Wednesday, December 14, 2011

उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई

भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीज वसाहतींचा विचार केला तर सर्वप्रथम आठवतो तो गोवा. भारत स्वतंत्र झाल्यावरही काही काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला, पोर्तुगीज संस्कृती जोपासलेला आणि त्याचवेळेस पोर्तुगीज अंमलाखाली दबलेला गोवा. परंतु खुद्द महाराष्ट्रातील, मुंबईच्या अगदी जवळची वसईची पोर्तुगीज वसाहत त्यामानाने चटकन लक्षात येत नाही. ती आजही उपेक्षित राहिल्यासारखी वाटते.

वसईच्या किल्ल्याचा नकाशावसईचा इतिहास एखाद्या पक्क्या वसईकराला विचाराल तर अगदी अभिमानाने आणि प्रेमाने तो तुम्हाला माहिती देईल आणि ही माहिती देण्यात कोणत्याही धर्माची वा जातीची व्यक्ती मागे नसेल याची खात्री अगदी छातीठोकपणे देता येईल. अर्थातच, माहिती देण्याची प्रत्येकाची आवृत्ती वेगवेगळी असेल. पुरातन काळापासून सोपारा बंदरामुळे विविध देशांतील, धर्मांतील लोकांचा वावर या परिसरात राहिला आहे आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आला आहे. ब्राह्मण, सारस्वत, सामवेदी, सोमवंशी क्षत्रिय, आगरी, आदिवासी, ख्रिश्चन, मुसलमान आणि अगदी आफ्रिकेहून गुलाम म्हणून आणलेले हबशी अशा अनेक संस्कृती आजही येथे नांदतात. पूर्वापार काळापासून असलेली सुपीक माती, मासेमारी आणि सोबतीला लाकडाचे आणि चामड्याचे उद्योग यामुळे सुबत्ता मिळवलेल्या या प्रदेशात नानाविध लोक वस्तीला येऊन राहिल्याचे आणि कायमचे वसईकर झाल्याचे इतिहासात डोकावल्यास दिसते.

वसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते, भरभराटीला आलेले होते तरी कालांतराने वसईचा परिसर राजकीय दृष्ट्या किंचित उपेक्षित झाला. अनेक वर्षांनी तिचा चेहरामोहरा बदलला तो पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून. वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं (Bacaim) म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन (Bassien) केले आणि त्यानंतर आता सद्यकाळी वसई या नावाने या शहराला ओळखले जाते. इतिहासातील; मुख्यत: मराठेशाहीतील काही महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार वसई राहिलेली आहे. पोर्तुगीजांपासून पुढे घडलेल्या इतिहासाचा आणि वसईच्या किल्ल्याचा थोडक्यात लेखाजोखा येथे घेतला आहे.

१६ व्या शतकात वसई आणि आजूबाजूचा प्रदेश गुजरातचा सुलतान कुतुबउद्दीन बहादुरशहाकडे होता. मुख्य राज्य गुजरातेत असल्याने त्याच्या काळातही हा प्रदेश उपेक्षितच राहिला. उलट लुटालूट, जाळपोळ, देवस्थानांना इजा पोहोचवणे वगैरे प्रकारांनी त्याने स्थानिकांना जेरीस आणले होते. याच सुमारास पोर्तुगीज दीव-दमण पासून गोव्यापर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत होते. बहादुरशहाला शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसईला दोन वेळा आग लावल्याचे कळते. गावांवर हल्ले करणे, लुटालूट करणे वगैरे प्रकार पोर्तुगीज आपल्या जहाजातून करत. “ज्याचं राज्य, त्याचाच धर्म” या उक्तीप्रमाणे देवळांवर बांधलेल्या मशीदींना तोडून तेथे चर्च उभे करण्याचा सपाटा पोर्तुगीजांनी लावला होता. जमिनीवरून मुघलांशी लढा आणि समुद्रावरून पोर्तुगीजांशी लढा, यांत बहादूरशहा जेरीस आला.

१५३४ मध्ये बहादूरशहाने नुनो डा’कुन्हा या पोर्तुगीज गवर्नरशी तह करून वसई, साष्टी, वरळी, कुलाबा, दीव-दमण, कल्याण, ठाणे, चौल हा सर्व प्रदेश पोर्तुगीजांना देऊन टाकला. अशा रीतीने, उत्तर कोकणावर पोर्तुगीजांचा अंमल आला. याच सुमारास वसईचा किल्ला बांधायला पोर्तुगीजांनी सुरुवात केली. तत्पूर्वी बहादूरशहाने आणि त्याच्या सुभेदाराने किनार्‍यानजीक उभारलेली तटबंदी आणि दुर्ग अस्तित्वात होते. वसईच्या किल्ल्याची माहिती लेखात पुढे बघू.


वसईच्या किल्ल्याचा दरवाजा या काळात पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अनन्वित अन्याय केले. विहिरीत पाव किंवा गोमांस टाकून लोकांना बाटवण्याचे प्रकार केले. हिंदू मंदिरे तोडून तेथे चर्चेस उभी केली. जाळपोळ करणे, जमिनी हिसकावणे इ. प्रकार होत. एका पोर्तुगीज प्रवाशाच्या वर्णनानुसार हिंदू देवतांच्या मूर्ती जाळणे, त्यांची तोडफोड करणे नित्याचे होते. ज्या ठिकाणी हिंदू स्नानासाठी, धार्मिक विधींसाठी किंवा पापविमोचनासाठी जात असा तलाव पोर्तुगीजांनी नष्ट करून टाकला. या छळाला कंटाळून हिंदू, मुसलमान आणि पारशी लोकांनी येथून स्थलांतर करून शहाजहानच्या मुघली राज्यात आसरा घेतला. १७२० मधील एका नोंदीनुसार वसई भागात ६०००० च्या आसपास लोकसंख्या होती आणि त्यातील बहुतांश बाटलेल्या ख्रिश्चनांची आणि युरोपीयांची होती.

पोर्तुगीजांनी लाकडाचा आणि बांधकामासाठी लागणार्‍या दगडांचा व्यापार भरभराटीस आणला. घरांसाठी, जहाजांसाठी लागणारी उत्कृष्ट लाकडे आणि बांधकामासाठी तासलेले दगड यांची मोठी निर्यात वसईतून चाले. तत्कालीन पोर्तुगीज प्रवाशाने लिहिलेल्या नोंदीनुसार गोव्यातील अनेक चर्चच्या बांधकामांसाठी वसईतून दगड आणि दगडी खांब नेण्यात आले होते. व्यापारीदृष्ट्या हा वसईतील भरभराटीचा काळ असला तरी स्थानिक जनता अन्यायाखाली दबली जात होती. स्थानिक हिंदू आणि मुसलमानांना जुलमाने बाटवणे, त्यांना त्रास देणे, मूर्तींची आणि प्रार्थनास्थळांची तोडफोड करणे यांत पोर्तुगीजांची धर्मसत्ता इतकी उन्मत्त झाली होती की पुढे तिचा त्रास पोर्तुगीज अधिकार्‍यांना आणि राजसत्तेला होऊ लागला; कारण विविध कामांसाठी त्यांना स्थानिकांची गरज होती, मदत हवी होती, ती लोक वसई सोडून जाऊ लागल्याने मिळेनाशी झाली. अधिकार्‍यांनी याबाबत पोर्तुगीज राजसत्तेकडे केलेल्या तक्रारींच्या नोंदी मिळतात.



Vasai Fort map

शिवाजी महाराजांचे लक्ष या जुलमांच्या बातम्यांनी वसईकडे वेधले होते. त्यांनी वसईवर कडक चौथाई लावली होती. पुढे पेशव्यांच्या डोळ्यातही वसई आणि वसईतील अत्याचार खुपत होतेच, पण प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. शेवटी अणजूरकर नाईकांनी "वसईप्रांत फिरंगीयांकडे आहे. त्याणें देवस्थानें व तीर्थे यांचा व महाराष्ट्रधर्म यांचा लोप केला. हिंदू लोक भ्रष्टाऊन क्षार केले. म्हणून साहेबी मसलत करून प्रांत मजकूर सर करून देवस्थापना करावी व स्वधर्मस्थापना होय ते गोष्टी करावी.” अशी तक्रार पहिल्या बाजीरावाकडे केली. या तक्रारीला यश येऊन वसईवर स्वारी करण्याचा बेत नक्की झाला.




वसईचा वेढा सोपा नव्हता; तब्बल दोन वर्षे मराठ्यांनी कसून लढा दिला. वसईच्या किल्ल्याच्या तीन बाजूंनी समुद्र आणि दलदल असल्याने किल्ला काबीज करणे कठीण होते. शेवटी अर्नाळा, वर्सोवा वगैरे किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश मराठे व्यापत गेले. यामुळे पोर्तुगीज सैन्याच्या रसदीवर परिणाम झाला. शेवटी चर खणून आणि सुरुंग लावून तटाला भगदाडे पाडून मराठे आत घुसले. हे करताना मराठ्यांच्या सैन्याची मोठी हानी झाली, तरीही मराठ्यांनी १७३९ मध्ये किल्ला जिंकून घेतला. तत्कालीन नोंदींनुसार मराठ्यांचे १२००० सैनिक कामी आले तर ८०० पोर्तुगीज कामी आले. (या नोंदीत पोर्तुगीजांकडून लढलेल्या इतर सैन्याची नोंद नसावी.) विजयानंतर मराठा सैन्याने पोर्तुगीजांच्या चर्चवरच्या घंटा उतरवल्या आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यातील एक घंटा नाशिकच्या नारोशंकराच्या मंदिरात असून ती मराठी भाषेत “नारोशंकराची घंटा” या वाक्प्रचाराने प्रसिद्ध आहे. तर दुसरी घंटा अष्टविनायकांतील बल्लाळेश्वराच्या मंदिरात आहे.




Darya Darwaja
मात्र ज्याला धार्मिक युद्धाचे नाव दिले जाते त्या युद्धातील तहाच्या अटी फारच सौम्य होत्या. या अटींनुसार पोर्तुगीज सैन्याला वसई सोडून जाण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली, या सह त्यांची चल मालमत्ता आणि संपत्ती सोबत घेऊन जाण्याची परवानगीही देण्यात आली. आठ दिवसांनंतर मराठ्यांनी किल्ला आणि घरादारांची लूट केली. बरेचसे पोर्तुगीज गोव्याच्या दिशेने चालते झाले. दोनशे वर्षांहून अधिक काळ वसईवरील पोर्तुगीज अंमल अशा रीतीने संपला, परंतु पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा आजही वसईत शिल्लक आहेत.



पुढे माधवराव पेशव्यांनी अनेक हिंदू कुटुंबांना वसईत वसण्यासाठी उद्युक्त केल्याचे सांगितले जाते. यावेळी पुण्याहून आणि कोकणातून अनेक हिंदू कुटुंबे वसईत स्थलांतरित झाली. सक्तीने किंवा फसवणूकीने बाटवलेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्याचेही प्रयत्न माधवरावांनी केल्याचे दाखले मिळतात. मराठ्यांनी शर्थीने जिंकून घेतलेली वसई फार काळ त्यांच्या हाती टिकली नाही. खिळखिळीत झालेल्या पेशवाईला शह देऊन १७८० मध्ये इंग्रजांनी वसई जिंकून घेतली आणि वसईवर इंग्रजांचा अंमल आला. १८०२ मध्ये यशवंतरावाने पुण्यावर हल्ला केल्यावर दुसरा बाजीराव पळून वसईला इंग्रजांना शरण गेला. वसईच्या या दुसर्‍या तहात मराठेशाही बुडाली आणि पेशवे ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातले बाहुले बनले. त्यानंतर वसईला काही काळ बाजीपूर या नावानेही ओळखले जाई.



किल्ल्याच्या आतील भागवसई आणि तिच्याजवळील माणिकपूर, पापडी, निर्मळ, रमेदी येथे पोर्तुगीजांनी बांधलेली सुरेख जुनी चर्चेस अद्यापही प्रार्थनास्थळे म्हणून वापरात आहेत.



वसईचा किल्ला

वसईचा किल्ला भुईकोट असून तो समुद्रकिनार्‍याशी बांधलेला आहे. तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर आहे.



चित्रात दाखवल्याप्रमाणे किल्ल्याला दहा बुरूज आहेत. त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान अशी फौज तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.

DSC00702



किल्ल्याच्या आतील भागकिल्ल्याला दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे. किल्ल्यात न्यायालय, तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात चोर वाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत. महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना मराठी नावे दिली होती. कोकणातला, बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही.

Vasai Fort 2

हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकारयाला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात ऊसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. तसेही लोक बांधकामासाठी पडलेले दगड उचलून घेऊन जात होतेच. पूर्वी वसईला भक्कम दगडी वाडे आणि कोट दिसत. ते दगड किल्ल्यातून उचलून आणल्याच्या गोष्टी ऐकायला येत. आज हे दगड आणि वाडे दिसेनासे होऊन तेथे सिमेंट काँक्रिटची जंगले उभी राहिली आहेत.


Vasai-fort-ruins


किल्ल्याचे अवशेष किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली. दिलेल्या चित्रात किल्ल्याचे भग्न अवशेष आणि वाढलेले रान दिसते. १५-२० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बर्‍याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून, भिंती, बुरूज, तट यांची साफसफाई करून, जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून, पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे.
Vasai Fort 3


संदर्भ:



वसईची मोहीम – य. न. केळकर

Notes on the history and antiquities of Chaul and Bassein – Joseph Gerson Cunha.

वसईचा इतिहास



चित्रे:

नकाशा आणि इतर काही चित्रे विकिपिडीयावरून घेतली आहेत.