सिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल
श्री. चंद्रशेखर यांनी काही दिवसांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या र्हासामागचे कोडे या लेखातून मॉन्सूनच्या पावसातील झालेल्या फरकांमुळे सिंधू संस्कृतीतील शहरांतून नागरिकांचे स्थानांतर झाल्याचे गृहितक मांडले होते. सिंधू संस्कृतीचा र्हास कसा झाला या विषयी अधिक रोचक संदर्भ या पुढेही मिळत राहतील आणि अधिक संशोधने होत राहतील पण चंद्रशेखर यांचा लेख माझ्या लक्षात राहिल तो खालील वाक्याने -
मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या.हे एक वाक्य फारच रोचक वाटले. सिंधू संस्कृतीची लिपी ही खरेच लिपी आहे की नाही या विषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. याचे मुख्य कारण या लिपीचा अर्थ लावणे अद्याप शक्य झालेले नाही आणि लिपीचा अर्थ लावण्यासाठी ही लिपी मोठ्या प्रमाणात लिहिलेली आढळत नाही. या लिपीचा वापर करून लिहिलेली भूर्जपत्रे किंवा शिलालेख मिळालेले नाहीत. मुद्रांवर लिहिलेल्या त्रोटक लिपीतून अक्षर उकल होणे कठीण झाले आहे. सिंधू लिपीची वाढ शहरे नष्ट झाल्याने खुंटली. त्यानंतरच्या गंगा खोर्यातील संस्कृतींनी लेखनकलेवर लक्ष केंद्रित केले नाही. सिंधू लिपी नंतरची लिपी इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास आढळते. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या र्हासानंतर सुमारे ६००-८०० वर्षे भारतीय उपखंडात लेखनकला वापरली जात नव्हती असे म्हणावे लागते. हा दावा किती खरा आणि किती खोटा ते पुढे पाहू. स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वदूर पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.
सुमेरियन कीलाकारी |
थॉथ हा कला आणि विद्येचा इजिप्शियन देव. त्याला नवनवीन कला शोधण्याचा छंद होता. आपले संशोधन तो अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाला आणि संपूर्ण इजिप्तच्या राजाला नेऊन दाखवत असे आणि त्याची प्रशंसा प्राप्त करत असे.
असाच एकदा थॉथला लेखनकलेचा शोध लागला. आपले नूतन संशोधन घेऊन थॉथ अमुनकडे गेला आणि उत्साहाने त्याने आपले संशोधन अमुनला सांगण्यास सुरुवात केली, “हे राजा, मी एक नवीन कला शोधली आहे. जी एकदा शिकून घेतली की समस्त इजिप्तवासी शहाणे होतील, विद्वान होतील आणि त्यांची स्मृती द्विगुणित होईल. या कलेद्वारे मी बुद्धिमत्ता आणि स्मृती यांवर अचूक तोडगा शोधला आहे.”
यावर नेहमी थॉथची प्रशंसा करणार्या अमुनने काही वेगळेच उत्तर दिले, “हे थॉथ! एखाद्या कलेला जन्म देणारा हा ती कला फायद्याची आहे किंवा नाही हे उत्तमरीत्या ठरवू शकत नाही. ही पारख त्या कलेच्या वापरकर्त्यांनी करावी. आता, तू या लेखनकलेचा जनक असल्याने येथे तुझे पितृवत प्रेम बोलते आहे आणि ते सत्य परिणामांच्या विरुद्ध आहे. खरंतर, ही कला तिच्या अभ्यासकांना विस्मरणाचे दान देईल. जे ही कला शिकतील ते आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग करणे सोडून देतील कारण ते लेखनावर/ लिखाणावर आपली श्रद्धा कायम करतील. या चिन्हा-खुणांच्या बाह्यज्ञानामुळे माणसे आपल्या हृदयातून निर्माण होणार्या अंतर्ज्ञानाला विसरतील. आपापल्यापरीने वाचन केल्याने ते त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढतील. तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे. हे संशोधन ऐकवल्याने (वाचून दाखवल्याने) लोकांना एकाच गोष्टीचे अनेक अर्थ कळतील. त्यांना आपण ज्ञानी झाल्याचा भास होईल परंतु प्रत्यक्षात त्यांना योग्य गोष्ट कळेलच असे नाही.”
अमुनचे म्हणणे खरे-खोटे पाडण्याच्या भानगडीत न पडता या कथेतीलही एक महत्त्वाचे वाक्य उचलते ते म्हणजे "तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे." यावरून अमुनला लेखनकलेचे सर्व फायदे लक्षात आले नव्हते असे म्हणावे लागेल. कदाचित, थॉथची उपलब्ध लेखनकला हे फायदे दर्शवण्याइतपत समृद्ध नसावी. परंतु या कथेत आणि वास्तवात साम्य असे की माणसाने लेखनकलेचा पहिला वापर नोंदी ठेवण्यासाठीच केला असे दिसून येते. या नोंदी मानवी भावना, काव्य, कथा, इतिहास यांसाठी नव्हत्या. या विस्तृत संवादासाठी जी मौखिक परंपरा वापरली जात होती ती तत्कालीन संस्कृतींना पसंत होती. किंबहुना, लेखनकलेचा विकास होण्यापूर्वी संवादकलेत मनुष्याने इतकी प्रगती केली होती की चटकन तो संवाद लिपीबद्ध करणे त्याला शक्य नव्हते. पुढील हजारो वर्षे माणसाने चित्रलिपी, शब्दावयव, चिन्हे-अक्षरे, विरामचिन्हे यांवर खर्च करून विस्तृत लेखनासाठी उपयुक्त अशा लिपींचा विकास केला.
लेखनाचा प्रथम वापर हा लेखांकन प्रक्रियेसाठी आणि तत्सम नोंदी राखण्यासाठी केला जाऊ लागला. सुमेरियन मृत्तिकापट्ट्यांवर अशाप्रकारच्या नोंदी आढळतात. याशिवाय, तत्कालीन राजांच्या विजयांच्या नोंदी, पिक-पाण्याच्या नोंदी, व्यापार, हुद्दे, शिक्के आणि ओळख पटवण्यासाठी वगैरे लेखनाचा वापर होत होता. पुढे तो वापर दानपत्रे आणि प्रचार, कायद्याची अंमलबजावणी यासाठी होऊ लागला. वेगळ्या शब्दांत, लोकशिक्षण, गद्य-पद्य लेखन, मनोरंजन वगैरेंसाठी लेखनकला वापरली जात नव्हती त्यामुळे लेखनाचा वापर करणारे अतिशय मोजके होते आणि लेखनाची महती न कळलेले अनेक होते. आता या पार्श्वभूमीवर सिंधू लिपीकडे बघू. सिंधू लिपी हे सुमेरियन कीलाकारीचे सख्खे अपत्य मानण्याबद्दल तज्ज्ञांत मतभेद आहेत परंतु कीलाकारीच्या कल्पना विसरणातून सिंधू लिपी निर्माण झाली असावी याबाबत फारसे मतभेद दिसत नाहीत. म्हणजेच, सिंधू लिपी ही स्वतंत्र लिपी नसून ती सुमेरियन किंवा आजूबाजूच्या इतर संस्कृतींकडून उसनी घेऊन आकारास आणलेली आहे. एखाद्या संस्कृतीत एखादे नवे संशोधन झाले आणि त्या संस्कृतीने ते वापरात आणले की त्या पहिल्या संस्कृतीशी साधर्म्य साधणार्या किंवा तिच्या जवळपास प्रगती साधलेल्या इतर संस्कृती ते संशोधन स्वीकारतात किंवा आपल्या पथ्यावर पडेल असे बदल करून स्वीकारतात. या स्वीकार करण्यात अर्थातच अनेक निकष असतात. उदा. गरज, फायदे-तोटे, सांस्कृतिक आणि धार्मिक समज वगैरे. साधारणतः कल्पना विसरणाचे पाच भाग मानले जातात. ज्ञान, मनवळवणी, निर्णय, अंमलबजावणी आणि स्थायीकरण.
सिंधू लिपीतील शिक्का |
अशोककालीन ब्राह्मी शिलालेख |
लेखातील सर्व चित्रे विकिपिडीयावरून घेतली असून लिपींची वाटचाल दर्शवण्यासाठी त्यांचा उपयोग केला आहे.
No comments:
Post a Comment