Wednesday, August 02, 2006

राजे सरफोजी आणि सरस्वती महाल ग्रंथालय

इजिप्त व मेसोपोटेमिया सारख्या ठिकाणी संस्कृतींचा (भाषा, लिपी वगैरे) उदय झाल्यावर माणसाला हळूहळू लिखित दस्तावैज तयार करण्याची गरज पडू लागली असा ज्ञात इतिहास आहे. पुरातत्त्ववेत्त्यांना हल्लीच सापडलेली ४०००(?) वर्षांपूर्वीची सुमेरियन मृत्तिका पट्टी ही लिखित दस्तावैजातील सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो.

इजिप्त मध्ये नाईल काठी उगवणार्‍या पपायरस या झाडापासून बनवल्या जाणा-या कागदावर, मेसोपोटेमियात चिकण मातीच्या पट्ट्यांवर आणि भारतात बेतुल वृक्षापासून बनवल्या जाणा-या भूर्जपत्रांवर लिखाणाला सुरुवात झाली. या बरोबरच हे हस्तलिखित जपून ठेवण्याची आणि इतरांना व पुढच्या पिढीला उपलब्ध करून देण्याची गरज भासू लागली. ज्ञान संचयासाठी लागणा-या या गरजेमुळेच नंतरच्या काळात ग्रंथालयाची उत्पत्ती झाली असावी.

ग्रंथालयाचा सर्वात जुना उल्लेख ग्रीक इतिहासात सापडतो. त्याकाळी ग्रंथालये ही शासनकर्ते व अधिकारी विद्वानांची खाजगी मालमत्ता असून त्यात सर्वसामान्य जनतेला प्रवेश नसावा असे वाचनात आले आहे. ख्रि. पू. तिसऱ्या शतकात टोलेमी दुसरा याच्या काळातले ऍलेक्झांड्रीयाचे ग्रंथालय त्या काळी जगातले सर्वात भव्य ग्रंथालय म्हणून गणले जायचे. भारतातही नालंदा व तक्षशीला सारख्या विद्यापीठांमध्ये अशी ग्रंथालये होती. नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय ९ मजली असल्याचे वाचनात आले आहे. ही ग्रंथालये केवळ विद्यार्थी व सन्माननिय पाहुणे केवळ यांच्यासाठीच होती. दुर्दैवाने त्याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या नंतरच्या इतिहासातही ग्रंथालयांविषयी फार माहिती दिसत नाही.

त्यानंतर मध्ययुगीन कालातही अशी अनेक खाजगी ग्रंथालये असण्याचा संभव आहे. कलाप्रेमी राजे व संस्थानिक यांनी आपल्या खाजगी ग्रंथालयांची स्थापना केली होती. यातील एका महत्वाच्या आणि सध्याही अस्तित्वात असणा-या "सरस्वती महाल ग्रंथालयाची" माहिती हल्लीच माझ्या वाचनात आली. शिवाजी राजांच्या वंशातले राजे सरफोजी यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली होती.

सरफोजी राजे (१७७७-१८३२): शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी (व्यंकोजी) राजे यांच्यापासून आठव्या पिढीत सरफोजी राजांचा जन्म झाला. (ते दत्तक पुत्र असल्याचे वाचनात आले आहे) १७९८ साली ते तंजावूरच्या गादीवर आले. सरफोजी राजे हे कलासक्त, साहित्यप्रेमी आणि विद्येचे आदर करणारे होते. त्यांच्या राज्यकालात तंजावूरला विद्येच्या माहेरघराचा दर्जा प्राप्त झाला. वाचन आणि ज्ञानसंचयाच्या विलक्षण आवडीतून त्यांनी सरस्वती महाल ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयासाठी त्यांनी परदेशातून विविध विषयांवरची सुमारे ४००० पुस्तके/ ग्रंथ खरेदी केली. अस म्हटलं जात की ही पुस्तके/ ग्रंथ त्यांनी स्वत: वाचले होते. या ग्रंथालयात नाट्यशास्त्र, नृत्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, हत्ती-घोडे यांचे प्रशिक्षण, वेदान्त, ज्योतिष, व्याकरण, संगीत अशा अनेक विषयांवरील ग्रंथ आढळतात.

सरफोजी राजांनी दक्षिणेत पहिला देवनागरी छापखाना टाकला. त्यात छपाईसाठी दगडाक्षरांचा वापर करण्यात आला. तसेच त्यांनी वैद्यक शास्त्रातील प्रगती करता धन्वंतरी महाल प्रयोगशाळेची स्थापना केली. यात ऍलोपथी, आयुर्वेद, युनानी, सिद्ध वैद्यांकडून संशोधन चालत असे. या प्रयोगशाळेत अनेक औषधी वनस्पतींचा अभ्यास करून त्यांची खुलासेवार वर्गवारी करण्यात आली. त्यांना चित्रकलेतही विशेष रस होता हे त्यांच्या दरबारातील तैलचित्रांवरून जाणवून येई. त्यांच्याकडे पुरातन दुर्मिळ नाण्यांचा संग्रह ही होता.

सरफोजी महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारने तंजावूरचे राज्य खालसा केले.

सरस्वती महाल ग्रंथालय: हे ग्रंथालय संपूर्ण जगात; मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते. या ग्रंथालयात सुमारे ४६००० हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील प्रती आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन १४६८ मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, अंबर होसैनी या मुसलमान कवीने केलेले भगवद्गीतेचे मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा बंगाली लिपीतील संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.

मराठी हस्तलिखिते: इसवी सन १६७६ ते १८५५ च्या मराठा राज्यकाळात लिहिली गेलेली मराठी हस्तलिखिते या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. त्यांची संख्या अदमासे १८५६ आहे. यात संतकवी रामदासी व दत्तात्रय मठातील विपुल साहित्य आहे. पुढे जेव्हा हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले गेले त्यावेळेस अनेक मराठी पंडित व विद्वानांनी लिहिलेल्या १२२० हस्तलिखितांची या संग्रहात भर घातली गेली. आता त्यांची संख्या ३०७६ इतकी आहे.

यातील बरेचसे साहित्य महाराष्ट्रात उपलब्ध नसल्याने त्याला दुर्मिळतेचे एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. माधव स्वामींचे रामायण, महाभारत, मेरू स्वामीचे अवधूत गीता टीका व रामसोहळा, मुकुंद स्वामींचे श्री रामकृपा विलास, राघव स्वामीचे आत्मबोध, आणि अनंत मुनी यांची भगवद् गीता यांचा या दुर्मिळ हस्तलिखितांत समावेश आहे.

याखेरीज तामीळ, संस्कृत, उर्दू हस्तलिखितांचाही या ग्रंथालयात समावेश आहे. मोडी लिपीतील राज्यकारभार विषयक दैनंदिनी, हिशेब, टिप्पणी, पत्र व्यवहार या सारखी लिखितेही या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. याखेरीज मराठी भाषेतील आणि मोडी लिपीत लिहिलेल्या चार प्राचीन ताम्रपट्टीका या ग्रंथालयात दर्शनी ठेवलेल्या आहेत. तसेच अनेक प्राचीन नकाशांचाही संग्रह केलेला आहे.

सध्या हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले असून त्यातील संग्रहाचा संदर्भकोश म्हणून वापर करता येतो.

Monday, June 19, 2006

रेव्ह. चार्ली एन्ड्रूज

काल परवा रिचर्ड ऍटेनबरोंचा गांधी चित्रपट पुनश्च पाहिला. नक्की कितव्यांदा ते आठवत नाही पण दरवेळेला चित्रपट पाहताना एक प्रश्न नेहमीच पडायचा. संपूर्ण चित्रपटात गांधिजींना "मोहन" म्हणून हाक मारणारे आणि त्यांना भारतात परत आणण्यात काही अंशी कारणीभूत असलेले "रेव्ह. चार्ली एन्ड्रूज" हे महाशय नक्की कोण?

एखाद्या अपरिचित व्यक्तीची माहिती काढणे हे तसेही थोडे कठिण काम. त्यातून ती व्यक्ती विस्मृतीत गेलेली, माझ्याकडेही माहितीच्या महाजाला शिवाय दुसरे साधन नाही. पण महाजाला सारखं दुसरं प्रभावी साधन नाही असंही म्हणता येईल कारण प्रथमदर्शनी कठीण वाटणारा हा शोध अगदी सोपा झाला. सर्वप्रथम IMDB (Internet Movie Data Base) वर गांधी चित्रपट शोधला. त्यात रेव्ह. चार्ली एन्ड्रूज हे नाव दृष्टीस पडले त्यामुळे गुगलवर त्यांचा शोध घेणे खूप सोपे झाले. वाचलेल्या माहितीवरुन पुढील गोषवारा लिहीत आहे.

रेव्ह. चार्ल्स फ्रिर (चार्ली) एन्ड्रूज यांचा जन्म १८७१ साली न्यू कॅसल, इंग्लंड येथे झाला. चार्लींचे वडिल ही चर्च मिनीस्टर होते, त्यांनी लहानग्या चार्लीला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. पहिली, प्रार्थनेवर प्रेम आणि दुसरी गरीबांवर प्रेम. काही कौटुंबिक कारणांमुळे चार्लीचे कुटुंब गरीबीच्या खाईत लोटले गेले. चार्लीच्या आई वडिलांना कुटुंब चालवण्यासाठी जे अपार कष्ट घ्यावे लागले त्याचा लहानग्या चार्लीच्या मनावर खोल परिणाम झाला.

ख्रिस्ती धर्माचे शिक्षण घेऊन १८९७ साली चार्ली पाद्री बनले. याच काळात त्यांचा ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाच्या झगडयाशी संबंध आला आणि त्यातल्या त्यात भारतात सुरु असलेल्या लढयाविषयी त्यांना विशेष आत्मीयता वाटली. १९०४ साली दिल्ली येथिल से. स्टिफन कॉलेजमधे शिकवण्याची संधी चालून आली आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन चार्ली भारतात दाखल झाले.

भारतात ब्रिटिशांचे वर्णद्वेषी धोरण पाहून ते व्यथित झाले आणि स्वत: या लढयात सक्रिय व्हायचे त्यांनी ठरवले. लढयाला पाठिंबा देणारा ब्रिटिश पाद्री या नात्याने त्यांना भारतात एक आगळेच महत्त्व प्राप्त झाले. नॅशनल कॉंग्रेसच्या सभा व बैठकींना त्यांना आमंत्रित केले जाऊ लागले. पाद्री असल्याने त्यांनी ब्रिटिश व भारतीय या दोहोंचा विश्वास लवकरच संपादन केला. यानंतर चार्ली स्वत: लढयात सक्रिय झाले.

१९१३ साली कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळकृष्ण गोखले यांच्या आग्रहावरुन चार्ली साऊथ अफ्रिकेच्या भारतीय समाजाला वर्णद्वेषाविरुद्ध त्यांच्या लढयात मदत करण्यासाठी तिथे दाखल झाले. तेथिल वास्तव्यात त्यांची भेट गांधीजींशी झाली आणि गांधीजींच्या अहिंसेच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेने ते प्रभावित होऊन गेले. या दोघांतील अतूट मैत्रीला इथूनच सुरुवात झाली.

१९१६ साली चार्ली गांधींजींसमवेत भारतात परतले. चंपारण्याच्या सत्याग्रहाच्या कैदेत असताना गांधीजींनी त्यांना "फीजी" ला जाऊन तेथिल मजूर आणि कामगारांना आपल्या हक्कांविषयी जागृत करण्यास सुचवले. त्यानुसार चार्ली फिजीला गेले. फीजीला त्यांना "दीनबंधू " या विशेषणाने सन्मानित करण्यात आले.तिथून परतल्यावर १९२५ व १९२७ साली त्यांनी All India Trade Union चे अध्यक्षपद भूषवले. १९३१ साली गोल मेज परिषदेसाठी गांधीजींसमवेत ते ईंग्लंडला जाऊन आले.

सर्व धर्मांविषयी त्यांचा दृष्टीकोन सहिष्णू तर होताच पण अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९३३ साली त्यांनी बाबा साहेब आंबेडकरांना अस्पृश्यांच्या मागण्या अधोलिखित करण्यास मदतही केली. गुरुदेव टागोरांच्या शांतिनिकेतन मधे वेळ घालवण्यास त्यांना फार आवडायचे.

पुढे, भारताविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या ब्रिटिशांनी इंग्लंडला परतावे व स्वातंत्र्यलढा भारतीयांनाच लढू द्यावा असे गांधीजींनी चार्लींना सुचवले. त्या नुसार त्यांनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ ब्रिटनमधे व्यतित केला. तिथेही त्यांनी आपल्या लिखाणातून पाश्चिमात्य जगताला भारतीय स्वातंत्र्य लढा व गांधीजींच्या तत्वांची ओळख करुन दिली.

गांधीजींना "मोहन" या त्यांच्या प्रथम नावाने संबोधणारे चार्ली हे एकच असावेत. “Mahatma Gandhi: His Life and Ideas” हे पुस्तक त्यांनी लिहून प्रकाशित केले होते. ५ एप्रिल १९४० साली कलकत्ता भेटीवर असताना त्यांचे निधन झाले.

----------

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढयाला येन केन प्रकारे मदतीचा हातभार लावणाऱ्या अनेक मोहोऱ्यांविषयी आपण अनभिज्ञ असल्याचे वारंवार लक्षात येते. या छोटयाश्या गोषवाऱ्यातून वाचकांचे लक्ष वेधण्याचा हा एक लहानसा प्रयत्न.

Thursday, May 04, 2006

विखुरलेले मोती

काहीतरी वाचताना भा. रा. तांब्याच्या प्रसिद्ध कवितेच्या ओळी नेहमीच आठवून जातात --
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील, होईल का काही अंतराय?

जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहिल कार्य काय?

काळाच्या ओघात अनेक मौल्यवान रत्ने कुठेतरी हरवून गेली आहेत. तांब्यांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे त्यांची आठवण होणे सुद्धा अभावानेच आहे. कधी त्या रत्नांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून तर कधी समाजाला त्यांची फारशी गरज वाटली नाही. युद्धात वीरमरण पत्करणारा प्रत्येक योद्धा, राज्याश्रय न मिळालेले अनेक विद्वान, प्रासादाच्या पायाशी रचलेला दगड यांची गणती ठेवायची तरी कशी? या रत्नांबद्दल कधी कुठेतरी काही वाचायला मिळाल की मला उगीचच खंत वाटत रहाते.

या रत्नांबद्दलची माहिती संकलीत करुन ठेवावी अस बऱ्याच वर्षांपासून मनात आहे. त्यांची मी कशी पारख केली, मला ती किती आणि का भावली, त्यांचा हार कसा गुंफत जायचा ते या नवीन ब्लॉग द्वारे माझ्या शब्दांत मांडायच ठरवल आहे. यातली काही रत्न ऐतिहासिक आहेत तर काही पौराणिक, काही खरी तर काही रचवलेली, काही अस्सल भारतीय तर काहींचा दूरान्वये भारताशी संबंध नाही. बाकी त्यांच्याविषयीची माहिती मला जपून ठेवण्याची फार इच्छा आहे. "मनात आलं.."ची सुरुवात देवापासून केली होती. या ब्लॉगची सुरुवात "आई"ने करावीशी वाटते.

चांगली मुलं घडायला चांगले पालक कारणीभूत असतात. माझ्या सुदैवाने मला ते लाभले आणि मला वाटत की तुम्हालाही लाभले असतीलच. त्यातूनही, आई जर खंबीर, धोरणी, कर्तबगार आणि द्रष्टी असेल तर तिच्या पोटी नक्कीच "शिवाजी" जन्माला येतात. या ब्लॉगची सुरुवात करण्यासाठी जिजाबाईंपेक्षा अधिक महत्वपूर्ण व्यक्ति कोण मिळणार?

आपल्या मराठीत म्हण आहे, "स्वामी तिन्ही जगाचा आईविणा भिकारी." शिवाजी महाराज खरोखर भाग्यवान म्हणायला पाहिजेत कारण त्यांना आयुष्यात बराच काळ आपल्या कर्तबगार आईची साथ लाभली.

जिजाबाई हा कालौघात हरवलेला मोती नाही पण मला वाटत की या मोत्याला हवे तसे कोंदण लाभलेले नाही. विशेषत: माहितीच्या या महाजालावर त्यांच्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे.

४०० वर्षांपूर्वीच्या या स्त्रीचा द्रष्टेपणा आणि दूरदृष्टी ही खचितच वाखाणण्याजोगी आहे. जिजाबाईंचा माहेरचा आधार तुटलेला होता, पतीप्रेमही फारसे त्यांच्या वाटयाला नव्हते. पतीचा दुसरा घरोबा, मोठा मुलगा दुरावलेला, पुण्यासारखी उजाड जहागीर नशीबी आलेली. अशा परिस्थितीतही ज्याच्यावर आपल्या सर्व आशा केंद्रीत आहेत त्या मुलाचे, स्वराज्याचे दुर्गम स्वप्न साकार व्हावे यासाठी अखंड त्याच्या पाठीशी उभं राहून त्याच्या या कार्यात सहभागी होणारी आई इतिहासात विरळाच.

काही दिवसांपूर्वी विकिपिडियाच्या मराठी ज्ञानकोशाच्या आवृत्तीवर काहीतरी शोधताना एक टीपण्णी वाचली की तेथील लेखांची संख्या केवळ साडे ३००० आहे. सहज म्हणून शिवाजी महाराजांविषयि माहिती शोधली तर बऱ्यापैकी लेख होता पण जिजाबाई, शहाजीराजे आणि इतर अनेक संलग्न व्यक्तींविषयी काहीच माहिती नव्हती. होत्या फक्त माहितीअभावी असलेल्या लाल खुणा. पाहून मनाला बरं नाही वाटलं. आपल्यामधे उत्कृष्ट मराठी लिहिणारे अनेकजण आहेत. त्यापैकी काही जणांनी तरी आपल्याकडिल माहिती या ज्ञानकोशात घातली तर तेथील उपयुक्त लेखांची संख्या वाढेल.

मी इतिहास विषयाची तज्ञ मुळीच नाही, तरीही मला जिजाबाईंविषयी ज्ञात असलेली ऐतिहासिक माहिती मी तिथे भरली. आपल्याला या पेक्षा जास्त माहिती असल्यास जरुर फेरफार करा. एके ठिकाणी जिजाबाईंविषयी बऱ्यापैकी माहिती मिळून गेली, पण त्यात आख्यायिका अधिक वाटतात. दोन्ही लिंक पुढे दिल्या आहेत.
या पुढील लेखही अशाच एका आईबद्दल लिहिण्याचा विचार आहे. ही आई भारतातील नाही पण तिचा अद्वितीय पराक्रमी पुत्र भारताशी जोडलेला आहे. जिजाबाईंसारखीच तीही दूरदर्शी आणि धोरणी होती. पण इतिहासकारांनी तिच्या कर्तुत्वाला काळी झालर जोडली आहे.