Wednesday, June 16, 2010

कॉटिंग्लीच्या पर्‍यांचे प्रकरण

आजवरच्या देशी-विदेशी साहित्यातील सर्वोत्कृष्ट सत्यान्वेशी कोण - याचे उत्तर साहित्य रसिकांकडून वेगवेगळे आले तरी बहुमताचा मान शेरलॉक होम्सला मिळेल असे वाटते. गेल्या एका शतकाहून अधिक काळापर्यंत वाचकांना मोहवून ठेवण्यात शेरलॉक होम्सला घवघवीत यश मिळाले आहे. थोडासा तिरसट, सामाजिक शिष्टाचारांपासून चार हात दूर पण चलाख आणि धूर्त अशा शेरलॉक होम्सच्या यशाचा खरा धनी मात्र त्याचा जनक आर्थर कॉनन डॉयल मानायला हवा. हुशार, धूर्त आणि प्रचंड निरीक्षण दृष्टी असणारा चिकित्सक शेरलॉक होम्स, पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉयलच्या वैद्यकीय ज्ञानातून उभा राहिला असावा असे म्हटले जाते. शेरलॉक होम्सच्या कथांना प्रसिद्धी मिळाली 'द स्ट्रँड मॅगझिन' या मासिकातून. डॉयलच्या कथांनी गुन्हेगारी-सत्यान्वेशी आणि चातुर्य कथांना फार मोठी प्रसिद्धी आणि वाचकवर्ग दिला. आजही सर आर्थर कॉनन डॉयल यांचे नाव एक उत्कृष्ट लेखक म्हणून घेतले जाते. परंतु, हाच डॉयल प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या मानसपुत्रापेक्षा कसा भिन्न होता याची जाणीव खालील लेखातून वाचकांना व्हावी.

ही घटना आहे सुमारे पहिल्या महायुद्धाच्या नंतरची. कॉटींग्ली या इंग्लंडमधील एका गावात दोघा मुलींना काहीतरी अविस्मरणीय दिसून येण्याची. १६ वर्षीय एल्सी राइट आणि तिच्याकडे राहायला आलेली तिची एक १० वर्षीय बहीण फ्रान्सीस ग्रिफिथ्स यांना घरामागील एका ओढ्यावर खेळताना पऱ्या दिसल्या. नाजूक, पंखधारी, चिमुकल्या पऱ्यांना या बहिणींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केले आणि एका अविस्मरणीय कहाणीचा जन्म झाला.

एल्सी राईट ही एका सुशिक्षित घरातील मुलगी. तिचे वडील पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. एकदा वडलांचा कॅमेरा घेऊन तिने आणि फ्रान्सीसने घरामागील ओढ्यावर काही छायाचित्रे काढली. ही चित्रे डेवलप करताना एल्सीच्या वडलांना त्यात पऱ्या दिसल्या. प्रथमतः त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही आणि त्यांनी एल्सीला कॅमेरा वापरण्यास बंदी घातली. तिच्या आईला मात्र ही छायाचित्रे पाहता क्षणीच त्यांच्या खरेपणाविषयी विश्वास वाटला. याचे कारण असे की एल्सीची आई गूढ-आध्यात्मवादावर विश्वास ठेवणारी होती. पऱ्या, देवदूत, जादू आणि इतर गोष्टींवर तिचा विश्वास होता त्यामुळे आपल्या मुलीने यात कोणताही बनाव केलेला नाही अशी तिची खात्री झाली. "थिऑसॉफिकल सोसायटीच्या" एका सभेत तिने या प्रकरणाची वाच्यता केली आणि दोन लहान मुलींनी पऱ्या पाहिल्या. एवढेच नाही तर त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे ही गोष्ट सर्वश्रुत झाली.
थिऑसॉफिकल सोसायटीच्या एका सदस्याने ही छायाचित्रे तपासणीसाठी तज्ज्ञाकडे पाठवली असता या तज्ज्ञाने छायाचित्रांच्या छायाप्रती (निगेटिव्हज) विश्वसनीय असल्याची ग्वाही दिली. ही माहिती फिरत फिरत सर आर्थर कॉनन डॉयल यांच्यापर्यंत पोहोचली. स्ट्रँड मासिकाने आपल्या ख्रिसमसच्या अंकात या पऱ्यांवर लेख लिहिण्याचे आवाहन डॉयल यांना केले. डॉयल यांनी या प्रकरणाला प्रसिद्धी देणाऱ्या थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य एडवर्ड गार्डनर यांच्याशी आणि एल्सिच्या वडलांशी संपर्क साधला. तोपर्यंत या प्रकरणाबाबत साशंक असणारे एल्सीचे वडील सर आर्थर कॉनन डॉयल छायाचित्रांच्या प्रकाशनाची परवानगी मागत आहेत या मागणीने सुखावले आणि त्यांनी छायाचित्रे वापरण्याची परवानगी डॉयल यांना दिली. यानंतर गार्डनर आणि डॉयल यांनी हे फोटो छाननीसाठी कोडॅक आणि इलफोर्ड या छायाचित्रीकरणासाठी प्रसिद्ध कंपन्यांकडे पाठवले. पैकी कोडॅक कंपनीतील अनेक तज्ज्ञांना ही छायाचित्रे विश्वसनीय वाटल्याचे सांगितले जाते. इलफोर्डला या छायाचित्रांत बनाव असल्याचे वाटले. दोन्ही कंपन्यांनी जाहीरपणे या छायाचित्रांना विश्वसनीय करार देण्यास नकार दिला पण डॉयल यांनी हार मानली नाही.

एडवर्ड गार्डनर यांनी एल्सीच्या घरी जाऊन पऱ्यांची आणखी चित्रे मिळवण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही मुलींनी खूप लोक गोळा झाले तर पऱ्या संपर्कात येणार नाहीत असे कारण दिल्याने गार्डनर यांनी चांगले कॅमेरे या मुलींच्या हाती देऊन स्वच्छ सूर्यप्रकाशात त्यांना छायाचित्रे घेण्याचे सुचवले. त्यानुसार या मुलींनी घेतलेल्या अनेक छायाचित्रांतून केवळ दोन छायाचित्रांत पऱ्यांचे दर्शन झाले. गार्डनर यांनी ही बातमी ताबडतोब डॉयल यांना कळवली. त्या वेळेस डॉयल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते. बातमी कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. या लेखाच्या निमित्ताने अतींद्रिय शक्तींवर लोकांचा विश्वास बसेल असा त्यांचा ग्रह झाला.

१९२० सालच्या डिसेंबर महिन्यात सर आर्थर कॉनन डॉयल यांनी आपला लेख स्ट्रँड मासिकात प्रसिद्ध केला. गोपनीयता राखण्यासाठी लेखातील नावे बदलून टाकण्यात आली. मासिकाच्या प्रती रातोरात खपल्या. डॉयल हे प्रसिद्ध लेखक असल्याने सुरुवातीला संमिश्र प्रतिक्रिया आल्या पण नंतर लेखावर उलट-सुलट प्रतिक्रियांना उधाण आले. या लेखाचे खंडन करणाऱ्यांनी आपापल्या लेखांतून डॉयल यांची आणि या प्रकरणाची खिल्ली उडवली तर डॉयल यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्यावर विश्वासही दाखवला. १९२२ साली डॉयल यांनी या प्रकरणावर "द कमिंग ऑफ द फेअरिज" नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. काही काळानंतर या प्रकरणाने उडालेला धुरळा खाली बसला.

पुढील अनेक वर्षे आपल्याला पऱ्या दिसल्या होत्या या विधानावर या दोन्ही मुली ठाम राहिल्या. या छायाचित्रांत पऱ्यांची कात्रणे वापरली होती हे त्यांनी कबूल करण्यास १९८३ साल उजाडले.

आज या छायाचित्रांवर नजर टाकली तर चित्रातील पऱ्या मानवांप्रमाणे त्रिमित नाहीत हे सहज ध्यानात येते. या मुलींनी लहान मुलांच्या पुस्तकातून कापून त्या छायाचित्रांसाठी उभ्या केल्या असाव्यात आणि पिन किंवा पातळ धाग्याने लटकवल्या असा अंदाज सहज बांधता येतो. एल्सीच्या वडिलांनी स्वतःही असे म्हटले होते की ही छायाचित्रे पाहिल्यावर त्यांना ही ठकबाजी वाटली आणि त्यांनी मुलींच्या खोल्यांची झडती घेतली होती परंतु त्यांना कुठलीही कात्रणे, चित्रे मिळाली नाहीत. तरीही, छायाचित्रांकडे निरखून पाहिले तर ही ठकबाजी आहे हे सहज लक्षात येते. १९२० साली छायाचित्रण ही कला नवी असली तरीदेखील ही ठकबाजी आहे असे अनेकांच्या लक्षात आले होतेच परंतु अशी ठकबाजी इतक्या लहान निष्पाप मुली करतील हा विचार अनेकांना रुचला नसावा. सर आर्थर कॉनन डॉयल हे त्यापैकीच एक.

आपल्या बायकोच्या आणि मुलाच्या अकाली मृत्यूनंतर डॉयल यांना अतिशय नैराश्य आले होते असे सांगितले जाते. नैराश्यातून सुटका करून घेताना डॉयल यांचा गूढ-आध्यात्मवाद आणि अतींद्रिय शक्तींवर विश्वास वाढला. "द घोस्ट क्लब" नावाच्या अतींद्रिय शक्तींचा पाठपुरावा करणाऱ्या संघटनेचे ते सदस्यही होते. त्यांच्या या वेडापायी हॅरी हुडिनी या प्रसिद्ध जादुगाराशी त्यांची घनिष्ठ मैत्री फाटली होती कारण हुडिनीच्या अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचा त्यांना विश्वास होता आणि हुडिनीचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता; तो अशा फसवणुकीचा पर्दाफाश करण्यास उत्सुक असे. डॉयल यांच्या काही मित्रांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष आयुष्यात डॉयल हे अतिशय सरळ आणि साधे गृहस्थ होते. गूढ गोष्टींवरील विश्वास आणि लहान वयाच्या निष्पाप मुली अशी फसवणूक करूच शकत नाहीत अशी त्यांची धारणा यामुळे त्यांची फसवणूक झाली असावी.

कारणे काहीही असतील, आपल्या लेखनातून बारीकसारीक निरीक्षणांवर भर देणारा चिकित्सक लेखक दोन लहान पोरींच्या खेळात सहज गंडला गेला असेच म्हणावे लागेल.

पूरक माहिती आणि अन्य छायाचित्रे:

विकीवर कॉटिंग्ली पर्‍या
कॉटिंग्ली. नेट
द कमिंग ऑफ फेअरीज - आर्थर कॉनन डॉयल

लेखातील सर्व चित्रे विकीपिडीयावरून साभार.

2 comments:

राज जैन said...

छान व नवीन माहीती कळाली, उत्तम लेख !

प्रशांत said...

आपल्या देशाला "भारत" हे नाव शकुंतलापुत्र भरतामुळे मिळालं नसून अन्य भरतामुळे मिळालंय असं आपण पूर्वी कुठेतरी (या ब्लॉगवर किंवा अन्य ब्लॉगवरील प्रतिसादावर) म्हटलेलं आठवलं. त्याबद्दल विस्तृत माहिती वाचायला आवडेल.
धन्यवाद.