Tuesday, May 24, 2011

सतीची प्रथा आणि अकबर

भारतातील सतीची जुलमी प्रथा बंद करण्याचे श्रेय लॉर्ड बेंटिंक आणि राजा राममोहन रॉय यांना दिले जाते परंतु त्याआधी हजारो वर्षे चालत आलेल्या या प्रथेला कोणाही कनवाळू माणसाने विरोध केला नाही हे पटणे थोडे कठीण वाटते. शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सती जाण्यापासून रोखल्याचे, तसेच मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला, अहिल्येला सती जाण्यापासून रोखल्याचे वाचायला मिळते परंतु तसा कायदा करणे किंवा इतरांच्या स्त्रियांची या जुलमातून मुक्तता करण्याचे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अकबराबद्दल जे वाचनात आले ते येथे देते.

मध्यमवयाकडे झुकणार्‍या अकबराला सुफी पंथ, पारशी आणि जैन धर्मांविषयी गोडी लागली होती. हिंदू आणि ख्रिश्चन धर्माकडेही त्याचा ओढा वाढला होता. अनेक धर्मीयांशी होणार्‍या वादविवाद चर्चांतून त्याच्यात हळूहळू बदल होत गेले. त्यातील काही बदल म्हणजे त्याने मांसाहार सोडला. राज्यातील शिकारींवर निर्बंध आणले, जनावरांची कत्तल करण्यावर निर्बंध आणले. ते इतके की वर्षातील अर्धे दिवस पाळीव जनावरांची (गाई-बैल, म्हशी, घोडे इ.) कत्तल होत नसे.

खालील गोष्ट घडली तेव्हा अकबराने चाळीशी पार केलेली होती. एके दिवशी अकबर आपल्या राणीवशात (बहुधा हिंदू राणीच्या) झोपला असता सकाळच्या प्रहरी बायकांची कुजबूज त्याच्या कानी पडली. त्याने उठून चौकशी केली असता कळले की राजा भगवानदासाच्या कुटुंबातील एक स्त्री सती जात आहे. अंबेरचे राजा भगवानदास हे मोठे प्रस्थ होते. त्याच्या बहिणीचा विवाह खुद्द अकबराशी झाला होता आणि त्याचा मुलगा मानसिंग अकबराचा प्रमुख सेनापती होता. त्यांच्या कुटुंबात सती जात आहे असे कळल्यावर राणीवशात चलबिचल होणे साहजिक होते. अधिक चौकशी करता अकबराला कळले की -
जयमल नावाचा राजा भगवानदासाचा एक भाऊ होता. त्याची रवानगी बंगाल, बिहार, ओरिसाच्या क्षेत्रात लढाईसाठी झाली होती परंतु भर उन्हाळ्यात घोडेस्वारी करताना तो बिहारमध्ये उष्माघाताने आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याची बायको राव उदयसिंग या मारवाडच्या राजाची मुलगी होती. तिच्यावर सती जाण्यासाठी दडपण येत होते. सती जाण्यास तिची तयारी नव्हती परंतु घरच्यांनी तिला तिच्या संमतीशिवायही सती जाण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेतला होता. यात खुद्द तिच्या मुलाचा समावेश होता.

अकबराच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर तो तिरमिरीने उठला आणि तडक घोड्यावर बसून सतीच्या चितेपाशी पोहोचला. बादशहा असा तिरमिरीने निघाला ही खबर कळताच त्याचे अंगरक्षकही घाईघाईने त्याच्या मागोमाग गेले. सुदैवाने, अकबर वेळेत पोहोचला आणि बादशहा आणि त्याच्यामागे आलेले सैनिक पाहून सतीची मिरवणूक थांबली. जबरदस्तीने त्या बाईला सती जाण्यास भाग पाडणार्‍यांची डोकी उडवावी अशी इच्छा झाल्याचे अकबराने नंतर व्यक्त केले परंतु प्रत्यक्षात तसे केले नाही. मिरवणूकीतील सर्वांना अटक मात्र झाली आणि काही काळ बंदीवास दिल्यानंतर त्यांची सुटका झाली.

या घटनेच्यावेळी राज्यात सती जाऊ नये असा पूर्वीच केलेला कायदा होता की या घटनेनंतर तसा कायदा करण्याचा निर्णय अकबराने घेतला ते नेमके कळत नाही परंतु सतीप्रथेवर बंदी आणण्याचा कडक कायदा करणे त्याला शक्य झाले नसावे. याचे कारण पदरी असणार्‍या प्रमुख राजपूत सरदारांना नाराज करणे त्याला शक्य नसावे. तरीही, 'केवळ त्या बाईची संमती असेल तरच ती सती जाऊ शकते परंतु तिच्या संमतीविना तिला सती जाण्यास प्रवृत्त करू नये आणि तसे करणार्‍यांवर कारवाई केली जाऊ शकते' असा कायदा त्याने केला.

अबु'ल फझलच्या म्हणण्याप्रमाणे अकबराच्या राज्यात कोतवालाची जबाबदारी ही "नागरक" या हिंदुग्रंथातील मौर्यकालीन कोतवालाप्रमाणेच होती. त्यात त्याने ज्या इतर कायद्यांची भर केली त्यात सतीविरोधी कायदाही होता. त्यानुसार, कोतवालाने गावात हेर नेमायचे आणि या हेरांनी गावात काय चालते त्याची इत्यंभूत माहिती परत आणायची. यात एखाद्या बाईला तिच्या संमतीविना सती दिले जात असल्यास ती कृती थांबवायचे आदेश होते. जर स्त्री स्वखुशीने सती जात असेल तर त्या घटनेत विलंब आणण्याचे आणि त्या स्त्रीचे मन वळवायचे आदेश होते. वेळ गेला की त्या स्त्रीचा दु:खावेग आवरून ती मृत्यूपासून परावृत्त होईल असा अंदाज त्यामागे होता.

अकबराचा कायदा किती सफल झाला याची कल्पना नाही पण त्याच्या पश्चात जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब यांनीही या कायदा तसाच ठेवला. किंबहुना, औरंगजेबाच्या राज्यात सती प्रथेवर पूर्णतः बंदी होती. इतर कायद्यांमध्ये अकबराने विधवांना पुर्नविवाह करण्याची संमती दिली होती आणि विवाहानंतर गर्भदानाचे वय किमान १२ असावे अशी सक्तीही केली होती.

सतीच्या प्रथेविरोधी कायदा करणारी अकबर ही बहुधा पहिली व्यक्ती असावी.

याच पार्श्वभूमीवर यापूर्वी १५६८मध्ये अकबराच्या स्वारीत चित्तौडला झालेला ३०० स्त्रियांच्या जौहाराची आठवण होणे साहजिक आहे. तो पाहून अकबराचे मन हेलावल्याचे संदर्भ पाहण्यास मिळत नाहीत. परंतु सम्राट अशोकाप्रमाणेचत्यावेळी अकबराला उपरती आणि साक्षात्कार झालेले नव्हते हे ही खरे.

संदर्भः अकबर द ग्रेट मोगल - विन्सेंट स्मिथ.

1 comment:

Unknown said...

प्रियभाषिणी,

फार सुंदर कथा आहे आणि तुम्ही ती फार समर्पक तर्‍हेने मांडलीत... अभिनंदन

कौशल श्री. इनामदार