Tuesday, January 04, 2011

अलेक्झांडर आणि पुरु युद्ध

इतिहासकार हा स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांच्या नोंदी करत असतो किंवा इतरांनी लिहिलेल्या नोंदी वापरून इतिहास लिहून ठेवत असतो. हा इतिहास नमूद करताना तो नि:पक्षपाती असतो का या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थी यावे. महाभारतातील कौटुंबिक कलहाला जय नावाचा इतिहास समजले तरी तेथेही व्यासांनी पदोपदी जेत्या पक्षाला वरचढ स्थान दिलेले आहे. पुढे जनमेजयाच्या समोर वैशंपायनांनी कथा सांगितल्याने राजाला संतोष देण्यासाठी त्यात बरेच फेरफार केले असावेत अशी शंका अनेक तज्ज्ञांना येतेच. महाभारत युद्धाप्रमाणेच भारतीय भूमीवर जी पौराणिक-ऐतिहासिक महत्त्वाची युद्धे लढली गेली त्यात दाशराज्ञ युद्ध, मगध-कलिंगचे युद्ध, पानिपतावरील युद्धे अशा अनेक युद्धांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक युद्ध अलेक्झांडर आणि पुरु यांच्यात लढले गेले. या युद्धामुळे अलेक्झांडरच्या ज्ञात जग जिंकत पुढे सरकण्याच्या इच्छेला खीळ बसली. भारताची भूमी ग्रीकांच्या आक्रमणापासून वाचली. या युद्धात नेमके काय झाले हे जाणून घेण्याची इच्छा मला अनेक दिवस होती.

अलेक्झांडरच्या लहान आयुष्यातही इतका विस्तृत इतिहास भरलेला आहे की तो लिहित लिहित भारतापर्यंत पोहोचेस्तोवर अनेक लेखकांचा उत्साह गळून जातो असे वाटते. सोईस्कर रित्या याला पाश्चात्यांचा भारतीय दुस्वास असेही म्हणता येईल.

या चित्रात अलेक्झांडर पुरुवर स्वारी करताना दिसतो तर दुसर्‍या चित्रात विजयाची देवता नाइके अलेक्झांडरचा गौरव करताना दिसते. या दोन्ही नाण्यांवर कोणतीही अधिक माहिती किंवा लेखन नाही. यावरून हे नाणे अलेक्झांडरने पाडले की त्याच्या क्षत्रपाने याबद्दल साशंकता आहे.
कारण काहीही असो, ज्या अनेक लेखकांचे संदर्भ मी वाचले ते अक्षरशः दोन ते तीन पानांत अलेक्झांडरची भारतीय स्वारी पूर्ण करतात. मागे ऑलिवर स्टोन निर्मित अलेक्झांडर या चित्रपटातही हे असेच झाल्याचे लक्षात आले. तसाही हा चित्रपट इतिहासापेक्षा अलेक्झांडरच्या लैंगिकतेमुळे अधिक गाजला असला तरी चित्रपटात युद्धांचे चित्रण अतिशय सुरेख आहे. भारतीय युद्धाच्या चित्रणातही विशेषतः अलेक्झांडर पुरुच्या हत्तीवर स्वतः चाल करून जातो तो प्रसंग चित्तवेधक आहे. परंतु ऐतिहासिक दृष्ट्या त्यात अनेक त्रुटी आहेत. या प्रसंगात अलेक्झांडर हा कुशल सेनापती असला आणि सैन्याचे नेतृत्व करत असला तरी त्याने पुरुच्या हत्तीवर चाल करून जाण्याचे धाडस दाखवले असेल का असा प्रश्न मनात आला होता. कालांतराने मला ब्रिटिश म्युझियममधील अलेक्झांडरचे नाणे दिसले आणि त्यावर चित्रित हा प्रसंगही दिसला. तरीही विश्वास ठेवण्यास काहीतरी कमी पडते आहे असे वाटले म्हणून अलेक्झांडरचा सर्वात विश्वासार्ह इतिहास, एरियनचा "ऍनाबेसिस ऑफ अलेक्झांडर" चाळला.

लढाईकडे वळण्यापूर्वी एरियन आणि त्याच्या ग्रंथा विषयी थोडे.

एरियन

एरियनचा जन्म सन ८६ ते १६० दरम्यानचा. म्हणजेच अलेक्झांडर नंतर सुमारे चारशे-साडेचारशे वर्षांनंतरचा. अलेक्झांडरच्या कर्तृत्वामुळे प्रेरित होऊन त्याने स्वारीचा वृत्तांत लिहिला तरी त्यात राजाची स्तुती करणे असा हेतू दिसत नाही. अनेक संदर्भ वापरून, आपली टिप्पणी देऊन तो इतिहास समोर आणतो. त्याच्या लेखनात व्यक्तीपूजा (हिरो-वरशिप) केलेली दिसत नाही आणि तरीही अलेक्झांडरला "द ग्रेट" बनवण्यात या इसमाचा मोठा हात असल्याचे मानले जाते . अलेक्झांडरच्या काळात न जन्मता, प्रत्यक्ष इतिहासाचा साक्षीदार नसतानाही त्याने लिहिलेला इतिहास हा अलेक्झांडरविषयीचा सर्वात मोठा विश्वासार्ह स्रोत मानला जातो. हा इतिहास लिहिण्यासाठी एरियनने जे संदर्भ चाळले त्यात टोलेमीने लिहिलेला अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्तांत, ऍरिस्टोब्युलसने लिहिलेला इतिहास हे दोन अतिशय महत्त्वाचे संदर्भ आणि याशिवाय कॅलिस्थेनिसने लिहिलेला इतिहास, नीअर्कसचा इतिहास आणि अशा अनेक संदर्भांचा समावेश आहे. मेगॅस्थेनिसने लिहिलेला इंडिका हा ग्रंथ, फिलिपच्या मंत्र्याकडील नोंदी आणि अलेक्झांडरच्या पत्रांचा तो संदर्भ म्हणून वापर करतो.

टोलेमीच्या संदर्भांवर त्याचा सर्वात अधिक विश्वास आणि याचे कारण देताना एरियन म्हणतो की टोलेमी हा लहानपणापासून अलेक्झांडर सोबत वाढलेला, त्याच्या सोबत राहिलेला, स्वारीवर गेलेला आणि याहूनही महत्त्वाचे असे की टोलेमी पुढे स्वतः सम्राट झाला. अशा परिस्थितीत त्याने काही खोटे लिहून ठेवणे म्हणजे स्वतःच्या नावाला बट्टा लावून घेण्यासारखे आहे. टोलेमीने अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इतिहास लिहिला. तो लिहिण्याची त्याच्यावर जबरदस्ती नव्हती किंवा जे घडले त्यापेक्षा वेगळे लिहून त्याला त्यातून काही बक्षीस किंवा उत्पन्न मिळणार नव्हते. अशाच कारणांसाठी ऍरिस्टोब्युलसही एरियनला विश्वासार्ह वाटतो.

अर्थातच, एरियनच्या अभ्यासातील त्रुटी दाखवणारे निबंध आहेत परंतु अलेक्झांडरच्या इतिहासाचा सबळ स्रोत म्हणून आजही एरियनकडेच पाहावे लागते. त्याचे लेखन आज इतक्या कालावधीनंतर शाबूत असणे ही सर्वात महत्त्वाची बाब.

दुसर्‍या भागात युद्धाचे त्रोटक वर्णन केले आहे. या युद्धातील एरियनने दिलेले मनुष्यबळ किंवा मनुष्यहानी यांच्या आकड्यांविषयी अनेकांना शंका वाटते. किंबहुना, एरियनला स्वतःलाही शंका वाटते म्हणून तो टोलेमीवर विश्वास प्रकट करतो. मीही केवळ एरियनचे संदर्भ वाचून आकडे दिले आहेत. ते योग्य आहेत असा दावा नाही.



काही संदर्भः

टोलेमी - हा अलेक्झांडरचा लहानपणीपासूनचा मित्र. टोलेमी हा अलेक्झांडरचा अनौरस सावत्र भाऊ असावा असा अंदाज बांधला जातो. अलेक्झांडरच्या सर्व स्वार्‍यांत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याचे जे ४ मोठे भाग झाले त्यात टोलेमीने इजिप्तचे राज्य हस्तंगत केले. टोलेमीने अलेक्झांडरच्या स्वार्‍यांचा विस्तृत इतिहास लिहून ठेवला.

ऍरिस्टोब्युलस - अलेक्झांडरचा मित्र आणि विश्वासू. सैन्यात स्थापत्यशास्त्री किंवा अभियंता असे त्याचे पद होते. त्याने अलेक्झांडरला अनेक स्वार्‍यांत सोबत केली आणि इतिहासही लिहून ठेवला.

नीअर्कस - अलेक्झांडरचा सेनापती. भारतीय युद्धात त्याचा समावेश होता. भारताबद्दल त्याने लिहून ठेवलेल्या नोंदींचा एरियनने आपल्या इंडिका या ग्रंथात उपयोग केला.

मेगॅस्थेनिस
- चंद्रगुप्ताच्या दरबारातील सेल्युकस निकेटरचा राजदूत. त्यानेही भारतावर इंडिका हा ग्रंथ लिहिला होता.

कॅलिस्थेनिस - हा ऍरिस्टॉटलचा नातू. त्याने अलेक्झांडरवर लिहिलेला इतिहास हा इतिहास कमी आणि भाटगिरी अधिक प्रकारचा आहे. मात्र अलेक्झांडरने पर्शियन रीतीरिवाजांचा स्वीकार केल्यावर कॅलिस्थेनिसची भाषा बदलते. बहुधा यावरूनच त्याचे आणि अलेक्झांडरचे संबंध बिघडले आणि त्याला राज्यद्रोहाच्या आरोपांखाली तुरुंगात टाकण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.

ऑलिवर स्टोनच्या चित्रपटात वर्णन केलेला प्रसंग असा दिसतो.



चित्र क्र. १ विकीपिडीयावरून घेतलेले असून चित्र क्र. २ allmovietrivia.info येथून घेतले आहे.

भारतीय स्वारीचा वृत्तांत

एरियनच्या मते सिंधू नदी ही भारतातील महत्त्वाची नदी होय. त्याला गंगा नदीचीही माहिती आहे परंतु भारतात प्रवेश करतेवेळी सिंधू ही विस्तृत नदी लागत असल्याने किंवा अलेक्झांडर गंगेपर्यंत न पोहोचल्याने सिंधू नदीच त्याला महत्त्वाची वाटणे साहजिक आहे. सिंधू नदी ही नाइल आणि युफ्रेटिसपेक्षाही अधिक गाळ-माती वाहून नेते, तिला चांगला वेग आहे असे एरियन म्हणतो. सिंधू नदीचा वेग आणि खोली पाहता ग्रीक सैन्याने इतक्या कमी वेळात कायमस्वरुपी पूल बांधला नसावा असे त्याला वाटते. तसे ठोस संदर्भ त्याला मिळत नाहीत म्हणून तो म्हणतो की होड्यांना होड्या जोडून, बहुधा त्या रश्शींनी एकत्र बांधून त्यावरून सैन्य नदी ओलांडून गेले असावे.

सिंधू नदी ओलांडून अलेक्झांडर तक्षशीलेला पोहोचल्यावर तेथे त्याचे मानाने स्वागत झाले. आजूबाजूच्या प्रदेशातील अनेक राजांनी कोणतीही खळखळ न करता शरणागती पत्करली. त्यात अभिसार हा झेलमच्या पलीकडल्या डोंगरी प्रदेशातील राजा आणि त्याचा भाऊ यांची गणती होते. (अभिसार हा कश्मीर प्रांतातील राजा असावा. ) दक्षराज नावाचा राजाही अलेक्झांडरला सामील झाल्याचे दिसते. इथे तक्षशीलेचा पाहुणचार स्वीकारून, ग्रीक प्रथेप्रमाणे खेळांचे आयोजन करून आणि जनावरांचे बळी देऊन पूजा करून अलेक्झांडर झेलमच्या दिशेने पुढे निघाला. हे करताना त्याने शरणागत तक्षशीलेत आपला प्रांताधिकारी (व्हॉइसरॉय) नेमला आणि जखमी सैनिकांना सुश्रूषेसाठी मागे ठेवले. एव्हाना सुमारे पाच हजारी भारतीय सेना त्याला सामील झाली होती.

अलेक्झांडरच्या आगमनाची खबर लागल्याने झेलमच्या पैलतिरावर पुरुची सेना जमली होती. अलेक्झांडरला झेलम ओलांडू न देता, किंबहुना, तो त्या प्रयत्नांत असताना त्यावर हल्ला करायचा अशी पुरुची रणनीती होती. अलेक्झांडरने झेलम किनारी आपला तळ ठोकला. पैलतिरावर पुरुची प्रचंड सेना आणि हत्ती उभे ठाकलेले दिसत होते. पुरुने जेथून जेथून नदी पार करणे सहज शक्य आहे तेथे तेथे आपले तळ ठोकले होते. अलेक्झांडरच्या हे लक्षात आल्यावर त्याने सैन्याच्या लहान फळ्या करून सर्व बाजूने पसरण्याचा आदेश दिला. असे केल्याने पुरू चकीत होईल आणि आपली निश्चित निती पुरुला कळून येणार नाही असे त्याला वाटले पण पुरू सावध होता. अलेक्झांडरने सिंधू नदीत पुलासाठी वापरलेल्या आपल्या होड्या झेलमपाशी मागवल्या. हे करताना त्याने त्यातील मोठ्या होड्या कापून त्यांच्या लहान होड्या बनवाव्यात अशी सूचना दिली. ती अंमलात आणून मोठ्या होड्यांचे दोन किंवा तीन तुकडे करण्यात आले.

समोरासमोरून झेलममध्ये घोडे टाकून नदी पार करणे अलेक्झांडरला शक्य नव्हतेच. एकतर पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी दुथडी भरून वाहत होती आणि पुरुचे हत्ती समोर तयार होते. घोडे पाण्यात शिरल्यावर या हत्तींनी त्यांच्यावर चाल केली असती आणि ग्रीक सैन्याची तेथेच धूळधाण उडाली असती हे अलेक्झांडर जाणून होता. त्याने आपण पावसाळा संपून थंडी सुरू झाल्यावरच हालचाल करू अशी अफवा पसरवली परंतु या अफवेचा पुरुच्या सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही. नंतर अलेक्झांडरने वेगळी निती अवलंबली. ती म्हणजे, रात्रीच्या पोटात त्याने आपले थोडे घोडदळ नदीच्या वेगवेगळ्याठिकाणी पसरवणे पण मोठमोठ्याने प्रचंड आवाज आणि गाजावाजा करणे सुरू केले. असे केल्याने पुरुला वाटावे की अलेक्झांडर स्वारीला सज्ज झाला आहे आणि त्याचे सर्व घोडदळ नदी ओलांडायच्या प्रयत्नात आहे म्हणून त्यानेही आपले सैन्य त्या दिशेने पाठवावे आणि त्यामुळे अलेक्झांडरला मूळ ठिकाणी नदी पार करता यावी. परंतु पुरुला हा कावा कळून आल्याने ही नितीही फसली.

लवकरच अलेक्झांडरला सुगावा लागला की त्याच्या सैन्यतळापासून सुमारे १७ मैलांवर झेलम नदीत एक बेट आहे. तिथे नदी थोडी उथळ होते आणि बेटाच्या आडोशाने नदी ओलांडणे सोपे आहे. पुरुच्या नजरेसमोरून सैन्य हलवणे सोपे नव्हते. अलेक्झांडरने हळूहळू त्याचे अंगरक्षक, काही सेनापती आणि काही चिवट सैनिकांची फळी बाजूला काढली आणि मागे नेली. क्रेटेरस या आपल्या सेनापतीच्या आधिपत्याखाली मुख्य सैन्य ठेवून त्याने स्वतः लहान फळीचे नेतृत्व केले. किनाऱ्यापासून बरेच अंतर ठेवून ही फळी पुढे सरकू लागली. सिंधू नदीतून आणलेल्या ३० वल्ह्यांच्या होड्यांचे तीन तुकडे करण्यात आले होते. हे तुकडेही या फळीसोबत पाठवण्यात आले. झेलम काठच्या दाट झाडीचा उपयोग त्यांना आडोशासाठी झाला. झेलमच्या त्या बेटामागे ईप्सित स्थळी पोहोचण्याच्या आदल्या रात्री विजांचा चकचकाट आणि गडगडाट होऊन वादळी पाऊस झाला. या पावसामुळे पुरुचे सैन्य गाफील राहिले आणि अलेक्झांडरच्या सैन्याला सुखरूप वाटचाल करण्यास जागा मिळाली.

बेटापलीकडून सैन्य जेव्हा नदीत उतरले तेव्हा नदी उथळ असूनही झालेल्या पावसाने भरून वाहत होती. छातीपर्यंत येणाऱ्या पाण्यातून वाट काढत सैन्याने आगेकूच केली. हे करताना बेटालाच दुसरा किनारा समजून सैन्य बेटावर जमा झाले पण लवकरच चूक कळल्याने त्यांनी पुन्हा किनाऱ्याकडे वाटचाल सुरू ठेवली. या सैन्यात पर्डिकस, कोएनस आणि सेल्युकसचा समावेश होता. पुरुला ही बातमी कळताच त्याने आपल्या मुलाला सैन्यानिशी अलेक्झांडरचा सामना करण्यास पाठवले. येथील युद्धात नेमके काय झाले याबाबत एरियन साशंक दिसतो परंतु टोलेमीच्या संदर्भांवर तो अधिक विश्वास ठेवतो. टोलेमीच्या संदर्भाप्रमाणे १२० रथ आणि दोन हजारांचे घोडदळ घेऊन पुरुपुत्र अलेक्झांडरचा पाडाव करण्यास रवाना झाला. परंतु अतिवृष्टीमुळे चिखल झाला होता त्यात रथ रुतले आणि गोंधळ झाला. येथे पुरुला अलेक्झांडर स्वतः नदी पार करण्याचे वेडे साहस करेल अशी कल्पना नव्हती. अशा गदारोळात पुरुच्या मुलाचा पराभव झाला.

पुरुपुत्राला अलेक्झांडरच्या सैन्याने कापून काढले आणि पुरुच्या मुख्य तळाकडे मोर्चा वळवला. याचवेळी क्रेटेरसही नदीत उतरू लागला. पुत्राच्या मृत्यूची बातमी आणि दोन्ही बाजूंनी सरकणारे अलेक्झांडरचे सैन्य पाहून नेमकी कोणती युद्धनिती वापरावी हे पुरुला कळेना. शेवटी त्याने अलेक्झांडरच्या रोखाने सैन्य वळवण्याचे आदेश दिले. वळवलेल्या सैन्यात ३०, ००० चे पायदळ, ४००० चे घोडदळ, सुमारे ३०० रथ आणि २०० हत्ती होते. बाकीची सेना त्याने क्रेटेरसशी सामना करण्यासाठी ठेवली. जेथे चिखल झालेला नाही अशा ठिकाणी थांबून त्याने व्यूहरचना केली. या रचनेत हत्ती सर्वांत पुढे होते. या हत्तींना घाबरून शत्रूचे घोडदळ किंवा पायदळ पुढे सरकणार नाही असा पुरुचा अंदाज होता. हत्तींच्या मागे पायदळ होते. पायदळाला कोट करण्यासाठी बाजूने घोडदळ उभे केलेले होते. त्याच्या बाजूने रथ उभे होते. अलेक्झांडरचे घोडदळ पुरुपेक्षा मोठे होते परंतु हत्तींवर हल्ला करणे अशक्य होते त्यामुळे अलेक्झांडरने स्वतःच्या नेतृत्वाखाली उजवीकडून आणि कोएनसने डावीकडून हल्ला चढवला. तसेच ग्रीक तिरंदाजांनी हत्तीच्या माहुतांचा वेध घेण्यास सुरुवात केली. पलीकडून क्रेटेरसनेही पुढे सरकण्यास प्रारंभ केला. अनेक दिशांनी झालेल्या हल्ल्यांमुळे पुरुचे सैन्य अडचणीत सापडले. हत्ती बिथरून मागे फिरले आणि पुरूच्या सैन्याला चिरडून जाऊ लागले. ग्रीक सैन्याने यानंतर चोहोबाजूंनी हल्ला चढवला. या युद्धात पुरूचे बरेचसे घोडदळ मारले गेले आणि अगदी क्षुल्लक पायदळ जिवंत राहिले.

एरियनच्या सांगण्यावरून भारतीयांचे सुमारे २०,००० च्या आसपास पायदळ आणि ३ हजारांच्या आसपास घोडदळ युद्धात कामी आले. रथांची मोडतोड झाली. पुरुचे दोन पुत्र कामी आले. पुरुचे सर्व सेनापती, युद्धभूमीवरील प्रांताधिकारी, अनेक माहुत वगैरे कामी आले. अलेक्झांडरच्या सैन्यातील कामी आलेल्यांची संख्या मात्र एरियन अतिशय क्षुल्लक (काही शेकड्यांत) देतो. या गणितात एरियनचे काहीतरी निश्चितच चुकलेले आहे हे सहज लक्षात येते. तज्ज्ञांच्या मते टोलेमीचे संदर्भ एरियन वापरतो. यापेक्षा ऍरिस्टोब्युलसचे संदर्भ खरे वाटतात.

एरियन पुढे म्हणतो की अलेक्झांडर तीक्ष्ण नजरेने पुरुवर लक्ष ठेवून होता. आपल्या सैन्याचा पराभव होतो आहे हे कळून चुकल्यावरही पुरू माघारी फिरला नाही. तो आपल्या सैन्यासह शौर्याने लढत राहिला. सैन्य माघार घेते म्हटल्यावर काढता पाय घेणाऱ्या पर्शियाचा सम्राट दरायुषसारखा पुरू नाही हे लक्षात आल्याने अलेक्झांडरच्या मनात या राजाविषयी आदर निर्माण झाला. सरतेशेवटी पुरुच्या उजव्या खांद्याला मोठी जखम झाली आणि त्याचा हत्ती माघारी फिरला. अलेक्झांडरने हे पाहिल्यावर तत्काळ हुकूम सोडले की माघारी फिरणाऱ्या पुरुला कुणीही अधिक इजा पोहोचवू नये. पुरुशी वाटाघाटी व्हाव्यात म्हणून त्याने तक्षशीलेचा एक घोडेस्वार पुरुच्या हत्तीच्या दिशेने पाठवला. घोडेस्वाराने पुरुचा हत्ती गाठला तसे त्याला पाहून पुरुचा राग उफाळून आला आणि त्याने पुन्हा शस्त्र उचलले परंतु बरीच विनवणी केल्यावर तो शरण येण्यास तयार झाला.


पुरुरवा

पुरुरवाचा नेमका वंश इतिहासात नमूद नाही. त्याचे राज्य झेलमच्या पूर्वेला पसरलेले होते त्यावरून तो पूर्व पंजाबातील राजा मानला जातो. तक्षशीलेच्या राजा अंभीशी त्याचे शत्रुत्व असल्याने अलेक्झांडर तक्षशीलेस पोहोचला असता त्याला नजराणे पाठवण्याची किंवा मैत्रीचा हात पुढे करण्याची तसदी त्याने घेतलेली नव्हती. उलट, अलेक्झांडर पूर्वेला कूच करेल या अंदाजाने त्याने सैन्याची जमवाजमव केली होती. पावसाळा आणि ग्रीकांना हत्तीशी लढण्याचा अनुभव नाही या अंदाजांवर तो गाफील राहिला आणि ग्रीक सैन्याने संधी साधली. लढाईत पुरुच्या सैन्याची संख्या पाहिली (एरियनने ती वाढवून-चढवून सांगितली नसेल तर) तर तो कुणी मोठा राजा असावा असा अंदाज बांधता येतो. त्याच्या बाजूने इतर कोणते राजे लढले हे कळत नाही. त्याचे प्रमुख सेनापती कोण होते ते कळत नाही.

एरियन पुरुचे वर्णन करताना त्याची उंची "पाच क्युबिट" होती असे म्हणतो. यावरून पुरु सुमारे ६ फुटांपेक्षा अधिक उंच असावा असे वाटते. त्याचे दोन पुत्र युद्धात कामी आले यावरून तो किमान मध्यमवयीन असावा असे दिसते. एरियनच्या सांगण्यावरून पुरू दिसायला अतिशय रुबाबदार असून शरणागत पुरू अलेक्झांडरला भेटायला आला असता त्याच्या चेहऱ्यावर भीती किंवा पराभव दिसत नव्हता. ते पाहून ग्रीक सैन्य अचंबित झाले. पुरुला येताना पाहून अलेक्झांडर स्वतः सैन्याच्या पुढे जाऊन स्वागतासाठी उभा राहिला. अलेक्झांडरने स्वतःहून बोलायला सुरुवात केली आणि पुरुला प्रसिद्ध प्रश्न विचारला.

"राजा, मी तुला कसे वागवू? " पुरुने बाणेदार उत्तर दिले, "हे अलेक्झांडर, मला राजासारखेच वागव. "
यावर अलेक्झांडर उत्तरला, " मी माझ्या मनाच्या समाधानासाठी तुला राजासारखेच वागवेन पण तू तुझे समाधान व्हावे म्हणून काहीतरी माग. "
त्यावर पुरू म्हणाला, "मी प्रथमतः जे मागितले त्यातच सर्व आले. "

अलेक्झांडरने पुरुला त्याचे जेवढे राज्य होते ते मानाने परत करून राज्याचे क्षत्रप बनवले तसेच कश्मीरचा भागही पुरुच्या आधिपत्याखाली दिला.

---------


या युद्धातील अलेक्झांडरच्या हानीची संख्या एरियनने दिलेल्या आकड्यांपेक्षा बरीच अधिक असावी. ग्रीक सैन्याला भारतीय भूमीवर युद्ध लढायचा अनुभव नसणे, पावसाळी वाईट हवामान, हत्तींचा सैन्यातील समावेश वगैरेंने त्रस्त होऊन त्यांनी कोएनसतर्फे परतण्याची विनंती अलेक्झांडरला केली. ती नाराजीने का होईना अलेक्झांडरला मानावी लागली. या युद्धानंतर (किंवा युद्धात) झालेला ब्युसाफलसचा मृत्यू वगैरे अलेक्झांडरचा निग्रह तोडण्यास हातभार लावून गेले असावेत.


अलेक्झांडर आणि पुरुच्या लढाईत अलेक्झांडर ऐवजी पुरुचाच विजय झाला असे तर्क अनेकांनी मांडलेले आढळतात. या तर्कांना अद्यापतरी तज्ज्ञांच्या लेखी अधिष्ठान मिळालेले नाही परंतु लढाईत पराभव होऊनही स्वतःचे राज्य परत मिळणे, सोबत दुसरे राज्यही पदरात पडणे, ज्या परदेशी सम्राटाने विजय मिळवला त्याचा त्या राज्यात/ देशात स्थायिक होण्याचा हेतू नसणे, इथपासून अलेक्झांडरचे माघारी फिरणे, पुढील काही वर्षांत त्याचा मृत्यू इ. मधून पुरुचा पराभव झाला तरी अंतिम विजय पुरुचाच झाला असे वाटणे शक्य आहे असे वाटते.
---------


वरील लेखात विस्तार भयास्तव युद्धाचे वर्णन त्रोटक केले आहे. हा लेख लिहिताना एरियन खेरीज इतर कोणत्याही इतिहासकाराचे भारतीय युद्धाविषयक संदर्भ तपासलेले नाहीत. लेखासंबंधात प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांतून देता येतीलच. वाचकांकडे अधिक माहिती असल्यास अवश्य पुरवावी. एरियनने लिहिलेला अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्तांत गूगलबुक्स वरून उतरवून घेता येईल.

लेखातील चित्रे विकीपीडीयावरून घेतली आहेत.

1 comment:

भानस said...

अभ्यासपूर्ण लेख. आवड व मेहनत स्पष्ट दिसून येते. आवडला. अजून बाकीच्याही पोस्ट वाचते आहे. :)