Thursday, October 26, 2006

जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर

इ. स. १८६० साली एक फ्रेंच संशोधक (Henri Mahout) कंबोडियाच्या मध्यभागी असणार्‍या टोन्ले सॅप सरोवराच्या जवळपास जंगलात पदभ्रमण करत असता त्याला एका भव्य अशा प्राचीन वास्तूचे भग्नावशेष दिसले. त्याबद्दल त्याने जे लिहिले त्यातील काही विशेष वाक्यांचा स्वैरानुवाद येथे देत आहे...


"...ही वास्तू उभारताना लागलेले अपार कष्ट आणि कारागिरी पाहिली की मन कौतुकाने उचंबळून येते आणि एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही... या भव्य वास्तूची निर्मिती करणार्‍या त्या महान आणि शक्तिमान संस्कृतीचे पुढे झाले तरी काय?..."


arial veiw


हे वर्णन कंबोडियातील प्राचीन हिंदू मंदिर 'एंगकोर वट'चे आहे. अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकलांचा नमुना म्हणून ओळखले जाणारे एंगकोर वट हे मध्ययुगात 'व्रह विष्णुलोक' (गृह विष्णुलोक?) म्हणून ओळखले जाई.


Angkor Wat


इतिहास:


कंबोडियाच्या मध्यभागी असणाऱ्या एंगकोर या प्राचीन ख्मेर राजधानीच्या भग्नावशेषांत एंगकोर वटचे मंदिर आजही उठून दिसते. संस्कृत "नगर" या शब्दाचे अपभ्रष्ट ख्मेर रूप "नोकोर"वरून नंतर "एंगकोर"ची व्युत्पत्ती झाली व "वाटिका" या शब्दापासून "वट" या शब्दाची निर्मिती झाली असा इतिहास वाचण्यास मिळतो. हिंदू व बौद्ध स्थापत्यशास्त्रांचा उपयोग करून बांधलेले एंगकोर वट हे भगवान विष्णूंचे जगातील सर्वात मोठे मंदिर समजले जाते. या मंदिराची निर्मिती भारतीय खगोलशास्त्राचे नियम वापरून करण्यात आली आहे असे सांगितले जाते.


ख्मेर राज्यकर्ता यशोवर्मन पहिला याने सुमारे इ. स. ८८९च्या काळात टोन्ले सॅप सरोवराच्या उत्तरेला यशोधरापुर नावाची आपली राजधानी स्थापन केली. या नगराच्या सभोवती त्याने खंदक खोदून नगराला सुरक्षित बनवले. कालांतराने या शहरालाच एंगकोर म्हटले जाऊ लागले. यशोवर्मननंतरच्या सर्व राजांनी आपापल्या परीने या नगरात बांधकाम करून त्याची शोभा वाढवली. एंगकोर वटची स्थापना सूर्यवर्मन दुसरा (राज्यकाळ: इ. स. १११३- ११४५) याच्या काळात सुरू झाली. सूर्यवर्मनचा राज्यकाळ तसा धामधुमीचा गेला, तरीही सुमारे ३७ वर्षे हे बांधकाम अखंडित चालले. राजा सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतर हे काम सततच्या युद्धांमुळे व आक्रमणांमुळे थांबून राहिले. पुढे जयवर्मन सातवा (राज्यकाळ: इ. स. ११८१- १२१९) याच्या काळात बांधकाम पुन्हा रुजू करण्यात आले. परंतु या वेळेपर्यंत कंबोडियात थेरवाद बौद्धधर्माचा प्रसार झाल्याने बांधकामात बौद्ध स्थापत्यशास्त्राचा प्रभाव आढळतो.


मंदिराचे बांधकाम:


एंगकोर वटचे मंदिर सर्व बाजूंनी पाण्याच्या खंदकांनी वेढलेले असल्याने कालांतराने या भागांत चहूबाजूंनी जंगल वाढले तरीही ते फारशी पडझड न होता सुरक्षित राहिले. संपूर्ण जगात स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना म्हणून गणल्या गेलेल्या या मंदिराच्या बांधकामात हिंदू आणि बौद्ध शिल्पकलांचा सुरेख संगम झाला आहे.


Angkor Wat model


हे मंदिर पश्चिमाभिमुख असून त्यातील मुख्य देवालय हिंदू पुराणातील मेरू पर्वताची प्रतिकृती मानले जाते. या स्थानाची लांबीरुंदी १५०० मीटर x १३०० मीटर असून ते जमीनीच्या तीन स्तरांवर (वेगवेगळ्या उंचीच्या तीन प्रांगणांत) बांधलेले आहे. मुख्य मंदिराच्या सभोवती पाच गोपुरांच्या शिल्पकलेने सुशोभित अशा सुरेख भिंती आहेत. या भिंती मेरूपर्वताला घातलेल्या वासुकीच्या विळख्याचे प्रतीक समजल्या जातात. गोपुरांच्या बुरुजांवर ब्रह्मदेवाचे मुख कोरलेले असून पायाजवळ कोरलेले त्रिमुखी हत्ती प्रत्येक सोंडेत कमलपुष्प धरून प्रवेशद्वारांची शोभा वाढवतात. मुख्य देवळापासून चौथ्या भिंतीसभोवती खणलेल्या खंदकाला क्षीरसागराचे प्रतीक समजतात. मंदिराची सर्वात बाहेरील भिंत ४.५ मीटर उंचीची असून पश्चिम दिशेकडून तिच्या पुढयातील सुमारे २०० मीटर लांबीच्या खंदकाला सुमारे ३५० मीटर लांबीच्या आणि १२ मीटर रुंदीच्या काजवाटेने (causeway) जमिनीशी जोडलेले आहे. पूर्वेकडूनही अशीच कच्ची काजवाट असून ती पूर्वी बांधकामाचे दगड वाहून नेण्यास व इतर वाहतुकीसाठी वापरली जात असावी.


हे संपूर्ण मंदिर वालुकाश्माच्या (sandstone) प्रस्तरापासून बनवले असून हे पत्थर अनेक मैल दूर असलेल्या खाणीतून कोरून मंदिराच्या जागी आणल्याचा पुरावा मिळतो. मंदिराचे बांधकाम व कलाकुसर पाहून हजारो गुलामांची, विशारदांची व कारागिरांची फौज या कामी लागली असावी असा अंदाज बांधता येतो.


मंदिराच्या भिंतींवर व गोपुरांवर अनेक देवतांच्या व अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या गोपुरांना "हत्ती दरवाजे" असेही म्हटले जाते कारण हे दरवाजे हत्तींची सहज ये-जा होण्याइतपत मोठे आहेत. ही गोपुरे ओलांडून आतील प्रांगणात आले असता सर्वप्रथम मुख्य मार्गाच्या उभय बाजूस दोन लहान इमारती आढळतात. त्यांना ग्रंथालये असे म्हटले जाते. यांचा उपयोग नक्की कशासाठी होत असावा याबद्दल शंका असली तरी पुरोहितवर्गाने एकत्र बसून पठण करण्याचे ते स्थान असावे असे समजले जाते. या ग्रंथालयांच्या भिंतीवर प्राचीन ख्मेर भाषेत कोरलेले शिलालेख आढळून येतात. यांत रामायण महाभारतातील संस्कृत श्लोक उद्धृत केलेले आहेत.


Gopure


हे मंदिर पश्चिमाभिमुख असण्याचे एक कारण असे सांगितले जाते की राजा सूर्यवर्मन याने आपले मृत्यूपश्चात आपले स्मारक राहावे या हेतूने मंदिराची स्थापना केली. या कारणास्तव या मंदिराला 'पिरॅमिड टेंपल' असेही संबोधले जाते. तसेच वैकुंठाला जाणारा मार्ग पश्चिमेकडे आहे असे मानल्याने या देवळाचे प्रमुख प्रवेशद्वार हे इतर हिंदू देवळांप्रमाणे पूर्वेला नसून पश्चिमेला बांधलेले आहे. काही तज्ज्ञांचा या संकल्पनेस विरोध आहे कारण अशी मंदिरे बांधण्याची प्रथा हिंदू धर्मात इतरत्र दिसून येत नाही तर भारतात काही मंदिरे पश्चिमाभिमुख आढळतात.


King Suryavaraman's procession


या स्थानाच्या तिसर्‍या आणि सर्वात उंचावरील प्रांगणात पाच मुख्य मंदिरे आहेत. त्यातील मध्यावरील प्रमुख मंदिरात पोहोचण्यासाठी तीन आयताकृती सज्जे पार करावे लागतात. प्रत्येक सज्जाच्या भिंतींवर व खांबांवर सुरेख कोरीव नक्षीकाम (bas-relief) केलेले आहे. सर्वात बाहेरील सज्जावर रामायण व महाभारतातल्या अनेक प्रसंग कोरलेले आहेत. यांत राम-रावण यांच्यातील युद्ध तसेच कौरव-पांडव युद्ध यांचा समावेश आहे. दक्षिणेकडील सज्जावर राजा सूर्यवर्मनची मिरवणूक जाताना कोरली आहे तर पूर्वेकडील सज्जावर देव व असुर यांच्यातील मेरूपर्वताच्या साहाय्याने क्षीरसागर घुसळण्याच्या समुद्रमंथनाचा प्रसंग कोरलेला आहे. याखेरीज भगवान विष्णूंनी केलेला असुरांचा पराभव, श्रीकृष्णाने केलेला बाणासुराचा वध अशी अनेक रेखीव शिल्पे कोरलेली आहेत. बौद्धकाळात निर्मिलेल्या एका सज्जात भगवान बुद्धांच्या अनेक मूर्तीही आढळतात.


gallery


या भिंती ओलांडून आत आले की पायऱ्या चढून मुख्य मंदिराकडे जाता येते. येथे पुन्हा एकदा मार्गाच्या उभय बाजूंस ग्रंथालये आढळतात. त्यानंतर पाच मुख्य देवळांचा समूह (quincunx – 'फाशावरील पाचाचा आकडा') दिसतो. कोणत्याही मंगलस्थानी चार दिशांना चार स्तंभ किंवा इमारती उभ्या करून चतु:सीमा निश्चित करणे व मध्यभागी असणाऱ्या वास्तूला/ इमारतीला संरक्षण देणे किंवा तिचे महत्त्व वाढवणे ही वैदिक परंपरा आहे. (उदा. सत्यनारायणाच्या पूजेतील चार खांब व मध्यभागी कलश) या मंदिरांची बांधणीही त्यानुसारच झाल्याचे दिसते. या पाचही मंदिरांतील मध्यावरील मंदिराचा कळस सर्वात उंच असून ते मेरूपर्वताचे प्रतीक समजले जाते. सर्व मंदिरांच्या भिंतींवर अतिशय नाजूक कोरीव काम केलेले आहे. या भिंतींवर प्रामुख्याने देवदेवतांच्या सुबक प्रतिमा कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिरात पूर्वी भगवान विष्णूंची मूर्ती होती, परंतु बौद्धधर्म स्वीकारल्यावर ती मूर्ती बदलून त्या स्थानी आता बुद्धाच्या मूर्ती आढळतात.


एंगकोर शहरांत एंगकोर वट शिवाय तत्कालीन ख्मेर राजांनी बांधलेली अनेक रेखीव मंदिरे आहेत. राजा हा देवाचा अंश असल्याने देवाची सेवा, प्रार्थना व कर्मकांड याला या समाजात फार महत्त्व असल्याचे दिसते. यांतून देवाशी, राजाशी आणि त्यायोगे राज्याशी एकरूपता व एकसंधता साधण्यास फार मोठी मदत झाली असावी असे वाटते. ख्मेर घराण्याच्या शेकडो वर्षे चाललेल्या राज्यकारभाराला या मंदिरांनी फार मोठा हातभार लावला असावा.


हे मंदिर पुनश्च उभारताना जयवर्मन सातवा याचे शब्द मंदिरातील एका शिलालेखावर आढळतात, "माझ्या या चांगल्या कार्याचा उपयोग, जीवनाच्या भवसागरात तरून जाण्याची धडपड करणाऱ्या जनसमुदायाला प्रसादाप्रमाणे होवो आणि त्यांना मोक्ष प्राप्त होवो."


****


संदर्भसूची:
सर्व चित्रे विकिपीडिया व हिंदूविस्डम.इन्फो यांच्या सौजन्याने घेतली असून त्यावर टिचकी मारली असता ती मोठ्या आकारांत पाहता येतील.


4 comments:

Anonymous said...

superb! I would love to go thru' the photo-essay you would be presenting in future too!

Vishal K said...

नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.

Priyabhashini said...

Thanks a lot Hemant and Vishal for your encouraging comments.

Unknown said...

Awesome!! Much helpful... :-)
https://mazespandan.wordpress.com/