अंश ईश्वराचा
मानव रानटी अवस्थेत असतानाही त्याला एक गोष्ट नेमकी आणि लवकरच कळून आली असावी ती म्हणजे एक एकटे राहण्यापेक्षा टोळी बनवून राहणे फायद्याचे आहे. ही गोष्ट त्याला रानटी अवस्थेत असताना कळली की कपिवस्थेत याबद्दल विशेष माहिती नाही पण त्याचे नेमके फायदे तोटे मनुष्यावस्थेत कळले असे मानू. आपला गट निर्माण केला की एकत्रितरीत्या शत्रूवर चाल करून जाणे सोपे पडते, स्वतःचे आणि आप्तजनांचे रक्षण करता येते, शिकार करणे सोपे जाते या गोष्टी त्याच्या ध्यानात आल्या असाव्या. टोळी जसजशी मोठी होत गेली तसतसे टोळीत अंतर्गत कटकटीही निर्माण झाल्या असाव्यात आणि मग त्या टोळीला शिस्त लावण्यासाठी, तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोळीतील शक्तीने आणि बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडे त्या टोळीचे नेतृत्व आले असावे. नगरे स्थापन झाल्यावर आणि टोळ्यांची व्याप्ती वाढल्यावर याच टोळीप्रमुखाचा राजा झाला.
आयसीसच्या रूपातील क्लिओपात्रा |
जगातील बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये अशाप्रकारे राजाला किंवा टोळीप्रमुखाला ईश्वरी अंश, देवाचा पुत्र किंवा साक्षात भगवंत मानण्याची प्रथा आहे. आपल्या महाकाव्यांचा विचार करता त्यातील कोणतेही महापुरुष मानवी नाहीत असे दिसून येईल. कथेतील मुख्य पात्रांचे चमत्कारिक जन्म, पुनर्जन्म, अवतार वगैरे गोष्टी सदर पात्रे सामान्य मनुष्यापेक्षा वेगळी आणि वरचढ होती हे दाखवण्यासाठी केलेला आढळतो. महाभारतातील जवळपास सर्व पात्रांचे जन्म चमत्कारिक आहेत. या पात्रांना दैवी गुण चिकटवलेले आहेत. याचप्रमाणे, इलियडचा विचार केला तरीही अशाचप्रकारचे संदर्भ आढळतात. इतरत्र इतिहासात डोकावले तर इजिप्तमध्ये राजाला देव मानण्याची प्रथा आढळते. राजा (फॅरो) हा होरस हा देवाचा पुनर्जन्म मानला जाई. इजिप्तची प्रसिद्ध फॅरो क्लिओपात्राने स्वतःला इजिप्शिअन देवता आयसीस म्हणून घोषित केले होते. तिच्या आयसीसच्या रूपातील प्रतिकृती आढळतात. चीनमध्ये राजा हा स्वर्गपुत्र असल्याचे मानले जाई, रोमन संस्कृतीत राजाला देव मानण्याची प्रथा होती, इंका संस्कृतीही राजाला देव मानत असे आणि अशा अनेक संस्कृतीत राजाला अमानवी गुणांचा धनी बनवल्याचे दिसून येईल.
अलेक्झांडर द ग्रेट हा झ्यूसचा पुत्र आहे हे स्वतः त्याची आई सांगत असे आणि तो पद्धतशीर प्रचार होता. पुढे सिवाच्या चेटक्याने अलेक्झांडर हा अमुनचा मुलगा असल्याचे म्हटले पण ग्रीकांनी तो झ्यूसचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले अशी अलेक्झांडरच्या गोटातून बतावणी केली गेली. रोमन सम्राट ऑगस्टसला देव म्हणून घोषित करण्यात आले होते. गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला पोटी अद्वितीय पुत्र जन्म घेतो आहे असे स्वप्न पडल्याचे सांगितले जाते. अशोकाच्या शिलालेखात देवांना प्रिय या विशेषणाचा सातत्याने वापर केलेला दिसतो. हुमायूनलाही स्वप्नातून आपल्याला अद्वितीय पुत्र होणार आहे हे कळून चुकले होते. अकबरावर सलीम चिश्तीची कृपादृष्टी असल्याच्या आणि शिवाजीराजांनाही भवानीचा दृष्टांत झाल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.रामदासांनी राजांबद्दल लिहिलेल्या या ओळी बोलक्या आहेत -
धर्मस्थापनेचा हव्यास। तेथेची वसे।।
होमरचे दैवतीकरण |
अशाचप्रकारच्या दैवतीकरणाचा उल्लेख डॅन ब्राऊनच्या लॉस्ट सिंबलमध्ये अनेकांनी वाचला असेल. जॉर्ज वॉशिंग्टनच्या मृत्यूपश्चात त्याचे दैवतीकरण यू. एस. कॅपिटल बिल्डिंगच्या रोटुंडाच्या छतावर दिसते. याला ऍपॉथिओसिस ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन (apotheosis of George Washington) म्हणून ओळखले जाते. दैवतीकरणाची ही पद्धत अर्थातच ग्रीक किंवा रोमनांची. टायटसच्या प्रसिद्ध कमानीच्या छतावर (The Arch of Titus, बांधकामः सुमारे इ. स. ८१) सम्राट टायटसचे दैवतीकरण दिसते. इलियड आणि ओडिसीचा निर्माता महाकवी होमर याच्या दैवतीकरणाचे प्राचीन शिल्पही उपलब्ध आहे. कॉन्स्टंटिनो ब्रुमिडी या इटालियन चित्रकाराने १८६५ मध्ये यू. एस. कॅपिटल बिल्डिंगच्या छतावर ही चित्रकारी केली. सन १८६२ मध्ये हे चित्र काढण्याची परवानगी मिळाल्याचे कळते. ही परवानगी यू. एस. कॅपिटॉल बिल्डिंगचा प्रमुख स्थापत्यशास्त्रज्ञ थॉमस वॉल्टरकडून ब्रुमिडीला मिळाल्याचे कळते. याआधी १८६०मध्येही एका जर्मन चित्रकाराने वॉशिंग्टनच्या दैवतीकरणाचे पेंटिंग तयार केले होते. या चित्राचा पगडा कॅपिटॉल बिल्डिंगीतील चित्रावर असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. जॉर्ज वॉशिंग्टनला अमेरिकेच्या राष्ट्रपित्याचा दर्जा या आधी अनेक वर्षे मिळालेला होता. त्याची लोकप्रियता मृत्यूनंतरही वाढत गेली. याचा फायदा घेण्यासाठी हे चित्र तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. ब्रुमिडीला महिना दोन हजार डॉलर्सच्या तनख्यावर हे चित्र काढण्याची परवानगी मिळाली. तयार झालेले चित्र अनेकांच्या पसंतीस पडले हे वेगळे सांगायला नको. आधुनिकतेचा मानदंड हाती घेऊन वावरणाऱ्या अमेरिकेचा पहिला देव जॉर्ज वॉशिंग्टन मानला जावा ही इच्छा प्रकट करण्यात हे चित्र सफल झाल्याचे दिसते.
जॉर्ज वॉशिंग्टनचे दैवतीकरण
वॉशिंग्टनच्या दैवतीकरणाच्या या एका चित्रात एकूण सात दृश्ये आहेत. मध्यभागी १३ कुमारिकांसह जॉर्ज वॉशिंग्टन स्वर्गारोहणासाठी तयार झालेला दिसतो. १३ कुमारिका अमेरिकेच्या तत्कालीन १३ वसाहती दाखवतात. वॉशिंग्टनच्या डोक्यावर E Pluribus Unum (विविधतेत एकता) हे अमेरिकेचे घोषवाक्य दिसते. वॉशिंग्टनच्या चित्रासभोवताली इतर ६ चित्रे दिसतात आणि ही सर्व चित्रे प्रगतिशील अमेरिकेत होणारे दैवतीकरण दर्शवतात.
युद्ध - केंद्रभागातील वॉशिंग्टनच्या पायथ्याशी दिसणाऱ्या या चित्रात अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता कोलंबिया शत्रूचा नि:पात करताना दिसते. तिच्यासह अमेरिकेचा राष्ट्रपक्षी गरूडही दिसतो.
विज्ञान - मिनर्वा ही बुद्धी आणि कलेची रोमन देवता. ती या चित्रात अमेरिकेचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलीन, रॉबर्ट फुल्टॉन आणि सॅम्युएल मोर्स यांना बहुधा विद्युतजनित्राबाबत महत्त्वाचे सल्ले देत आहे. मिनर्वा हे ग्रीक देवता अथीनाचे रूप. वॉशिंग्टन डिसीच्या शहरात इतत्रही ती अनेकदा दिसून येते.
नौधन(सागरी)- समुद्राचा रोमन सम्राट नेपच्यून या चित्रात दिसतो. तसेच समुद्रातून प्रकट झालेली प्रेमाची रोमन देवता वीनसच्या हाती 'ट्रान्सअँटलांटीक टेलेग्राफ केबल' दिसते. या केबलद्वारे अमेरिका आणि युरोपचा संपर्क साधण्याचे प्रयत्न १८५७ ला सुरू झाले होते.
वाणिज्य - मर्क्यूरी हा रोमन व्यापाराचा आणि अर्थकारणाचा देव येथे रॉबर्ट मॉरिस या अमेरिकन व्यापारी आणि राजकारण्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मदतीसाठी सोन्याने भरलेली पुरचुंडी देताना दिसतो.
यांत्रिकी - या चित्रात वल्कन हा लोहारांचा रोमन देव स्टीमबोट आणि तोफांच्या बांधणीवर काम करताना दिसतो.
शेतकी - सेरेस ही रोमन पीक पाण्याची देवता सायरस मॅकॉर्मिक या प्रसिद्ध अमेरिकन शेतकऱ्याने तयार केलेल्या पीक कापणी यंत्रावर आरूढ दिसते.
चित्राविषयी याहून अधिक माहिती आंतरजालावर शोधल्यास सहज उपलब्ध आहे. ज्यांना फ्रीमेसनरीच्या कॉन्स्पिरसी थिअरीत रुची आहे त्यांच्यासाठी थॉमस वॉल्टर, १८६५ मधील अमेरिकन अध्यक्ष अँड्र्यू जॉनसन हे दोघे फ्रीमेसन्स होते. तत्पूर्वीचे अब्राहम लिंकन हे फ्रीमेसन नसले तरी सदस्यत्वासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता पण त्यांच्या मृत्यूमुळे ते फ्रीमेसन बनले नाहीत असे कळते. चित्रात दिसणारे बेंजामिन फ्रँकलिन हे फ्रीमेसन होते आणि अर्थातच जॉर्ज वॉशिंग्टन हे स्वतःही फ्रीमेसन होते.
अधिक माहिती:
वॉशिंग्टनचे दैवतीकरण
क्लिओपात्राचे आणि होमरचे चित्र विकिपिडीयावरून घेतले आहे.
2 comments:
माणूस काय होता, त्याचा प्रवास कसा झाला हे प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या कुवतीनुसार समजून घ्यायला पाहिजे असं वारंवार वाटतं.आपल्या अभ्यासपूर्ण लेखाने हा समज द्ढ केला.सगळ्याच क्षेत्रात या ईश्वराच्या अंशाने काय थैमान घातलंय हे आपण सगळेच बघतो आहोत.मानवांमधला ईश्वर बनणं सोपं आहे की नाही ते माहित नाही पण त्याचे फायदे मात्र अफलातून आहेत! असो! आपला ले़ख आणि अनुदिनी दोन्ही अप्रतिम आहेत.आभार!
Liked this post..
- Chintamani
Post a Comment