Thursday, May 04, 2006

विखुरलेले मोती

काहीतरी वाचताना भा. रा. तांब्याच्या प्रसिद्ध कवितेच्या ओळी नेहमीच आठवून जातात --
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील, होईल का काही अंतराय?

जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहिल कार्य काय?

काळाच्या ओघात अनेक मौल्यवान रत्ने कुठेतरी हरवून गेली आहेत. तांब्यांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे त्यांची आठवण होणे सुद्धा अभावानेच आहे. कधी त्या रत्नांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून तर कधी समाजाला त्यांची फारशी गरज वाटली नाही. युद्धात वीरमरण पत्करणारा प्रत्येक योद्धा, राज्याश्रय न मिळालेले अनेक विद्वान, प्रासादाच्या पायाशी रचलेला दगड यांची गणती ठेवायची तरी कशी? या रत्नांबद्दल कधी कुठेतरी काही वाचायला मिळाल की मला उगीचच खंत वाटत रहाते.

या रत्नांबद्दलची माहिती संकलीत करुन ठेवावी अस बऱ्याच वर्षांपासून मनात आहे. त्यांची मी कशी पारख केली, मला ती किती आणि का भावली, त्यांचा हार कसा गुंफत जायचा ते या नवीन ब्लॉग द्वारे माझ्या शब्दांत मांडायच ठरवल आहे. यातली काही रत्न ऐतिहासिक आहेत तर काही पौराणिक, काही खरी तर काही रचवलेली, काही अस्सल भारतीय तर काहींचा दूरान्वये भारताशी संबंध नाही. बाकी त्यांच्याविषयीची माहिती मला जपून ठेवण्याची फार इच्छा आहे. "मनात आलं.."ची सुरुवात देवापासून केली होती. या ब्लॉगची सुरुवात "आई"ने करावीशी वाटते.

चांगली मुलं घडायला चांगले पालक कारणीभूत असतात. माझ्या सुदैवाने मला ते लाभले आणि मला वाटत की तुम्हालाही लाभले असतीलच. त्यातूनही, आई जर खंबीर, धोरणी, कर्तबगार आणि द्रष्टी असेल तर तिच्या पोटी नक्कीच "शिवाजी" जन्माला येतात. या ब्लॉगची सुरुवात करण्यासाठी जिजाबाईंपेक्षा अधिक महत्वपूर्ण व्यक्ति कोण मिळणार?

आपल्या मराठीत म्हण आहे, "स्वामी तिन्ही जगाचा आईविणा भिकारी." शिवाजी महाराज खरोखर भाग्यवान म्हणायला पाहिजेत कारण त्यांना आयुष्यात बराच काळ आपल्या कर्तबगार आईची साथ लाभली.

जिजाबाई हा कालौघात हरवलेला मोती नाही पण मला वाटत की या मोत्याला हवे तसे कोंदण लाभलेले नाही. विशेषत: माहितीच्या या महाजालावर त्यांच्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे.

४०० वर्षांपूर्वीच्या या स्त्रीचा द्रष्टेपणा आणि दूरदृष्टी ही खचितच वाखाणण्याजोगी आहे. जिजाबाईंचा माहेरचा आधार तुटलेला होता, पतीप्रेमही फारसे त्यांच्या वाटयाला नव्हते. पतीचा दुसरा घरोबा, मोठा मुलगा दुरावलेला, पुण्यासारखी उजाड जहागीर नशीबी आलेली. अशा परिस्थितीतही ज्याच्यावर आपल्या सर्व आशा केंद्रीत आहेत त्या मुलाचे, स्वराज्याचे दुर्गम स्वप्न साकार व्हावे यासाठी अखंड त्याच्या पाठीशी उभं राहून त्याच्या या कार्यात सहभागी होणारी आई इतिहासात विरळाच.

काही दिवसांपूर्वी विकिपिडियाच्या मराठी ज्ञानकोशाच्या आवृत्तीवर काहीतरी शोधताना एक टीपण्णी वाचली की तेथील लेखांची संख्या केवळ साडे ३००० आहे. सहज म्हणून शिवाजी महाराजांविषयि माहिती शोधली तर बऱ्यापैकी लेख होता पण जिजाबाई, शहाजीराजे आणि इतर अनेक संलग्न व्यक्तींविषयी काहीच माहिती नव्हती. होत्या फक्त माहितीअभावी असलेल्या लाल खुणा. पाहून मनाला बरं नाही वाटलं. आपल्यामधे उत्कृष्ट मराठी लिहिणारे अनेकजण आहेत. त्यापैकी काही जणांनी तरी आपल्याकडिल माहिती या ज्ञानकोशात घातली तर तेथील उपयुक्त लेखांची संख्या वाढेल.

मी इतिहास विषयाची तज्ञ मुळीच नाही, तरीही मला जिजाबाईंविषयी ज्ञात असलेली ऐतिहासिक माहिती मी तिथे भरली. आपल्याला या पेक्षा जास्त माहिती असल्यास जरुर फेरफार करा. एके ठिकाणी जिजाबाईंविषयी बऱ्यापैकी माहिती मिळून गेली, पण त्यात आख्यायिका अधिक वाटतात. दोन्ही लिंक पुढे दिल्या आहेत.
या पुढील लेखही अशाच एका आईबद्दल लिहिण्याचा विचार आहे. ही आई भारतातील नाही पण तिचा अद्वितीय पराक्रमी पुत्र भारताशी जोडलेला आहे. जिजाबाईंसारखीच तीही दूरदर्शी आणि धोरणी होती. पण इतिहासकारांनी तिच्या कर्तुत्वाला काळी झालर जोडली आहे.

7 comments:

SankalpW said...

आज बर्याच दिवसांनी एक चांगला लेख वाचायला मिळाला. तशा भारतिय लोकांनी बर्याच चुका करुन ठेवल्या आहेत. पण त्यातली एक महत्त्वाची चुक ही, की भारतिय लोकांनी आपल्या इतिहासाची नोंद कधीच व्यवस्थित ठेवलेली नाही. ह्याचाच फ़ायदा घेवून ईंग्रजांनी व मुघलांनी स्वत:च्या द्रुष्टिकोनातुन लिहिलेला इतिहास आपल्या बोडक्यावर लादला. त्यामुळे आपल्या इतिहासातील बर्याचशा व्यक्तिमत्वांना हवा तो आणि हवा तसा न्याय मिळालेला नाही. ह्या पार्श्वभुमीवर तु हाती घेतलेला हा उपक्रम नक्किच स्तुत्य आहे. तुझ्या पुढच्या ब्लोग ची मी आतुरतेने वाट पहातो आहे. आशा करतो की आपल्या इतिहासातले असे बरेचसे हरवलेले मोती तुझ्या प्रयत्नांनी उजेडात येतील.

शैलेश श. खांडेकर said...

प्रियभाषीणी,

आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि उचीत आहे! सुरूवात छानच झालीय. पुढील लेखांबद्दल उत्सुकता आणि शुभेच्छा आहेतच.

Priyabhashini said...

संकल्प आणि शैलेश आभार. जे जे चांगलं आहे ते ते माझ्या भाषेत यावे आणि रहावे.

मेघदूताबद्दल ही हेच म्हणीन.

बघू पुढे कसं जमतय ते.

Tatyaa Abhyankar said...

Priyaali,
chhan lihile aahe.

Tatyaa Abhyankar.

जजरवनकळख said...

very nice
the words r few but ur work is really nice
keep it up we r waitnig for ur next blog

जजरवनकळख said...

i have written in english for that please forgive me but i dont know how to write in marathi,but i m a true marathi and marathi lover

Priyabhashini said...

Tatya and Tushar thanks a lot for your valuable comments.