सवर हल्ले केल्याचे प्लेटो सांगतो परंतु अचानक एका दिवस-रात्रीत होत्याचे नव्हते होऊन अटलांटिस समुद्राच्या पोटात गडप झाल्याची नोंद येते. अटलांटिस हे खरेच राज्य होते की प्लेटोच्या सुपीक डोक्यातून निर्माण झालेली ती एक रम्य कल्पना होती याबाबत कोणी पुरावा देऊ शकत नाही. प्लेटोखेरीज अन्य कोणत्याही पुरातन नोंदीत किंवा ग्रीक दंतकथांत अटलांटिसचा उल्लेख सापडत नाही आणि अटलांटिस असे अचानक गडप होण्याचे नेमके कारण काय तेही समजत नाही परंतु तरीही अटलांटिसने संशोधकांना आजतागायत भुरळ घातली आहे. हे बेट शोधून काढण्याचे हजारो प्रयत्न झाले आहेत आणि होत राहतील.

अटलांटिसचे भौगोलिक स्थान कोणते याबाबतही अनेक प्रवाद आहेत. ग्रीसच्या जवळ भूमध्य समुद्रात, इजिप्तच्या जवळ अफ्रिकेनजीकच्या समुद्रात ते दूरवर अटलांटिक समुद्रात आणि हिंदी महासागरातही अटलांटिस असावे का काय या विचारांनी पछाडलेले अनेक हौशी संशोधक सापडतात.

समुद्राने गिळलेल्या बेटांची आणि किनार्‍यावरील शहरांची संख्या तशी बेसुमार असावी. सॅंटोरिनी, विनेटा, ओलस, अलेक्झांड्रियाचा समुद्रतटाजवळील भाग आणि अशी अनेक शहरे समुद्राने आपल्या उदरात सामावून घेतलेली आहेत. भारताचा विचार करता समुद्राने गिळलेले चटकन आठवणारे शहर म्हणजे द्वारका. महाभारताच्या १६ व्या अध्यायात द्वारकेचा विनाशकाळ जवळ आला असता विनाश कसाकाय घडत गेला याचे उल्लेख येतात. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे - घरांतील भांडी अचानक फुटू लागली, रस्त्यांवर उंदीर-घुशी राजरोस फिरू लागले, शहरातील पक्षी उच्च रवात ओरडू लागले, गिधाडे शहरावर घिरट्या घालू लागली, द्वारकावासियांनी स्थलांतरास सुरुवात केली आणि बघता बघता द्वारका समुद्राच्या उदरात नाहीशी झाली इ.

महाभारतात, द्वारकेच्या अशा नाहीशा होण्याचा संबंध गांधारीचा शाप, यादवांचा शाप ते श्रीकृष्णाच्या मृत्यूशीही लावला जातो परंतु द्वारकेचेही नेमके असे का व्हावे ते कळत नाही. आज या सर्वांची कारणे समुद्राची पातळी वाढणे, किनारे खचणे, भूकंप, त्सुनामी अशी पुढे करता येतात. पूर्वापार भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावरून व्यापार चालत असल्याच्या नोंदी मिळतात. महाराष्ट्राचे, केरळचे किनारे आणि त्यावरील बंदरे यांचे उल्लेख इतिहासात शोधल्यास सहज मिळतात. बंगालच्या महासागरातील असेच एक पुरातन बंदर तमिळनाडूतील महाबलीपुरम‌ला असल्याचे सांगितले जाते.

महाबलिपुरम्‌चे समुद्रतटावरील मंदिरमहाबलीपुरम्‌बद्दल प्रसिद्ध आख्यायिका अशी की हिरण्यकश्यपुचा नरसिंहाने वध केल्यावर प्रह्लाद गादीवर बसला. या प्रह्लादाचा मुलगा बळी किंवा महाबळी. या बळीराजाने महाबलीपुरम्‌ची स्थापना केल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक नोंदींनुसार पल्लव राज्यकाळात महाबलीपुरम्‌च्या बंदराचा विकास झाल्याचे सांगितले जाते. सातवाहनांचे राज्य खिळखिळे झाल्यावर पल्लव राजघराण्याने आपले स्वतंत्र राज्य आंध्र आणि तमिळनाडूमध्ये स्थापन केले. त्यापैकी दुसरा नरसिंहवर्मन या राजाने आठव्या शतकात महाबलीपुरम्‌ शहराचा विकास केल्याचे सांगितले जाते. या पल्लव राजांबद्दल विस्तार लेखात नंतर येईलच. या शहराबद्दल दुसरी प्रसिद्ध आख्यायिका अशी की येथे समुद्रतटापाशी सात प्रचंड मंदिरे उभी होती आणि या मंदिरांच्या सभोवताली प्रचंड राजवाडे, महाल आणि हवेल्या उभ्या होत्या. एक सुसंस्कृत राज्य येथेही नांदत होते. आज यापैकी फक्त एकच मंदिर समुद्रतटावर उभे आहे.

महाबलीपुरम् शहराबद्दल प्राचीन उल्लेख मार्को पोलोच्या नोंदीत आढळतो असे म्हणतात. हा उल्लेख महाबलीपुरमवर उल्लेखनीय प्रकाश टाकत नसला तरी मार्को पोलोच्या प्रवासाचे नकाशे पाहता तो या बंदराला भेट देऊन गेल्याचे स्पष्ट कळते. यानंतरची महत्त्वाची नोंद जॉन गोल्डींगहॅम या ब्रिटिश खगोल संशोधकाने अठराव्या शतकात केलेली आढळते. या नोंदीत तो महाबलीपुरम्‌चे मंदिर, त्याचे स्थापत्त्य, रचना या सर्वांवर भाष्य करतो. प्राचीन आख्यायिकेनुसार येथे सात मंदिरे असल्याचाही उल्लेख येतो, गोल्डींगहॅमची आख्यायिका सांगते की कोणे एके काळी या जागी एक अतिशय सुसंस्कृत शहर विकसित झाले होते. स्वर्गस्थ देवांना याचा हेवा वाटल्याने त्यांनी प्रलय निर्माण केला आणि क्षणार्धात सर्व शहर पाण्यात गडप झाले. सातपैकी सहा मंदिरे पाण्याखाली गेली आणि एक किनार्‍यावर शिल्लक राहिले. या नोंदीचा काळ सुमारे १७९८चा. या आख्यायिकेला पुष्टी देणारी घटना सुमारे १०० वर्षांनी घडली.

१८८३ मध्ये इंडोनेशियाजवळील क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक होऊन प्रचंड त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. या प्रलयात सुमारे ३६,००० जीव गेले आणि इंडोनेशियाजवळील काही लहान बेटे जगाच्या नकाशावरून पुसली गेली. भारताच्या किनार्‍याला नेमकी हानी कशी पोहोचली याचे तपशील मिळू शकले नाहीत परंतु पोहोचली असावी ही शक्यता फार मोठी वाटते. यानंतर १९१४ मध्ये जे. डब्ल्यू. कूम्बस या ब्रिटिश लेखकाने लिहिलेल्या आख्यायिकेत येथे बंगालच्या उपसागराकडे पाहणारी सात भव्य मंदिरे असून त्यांचे कळस तांब्याचे होते असे म्हटले आहे. हे कळस सूर्यप्रकाशात झळाळत असत आणि नाविकांना दिशा मार्गदर्शक म्हणून या कळसांचा मोठा उपयोग होत असे.

या मंदिरांचा र्‍हास नेमका कशामुळे आणि कधी झाला याची नोंद मिळत नसली तरी संशोधकांच्यामते भूकंप, त्सुनामीसारखे काहीतरी घडले असावे आणि त्यातून देवांना हेवा वाटल्याने त्यांनी हे शहर नष्ट केले ही दंतकथा जन्मली असावी. १०००-१२०० वर्षांपूर्वी येथील जमीनही समुद्रात आतवर पसरलेली असावी आणि आतापर्यंतच्या कालावधीत जमिनीची धूप होऊन समुद्र आत सरकला असावा ही दुसरी शक्यता वर्तवली जाते परंतु प्रचलीत आख्यायिकेशी ती मेळ खात नाही. ब्रिटिश राजवटीत या समुद्रकिनार्‍यावरील अनेक मूर्ती आणि स्थाने वाळूखालून साफ करून घेण्यात आली आणि पुरातत्त्वखात्याचे कामही रुजू करण्यात आले.

तरीही २००४ सालच्या त्सुनामीपूर्वी या प्राचीन शहराबद्दल आणि त्याच्या सात प्रसिद्ध मंदिरांबद्दल म्हणावे तसे पुरावे सापडत नव्हते. अनेक भारतीय आणि परदेशी संशोधकांच्यामते या सर्व भाकडकथा असण्याची शक्यता वर्तवली जात असे. परंतु, समुद्रात नाव घातल्यावर आणि कधी कधी ओहोटीच्या वेळी समुद्राखाली मानवनिर्मित बांधकाम दिसते अशा प्रकारच्या स्थानिक कोळ्यांनी सांगितलेल्या दंतकथा मात्र प्रसिद्ध राहिल्या. २००२ साली एका ब्रिटिश संस्थेसोबत नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या भारतीय संस्थेने महाबलीपुरमच्या किनार्‍यावर संशोधन प्रकल्प राबवला. त्यात किनार्‍यापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मानवनिर्मित भिंतींसदृश बांधकाम सापडले. बांधकामाच्या रचनेवरून तेथे एकेकाळी अनेक इमारती उभ्या असाव्यात असा अंदाज बांधण्यात आला. संशोधकांनी या बांधकामाचा काळ पल्लव राज्यकाळात, अंदाजे नरसिंहवर्मनच्या काळात नेऊन ठेवला.

त्सुनामीच्या दिवशी अनेक पर्यटकांना आणि स्थानिक रहिवाशांना ओहोटीसारखी परिस्थिती निर्माण होऊन समुद्राचे पाणी अचानक शेकडो मैल आत ओढले गेल्याचे दिसले. या काळात अनेकांना पाण्याखालील बांधकामाचे दर्शन झाले. त्यानंतर आलेल्या प्रचंड लाटेने समुद्रातील काही प्राचीन अवशेष किनार्‍याकडे ढकलले गेले आणि किनार्‍याजवळील काही दुर्लक्षित बांधकामांवरील शेकडो वर्षे साचलेली वाळू धुतली गेल्याने ते नव्याने नजरेस आले.
किनार्‍यावर ढकलले गेलेले - नव्याने सापडलेले काही अवशेष


आलोक त्रिपाठी या भारतीय पुरातत्त्व खात्यातील संशोधकाची मुलाखत हल्लीच पाहण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार या भागातील समुद्र उथळ असल्याने बरेचदा तेथे नाव घालण्यास किंवा पाणबुड्यांना आत जाऊन चित्रण करण्यास अडचणी येतात. तरीही २००५ सालापासून केलेल्या अव्याहत प्रयत्नांतून येथे एक पुरातन शहर वसत होते यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. या बांधकामात ताशीव भिंती आणि बांधकाम स्पष्ट दिसून येते आणि सध्या हे बांधकाम पल्लव राज्यकाळातीलच आहे की त्याहीपेक्षा प्राचीन आहे यावर संशोधन सुरू आहे.

पल्लव राजघराणे

लेखात वर उल्लेखल्याप्रमाणे सातवाहनांच्या पडत्या काळात पल्लव राजघराण्याचा उदय झाला आणि त्यांनी आंध्र आणि तमिळनाडू प्रदेशात आपले राज्य स्थापन केले. हे पल्लव राजे मूळचे कोणते याबाबत मात्र प्रवाद आहेत. काही संशोधकांच्या मते पर्शियातील पह्लव म्हणजेच पल्लव. स्थलांतरित होऊन ते येथे स्थायिक झाले असावेत आणि पुढे त्यांचे नाव पल्लव असे पडले असावे. या घराण्यातील बरेचसे राजे वर्मन ही उपाधी चालवत. या वर्मन उपाधीमुळे यापैकीच एखादा राजा कंबोडियात जाऊन ख्मेर घराण्याचा निर्माता ठरला असावा अशी शक्यताही वर्तवली जाते. पल्लव राजा महेंद्रवर्मन हा कला आणि स्थापत्त्य यांचा प्रेमी होता. त्याचा राजवटीत पाषाणातून कोरलेल्या सुबक आणि देखण्या मंदिरांची निर्मिती केली गेली. महाबलिपुरम्‌च्या मंदिराचा विकास किंवा निर्मिती दुसर्‍या नरसिंहवर्मनाच्या काळात झाली असे मानले जाते. हा राजाही कला, भाषा आणि स्थापत्त्यशास्त्राचा प्रेमी होता. हा राजा मल्लविद्येतही प्रवीण होता आणि त्यामुळे महाबलिपुरम्‌ला मामल्लापुरम्‌ (मामल्ला = मल्ल) या नावानेही ओळखले जाते.
महाबलिपुरम्‌चे समुद्रतटावरील मंदिर

महाबलिपुरम्‌चे समुद्रतटावरील उरलेले एकमेव मंदिर संपूर्ण पाषाणातून कोरलेले आहे. या मंदिराच्या स्थापत्त्याबद्दलही आख्यायिका सांगितली जाते की हे कोरीव काम करताना लाकूड आणि धातू यांचा वापर केला नाही. हे मंदिर एका संपूर्ण पाषाणातून कोरलेले आहे. येथे प्रमुख मंदिर विष्णूचे असून या मंदिराच्या स्थापनेनंतर महाबलिपुरम्‌चा र्‍हास थांबला अशी कथा सांगितली जाते. याचबरोबर, मोकळ्या जागेवर खडकांवर कोरलेले गंगेचे पृथ्वीवर अवतरणे, अर्जुनाची तपश्चर्या, वराहाचे मंदिर, पांडवांचे रथ हे कोरीव कामांचे उत्कृष्ट नमुने मानले जातात.

संदर्भः


चित्रे


  • मार्कोपोलोचा नकाशा : http://www.silk-road.com/maps/images/polomap.jpg

  • महाबलिपुरम् मंदिर आणि कोरीव लेणी : विकिपीडिया

  • किनार्‍यावर ढकलले गेलेले - नव्याने सापडलेले अवशेष : http://newsimg.bbc.co.uk