Sunday, November 04, 2007

द्रौपदीचा पांडवांशी विवाह - आक्षेप आणि कारणमीमांसा

मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात. गांगुलींचे महाभारत हीच माझ्याकडील विश्वसनीय प्रत आहे. तिच्या अनुषंगाने खालील लेख लिहिला आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील महाभारताची सुधारित प्रत कोणी वाचली असल्यास आणि खालील लेखावर अधिक प्रकाश टाकू शकल्यास आभारी असेन.

चर्चेतील आक्षेप काहीसे असे होते.


  • द्रौपदी ही भीक होती का?
  • पांडवांनी बैलोबांप्रमाणे आईची आज्ञा शिरसावंद्य मानून द्रौपदीला वाटून कसे घेतले?
  • कुंतीने भावांभावांत एकी रहावी म्हणून पाचांचा विवाह द्रौपदीशी करण्याचा जलद निर्णय कसा काय घेतला?
  • अनेक प्रसंगांतून द्रौपदी उर्मट होती असे दिसते तर तिने पाचांची पत्नी बनणे कसे स्वीकारले?



भिक्षा ही भिकार्‍याला दिलेली भीक नसून ब्राह्मणाची मिळकत समजली जाई. तत्कालीन स्त्रियांची सामाजिक स्थिती पाहता, स्त्रीही गोधनाप्रमाणेच पुरुषाची मिळकत असणे वावगे नसावे. आता वळू स्वयंवरपर्वाकडे - यातील स्वयंवराचा भाग सोडून, द्रौपदीला जिंकल्यावर ब्राह्मणवेशात पांडव तिला घेऊन कुंभाराच्या घरी येतात तिथपासून सुरुवात करू.

आपले पुत्र परतले नाहीत या काळजीत पाठमोऱ्या बसलेल्या कुंतीच्या समोर उभे राहून पांडव, आपण भिक्षा घेऊन आल्याचे सांगतात. 'जे काही मिळाले ते तुम्ही समान वाटून घ्या' असे कुंती सांगते आणि पुत्रांकडे वळते. समोर उभ्या असलेल्या याज्ञसेनीला पाहून कुंती चकित होते आणि तिला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो. 'हे मी काय केले?' असे मोठ्याने बोलून ती द्रौपदीचा हात पकडते आणि पापाचे क्षालन व्हावे म्हणून युधिष्ठीरासमोर उभी राहते आणि सुनावते ' द्रुपद राजाची कन्या तुझ्या धाकट्या भावांनी जिंकून आणून माझ्यासमोर उभी केली आणि वर भिक्षा आणली असे ओरडले तो त्यांचा निव्वळ मूर्खपणा आहे. हे राजा! भिक्षा आणली असे वाटल्याने मी काही चुकीचे बोलून गेले नाही पण आता तूच सांग की माझे बोलणे खोटे कसे पडावे? आपल्या हातून पाप कसे घडू नये आणि या नवपरिणित वधूला येथे अवघडल्यासारखे कसे वाटू नये?'

युधिष्ठीर आईची समजूत घालतो आणि अर्जुनाकडे वळून म्हणतो, 'याज्ञसेनीला तू पणात जिंकलेस, तेव्हा तिच्याशी लग्न केवळ तूच करावेस. तेच योग्य होईल.'

यावर अर्जुन म्हणतो, 'असे करून पापाचा घडा माझ्या नशिबी येणार. आपण सर्व काही वाटून घ्यायची शपथ घेतली होती, मातेने तशी आज्ञाही दिली. आता याज्ञसेनीशी सर्वप्रथम विवाह तुम्ही करावा, मग भीमाने, मी, नकुल आणि सहदेवाने विवाह करावेत असे मला वाटते. यानंतर, मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्व आपली आज्ञा मानू.'

अर्जुनाचे वक्तव्य ऐकून बाकीच्या पांडवांनी द्रौपदीकडे निरखून पाहिले आणि तिच्या अप्रतिम सौंदर्याकडे पाहून ती आपलीही पत्नी होऊ शकते या शिवाय कोणताही दुसरा विचार त्यांच्या मनात येईना. युधिष्टीराने हे सर्व पाहून जाणले की आपल्या भावांच्या मनात द्रौपदीविषयी लालसा निर्माण झाली आहे आणि ही गोष्ट भावांभावांत फूट पाडायला कारणीभूत होईल हे जाणून त्याने 'द्रौपदी ही पाचही पांडवांची बायको होईल' असे घोषित केले.

हे सर्व घडत असता आपल्या बहिणीला जिंकणारे हे ब्राह्मण कोण हे पाहण्यासाठी धृष्टद्युम्न कुंभाराच्या घराबाहेर लपला होता. लाक्षागृहाच्या कांडापासून नाहीसे झालेले पांडव हेच ते पाच ब्राह्मण असावेत अशी शंका आल्याने श्रीकृष्ण आणि बलराम कुंभाराच्या घरात येऊन पांडवांना भेटून सल्ला मसलत करून गेले. ती रात्र पांडवांनी आनंदात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी लपलेला धृष्टद्युम्न महालात परतला तसे द्रुपदाने उत्सुकतेने ब्राह्मणांविषयी विचारले तेव्हा धृष्टद्युम्नाने ते पांडव असल्याचा संशय व्यक्त केला. येथे द्रुपद विचारतो की त्या गरीबाच्या घरात द्रौपदी कशी राहिली आणि धृष्टद्युम्न सांगतो की अतिशय शालीन आणि मिळून मिसळून राहिली.

विवाहाची बोलणी करायला द्रुपद कुंभाराच्या घरी गेला आणि पांडवांना उत्सवासाठी आमंत्रित करून गेला. यानंतर मिरवणूक, भोजन इ. नंतर द्रुपदाने लग्नाची बोलणी सुरू केली. पांडवांनीही त्याला आपली खरी ओळख दिली आणि द्रुपदाकडे आश्रय मागितला. द्रुपद आणि पांडवांची कुरुराजघराण्यात चाललेल्या राजकारणाविषयी बोलणी झाली.

यानंतर द्रुपदाने युधिष्ठिराकडे विनंती केली की आता अर्जुन आणि द्रौपदीचा विवाह ठरावा. यावेळेस युधिष्ठिराने सांगितले की द्रौपदीशी विवाह प्रथम मी करणार. झाला प्रकार माहित नसल्याने द्रुपदाने युधिष्ठिराला म्हटले की 'द्रौपदीला अर्जुनाने जिंकले आहे. सर्वांची संमती असेल की आपण मोठे भाऊ असल्याने तिच्याशी विवाह करावा तर माझी काहीच हरकत नाही.' यावर युधिष्ठिराने त्याला घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते ऐकून द्रुपद काळजीत पडला आणि म्हणाला की 'एका पुरुषाने अनेक विवाह करणे ही आपली प्रथा आहे परंतु एका स्त्रीने अनेक पती करणे धर्मबाह्य ठरणार नाही काय? असे पाप कसे करता येईल? या प्रसंगाने तुमच्या किर्तीला काळिमा तर नाही लागणार? अशा प्रकारचे लग्न मला समाजात आणि वेदांत आढळून आलेले नाही. हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे.'

युधिष्ठिर उत्तरादाखल म्हणतो, 'नैतिकता हा फार नाजूक मामला आहे. तिचा पथ सतत बदलत असतो. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही. ज्येष्ठांचा अवमान केला नाही. आमच्या मातेने हे शब्द उच्चारले ते खोटे ठरावेत अशी तिची आणि माझी इच्छा नाही.'

यावरही द्रुपदाचे संपूर्ण समाधान झालेले दिसत नाही (असे माझे मत) तो उद्गारतो, 'हे कुंती, तू, तुझे पुत्र आणि माझा पुत्र धृष्टद्युम्न मिळून या गोष्टीवर निर्णय करा. तुम्ही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचलात ते मला कळवा. मी विवाहाची तयारी करेन.'

द्रुपद, पांडव, कुंती आणि धृष्टद्युम्न यांचा विचारविनिमय चालला असता तेथे व्यास पोहोचले. यानंतर द्रुपद, धृष्टद्युम्न, युधिष्ठीर आणि व्यास यांच्यात मोठी चर्चा झाली. त्या चर्चेचे फलीत असे निघाले की पूर्वीही एका स्त्रीला एकाहून अधिक नवरे असल्याचे दाखले आहेत. द्रौपदीही "श्री"चा पुनर्जन्म असून ती पूर्वजन्मी पाच इंद्रांची पत्नी होती. (ती गोष्ट विस्तारभयास्तव येथे देत नाही) तिचा जन्म एका विशिष्ट हेतूने झाल्याने तिला पाचांची पत्नी होऊ देणे धर्मबाह्य नाही. आणि या चर्चांचे फलीत धर्मानुसार द्रौपदीने पांडवांशी केलेल्या विवाहात झाले.

असो. आता माझी टिप्पणीः


  • भिक्षा म्हणजे भिकार्‍याला दिलेली भीक नाही.
  • कुंतीने एक दोन मिनिटांत निर्णय घेतला नाही किंबहुना, निर्णय कुंतीचा नाही हे सहज समजते.
  • युधिष्ठिराने लंपटपणे द्रौपदी मिळावी म्हणून प्रयत्न केले किंवा भावाभावांतील एकी राहावी म्हणून प्रयत्न केले हे मानणे ज्याच्या त्याच्या समजूतीवर अवलंबून आहे. मला दोन्हींशी वावडे नाही.



राजकारणाचा विचार केला असता पांडवांची स्थिती त्यावेळी फार वाईट होती. त्यांना योग्य आश्रयदाता हवा होता आणि तो द्रुपदापेक्षा उत्तम मिळाला नसता. द्रुपदाचे आश्रित होण्यासाठी आणि त्याची कृपा आपल्यावर राहण्यासाठी द्रौपदीला जिंकणे आवश्यक होते. ते न होता, भावाभावांतच कलह उत्पन्न झाले तर गेलेले राज्य मिळणे कठिण होते आणि विनाश निश्चित होता. आईची आज्ञा न मानणे, मोठ्या भावाच्या आधी धाकट्या भावाने लग्न करणे, शब्द खोटा पाडणे इ. गोष्टीही धर्मबाह्यच ठरल्या असत्या. म्हणजेच, इथून नाहीतर तिथून पांडवांचाच दोष मानला गेला असता. द्रुपदालाही द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी प्रबळ मित्रांची आणि सहकार्‍यांची गरज होती. धर्मबाह्य वाटले तरी त्याने मान तुकवली असतीच. व्यासांनी तेथे येऊन धर्मचर्चा करून पांडव कोणतेही पाप करत नसल्याचा निर्वाळा दिला आणि द्रौपदीचा विवाह पाचांशी झाला.

द्रौपदी या प्रसंगात काहीच का बोलली नाही याचे एक कारण द्रौपदीला आपला जन्म कशासाठी झाला आहे याची कल्पना होती. श्रीकृष्णाच्या भेटीने हे ब्राह्मण पांडवच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. वडिलांच्या अपमानाचा बदला आणि त्यासाठीच आपला जन्म आहे आणि पांडवांशिवाय हे कार्य कोणीच करू शकत नाही हे माहित असल्याने तिने गप्प राहणे पसंत केले.

किंवा, दुसर कारण जे महाभारताबाहेरील असावे - बाईने पतिविरुद्ध बोलले की संस्कृतीचा ऱ्हास होतो अशी समजूत असल्याने कदाचित ते संवाद मूळ महाभारतात झालेल्या बदलांमध्ये काढून टाकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूर्याचा पुत्र म्हणून तेजस्वी कर्ण आणि यज्ञज्वालेतून बाहेर आलेले धृष्टद्युम्न आणि द्रौपदी दोघेही उर्मट असल्याचे दाखले महाभारतात दिसतात. तेव्हा या सर्व प्रसंगात द्रौपदीने आपली नाराजी दाखवली नसेल असे वाटत नाही. कदाचित, तिने ती आपल्या पित्याकडे व्यक्त केली असेल किंवा भावाकडे कारण त्या दोघांच्या संवादांत चिंता, काळजी, पापाची भीती दिसून येते.

संदर्भः द महाभारता ऑफ कृष्णद्वैपायन व्यास - के. एम. गांगुली (पाने २४७ ते २५६)