Monday, April 20, 2009

जपून! ते लक्ष ठेवून आहेत

Seeing this obscene thing is a shock; what is worse is seeing people passing to and fro beneath it, intent on either plotting their day's business or planning their evening's pleasure; they pass to and fro and do not look up.

None of them look up.

I hear him say it again: We don't see them... but they see us.

- Stephen King
Nightmares in the sky


सुप्रसिद्ध भयकथा लेखक स्टीफन किंग यालाही अंगावर शहारे आणणारे असे काही अस्तित्वात आहे ही कल्पनाच मोठी रोचक आहे. वर उद्धृत केलेली वाक्ये स्टीफन किंगच्या एखाद्या प्रसिद्ध कादंबरीतील नसून एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पकलेवरील चित्रांच्या पुस्तकासाठी किंग यांनी केलेले हे भाष्य आहे. मध्ययुगात प्रामुख्याने प्रसिद्ध झालेल्या परंतु पुरातन काळापासून सर्व संस्कृतीत चालत आलेल्या या शिल्पकलेला ढोबळमानाने गर्गॉयल्स , ग्रोटेस्क अशा नावांनी संबोधले जाते.


गरगॉयल म्हणजे काय?

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर गरगॉयल म्हणजे इमारतींवरील पाणी वाहून नेणारी आणि त्याचा निचरा करणारी नळकांडी. याला इंग्रजीत "गटर" असा शब्द आहे. ही प्रामुख्याने इमारतींच्या माथ्यावर स्थित असून नळकांड्याच्या तोटीला एखादा भयप्रद चेहरा किंवा अर्धपशूमानवी आकृतीचे शिल्प असते. यांचा मुख्य उपयोग इमारतीच्या भिंती आणि वास्तुचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करून हे पाणी इमारतीपासून थोड्या दूर अंतरावर फेकणे हा असतो. आपल्याकडेही थोडेफार यासाठीच परंतु वेगळ्या वापरासाठी देवळांमध्ये गोमुखे दिसतात.

चित्र १: पाणी ओकणारे गरगॉयल


गरगॉयल या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे "गार्गल" या शब्दावरून. घशातून गुळण्यांसारखे आवाज करत पाणी ओकणार्‍या या शिल्पांना गरगॉयल हा ध्वन्यानुसारी शब्द अगदी चपखल बसतो. अशाचप्रकारे, इमारतींवर स्थित चमत्कृतीपूर्ण परंतु पाण्याचा निचरा न करणार्‍या शिल्पांना ग्रोटेस्क, दोन किंवा अधिक प्राण्यांच्या संकराने तयार होणारे "कायमेरा" अशा अनेक प्रकारांनी संबोधले जाते. ही शिल्पे इमारतींचे कळस, प्रवेशद्वारे, खांब, कमानी यांवर स्थित दिसतात. कायमेरा, ग्रोटेस्क आणि गरगॉयल्स यांच्यात मूलभूत फरक असला तरी प्रामुख्याने ही शिल्पे गरगॉयल्स या नावाने अनेक माध्यमांतून प्रसिद्ध असल्याने लेखाच्या सुटसुटीतपणासाठी गरगॉयल असाच शब्द यापुढे वापरला आहे.

गरगॉयल, ग्रोटेस्क आणि याप्रकारची शिल्पे अस्तित्वात कशी आली असावीत याचा विचार करता अनेक संस्कृतींमध्ये समान आढळणारी आणि प्राचीन काळापासून चालत आलेली काही उदाहरणे येथे देता येतील.

माणसाला अनादी काळापासून त्याच्या आसपास वावरणारे प्राणी आणि त्यांच्या वर्तणूकीविषयी कमालीचे कुतूहल वाटत आले आहे. वाघाचे शौर्य, घारीची नजर, गरुडाची झेप, कोल्ह्याचे चातुर्य, लांडग्याचा लबाडपणा, सशाचे भित्रेपण यासर्वांमधून मानवी स्वभावाचे विशेष प्राण्यांना चिकटवलेले आढळतील आणि प्राण्यांचे विशेष मानवी स्वभावात उतरतात हे दर्शवलेले आढळेल. पक्ष्यांची आभाळातील भरारी पाहून माणसालाही आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पडले असावे ही गोष्ट जितकी सत्य आहे त्याचबरोबर, मनुष्य आणि प्राणी यांच्या संकराने चमत्कृतीपूर्ण अशी अर्धपशूमानवी व्यक्ती आणि शक्ती निर्माण करण्याचा मानवाचा मानसही पुरातन काळापासून स्पष्ट आहे.

काही पुरातन संस्कृतींचा विचार करता, ग्रीक संस्कृतीतील मिनोटॉर हा राक्षस, सापांचे केस डोक्यावर बाळगणारी मेड्युसा, भारतीय संस्कृतीतील हत्तीचे डोके चिकटवलेला गणपती, बोकडाचे डोके लावलेला दक्षराज, घोड्यांची तोंडे असणारे गंधर्व, शंकराचा नंदी, इजिप्शीयन संस्कृतीमधील कोल्ह्याचे तोंड चिकटवलेला मृत्युदेव अनुबीस, पक्ष्याचे डोके असणारा थॉथ आणि परिकथांतून समोर येणार्‍या मत्स्यकन्या, घोड्याचे धड असणारे धनुर्धर सेंटॉर, पंखधारी पर्‍या वगैरे या अर्धपशूमानवी गटात मोडतील. अगदी अर्वाचीन काळातही वटवाघळांसारखे पंख लावून फिरणारा बॅटमॅन, मनगटातून कोळ्याची जाळी काढणारा स्पायडरमॅन हे साय-फाय नायकही प्राण्यांचे गुणधर्म मानवी जीवनात अंतर्भूत करताना दिसतात आणि याच पार्श्वभूमीवर कुठेतरी चमत्कृतीपूर्ण गरगॉयल्सचीही भेट घडते. इमारतींच्या कळसांवरून तुमच्याकडे ते सतत पाहात असतात. नजर ठेवून असतात, तुमच्या लक्षात ते येवो किंवा न येवो.

चित्र २: पॅरिसमधील सुप्रसिद्ध नोत्र दाम चर्चवरील ग्रोटेस्क


एखाद्या जुन्या गॉथिक किंवा रोमन बांधणीच्या इमारतींवर भयप्रद किंवा हिंस्त्र चेहरे, अर्धपशूमानवी मुखवटे आणि शरीरे, आक्रमक आविर्भावातील पशू यांची शिल्पे तुमच्या पाहण्यात आली असावीत. युरोपमधील ऐतिहासिक इमारती, चर्चेस, न्यूयॉर्क, बॉस्टन, फिलाडेल्फिया, मुंबई अशा अनेक ठिकाणी अशी शिल्पे तुमच्या नजरेस पडतील. पडली नसतील, तर पाहून घ्या, आढळतील हे निश्चित. आकाशातून उंचावरून आपल्याकडे अशा हिडीस आकृत्या पाहात आहेत ही कल्पना मनाला हुरहुर लावणारी नक्कीच ठरावी. हॅलोवीनच्या सुमारास बाजारातही गरगॉयल्सच्या चमत्कारिक प्रतिकृती विकायला ठेवलेल्या आढळतील.

पशूंच्या आणि अर्धपशूमानवांच्या चमत्कृतीपूर्ण शिल्पांबरोबरच संपूर्ण मानवी परंतु हिडीस आणि भयप्रद स्वरूपातील गरगॉयल्सही अनेकदा इमारतींवर पाहण्यास मिळतात. एखाद्या रोमन किंवा गॉथिक बांधणीच्या इमारतींच्या कमानींवरील किंवा प्रवेशद्वारांवरील की-स्टोन्सवर असे हिडीस चेहरे सहज दृष्टीस पडतील. अशा भयप्रद चेहर्‍यांमुळे अनेकांना हे गरगॉयल्स एखाद्या सैतानी करणीचे, दुष्ट प्रवृत्तींचे प्रतिनिधी वाटतात आणि गरगॉयल्सच्या गूढपणात भर पडते. काहीजणांच्या मते वास्तुकडे सैतानी प्रवृत्तींची नजर पडू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी ही शिल्पे कोरलेली असतात तर काहींच्या मते शत्रूची मुंडकी प्रवेशद्वारांवर लावून विजय साजरा केला जातो. या ठिकाणी शौर्यवान विजेता राहतो असे सांगण्याची ही पद्धत असावी, इमारतीच्या मालकांचा किंवा त्यांच्या विजयांचा संबंध या शिरांशी जोडता येतो असे काहींना वाटते. भारतातही शत्रूचे शीर तोडून ते वेशीवर, किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जनतेला दिसावे असे ठेवले जाण्याची प्रथा होती तसेच काहीसे. काही तज्ज्ञांच्या मते हल्लीच्या काळात जसे एखाद्या चेहर्‍याचे व्यंगचित्र करण्याची पद्धत आहे त्याप्रमाणेच मध्ययुगात एखादा चेहरा अशा स्वरूपात लावण्याची पद्धत असावी. त्यात भयरसाची निर्मिती नसून केवळ विनोदनिर्मितीसाठी ही शिल्पे कोरली जात असावीत. कारणे काहीही असली तरी ही शिल्पे पाहून अंगावर शहारा आल्यास किंवा भीतीची भावना मनाला चाटून गेल्यास नवल नाही.

चित्र ३: हॅलोवीनच्या सुमारास अशी गरगॉयल्स बाजारात विकायला ठेवलेली आढळतात.



गरगॉयल्सची शिल्पकला मध्ययुगात प्रसिद्ध झाली असली तरी प्राचीन काळीही अशाप्रकारच्या शिल्पांचा आणि चित्रांचा वापर होत असे हे जाणवते. पुरातन इजिप्शियन स्थापत्त्यशास्त्रातील स्फिन्क्स, ग्रीक मडक्यांवर आढळणारे अर्धपशूमानव या सारख्या शिल्प आणि चित्रांना सुमारे ३-४ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. इजिप्शियन स्फिन्क्सला ग्रीकांनी आपली पौराणिक कथा जोडून भयनिर्मितीचा प्रयत्न केलेला आहे असे सांगितले जाते. एक आद्य गरगॉयल म्हणून याकडे पाहता यावे. याचप्रमाणे जुन्या काळातील उत्कृष्ट गरगॉयल कोणते यावर अनेक तज्ज्ञांचे एकमत होते ते म्हणजे अथीनाच्या ढालीवर असणारे मेड्युसाचे शीर. ग्रीक पुराणांत मेड्युसा या राक्षसीला गॉर्गॉन असे म्हटले गेले आहे.
चित्र ४: पार्थेनॉनची प्रतिकृती असलेल्या नॅशविलमधील अथीनाची ढाल येथे पाहता येईल.
गॉरगॉन या शब्दाचा अर्थ "घशांतून मोठ्याने आवाज काढणारे (डरकाळ्या फोडणारे) " असा होतो. प्राचीन ग्रीक संस्कृतीत दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी अशा शिरांचा वापर केला जाई. कपडे, चिलखते, ढाली, घरे, भिंती वगैरेंवर गॉरगॉनचे शीर रंगवलेले किंवा कोरलेले आढळत असे. अलेक्झांडर द ग्रेटच्या चिलखतावरही मेड्युसाचे शीर विराजमान असल्याचे पॉम्पै येथील कलाकृतीवरून कळते.

येथे एक गंमतीदार गोष्ट आठवते ती म्हणजे मेड्युसा ही पूर्वी अतिशय रूपवान होती. तिच्यावर रागावलेल्या अथीनाने तिला शाप दिल्यावर मेड्युसा भयंकर दिसू लागली. तिचे लांबसडक केस विषारी सापांत बदलले. ती इतकी हिडीस दिसू लागली की तिला पाहून भीतीने थरथरणार्‍या मनुष्याचे रुपांतर दगडात होई, म्हणजेच भीतीने आक्रसून घेतलेल्या किंवा वेडावाकडा चेहरा झालेले एक नवे गरगॉयल अस्तित्वात येई.

पाश्चात्य जगतातून सरकून भारताकडे नजर टाकल्यास भारतीय स्थापत्यशास्त्राला हजारो वर्षांचा इतिहास आहे हे लक्षात येते. परकीय आक्रमणे, कलेवरील परकीय प्रभाव या सर्वातून भारतीय कला फुललेली आहे.

भारतातील गरगॉयल्स

मुंबईत असताना छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारती समोरून तुम्ही अनेकदा गेला असाल तर वरील गरगॉयल्स तुमच्या पाहण्यात आली असतील. असे नसल्यास, यानंतर कधी जाणे झाले तर या स्थापत्यशास्त्राच्या उत्कृष्ट नमुन्यासमोर काही काळ अवश्य रेंगाळा. सुबक आणि घाटीव गरगॉयल्स इमारतीच्या माथ्यावरून तुमच्याकडेच रोखून पाहात आहेत याची प्रचीती येईल. तेथून पुढे फोर्ट विभागातील जुन्या इमारतींकडेही बघा, तिथेही गरगॉयल्स सापडण्याची शक्यता आहेच. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजमहालावरही अशाच प्रकारचे गरगॉयल्स आहेत अशी बातमी नुकतीच एका मित्रांशी बोलताना कळली. अर्थातच, हे पाश्चात्य स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत. लक्ष्मी विलास राजवाडा हा संपूर्ण पाश्चात्य धर्तीचा नसला तरी त्यावर काही पाश्चात्य धाटणीचे सोपस्कार पार पडले असावेत असे वाटते. यामुळेच अस्सल भारतीय स्थापत्यशास्त्रातील गरगॉयल्स म्हणून यांची गणना करता येणार नाहीत.

भारतातही गरगॉयलसारखी शिल्पे कोरली जात का? या प्रश्नाचे उत्तर "होय" आहे. गोमुख हे सर्वार्थाने योग्य गरगॉयल मानले तरी गरगॉयल या शब्दाचा हेतू ज्याप्रमाणे बदलला आहे त्या सदृश भय उत्पन्न करणारी शिल्पेही भारतात आढळतात. भारतातील कोरीवकामाने मढवलेल्या कोणत्याही मंदिरांकडे पाहिले तर अशा गरगॉयल सदृश मूर्ती सहज दिसून येतील. या ठिकाणी चटकन आठवलेले दोन शिल्प प्रकार म्हणजे दक्षिण भारतातील मंदिरांत आढळणारे याली आणि भारतभर सर्वत्र सहज आढळणारे कीर्तिमुख यांची माहिती पुढे दिली आहे.

शरभेश्वर (सरभ/ याली)

पुराणांतून पुढील कथा सांगितली जाते ती अशी, हिरण्यकश्यपूचा नायनाट झाल्यावरही विष्णूने घेतलेल्या नरसिंहावताराचा राग शांत होईना. नरसिंहावताराच्या रागाचा त्रास संपूर्ण जगाला होऊ लागला तेव्हा त्याचा नि:पात करण्यासाठी शिवाने सिंह, गरूड आणि मानव यांच्या संकराने बनलेला शरभेश्वर अवतार धारण केला आणि नरसिंहाशी घनघोर युद्ध केले. काही काळाने नरसिंहाला शरभेश्वराचे खरे स्वरूप कळले आणि त्याचा राग शांत झाला आणि तो शरभेश्वराचा परमभक्त बनला. यापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारे, शरभ उपनिषदात शरभाने नरसिंहाला मारून टाकले असा उल्लेख येतो.
चित्र ५: मैसूर सँडल सोपचे बोधचिन्ह असणारा शरभेश्वर


दक्षिण भारतात मंदिरांच्या खांबावर सिंह, गरूड यांच्या संकराने बनलेला अर्धपशूमानव कोरण्याची प्रथा मध्यकाळापासून प्रसिद्ध आहे. याला "याली" असे म्हटले जाते. भारतात इतरत्रही हे याली, शरभेश्वर किंवा सरभ या नावाने प्रसिद्ध आहेत. मंदिरांचे संरक्षण करणार्‍या देवता म्हणून त्यांना खांबावर कोरले जाते. सिंह-गरूड आणि मानव यांच्या संकराने दर्शवलेले पर्शियन सम्राट दरायसचे (दर्युश) चित्र, बॅबिलॉनचे पंखधारी सिंह आणि सुप्रसिद्ध इजिप्शियन स्फिन्क्स हे सर्व शरभेश्वराविषयी लिहिताना नजरेआड करवत नाही.

दिवाळीच्या दिवसांत उटण्यासारखा साबण म्हणून ज्या मैसूर सँडल सोपचा वापर केला जातो त्याचे बोधचिन्ह शरभेश्वर आहे.

चित्र ६: मदुराईमधील मंदिराच्या खांबावर कोरलेला याली






कीर्तिमुख

मध्यंतरी बिल मॉयर्स या प्रसिद्ध अमेरिकन पत्रकाराने जोसेफ कॅम्पबेल यांच्या घेतलेल्या मुलाखतींचे संकलन वाचताना शिवपुराणातील एक गोष्ट आढळली. ती काहीशी अशी -

कोण्या एका बलाढ्य राक्षसाने देवांचा पराभव करून स्वर्गावर आपले राज्य स्थापन केले आणि तेथून तो तडक कैलासावर पोहोचला आणि विजयोन्मादाच्या भरात त्याने शिवाकडे पार्वतीची मागणी केली. संतप्त शिवाने आपले तिसरे नेत्र उघडले आणि त्यातून विजेचा लोळ बाहेर पडला. त्या लोळातून पहिल्या राक्षसापेक्षाही बलवान आणि भयंकर असा दुसरा राक्षस निर्माण झाला. सिंहाचे डोके, त्यावर लांबलचक जटाधारी केस, प्रचंड शरीर असणार्‍या या राक्षसाची निर्मिती शिवाने पहिल्या राक्षसाला खाऊन टाकण्यासाठी केली होती. या राक्षसाला पाहून पहिला राक्षस थरथरा कापू लागला आणि शिवाकडे क्षमायाचना करू लागला. भोळ्या शिवाला याचनेचा अव्हेर करता येईना आणि त्याने या पहिल्या राक्षसाला क्षमा केली.

आता दुसर्‍या राक्षसाने शिवाला विचारले, "माझी निर्मिती या पहिल्या राक्षसाला खाण्यासाठी तुम्ही केलीत. मी प्रचंड भुकेला आहे. आता मी कोणाला खाऊ?" शिवाने उत्तरात म्हटले, "असं कर. तू स्वतःलाच खा." शिवाची आज्ञा शिरसावंद्य मानून या राक्षसाने प्रथम आपले पाय खाण्यास सुरूवात केली. मग पोट खाल्ले. नंतर हात खाल्ले, छाती, मान खाल्ली आणि असे करता करता केवळ डोके शिल्लक राहिले. राक्षसाच्या या आज्ञाधारकतेवर प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला तेथेच थांबवले आणि वर दिला, तो असा, "यापुढे तुला जग कीर्तिमुख म्हणून ओळखेल. माझ्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुझी स्थापना होईल. तुझ्यासमोर वाकल्याखेरीज माझे दर्शन लोकांना होणार नाही, त्यांना पुण्य प्राप्त होणार नाही."

कीर्तिमुखांची कथा पद्मपुराणातही आढळते परंतु त्यात थोडाफार बदल दिसतो. तो काहीसा असा, कीर्तिमुख हा शंकराच्या जटेतून निघालेला एक शिवगण. याला तीन तोंडे, तीन पाय, तीन शेपट्या आणि सात हात होते. शंकराच्या आज्ञेवरून याने प्रेत खाऊन दाखवले. त्याचे साहस पाहून शंकराने वर दिला की, 'तुझे स्मरण केल्याशिवाय माझे दर्शन करणार्‍याचा अध:पात होईल.'
sangameshwar - dhruv"
चित्र ७: संगमेश्वर मंदिरातील कीर्तिमुख


शंकराच्या शिवगणाची ही गोष्ट खरी मानली तरी विष्णूमंदिरातदेखील ही कीर्तिमुखे सहज दिसून येतात. वेंकटेश्वर बालाजीच्या मूर्तीवरही हे कीर्तिमुख दिसते. महाराष्ट्रातील काही शिवमंदिरांतील कीर्तिमुखे उपक्रमावरील ध्रुव या प्रकाशचित्रकारांनी मला वापरण्यासाठी दिली होती ती येथे लावत आहे. भयंकर चेहर्‍यांच्या या राक्षसांचे देवाच्या मंदिरांत स्थान गॅरगॉयल (ग्रोटेस्क) सदृशच असावे हा कयास येथे मांडता येतो.

ध्रुवने दिलेले कीर्तिमुखांचे काही फोटो येथे लावत आहे. फोटो काढण्यादरम्यान ध्रुवने निरीक्षण केले त्यात महाराष्ट्रात कीर्तिमुखे केवळ प्रवेशद्वारे किंवा कमानींवर न दिसता गर्भगृहाकडे जाणार्‍या पायर्‍यांवर, विशेषतः सर्वात वरच्या पायरीवरही दिसून येतात. वाचक्नवींनी पुरवलेल्या माहितीनुसार प्राचीन संस्कृतीत सिंह हे सामर्थ्याचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे राजद्वारावर, राजाच्या आसनावर, मंदिरात गाभार्‍याच्या दरवाज्यावर, देवाच्या प्रभावळीत, उंबर्‍यावर अथवा शिखरापासी एक विक्राळ सिंहमुख(कीर्तिमुख) कोरलेले असते. अशी आकृती असलेले भवन सुरक्षित राहते अशी भावना असते. जैन आणि बौद्ध संस्कृतीतही अशाप्रकारे कीर्तिमुखे कोरण्याची प्रथा आहे.

चित्र ८: वाटेश्वर मंदिरातील एक ग्रोटेस्क



जगातील विविध संस्कृतींची तुलना करत गेल्यास त्यांच्यातील साम्यस्थळे आश्चर्यचकीत करतात. गरगॉयल्स, ग्रोटेस्क, कायमेरा, स्फिन्क्स, याली, कीर्तिमुखे ही एकमेकांशी सांस्कृतिक दुव्यांतून बांधली गेली असावीत का? या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणारा अभ्यासक "होय" असेच देईल. ड्रॅगनसदृश प्राणी किंवा भयंकर दिसणारे डायनॅसोर, काळाच्या ओघात नष्ट पावलेले काही प्रचंड आकारांचे जीव हे तर या गरगॉयल्समागील प्रेरणा नसावेत. विषयाचा आणि या शिल्पांचा आवाका बराच मोठा आहे. या लेखातून या विविध शिल्पांना केवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या शांत संध्याकाळी वेळ काढून या गरगॉयल्सकडे अवश्य नजर टाका, तेही तुमच्याकडे इमारतींच्या छतांवरून कुतूहलाने पाहतील याबाबत शंका नाही.

grotesque - dhruv चित्र ९: महाराष्ट्रातील एक ग्रोटेस्क





तळटीपा:

उपक्रमावरील टंकात ग्यर्गॉयल या उच्चारात शब्द लिहिणे कठिण वाटल्याने सुटसुटीत गरगॉयल या शब्दाचा वापर लेखात केला आहे.

ग्रोटेस्क या शब्दाचे मूळ ग्रोट्टो या शब्दात दडलेले आहे. अधिक माहिती येथे मिळेल.

संदर्भ, अधिक माहिती, पूरक वाचनः


  1. गरगॉयल्स

  2. नाईटमेअर्स इन द स्काय : स्टिफन किंग

  3. अबाऊट गरगॉयल्स

  4. शरभ उपनिषद

  5. कीर्तिमुख

  6. जोसेफ कॅम्पबेल अँड पावर ऑफ मिथ


  7. याखेरीज, विकिपिडीयावर अनेक संदर्भ वाचनास मिळतील.


आभारः

कीर्तिमुखांच्या चित्रांसाठी ध्रुवची आभारी आहे. संदर्भांसाठी चित्राची आभारी आहे. इतर अनेक सुचवण्यांसाठी धनंजय, वाचक्नवी, विसुनाना, तो, चित्तरंजन यांची आभारी आहे. ही सर्व मंडळी उपक्रम.ऑर्ग या संकेतस्थळाचे सदस्य आहेत.


चित्रे:


  1. चित्र १ आणि चित्र २ ही विकिपिडीयावरून घेतलेली असून चित्र ३ www.frightcatalog.com येथून घेतले आहे.

  2. चित्र क्र. ५ www.mysoresandal.co.in येथून घेतले आहे.

  3. चित्र क्र. ६ www.art-and-archaeology.com येथून घेतले आहे.

  4. ध्रुवची चित्रे त्याच्या परवानगीने लावली आहेत.

6 comments:

Unknown said...

अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा तो मूज़े मिला " क्विलपॅड " /
आप भि " क्विलपॅड " www.quillpad.in का इस्तीमाल करते हे क्या..?

priyadarshan said...

आज संध्याकाळी रस्तातुन फोर्ट ते बोरीबंदर चालताचालता जर का मला ठेच लागली असती तर त्याला आपण कारणीभुत असता.

एक अप्रतिम , माहितीपुर्ण लेख.

मी भोर जवळील अंबावडॆमधील एक शिवमंदिरात किर्तीमुखाचा एक चांगला फोटो काढला आहे.

कधीतरी आता सकाळी या विभागातल्या इमारती वरील "ते " पहाण्यासाठी एक फेरफेटका मारावा म्हणतो.

आपल्या ब्लॉगवर आपण कधी तरी लिहाल करुन मी बरेच महिने वाट बघत होतो.

HAREKRISHNAJI said...

I have posted Kirtimukh's photo on my blog. Should I send it to you ?

Priyadarshan

Gouri said...

हरेकृष्णजींच्या ब्लॉगवरच्या लिंकवरून इथे आले. फारच सुंदर माहिती.

साळसूद पाचोळा said...

मस्त लिहले आहे. गरगोईल्स कशासाठी असावित असा साधा विचारही आमचा मेदुत कधी क डोकावला नाही याचा विचार करतो आहे.... पन इथून पुढे प्रत्येक मंदिर, गड दरवाजे, वास्तू निरखून पाहनार आनी किर्तिमुखेहि निर्खून पाहनार

HAREKRISHNAJI said...

य लेखापासुन प्रेरणा घेत गेले अनेक दिवस मी मुंबई मधल्या इमारतींच्या वास्तुकलेचे सौदर्य न्याहाळात फिरतोय. असंख्य फोटो माझ्या ब्लॉगवर टाकले आहेत. प्लीज बघाल काय व काहीतरी प्रतिक्रिया द्याल का .