Tuesday, August 21, 2012

सिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल

श्री. चंद्रशेखर यांनी काही दिवसांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामागचे कोडे या लेखातून मॉन्सूनच्या पावसातील झालेल्या फरकांमुळे सिंधू संस्कृतीतील शहरांतून नागरिकांचे स्थानांतर झाल्याचे गृहितक मांडले होते. सिंधू संस्कृतीचा र्‍हास कसा झाला या विषयी अधिक रोचक संदर्भ या पुढेही मिळत राहतील आणि अधिक संशोधने होत राहतील पण चंद्रशेखर यांचा लेख माझ्या लक्षात राहिल तो खालील वाक्याने -

मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या.
हे एक वाक्य फारच रोचक वाटले. सिंधू संस्कृतीची लिपी ही खरेच लिपी आहे की नाही या विषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. याचे मुख्य कारण या लिपीचा अर्थ लावणे अद्याप शक्य झालेले नाही आणि लिपीचा अर्थ लावण्यासाठी ही लिपी मोठ्या प्रमाणात लिहिलेली आढळत नाही. या लिपीचा वापर करून लिहिलेली भूर्जपत्रे किंवा शिलालेख मिळालेले नाहीत. मुद्रांवर लिहिलेल्या त्रोटक लिपीतून अक्षर उकल होणे कठीण झाले आहे. सिंधू लिपीची वाढ शहरे नष्ट झाल्याने खुंटली. त्यानंतरच्या गंगा खोर्‍यातील संस्कृतींनी लेखनकलेवर लक्ष केंद्रित केले नाही. सिंधू लिपी नंतरची लिपी इ.स.पूर्व ५०० च्या सुमारास आढळते. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या र्‍हासानंतर सुमारे ६००-८०० वर्षे भारतीय उपखंडात लेखनकला वापरली जात नव्हती असे म्हणावे लागते. हा दावा किती खरा आणि किती खोटा ते पुढे पाहू. स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वदूर पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.
सुमेरियन कीलाकारी
सुमेरियन कीलाकारी
यापैकी पुनरुत्पादन प्रकाराला "नीलप्रत" (blueprint) असेही म्हटले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणून अनेक युरोपीय भाषांनी स्वीकारलेली रोमन लिपी. परंतु युरेशियातील ग्रीक, अरबी, अर्माइक, ब्राह्मी अनेक लिपींमध्ये आणि वर्णमालेमध्ये जो फरक जाणवतो त्यावरून येथे केवळ नीलप्रत न वापरता मूळ संकल्पनेत स्वतःच्या संस्कृतीला आणि भाषेला पूरक अशी नवी लिपी निर्माण केलेली दिसते. मनुष्य लेखनकलेच्या कित्येक वर्षे आधी भाषा बोलायला शिकला. ध्वनी, शब्द, त्यातील चढ-उतार, विराम, अखंडता, शब्दांची जोडणी, आकडे, मोजणी वगैरे प्रमाणित करून या ध्वनींना संवादाचे साधन बनवण्यासाठी माणसाने हजारो वर्षे घेतली असावी पण या सर्वासाठी त्याला लेखनाची गरज नव्हती. इथे माझ्या एका जुन्या लेखातील थॉथची कथा आठवते. ती पुन्हा येथे देते -
थॉथ हा कला आणि विद्येचा इजिप्शियन देव. त्याला नवनवीन कला शोधण्याचा छंद होता. आपले संशोधन तो अमुन या सर्वोच्च इजिप्शियन देवाला आणि संपूर्ण इजिप्तच्या राजाला नेऊन दाखवत असे आणि त्याची प्रशंसा प्राप्त करत असे. असाच एकदा थॉथला लेखनकलेचा शोध लागला. आपले नूतन संशोधन घेऊन थॉथ अमुनकडे गेला आणि उत्साहाने त्याने आपले संशोधन अमुनला सांगण्यास सुरुवात केली, “हे राजा, मी एक नवीन कला शोधली आहे. जी एकदा शिकून घेतली की समस्त इजिप्तवासी शहाणे होतील, विद्वान होतील आणि त्यांची स्मृती द्विगुणित होईल. या कलेद्वारे मी बुद्धिमत्ता आणि स्मृती यांवर अचूक तोडगा शोधला आहे.” यावर नेहमी थॉथची प्रशंसा करणार्‍या अमुनने काही वेगळेच उत्तर दिले, “हे थॉथ! एखाद्या कलेला जन्म देणारा हा ती कला फायद्याची आहे किंवा नाही हे उत्तमरीत्या ठरवू शकत नाही. ही पारख त्या कलेच्या वापरकर्त्यांनी करावी. आता, तू या लेखनकलेचा जनक असल्याने येथे तुझे पितृवत प्रेम बोलते आहे आणि ते सत्य परिणामांच्या विरुद्ध आहे. खरंतर, ही कला तिच्या अभ्यासकांना विस्मरणाचे दान देईल. जे ही कला शिकतील ते आपल्या स्मरणशक्तीचा उपयोग करणे सोडून देतील कारण ते लेखनावर/ लिखाणावर आपली श्रद्धा कायम करतील. या चिन्हा-खुणांच्या बाह्यज्ञानामुळे माणसे आपल्या हृदयातून निर्माण होणार्‍या अंतर्ज्ञानाला विसरतील. आपापल्यापरीने वाचन केल्याने ते त्यातून आपल्याला हवा तसा अर्थ काढतील. तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे. हे संशोधन ऐकवल्याने (वाचून दाखवल्याने) लोकांना एकाच गोष्टीचे अनेक अर्थ कळतील. त्यांना आपण ज्ञानी झाल्याचा भास होईल परंतु प्रत्यक्षात त्यांना योग्य गोष्ट कळेलच असे नाही.”
अमुनचे म्हणणे खरे-खोटे पाडण्याच्या भानगडीत न पडता या कथेतीलही एक महत्त्वाचे वाक्य उचलते ते म्हणजे "तुझे संशोधन स्मृती वाढवण्यात कोणतीही मदत करत नाही, फक्त नोंद ठेवण्याच्या कामी उपयोगाचे आहे." यावरून अमुनला लेखनकलेचे सर्व फायदे लक्षात आले नव्हते असे म्हणावे लागेल. कदाचित, थॉथची उपलब्ध लेखनकला हे फायदे दर्शवण्याइतपत समृद्ध नसावी. परंतु या कथेत आणि वास्तवात साम्य असे की माणसाने लेखनकलेचा पहिला वापर नोंदी ठेवण्यासाठीच केला असे दिसून येते. या नोंदी मानवी भावना, काव्य, कथा, इतिहास यांसाठी नव्हत्या. या विस्तृत संवादासाठी जी मौखिक परंपरा वापरली जात होती ती तत्कालीन संस्कृतींना पसंत होती. किंबहुना, लेखनकलेचा विकास होण्यापूर्वी संवादकलेत मनुष्याने इतकी प्रगती केली होती की चटकन तो संवाद लिपीबद्ध करणे त्याला शक्य नव्हते. पुढील हजारो वर्षे माणसाने चित्रलिपी, शब्दावयव, चिन्हे-अक्षरे, विरामचिन्हे यांवर खर्च करून विस्तृत लेखनासाठी उपयुक्त अशा लिपींचा विकास केला.

लेखनाचा प्रथम वापर हा लेखांकन प्रक्रियेसाठी आणि तत्सम नोंदी राखण्यासाठी केला जाऊ लागला. सुमेरियन मृत्तिकापट्ट्यांवर अशाप्रकारच्या नोंदी आढळतात. याशिवाय, तत्कालीन राजांच्या विजयांच्या नोंदी, पिक-पाण्याच्या नोंदी, व्यापार, हुद्दे, शिक्के आणि ओळख पटवण्यासाठी वगैरे लेखनाचा वापर होत होता. पुढे तो वापर दानपत्रे आणि प्रचार, कायद्याची अंमलबजावणी यासाठी होऊ लागला. वेगळ्या शब्दांत, लोकशिक्षण, गद्य-पद्य लेखन, मनोरंजन वगैरेंसाठी लेखनकला वापरली जात नव्हती त्यामुळे लेखनाचा वापर करणारे अतिशय मोजके होते आणि लेखनाची महती न कळलेले अनेक होते. आता या पार्श्वभूमीवर सिंधू लिपीकडे बघू. सिंधू लिपी हे सुमेरियन कीलाकारीचे सख्खे अपत्य मानण्याबद्दल तज्ज्ञांत मतभेद आहेत परंतु कीलाकारीच्या कल्पना विसरणातून सिंधू लिपी निर्माण झाली असावी याबाबत फारसे मतभेद दिसत नाहीत. म्हणजेच, सिंधू लिपी ही स्वतंत्र लिपी नसून ती सुमेरियन किंवा आजूबाजूच्या इतर संस्कृतींकडून उसनी घेऊन आकारास आणलेली आहे. एखाद्या संस्कृतीत एखादे नवे संशोधन झाले आणि त्या संस्कृतीने ते वापरात आणले की त्या पहिल्या संस्कृतीशी साधर्म्य साधणार्‍या किंवा तिच्या जवळपास प्रगती साधलेल्या इतर संस्कृती ते संशोधन स्वीकारतात किंवा आपल्या पथ्यावर पडेल असे बदल करून स्वीकारतात. या स्वीकार करण्यात अर्थातच अनेक निकष असतात. उदा. गरज, फायदे-तोटे, सांस्कृतिक आणि धार्मिक समज वगैरे. साधारणतः कल्पना विसरणाचे पाच भाग मानले जातात. ज्ञान, मनवळवणी, निर्णय, अंमलबजावणी आणि स्थायीकरण.


सिंधू लिपीतील शिक्का
सिंधू लिपीतील शिक्का
पहिले दोन भाग ज्ञान आणि मनवळवणी सहजगत्या उपलब्ध झाले नाहीत आणि नवे संशोधन स्वीकारण्याचा निर्णय झाल्यास मिळालेले ज्ञान किंवा संशोधन जसेच्या तसे वापरणे कठीण होऊ शकते पण अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले असल्यास मूळ संशोधनाला नजरेसमोर ठेवून एक समरुपी पर्यायी पद्धत निर्माण करता येते. सुमेरियन कीलाकारीवरून व्युत्पन्न झालेल्या अनेक लिपींमध्येही हेच साम्य दिसून येते आणि म्हणूनच शेजार्‍यांकडून स्वीकारलेल्या या लिपी जशाच्या तशा न स्वीकारता थोड्याफार फरकांनी किंवा अधिकच्या संकल्पनांची भरती करून स्वीकारल्या गेल्या. सिंधू संस्कृतीने लिपी स्वीकारायचे मुख्य कारण व्यापार हे असावे. मध्य आशियाई संस्कृतींशी व्यापार करताना त्यांना शिक्के, चलन, ओळखपत्रे यांवरून तेथील लिपीची ओळख झाली असावी. ही मर्यादित ओळख स्वीकारण्यामागे उद्देशही व्यापारात एकसूत्रता राहणे हा असावा. ज्या संस्कृती तगल्या, वाचल्या आणि फोफावल्या त्या स्थायी संस्कृतींनी लेखांकन, ओळखपत्रे, दानपत्रे यांच्या पुढे जाऊन लिपीमध्ये सुधार केले, नवे संशोधन केले, अक्षरओळख, वर्णमाला, स्वरनिश्चिती इ. मधून सुधारित लिपी जन्माला आली. सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामुळे या सुधारणांना खीळ बसली आणि सिंधू लिपी उत्क्रांत झाली नाही. काही तज्ज्ञांच्या मते सिंधू लिपीच्या खुणा ब्राह्मी लिपीत दिसतात पण याला म्हणावे तेवढे पुरावे देणे अद्याप जमलेले नाही त्यामुळे बहुतांश तज्ज्ञ ब्राह्मी लिपी ही अर्माइक लिपीवरून व्युत्पन्न झाल्याचे मानतात त्यालाच ग्राह्य धरलेले आहे. सिंधू लिपीनंतर ब्राह्मी लिपीच्या वापरापर्यंत सिंधू खोरे सोडून पूर्वेकडे वळलेली संस्कृती शेतजमीन, पशुपालन, शासन, सुव्यवस्था यांचा पुनर्विकास करण्यात व्यग्र झाली. या काळात मध्य आशियाशी असणार्‍या व्यापारावर परिणाम झाला असण्याची शक्यता वगळता येत नाही. एकंदरीत या सर्व स्थित्यंतरांमुळे सिंधू संस्कृतीत उदयाला आलेली लेखनकला खुंटली. असाच काहीसा प्रकार "लिनिअर बी" आणि ग्रीक या दोन लिपींच्या बाबत झाल्याचे दिसते. म्हणजे, भारतीय समाज या मधल्या काळात निरक्षर राहिला का? याचे उत्तर स्थलांतरित झालेल्या बहुतांश भारतीय समाजाने काही काळापुरता लेखनाला बाजूला सारले असेच द्यावे लागते आणि त्यानंतर लेखनाचे महत्त्व ध्यानात आल्यावर पुन्हा एकदा शेजार्‍यांकडून लिपी उसनी घेऊन तिला आपल्या समाजात रुळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना मूर्त स्वरूप येण्यास ६००-८०० वर्षांचा काळ लागला.
अशोककालीन ब्राह्मी शिलालेख
अशोककालीन ब्राह्मी शिलालेख
सिंधू संस्कृतींचे स्थलांतर न होते तर सिंधू लिपी उत्क्रांत होऊन सद्य भारतीय लिपींचा चेहरामोहरा वेगळा भासला असता. मात्र तसे न झाल्याने पुनश्च सेमेटिक लिपींशी संबंध आल्यावर कल्पना विसरणाच्या तत्त्वानुसार पुन्हा एकदा लेखनकलेला आपलेसे करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि ब्राह्मी, खारोष्टीच्या रुपाने भारतीय संस्कृतीत पुन्हा एकदा लेखनकलेच्या विस्तारास प्रारंभ झाला. या मधल्या काळात जी मूळ लिपी उसनी घेतली गेली ती उत्क्रांत झाल्याने (येथे अर्माइक) तिच्यावरून बेतलेल्या ब्राह्मीचा आणि त्या पुढील लिपींचा विस्तार झपाट्याने झाला आणि लेखन केवळ शिक्के, ओळखपत्रे, रेकॉर्ड किपिंग आणि प्रचार यापुरते सिमीत न राहता महाकाव्ये, पुराणे इ. द्वारे लोकशिक्षणाच्या मार्गाने लिपींची वाटचाल सुरू झाली.

लेखातील सर्व चित्रे विकिपिडीयावरून घेतली असून लिपींची वाटचाल दर्शवण्यासाठी त्यांचा उपयोग केला आहे.

Sunday, June 17, 2012

रामाला दैवत्व कधी प्राप्त झाले असावे?

रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांवर उहापोह करणार्‍यांची, त्याकडे इतिहास म्हणून बघणार्‍यांची आणि राम-कृष्ण यांची विष्णूचे अवतार म्हणून भक्ती करणार्‍यांची संख्या अमाप असावी. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेकांना या महाकाव्यांनी, त्यातील पात्रांनी आणि देवस्वरूप अवतारांनी भुरळ घातली आहे. मध्यंतरी विसुनानांनी हेलिओडोरसच्या स्तंभाबद्दल लिहिलेल्या "गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१" या लेखातून कृष्णभक्तीची/ भागवत् धर्माची परंपरा भारतात किती पुरातन आहे त्यावर माहिती दिली होती. त्या लेखातून पुढे आलेल्या निष्कर्षात कृष्णभक्ती ही इ.स. पूर्व ३०० च्याही आधी केली जात असावी असा सहज निष्कर्ष निघतो. या निष्कर्षाला पुष्टी देण्यासाठी मेगॅस्थेनिसने इंडिकामध्ये शौरसेनींविषयी दिलेली माहिती, अलेक्झांडरने शिव आणि कृष्ण या दोन्ही देवता ग्रीकांना पूर्वापार माहित असल्याचा केलेला दावा, हेलिओडोरसचा गरुडध्वज हे पुढे करता येतात. कृष्णाप्रमाणेच देवपदावर पोहोचलेल्या रामभक्तीची परंपरा किती जुनी असावी हा विचार मनात डोकावतो परंतु मूळ मुद्द्याला हात घालण्यापूर्वी राम आणि कृष्ण यांना प्रसिद्धी देणार्‍या रामायण आणि महाभारताकडे एकवार पाहू.

***
कोंबडी आधी की अंडे या प्रश्नाचे मनाजोगे उत्तर मिळालेले नसले तरी "रामायण आधी की महाभारत" या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडून चटकन "रामायण आधीचे" असे दिले जाते. याला प्रमाण म्हणून रामायणाचा काळ, त्यावेळी असणारे समाजजीवन, पौराणिक व्यक्ती, वेषभूषा अशा अनेक गोष्टींच्या आधारे रामायणच आधीचे असा निष्कर्ष काढला जातो. त्यापैकी प्रामुख्याने येणारे काही मुद्दे असे -

१. पौराणिक वंशावळीप्रमाणे राम किंवा त्याचा रघुवंश हा कुरुवंशाच्या आधी येतो.
२. रामायणात महाभारताचा उल्लेख नाही पण महाभारतात रामकथेचा आणि त्यातील पात्रांचा (उदा. हनुमान) उल्लेख/ कथा आहेत.
३. रामायणाचे कथानक त्रेतायुगात घडते आणि महाभारताचे द्वापारयुगात.

परंतु विचार केल्यास या विधानांतून राम ही व्यक्ती कुरुवंशाआधी जन्माला आली होती इतकेच कळते. रामायण हे महाभारताआधी रचले हे सिद्ध होत नाही. एखाद्या उत्तम लेखकासाठी त्याची कथा सद्य काळापेक्षा मागे जाऊन रचणे हे अशक्य कार्य नाही. उदा. लगान या चित्रपटात दाखवलेली पात्रे, काळ आणि कथा सांगते की क्रिकेट हा खेळ गुजराथमधील काही अडाणी गावकर्‍यांनी ब्रिटिशांसमवेत लीलयेने खेळून दाखवला. ही कथा २१ व्या शतकात लिहिलेली असेल तरी १००-१२५ वर्षांपूर्वीचा काळ निर्माण करणे, तत्कालीन इतिहासातील खर्‍या व्यक्तिंशी त्या कथानकाशी सांगड घालणे आणि एक नवे कथानक रचणे चांगल्या लेखकाला अवघड नसते.

एका वेगळ्या उदाहरणात, इलियडचा पूर्वभाग सायप्रिआ हा इलियडनंतर रचला गेल्याचा प्रवाद आहे. असे करताना लेखकांनी हे पूर्वभाग आहेत याची जाणीव ठेवून लेखन केल्याचे निर्वाळे तज्ज्ञ देतात. अगदी अलिकडल्या काळातील उदाहरण बघायचे झाले तर ट्वायलाइट या प्रसिद्ध कादंबरीत येणार्‍या ब्री टॅनर या संक्षेपाने येणार्‍या पात्रावर पुढे "द शॉर्ट सेकंड लाइफ ऑफ ब्री टॅनर" अशी कादंबरी लिहिण्यात आली.

अशाप्रकारे संक्षेपाने येणार्‍या पात्राचा किंवा कथानकाचा विस्तार करून नवे कथानक रचणारा लेखक योग्य काळ उभा करतो, त्या काळाशी सुसंगत मांडणी, समाजव्यवस्था, राजकारण यांचा समावेश करून कथेला सुसंगती आणतो.

महाभारताचा विचार करता, महाभारतात संक्षेपाने रामकथा (रामोपाख्यान) येते. याला रामकथा असे म्हटले आहे कारण महाभारतात वाल्मिकीने रचलेल्या रामायणाचा उल्लेख नाही. इतकेच नाही तर या कथेत राम हा एक राजपुत्र म्हणून येतो. दैवी पुरुष म्हणून नाही. वाल्मिकी नावाच्या कोणत्याही ऋषींचा महाभारतात उल्लेख नाही. महाभारतात या रामकथेच्या संक्षेपाने येण्याबद्दल चार गृहितके मांडता येतील -
  • रामायण महाभारता आधी रचले गेल्याने त्याचा संक्षेपाने महाभारतात रामकथा (रामोपाख्यान) उल्लेख येतो किंवा
  • महाभारतात आलेली रामकथा ही नंतर फुलवून त्याचे वेगळे रामायण हे महाकाव्य निर्माण झाले.
  • महाभारतात आलेली रामकथा ही वाल्मिकी रामायणाच्या पूर्वीच्या एखाद्या रामायणावर आधारित आहे.
  • रामकथा आणि रामायण हे एका तिसर्‍याच रामस्रोतावरून निर्माण झाले आहेत.
यापैकी कोणते विधान खरे मानायचे हा गुंता होतो. विविध तज्ज्ञ वरीलपैकी विविध मते मांडून आपापले तर्क मांडतात. सध्या आपण केवळ दुसर्‍या विधानाबाबत विचार करू.

- महाभारतात आलेली रामकथा ही नंतर फुलवून त्याचे वेगळे रामायण हे महाकाव्य निर्माण झाले. -

या मुद्द्याच्या पुष्टर्थ काही गृहितके खाली मांडत आहे.

१. रामायणातील राम हा कथेचा नायक आहे तर कृष्ण महाभारतातील प्रमुख पात्र नाही. एकदा विष्णूच्या अवताराने नायकाचा अवतार घेतल्यावर त्या पुढील अवतारात तो नायक नसावा ही एक प्रकारची उतरंड वाटते.

२. रामकथेतील राम हा दैवी पुरुष नाही. अहल्येचे प्रसिद्ध प्रकरण रामकथेत येत नाही. तो दैवी पुरुष आहे असे दाखवण्यासाठी जे बालकांड आणि उत्तरकांड याचा वापर होतो ते दोन्ही अनेक तज्ज्ञांच्या मते मागाहून भरती झालेले असावे असे मानले जातात. या वरून मूळ कथेला ठिगळे जोडून रामाला दैवी बनवण्याचा घाट कालांतराने घालण्यात आला. पुराणांतून रामाला आणि कृष्णाला विष्णूचे अवतार मानून रामाला कृष्णापेक्षा पुरातन ठरवण्यात आले. हे सर्व बदल गुप्त काळात झाले असावे असा अंदाज मांडला जातो. पुराणांना गुप्तकाळात प्रमाणित करताना त्यात अनेक फेरफार केले गेले असे मानले जाते. रामालाही दैवत्व तेव्हाच प्राप्त झाले असावे का? बौद्ध काळानंतर जेव्हा हिंदू धर्म पुन्हा बळकट झाला तेव्हा हिंदू दैवतांना बळकटी आली असे तर नव्हे?

३. प्रचलित प्रवादांनुसार महाभारत हा इतिहास तर रामायण हे आदिकाव्य मानले गेले आहे. बहुधा यामुळेच रामायणाच्या अनेक आवृत्ती दिसून येतात. त्या मानाने महाभारताच्या आवृत्तींतील फरक लहान आहेत आणि आवृत्तींची संख्याही कमी आहे. येथे उदाहरण द्यायचे झाले तर काही रामायणांत सीता ही रामाची बहिण आहे तर काहींमध्ये ती रावणाची मुलगी आहे. काही रामायणांत रावणाचा वध लक्ष्मणाकडून होतो तर दशरथ जातकात किष्किंधा, लंका, सीतेचे अपहरण वगैरे नाही. अध्यात्मिक रामायण नावाचे एक रामायण खुद्द वेदव्यासांनी रचले असे सांगितले जाते परंतु गुप्तकाळात ज्या प्रमाणे सर्व पुराणांचा लेखक व्यास बनले त्यातलाच हा एक प्रकार असावा असे एक मत पडते. यावरून राम हा कथानायक म्हणून अधिक प्रसिद्ध असावा असे वाटते.

४. स्थळ-काळाचा विचार केल्यास सरस्वती नदीच्या खोर्‍यातून पूर्वेकडे गंगेच्या खोर्‍यात तत्कालीन जमातींचे स्थलांतर झाले असे मानले जाते. महाभारत हे गंगेच्या पश्चिमेकडील खोर्‍यात घडते. महाभारत काळात गंगेचे पूर्वेकडील खोरे त्यामानाने उपेक्षित वाटते. महाभारतात सरस्वती नदीचा उल्लेख अनेकदा येतो. रामायणात तो किष्किंधाकांडात इतका पुसटसा येतो की तो मागाहून घातला गेला असावा अशी शंका घेतली जाते. रामायणातील कोसल देश, अयोध्या नगरी वगैरे गंगा, शरयु नदीच्या आसपासच्या भागात वसलेले प्रदेश सप्तसिंधुंना महत्त्व देत नाहीत. याउलट, महाभारतात कोसल, किष्किंधा, दंडकारण्य वगैरे प्रदेशांना महत्त्व नाही.

५. इ.स.पूर्व ४५० मध्ये 'कृष्णवासुदेव' याची प्रस्थापना यमुना आणि (लुप्त?) सरस्वती यांच्या आसपासच्या राज्यांमध्ये प्रमुख दैवत म्हणून झालेली होती. (संदर्भः गरुडध्वज..लेख) या प्रकारे राम या दैवताची प्रस्थापना त्या काळात झाल्याचे ऐकिवात नाही. दुसर्‍या शब्दांत कृष्णाला ज्या काळी दैवताचे स्वरूप होते त्याकाळी रामही दैवी झाला होता असे स्पष्ट विधान करण्यास खात्रीशीर पुरावे मिळत नाहीत. कृष्ण हा त्यामानाने भारतात खोलवर रुजलेला दिसतो. कधी महाराष्ट्रात विठोबाच्या रुपात तर कधी ओरिसात जगन्नाथ म्हणून, राजस्थानात श्रीनाथजी म्हणून तर गुजराथेत रणछोडराय म्हणून. रामाचे असे लोकदैवतांत रुजलेले रुप दिसत नाही.

संस्कृती या पुस्तकात इरावती कर्वे म्हणतात की वाल्मिकी रामायणाची भाषा ही महाभारतातील भाषेपेक्षा अधिक अर्वाचीन वाटते. रामायणात येणारे अहिंसेचे उल्लेखही बौद्ध काळामुळे घातले गेले असावे अशी शंका त्यांना येते. हा लेख आणि उपक्रम या संकेतस्थळावर यावर सांगोपांग चर्चा झाल्यावर इरावती कर्वेंच्या संस्कृती या पुस्तकातील रामायण-महाभारतावरील लेख मला वाचायला मिळाले. रामायणाबाबत या लेखात घेतलेल्या शंका इरावतीबाईंनीही बहुतांशी उद्दृत केल्या आहेत.
***


या विषयावर सांगोपांग चर्चा उपक्रम या संकेतस्थळावर मध्यंतरी झाली आणि त्यातून रामाला दैवत्व बौद्ध सुवर्णकाळानंतर आणि कालिदासापूर्वी प्राप्त झाले असावे या निष्कर्षाप्रत मी पोहोचले आहे.



संदर्भः लोकदैवतांचे विश्वः र. चिं. ढेरे The Mahabharata, Volume 2: Book 2: The Book of Assembly; Book 3: The Book of the Forest - J. A. B. van Buitenen एशियन वेरिएशन्स इन रामायणा

Wednesday, December 14, 2011

उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई

भारतातील पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीज वसाहतींचा विचार केला तर सर्वप्रथम आठवतो तो गोवा. भारत स्वतंत्र झाल्यावरही काही काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलेला, पोर्तुगीज संस्कृती जोपासलेला आणि त्याचवेळेस पोर्तुगीज अंमलाखाली दबलेला गोवा. परंतु खुद्द महाराष्ट्रातील, मुंबईच्या अगदी जवळची वसईची पोर्तुगीज वसाहत त्यामानाने चटकन लक्षात येत नाही. ती आजही उपेक्षित राहिल्यासारखी वाटते.

वसईच्या किल्ल्याचा नकाशावसईचा इतिहास एखाद्या पक्क्या वसईकराला विचाराल तर अगदी अभिमानाने आणि प्रेमाने तो तुम्हाला माहिती देईल आणि ही माहिती देण्यात कोणत्याही धर्माची वा जातीची व्यक्ती मागे नसेल याची खात्री अगदी छातीठोकपणे देता येईल. अर्थातच, माहिती देण्याची प्रत्येकाची आवृत्ती वेगवेगळी असेल. पुरातन काळापासून सोपारा बंदरामुळे विविध देशांतील, धर्मांतील लोकांचा वावर या परिसरात राहिला आहे आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आला आहे. ब्राह्मण, सारस्वत, सामवेदी, सोमवंशी क्षत्रिय, आगरी, आदिवासी, ख्रिश्चन, मुसलमान आणि अगदी आफ्रिकेहून गुलाम म्हणून आणलेले हबशी अशा अनेक संस्कृती आजही येथे नांदतात. पूर्वापार काळापासून असलेली सुपीक माती, मासेमारी आणि सोबतीला लाकडाचे आणि चामड्याचे उद्योग यामुळे सुबत्ता मिळवलेल्या या प्रदेशात नानाविध लोक वस्तीला येऊन राहिल्याचे आणि कायमचे वसईकर झाल्याचे इतिहासात डोकावल्यास दिसते.

वसई जवळचं सोपारा बंदर सम्राट अशोकाच्या पूर्वीपासून प्रसिद्ध होते, भरभराटीला आलेले होते तरी कालांतराने वसईचा परिसर राजकीय दृष्ट्या किंचित उपेक्षित झाला. अनेक वर्षांनी तिचा चेहरामोहरा बदलला तो पोर्तुगीजांनी तेथे वस्ती केल्यापासून. वसे असे मूळ नाव असणाऱ्या या प्रदेशाला पोर्तुगीजांनी बसैं (Bacaim) म्हणायला सुरुवात केली, पुढे इंग्रजांनी बसैंचे बसीन (Bassien) केले आणि त्यानंतर आता सद्यकाळी वसई या नावाने या शहराला ओळखले जाते. इतिहासातील; मुख्यत: मराठेशाहीतील काही महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार वसई राहिलेली आहे. पोर्तुगीजांपासून पुढे घडलेल्या इतिहासाचा आणि वसईच्या किल्ल्याचा थोडक्यात लेखाजोखा येथे घेतला आहे.

१६ व्या शतकात वसई आणि आजूबाजूचा प्रदेश गुजरातचा सुलतान कुतुबउद्दीन बहादुरशहाकडे होता. मुख्य राज्य गुजरातेत असल्याने त्याच्या काळातही हा प्रदेश उपेक्षितच राहिला. उलट लुटालूट, जाळपोळ, देवस्थानांना इजा पोहोचवणे वगैरे प्रकारांनी त्याने स्थानिकांना जेरीस आणले होते. याच सुमारास पोर्तुगीज दीव-दमण पासून गोव्यापर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत होते. बहादुरशहाला शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसईला दोन वेळा आग लावल्याचे कळते. गावांवर हल्ले करणे, लुटालूट करणे वगैरे प्रकार पोर्तुगीज आपल्या जहाजातून करत. “ज्याचं राज्य, त्याचाच धर्म” या उक्तीप्रमाणे देवळांवर बांधलेल्या मशीदींना तोडून तेथे चर्च उभे करण्याचा सपाटा पोर्तुगीजांनी लावला होता. जमिनीवरून मुघलांशी लढा आणि समुद्रावरून पोर्तुगीजांशी लढा, यांत बहादूरशहा जेरीस आला.

१५३४ मध्ये बहादूरशहाने नुनो डा’कुन्हा या पोर्तुगीज गवर्नरशी तह करून वसई, साष्टी, वरळी, कुलाबा, दीव-दमण, कल्याण, ठाणे, चौल हा सर्व प्रदेश पोर्तुगीजांना देऊन टाकला. अशा रीतीने, उत्तर कोकणावर पोर्तुगीजांचा अंमल आला. याच सुमारास वसईचा किल्ला बांधायला पोर्तुगीजांनी सुरुवात केली. तत्पूर्वी बहादूरशहाने आणि त्याच्या सुभेदाराने किनार्‍यानजीक उभारलेली तटबंदी आणि दुर्ग अस्तित्वात होते. वसईच्या किल्ल्याची माहिती लेखात पुढे बघू.


वसईच्या किल्ल्याचा दरवाजा या काळात पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अनन्वित अन्याय केले. विहिरीत पाव किंवा गोमांस टाकून लोकांना बाटवण्याचे प्रकार केले. हिंदू मंदिरे तोडून तेथे चर्चेस उभी केली. जाळपोळ करणे, जमिनी हिसकावणे इ. प्रकार होत. एका पोर्तुगीज प्रवाशाच्या वर्णनानुसार हिंदू देवतांच्या मूर्ती जाळणे, त्यांची तोडफोड करणे नित्याचे होते. ज्या ठिकाणी हिंदू स्नानासाठी, धार्मिक विधींसाठी किंवा पापविमोचनासाठी जात असा तलाव पोर्तुगीजांनी नष्ट करून टाकला. या छळाला कंटाळून हिंदू, मुसलमान आणि पारशी लोकांनी येथून स्थलांतर करून शहाजहानच्या मुघली राज्यात आसरा घेतला. १७२० मधील एका नोंदीनुसार वसई भागात ६०००० च्या आसपास लोकसंख्या होती आणि त्यातील बहुतांश बाटलेल्या ख्रिश्चनांची आणि युरोपीयांची होती.

पोर्तुगीजांनी लाकडाचा आणि बांधकामासाठी लागणार्‍या दगडांचा व्यापार भरभराटीस आणला. घरांसाठी, जहाजांसाठी लागणारी उत्कृष्ट लाकडे आणि बांधकामासाठी तासलेले दगड यांची मोठी निर्यात वसईतून चाले. तत्कालीन पोर्तुगीज प्रवाशाने लिहिलेल्या नोंदीनुसार गोव्यातील अनेक चर्चच्या बांधकामांसाठी वसईतून दगड आणि दगडी खांब नेण्यात आले होते. व्यापारीदृष्ट्या हा वसईतील भरभराटीचा काळ असला तरी स्थानिक जनता अन्यायाखाली दबली जात होती. स्थानिक हिंदू आणि मुसलमानांना जुलमाने बाटवणे, त्यांना त्रास देणे, मूर्तींची आणि प्रार्थनास्थळांची तोडफोड करणे यांत पोर्तुगीजांची धर्मसत्ता इतकी उन्मत्त झाली होती की पुढे तिचा त्रास पोर्तुगीज अधिकार्‍यांना आणि राजसत्तेला होऊ लागला; कारण विविध कामांसाठी त्यांना स्थानिकांची गरज होती, मदत हवी होती, ती लोक वसई सोडून जाऊ लागल्याने मिळेनाशी झाली. अधिकार्‍यांनी याबाबत पोर्तुगीज राजसत्तेकडे केलेल्या तक्रारींच्या नोंदी मिळतात.



Vasai Fort map

शिवाजी महाराजांचे लक्ष या जुलमांच्या बातम्यांनी वसईकडे वेधले होते. त्यांनी वसईवर कडक चौथाई लावली होती. पुढे पेशव्यांच्या डोळ्यातही वसई आणि वसईतील अत्याचार खुपत होतेच, पण प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. शेवटी अणजूरकर नाईकांनी "वसईप्रांत फिरंगीयांकडे आहे. त्याणें देवस्थानें व तीर्थे यांचा व महाराष्ट्रधर्म यांचा लोप केला. हिंदू लोक भ्रष्टाऊन क्षार केले. म्हणून साहेबी मसलत करून प्रांत मजकूर सर करून देवस्थापना करावी व स्वधर्मस्थापना होय ते गोष्टी करावी.” अशी तक्रार पहिल्या बाजीरावाकडे केली. या तक्रारीला यश येऊन वसईवर स्वारी करण्याचा बेत नक्की झाला.




वसईचा वेढा सोपा नव्हता; तब्बल दोन वर्षे मराठ्यांनी कसून लढा दिला. वसईच्या किल्ल्याच्या तीन बाजूंनी समुद्र आणि दलदल असल्याने किल्ला काबीज करणे कठीण होते. शेवटी अर्नाळा, वर्सोवा वगैरे किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश मराठे व्यापत गेले. यामुळे पोर्तुगीज सैन्याच्या रसदीवर परिणाम झाला. शेवटी चर खणून आणि सुरुंग लावून तटाला भगदाडे पाडून मराठे आत घुसले. हे करताना मराठ्यांच्या सैन्याची मोठी हानी झाली, तरीही मराठ्यांनी १७३९ मध्ये किल्ला जिंकून घेतला. तत्कालीन नोंदींनुसार मराठ्यांचे १२००० सैनिक कामी आले तर ८०० पोर्तुगीज कामी आले. (या नोंदीत पोर्तुगीजांकडून लढलेल्या इतर सैन्याची नोंद नसावी.) विजयानंतर मराठा सैन्याने पोर्तुगीजांच्या चर्चवरच्या घंटा उतरवल्या आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यातील एक घंटा नाशिकच्या नारोशंकराच्या मंदिरात असून ती मराठी भाषेत “नारोशंकराची घंटा” या वाक्प्रचाराने प्रसिद्ध आहे. तर दुसरी घंटा अष्टविनायकांतील बल्लाळेश्वराच्या मंदिरात आहे.




Darya Darwaja
मात्र ज्याला धार्मिक युद्धाचे नाव दिले जाते त्या युद्धातील तहाच्या अटी फारच सौम्य होत्या. या अटींनुसार पोर्तुगीज सैन्याला वसई सोडून जाण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली, या सह त्यांची चल मालमत्ता आणि संपत्ती सोबत घेऊन जाण्याची परवानगीही देण्यात आली. आठ दिवसांनंतर मराठ्यांनी किल्ला आणि घरादारांची लूट केली. बरेचसे पोर्तुगीज गोव्याच्या दिशेने चालते झाले. दोनशे वर्षांहून अधिक काळ वसईवरील पोर्तुगीज अंमल अशा रीतीने संपला, परंतु पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा आजही वसईत शिल्लक आहेत.



पुढे माधवराव पेशव्यांनी अनेक हिंदू कुटुंबांना वसईत वसण्यासाठी उद्युक्त केल्याचे सांगितले जाते. यावेळी पुण्याहून आणि कोकणातून अनेक हिंदू कुटुंबे वसईत स्थलांतरित झाली. सक्तीने किंवा फसवणूकीने बाटवलेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्याचेही प्रयत्न माधवरावांनी केल्याचे दाखले मिळतात. मराठ्यांनी शर्थीने जिंकून घेतलेली वसई फार काळ त्यांच्या हाती टिकली नाही. खिळखिळीत झालेल्या पेशवाईला शह देऊन १७८० मध्ये इंग्रजांनी वसई जिंकून घेतली आणि वसईवर इंग्रजांचा अंमल आला. १८०२ मध्ये यशवंतरावाने पुण्यावर हल्ला केल्यावर दुसरा बाजीराव पळून वसईला इंग्रजांना शरण गेला. वसईच्या या दुसर्‍या तहात मराठेशाही बुडाली आणि पेशवे ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातले बाहुले बनले. त्यानंतर वसईला काही काळ बाजीपूर या नावानेही ओळखले जाई.



किल्ल्याच्या आतील भागवसई आणि तिच्याजवळील माणिकपूर, पापडी, निर्मळ, रमेदी येथे पोर्तुगीजांनी बांधलेली सुरेख जुनी चर्चेस अद्यापही प्रार्थनास्थळे म्हणून वापरात आहेत.



वसईचा किल्ला

वसईचा किल्ला भुईकोट असून तो समुद्रकिनार्‍याशी बांधलेला आहे. तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला दोन प्रमुख प्रवेशद्वारे असून एक जमिनीच्या दिशेने (गावाकडे) आणि दुसरे बंदराच्या दिशेने आहे. किल्ल्याच्या चोहीबाजूंनी पूर्वी तट होते आणि तटांची उंची ३० फुटांच्या वर आहे.



चित्रात दाखवल्याप्रमाणे किल्ल्याला दहा बुरूज आहेत. त्यांची नावे नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. बुरुजांवर तोफा आणि बंदुका ठेवल्या जात. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक, त्यांचा एक कप्तान अशी फौज तैनात असे. मराठ्यांशी झालेल्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरुंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.

DSC00702



किल्ल्याच्या आतील भागकिल्ल्याला दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे. किल्ल्यात न्यायालय, तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार वगैरे विशेष इमारती असून बाकी इमारतींचे अवशेषही दिसून येतात. किल्ल्यात चोर वाटा आणि काळोखी चक्री जिने आहेत. महादेवाचे आणि वज्रेश्वरीचे मंदिरही आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यावर बुरुजांना मराठी नावे दिली होती. कोकणातला, बंदरावर स्थित असा हा किल्ला तत्कालीन राजवटींना समुद्रावर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्याच्या कामी अतिशय उपयुक्त असावा असा अंदाज बांधता येतो. तरीही पेशव्यांच्या हातात असताना या किल्ल्याचा म्हणावा तसा वापर झालेला दिसत नाही.

Vasai Fort 2

हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते. अर्धगोलाकार कमानींचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरूज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. इंग्रजांच्या हाती लागल्यावर किल्ल्याची व्यवस्था चांगली राखली गेली नाही. दलदल आणि त्यात माजणारे रान यामुळे किल्ल्याची पडझड होत होती. त्यात सन १८६० मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकारयाला, कर्नल लिटलवूडला भाड्याने दिला. त्याने किल्ल्यात ऊसाची शेती केली आणि साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. तसेही लोक बांधकामासाठी पडलेले दगड उचलून घेऊन जात होतेच. पूर्वी वसईला भक्कम दगडी वाडे आणि कोट दिसत. ते दगड किल्ल्यातून उचलून आणल्याच्या गोष्टी ऐकायला येत. आज हे दगड आणि वाडे दिसेनासे होऊन तेथे सिमेंट काँक्रिटची जंगले उभी राहिली आहेत.


Vasai-fort-ruins


किल्ल्याचे अवशेष किल्ल्याची व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळातही फारशी राखली गेली नाही. अनेक वर्षे हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. सुयोग्य व्यवस्था राखली न गेल्याने जागोजागी माजलेले रान, तट फोडून बाहेर आलेली झाडांची मुळे, दलदल यामुळे किल्ल्याची आणखीनच दुर्दशा होत गेली. दिलेल्या चित्रात किल्ल्याचे भग्न अवशेष आणि वाढलेले रान दिसते. १५-२० वर्षांपूर्वी किल्ल्याच्या बर्‍याचशा परिसरात मानवी संचार शक्य नव्हता. गेल्या काही वर्षांत उभारला गेलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याची व्यवस्था हाती घेऊन थोडी डागडुजी आणि रानाची साफसफाई केल्याने या उपेक्षित किल्ल्याकडे लोकांचे थोडेफार लक्ष वळले आहे. तरीही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मुंबईजवळच्या या किल्ल्याला पर्यटन स्थळ बनवावे या दृष्टीने भक्कम प्रयत्न होणे आवश्यक आहेत. किल्ल्याच्या राहिलेल्या अवशेषांची डागडुजी करून, भिंती, बुरूज, तट यांची साफसफाई करून, जागोजागी ऐतिहासिक माहिती देणाऱ्या पाट्या लावून, पर्यटकांसाठी विश्रांती व्यवस्था करून या किल्ल्याकडे लोकांचे लक्ष वेधणे आणि एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा जपणे शक्य आहे.
Vasai Fort 3


संदर्भ:



वसईची मोहीम – य. न. केळकर

Notes on the history and antiquities of Chaul and Bassein – Joseph Gerson Cunha.

वसईचा इतिहास



चित्रे:

नकाशा आणि इतर काही चित्रे विकिपिडीयावरून घेतली आहेत.

Tuesday, May 24, 2011

सतीची प्रथा आणि अकबर

भारतातील सतीची जुलमी प्रथा बंद करण्याचे श्रेय लॉर्ड बेंटिंक आणि राजा राममोहन रॉय यांना दिले जाते परंतु त्याआधी हजारो वर्षे चालत आलेल्या या प्रथेला कोणाही कनवाळू माणसाने विरोध केला नाही हे पटणे थोडे कठीण वाटते. शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सती जाण्यापासून रोखल्याचे, तसेच मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला, अहिल्येला सती जाण्यापासून रोखल्याचे वाचायला मिळते परंतु तसा कायदा करणे किंवा इतरांच्या स्त्रियांची या जुलमातून मुक्तता करण्याचे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अकबराबद्दल जे वाचनात आले ते येथे देते.

मध्यमवयाकडे झुकणार्‍या अकबराला सुफी पंथ, पारशी आणि जैन धर्मांविषयी गोडी लागली होती. हिंदू आणि ख्रिश्चन धर्माकडेही त्याचा ओढा वाढला होता. अनेक धर्मीयांशी होणार्‍या वादविवाद चर्चांतून त्याच्यात हळूहळू बदल होत गेले. त्यातील काही बदल म्हणजे त्याने मांसाहार सोडला. राज्यातील शिकारींवर निर्बंध आणले, जनावरांची कत्तल करण्यावर निर्बंध आणले. ते इतके की वर्षातील अर्धे दिवस पाळीव जनावरांची (गाई-बैल, म्हशी, घोडे इ.) कत्तल होत नसे.

खालील गोष्ट घडली तेव्हा अकबराने चाळीशी पार केलेली होती. एके दिवशी अकबर आपल्या राणीवशात (बहुधा हिंदू राणीच्या) झोपला असता सकाळच्या प्रहरी बायकांची कुजबूज त्याच्या कानी पडली. त्याने उठून चौकशी केली असता कळले की राजा भगवानदासाच्या कुटुंबातील एक स्त्री सती जात आहे. अंबेरचे राजा भगवानदास हे मोठे प्रस्थ होते. त्याच्या बहिणीचा विवाह खुद्द अकबराशी झाला होता आणि त्याचा मुलगा मानसिंग अकबराचा प्रमुख सेनापती होता. त्यांच्या कुटुंबात सती जात आहे असे कळल्यावर राणीवशात चलबिचल होणे साहजिक होते. अधिक चौकशी करता अकबराला कळले की -
जयमल नावाचा राजा भगवानदासाचा एक भाऊ होता. त्याची रवानगी बंगाल, बिहार, ओरिसाच्या क्षेत्रात लढाईसाठी झाली होती परंतु भर उन्हाळ्यात घोडेस्वारी करताना तो बिहारमध्ये उष्माघाताने आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याची बायको राव उदयसिंग या मारवाडच्या राजाची मुलगी होती. तिच्यावर सती जाण्यासाठी दडपण येत होते. सती जाण्यास तिची तयारी नव्हती परंतु घरच्यांनी तिला तिच्या संमतीशिवायही सती जाण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेतला होता. यात खुद्द तिच्या मुलाचा समावेश होता.

अकबराच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर तो तिरमिरीने उठला आणि तडक घोड्यावर बसून सतीच्या चितेपाशी पोहोचला. बादशहा असा तिरमिरीने निघाला ही खबर कळताच त्याचे अंगरक्षकही घाईघाईने त्याच्या मागोमाग गेले. सुदैवाने, अकबर वेळेत पोहोचला आणि बादशहा आणि त्याच्यामागे आलेले सैनिक पाहून सतीची मिरवणूक थांबली. जबरदस्तीने त्या बाईला सती जाण्यास भाग पाडणार्‍यांची डोकी उडवावी अशी इच्छा झाल्याचे अकबराने नंतर व्यक्त केले परंतु प्रत्यक्षात तसे केले नाही. मिरवणूकीतील सर्वांना अटक मात्र झाली आणि काही काळ बंदीवास दिल्यानंतर त्यांची सुटका झाली.

या घटनेच्यावेळी राज्यात सती जाऊ नये असा पूर्वीच केलेला कायदा होता की या घटनेनंतर तसा कायदा करण्याचा निर्णय अकबराने घेतला ते नेमके कळत नाही परंतु सतीप्रथेवर बंदी आणण्याचा कडक कायदा करणे त्याला शक्य झाले नसावे. याचे कारण पदरी असणार्‍या प्रमुख राजपूत सरदारांना नाराज करणे त्याला शक्य नसावे. तरीही, 'केवळ त्या बाईची संमती असेल तरच ती सती जाऊ शकते परंतु तिच्या संमतीविना तिला सती जाण्यास प्रवृत्त करू नये आणि तसे करणार्‍यांवर कारवाई केली जाऊ शकते' असा कायदा त्याने केला.

अबु'ल फझलच्या म्हणण्याप्रमाणे अकबराच्या राज्यात कोतवालाची जबाबदारी ही "नागरक" या हिंदुग्रंथातील मौर्यकालीन कोतवालाप्रमाणेच होती. त्यात त्याने ज्या इतर कायद्यांची भर केली त्यात सतीविरोधी कायदाही होता. त्यानुसार, कोतवालाने गावात हेर नेमायचे आणि या हेरांनी गावात काय चालते त्याची इत्यंभूत माहिती परत आणायची. यात एखाद्या बाईला तिच्या संमतीविना सती दिले जात असल्यास ती कृती थांबवायचे आदेश होते. जर स्त्री स्वखुशीने सती जात असेल तर त्या घटनेत विलंब आणण्याचे आणि त्या स्त्रीचे मन वळवायचे आदेश होते. वेळ गेला की त्या स्त्रीचा दु:खावेग आवरून ती मृत्यूपासून परावृत्त होईल असा अंदाज त्यामागे होता.

अकबराचा कायदा किती सफल झाला याची कल्पना नाही पण त्याच्या पश्चात जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब यांनीही या कायदा तसाच ठेवला. किंबहुना, औरंगजेबाच्या राज्यात सती प्रथेवर पूर्णतः बंदी होती. इतर कायद्यांमध्ये अकबराने विधवांना पुर्नविवाह करण्याची संमती दिली होती आणि विवाहानंतर गर्भदानाचे वय किमान १२ असावे अशी सक्तीही केली होती.

सतीच्या प्रथेविरोधी कायदा करणारी अकबर ही बहुधा पहिली व्यक्ती असावी.

याच पार्श्वभूमीवर यापूर्वी १५६८मध्ये अकबराच्या स्वारीत चित्तौडला झालेला ३०० स्त्रियांच्या जौहाराची आठवण होणे साहजिक आहे. तो पाहून अकबराचे मन हेलावल्याचे संदर्भ पाहण्यास मिळत नाहीत. परंतु सम्राट अशोकाप्रमाणेचत्यावेळी अकबराला उपरती आणि साक्षात्कार झालेले नव्हते हे ही खरे.

संदर्भः अकबर द ग्रेट मोगल - विन्सेंट स्मिथ.

Monday, May 02, 2011

अंश ईश्वराचा

मानव रानटी अवस्थेत असतानाही त्याला एक गोष्ट नेमकी आणि लवकरच कळून आली असावी ती म्हणजे एक एकटे राहण्यापेक्षा टोळी बनवून राहणे फायद्याचे आहे. ही गोष्ट त्याला रानटी अवस्थेत असताना कळली की कपिवस्थेत याबद्दल विशेष माहिती नाही पण त्याचे नेमके फायदे तोटे मनुष्यावस्थेत कळले असे मानू. आपला गट निर्माण केला की एकत्रितरीत्या शत्रूवर चाल करून जाणे सोपे पडते, स्वतःचे आणि आप्तजनांचे रक्षण करता येते, शिकार करणे सोपे जाते या गोष्टी त्याच्या ध्यानात आल्या असाव्या. टोळी जसजशी मोठी होत गेली तसतसे टोळीत अंतर्गत कटकटीही निर्माण झाल्या असाव्यात आणि मग त्या टोळीला शिस्त लावण्यासाठी, तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोळीतील शक्तीने आणि बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडे त्या टोळीचे नेतृत्व आले असावे. नगरे स्थापन झाल्यावर आणि टोळ्यांची व्याप्ती वाढल्यावर याच टोळीप्रमुखाचा राजा झाला.








आयसीसच्या रूपातील क्लिओपात्रा

टोळीची किंवा राज्याची व्यवस्था राखतानाच राजाला स्वतःच्या भवितव्याचा विचार करणे, आपले पद राखून ठेवणे आणि स्वतःला सुरक्षित ठेवणेही आवश्यक होते. या कामी केवळ शक्तीचा उपयोग नव्हता तर युक्तीचा उपयोगही करणे आवश्यक होते. राजाच्या मागे उभे राहणारे बळकट वीर, सेनापती, अमात्य, मंत्री, इतर हुशार सल्लागार आणि सामान्य प्रजाजन या सर्वांत एकी राखण्यास आवश्यक असणारा गुण म्हणजे राजनिष्ठा. एखाद्या व्यक्तीविषयी अपार निष्ठा बाळगण्यासाठी त्या व्यक्तीला एकतर कर्तृत्वाने अतिशय मोठे होण्याची गरज असते किंवा जन्माने/ पदाने अत्युच्च असण्याची गरज असते. या दोहोंमुळे ही व्यक्ती पूजनीय ठरत असे, लोकांच्या निष्ठा राजाकडे अबाधित राहत आणि त्यायोगे राज्य आणि राजा सुरक्षित राहत असे. कर्तृत्वाने नेमके किती मोठे व्हायला हवे याच्या सीमा आखलेल्या नसल्याने आणि प्रत्येक व्यक्तीच्या कर्तृत्वाला मर्यादा असल्याने स्वतःला सुरक्षित ठेवण्यास केवळ कर्तृत्वाचा उपयोग नाही; त्यापेक्षा भव्य काहीतरी उभे करायला हवे ही जाणीवही राज्यपद उपभोगणाऱ्यांना झाली असावी. हे जे काही भव्यदिव्य आहे ते मानवी हस्तक्षेपा पलीकडले असणे किंवा अमानवी असणे किंबहुना ते तसे दाखवणे पथ्यावर पडले. याचे कारण विज्ञानाचा अभाव, नैसर्गिक आपत्ती किंवा न उमजणाऱ्या गोष्टींना सर्वसामान्य जनतेने ईश्वरी संकेत मानणे. या गोष्टी आपल्या हातात नाहीत किंवा या गोष्टींना आपण रोखू शकत नाही, या आपल्या मानवी शक्तीच्या पल्याड आहेत या भावनेतून ईश्वराबद्दल दरारा निर्माण झाला आणि याच भावनेतून जन्माने मोठे होणे -उच्च असणे या संकल्पनेची निर्मिती झाली. राजा हा साक्षात ईश्वराचा अंश आहे किंवा साक्षात ईश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी आहे असे दर्शवून देणे हे राज्यव्यवस्था आणि पद सुरक्षित ठेवण्यास कारणीभूत ठरते याची जाणीवही माणसाला झाली. निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी या युक्तीचा वापर हमखास होऊ लागला.

जगातील बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये अशाप्रकारे राजाला किंवा टोळीप्रमुखाला ईश्वरी अंश, देवाचा पुत्र किंवा साक्षात भगवंत मानण्याची प्रथा आहे. आपल्या महाकाव्यांचा विचार करता त्यातील कोणतेही महापुरुष मानवी नाहीत असे दिसून येईल. कथेतील मुख्य पात्रांचे चमत्कारिक जन्म, पुनर्जन्म, अवतार वगैरे गोष्टी सदर पात्रे सामान्य मनुष्यापेक्षा वेगळी आणि वरचढ होती हे दाखवण्यासाठी केलेला आढळतो. महाभारतातील जवळपास सर्व पात्रांचे जन्म चमत्कारिक आहेत. या पात्रांना दैवी गुण चिकटवलेले आहेत. याचप्रमाणे, इलियडचा विचार केला तरीही अशाचप्रकारचे संदर्भ आढळतात. इतरत्र इतिहासात डोकावले तर इजिप्तमध्ये राजाला देव मानण्याची प्रथा आढळते. राजा (फॅरो) हा होरस हा देवाचा पुनर्जन्म मानला जाई. इजिप्तची प्रसिद्ध फॅरो क्लिओपात्राने स्वतःला इजिप्शिअन देवता आयसीस म्हणून घोषित केले होते. तिच्या आयसीसच्या रूपातील प्रतिकृती आढळतात. चीनमध्ये राजा हा स्वर्गपुत्र असल्याचे मानले जाई, रोमन संस्कृतीत राजाला देव मानण्याची प्रथा होती, इंका संस्कृतीही राजाला देव मानत असे आणि अशा अनेक संस्कृतीत राजाला अमानवी गुणांचा धनी बनवल्याचे दिसून येईल.

अलेक्झांडर द ग्रेट हा झ्यूसचा पुत्र आहे हे स्वतः त्याची आई सांगत असे आणि तो पद्धतशीर प्रचार होता. पुढे सिवाच्या चेटक्याने अलेक्झांडर हा अमुनचा मुलगा असल्याचे म्हटले पण ग्रीकांनी तो झ्यूसचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले अशी अलेक्झांडरच्या गोटातून बतावणी केली गेली. रोमन सम्राट ऑगस्टसला देव म्हणून घोषित करण्यात आले होते. गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला पोटी अद्वितीय पुत्र जन्म घेतो आहे असे स्वप्न पडल्याचे सांगितले जाते. अशोकाच्या शिलालेखात देवांना प्रिय या विशेषणाचा सातत्याने वापर केलेला दिसतो. हुमायूनलाही स्वप्नातून आपल्याला अद्वितीय पुत्र होणार आहे हे कळून चुकले होते. अकबरावर सलीम चिश्तीची कृपादृष्टी असल्याच्या आणि शिवाजीराजांनाही भवानीचा दृष्टांत झाल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.रामदासांनी राजांबद्दल लिहिलेल्या या ओळी बोलक्या आहेत -


जे सत्किर्तीचे पुरुष। ते ईश्वराचे अंश।
धर्मस्थापनेचा हव्यास। तेथेची वसे।।

या आणि अशा अनेक उदाहरणांवरून राजा हा अतिमानवी शक्तींशी जवळीक साधणारा आहे हे सांगण्याचा प्रयत्न दिसतो. राजाला देवाचा अंश मानणे यापेक्षा थोडी पुढची पायरी देवराजा ही प्रथा. कंबोडियातील ख्मेर राजघराण्यात ही प्रथा दिसते. या प्रथेत राजा ही शिवस्वरूप असून सर्वश्रेष्ठ आहे असे मानले जाई. यालाच मनुष्याचे दैवतीकरण करणे असे म्हणता येईल. चंद्रशेखर यांच्या लेखात जयवर्मन राजाचा मृत्यूनंतर अवलोकेतेश्वराच्या रूपात दैवतीकरण झाल्याचा उल्लेख आहे. ही प्रथा केवळ कंबोडियातच नाही तर इतरत्रही आढळते. मानवी आयुष्यात किंवा मानवी मृत्यूनंतर त्याला देवाच्या जागी बसवणे हे भारतीय संस्कृतीला नवे नाही. व्यक्तिपूजा, अवतार, महात्मा वगैरे अनेक शब्द मनुष्याला अतिमानवी शक्तीच्या जवळ घेऊन जातात आणि जसे हे भारतीय संस्कृतीला नवे नाही तसे जगातील इतर संस्कृतींनाही हे "दैवतीकरण" नवे नाही. दैवतीकरणाची ही पद्धत वर्षानुवर्षे सुरू आहे आणि आता राजे गेले तरी नेत्यांच्या रूपात ही पद्धत सुरू राहिल किंबहुना महात्म्यांच्या उपाधीतून सुरू असल्याचेच जाणवते.






होमरचे दैवतीकरण


अशाचप्रकारच्या दैवतीकरणाचा उल्लेख डॅन ब्राऊनच्या लॉस्ट सिंबलमध्ये अनेकांनी वाचला असेल. जॉर्ज वॉशिंग्टनच्या मृत्यूपश्चात त्याचे दैवतीकरण यू. एस. कॅपिटल बिल्डिंगच्या रोटुंडाच्या छतावर दिसते. याला ऍपॉथिओसिस ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन (apotheosis of George Washington) म्हणून ओळखले जाते. दैवतीकरणाची ही पद्धत अर्थातच ग्रीक किंवा रोमनांची. टायटसच्या प्रसिद्ध कमानीच्या छतावर (The Arch of Titus, बांधकामः सुमारे इ. स. ८१) सम्राट टायटसचे दैवतीकरण दिसते. इलियड आणि ओडिसीचा निर्माता महाकवी होमर याच्या दैवतीकरणाचे प्राचीन शिल्पही उपलब्ध आहे. कॉन्स्टंटिनो ब्रुमिडी या इटालियन चित्रकाराने १८६५ मध्ये यू. एस. कॅपिटल बिल्डिंगच्या छतावर ही चित्रकारी केली. सन १८६२ मध्ये हे चित्र काढण्याची परवानगी मिळाल्याचे कळते. ही परवानगी यू. एस. कॅपिटॉल बिल्डिंगचा प्रमुख स्थापत्यशास्त्रज्ञ थॉमस वॉल्टरकडून ब्रुमिडीला मिळाल्याचे कळते. याआधी १८६०मध्येही एका जर्मन चित्रकाराने वॉशिंग्टनच्या दैवतीकरणाचे पेंटिंग तयार केले होते. या चित्राचा पगडा कॅपिटॉल बिल्डिंगीतील चित्रावर असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. जॉर्ज वॉशिंग्टनला अमेरिकेच्या राष्ट्रपित्याचा दर्जा या आधी अनेक वर्षे मिळालेला होता. त्याची लोकप्रियता मृत्यूनंतरही वाढत गेली. याचा फायदा घेण्यासाठी हे चित्र तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. ब्रुमिडीला महिना दोन हजार डॉलर्सच्या तनख्यावर हे चित्र काढण्याची परवानगी मिळाली. तयार झालेले चित्र अनेकांच्या पसंतीस पडले हे वेगळे सांगायला नको. आधुनिकतेचा मानदंड हाती घेऊन वावरणाऱ्या अमेरिकेचा पहिला देव जॉर्ज वॉशिंग्टन मानला जावा ही इच्छा प्रकट करण्यात हे चित्र सफल झाल्याचे दिसते.

जॉर्ज वॉशिंग्टनचे दैवतीकरण

DSC02325

वॉशिंग्टनच्या दैवतीकरणाच्या या एका चित्रात एकूण सात दृश्ये आहेत. मध्यभागी १३ कुमारिकांसह जॉर्ज वॉशिंग्टन स्वर्गारोहणासाठी तयार झालेला दिसतो. १३ कुमारिका अमेरिकेच्या तत्कालीन १३ वसाहती दाखवतात. वॉशिंग्टनच्या डोक्यावर E Pluribus Unum (विविधतेत एकता) हे अमेरिकेचे घोषवाक्य दिसते. वॉशिंग्टनच्या चित्रासभोवताली इतर ६ चित्रे दिसतात आणि ही सर्व चित्रे प्रगतिशील अमेरिकेत होणारे दैवतीकरण दर्शवतात.

युद्ध - केंद्रभागातील वॉशिंग्टनच्या पायथ्याशी दिसणाऱ्या या चित्रात अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता कोलंबिया शत्रूचा नि:पात करताना दिसते. तिच्यासह अमेरिकेचा राष्ट्रपक्षी गरूडही दिसतो.

विज्ञान - मिनर्वा ही बुद्धी आणि कलेची रोमन देवता. ती या चित्रात अमेरिकेचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलीन, रॉबर्ट फुल्टॉन आणि सॅम्युएल मोर्स यांना बहुधा विद्युतजनित्राबाबत महत्त्वाचे सल्ले देत आहे. मिनर्वा हे ग्रीक देवता अथीनाचे रूप. वॉशिंग्टन डिसीच्या शहरात इतत्रही ती अनेकदा दिसून येते.

नौधन(सागरी)- समुद्राचा रोमन सम्राट नेपच्यून या चित्रात दिसतो. तसेच समुद्रातून प्रकट झालेली प्रेमाची रोमन देवता वीनसच्या हाती 'ट्रान्सअँटलांटीक टेलेग्राफ केबल' दिसते. या केबलद्वारे अमेरिका आणि युरोपचा संपर्क साधण्याचे प्रयत्न १८५७ ला सुरू झाले होते.

वाणिज्य - मर्क्यूरी हा रोमन व्यापाराचा आणि अर्थकारणाचा देव येथे रॉबर्ट मॉरिस या अमेरिकन व्यापारी आणि राजकारण्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मदतीसाठी सोन्याने भरलेली पुरचुंडी देताना दिसतो.

यांत्रिकी - या चित्रात वल्कन हा लोहारांचा रोमन देव स्टीमबोट आणि तोफांच्या बांधणीवर काम करताना दिसतो.

शेतकी - सेरेस ही रोमन पीक पाण्याची देवता सायरस मॅकॉर्मिक या प्रसिद्ध अमेरिकन शेतकऱ्याने तयार केलेल्या पीक कापणी यंत्रावर आरूढ दिसते.

चित्राविषयी याहून अधिक माहिती आंतरजालावर शोधल्यास सहज उपलब्ध आहे. ज्यांना फ्रीमेसनरीच्या कॉन्स्पिरसी थिअरीत रुची आहे त्यांच्यासाठी थॉमस वॉल्टर, १८६५ मधील अमेरिकन अध्यक्ष अँड्र्यू जॉनसन हे दोघे फ्रीमेसन्स होते. तत्पूर्वीचे अब्राहम लिंकन हे फ्रीमेसन नसले तरी सदस्यत्वासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता पण त्यांच्या मृत्यूमुळे ते फ्रीमेसन बनले नाहीत असे कळते. चित्रात दिसणारे बेंजामिन फ्रँकलिन हे फ्रीमेसन होते आणि अर्थातच जॉर्ज वॉशिंग्टन हे स्वतःही फ्रीमेसन होते.

अधिक माहिती:
वॉशिंग्टनचे दैवतीकरण


क्लिओपात्राचे आणि होमरचे चित्र विकिपिडीयावरून घेतले आहे.

Tuesday, January 04, 2011

अलेक्झांडर आणि पुरु युद्ध

इतिहासकार हा स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांच्या नोंदी करत असतो किंवा इतरांनी लिहिलेल्या नोंदी वापरून इतिहास लिहून ठेवत असतो. हा इतिहास नमूद करताना तो नि:पक्षपाती असतो का या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थी यावे. महाभारतातील कौटुंबिक कलहाला जय नावाचा इतिहास समजले तरी तेथेही व्यासांनी पदोपदी जेत्या पक्षाला वरचढ स्थान दिलेले आहे. पुढे जनमेजयाच्या समोर वैशंपायनांनी कथा सांगितल्याने राजाला संतोष देण्यासाठी त्यात बरेच फेरफार केले असावेत अशी शंका अनेक तज्ज्ञांना येतेच. महाभारत युद्धाप्रमाणेच भारतीय भूमीवर जी पौराणिक-ऐतिहासिक महत्त्वाची युद्धे लढली गेली त्यात दाशराज्ञ युद्ध, मगध-कलिंगचे युद्ध, पानिपतावरील युद्धे अशा अनेक युद्धांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक युद्ध अलेक्झांडर आणि पुरु यांच्यात लढले गेले. या युद्धामुळे अलेक्झांडरच्या ज्ञात जग जिंकत पुढे सरकण्याच्या इच्छेला खीळ बसली. भारताची भूमी ग्रीकांच्या आक्रमणापासून वाचली. या युद्धात नेमके काय झाले हे जाणून घेण्याची इच्छा मला अनेक दिवस होती.

अलेक्झांडरच्या लहान आयुष्यातही इतका विस्तृत इतिहास भरलेला आहे की तो लिहित लिहित भारतापर्यंत पोहोचेस्तोवर अनेक लेखकांचा उत्साह गळून जातो असे वाटते. सोईस्कर रित्या याला पाश्चात्यांचा भारतीय दुस्वास असेही म्हणता येईल.

या चित्रात अलेक्झांडर पुरुवर स्वारी करताना दिसतो तर दुसर्‍या चित्रात विजयाची देवता नाइके अलेक्झांडरचा गौरव करताना दिसते. या दोन्ही नाण्यांवर कोणतीही अधिक माहिती किंवा लेखन नाही. यावरून हे नाणे अलेक्झांडरने पाडले की त्याच्या क्षत्रपाने याबद्दल साशंकता आहे.
कारण काहीही असो, ज्या अनेक लेखकांचे संदर्भ मी वाचले ते अक्षरशः दोन ते तीन पानांत अलेक्झांडरची भारतीय स्वारी पूर्ण करतात. मागे ऑलिवर स्टोन निर्मित अलेक्झांडर या चित्रपटातही हे असेच झाल्याचे लक्षात आले. तसाही हा चित्रपट इतिहासापेक्षा अलेक्झांडरच्या लैंगिकतेमुळे अधिक गाजला असला तरी चित्रपटात युद्धांचे चित्रण अतिशय सुरेख आहे. भारतीय युद्धाच्या चित्रणातही विशेषतः अलेक्झांडर पुरुच्या हत्तीवर स्वतः चाल करून जातो तो प्रसंग चित्तवेधक आहे. परंतु ऐतिहासिक दृष्ट्या त्यात अनेक त्रुटी आहेत. या प्रसंगात अलेक्झांडर हा कुशल सेनापती असला आणि सैन्याचे नेतृत्व करत असला तरी त्याने पुरुच्या हत्तीवर चाल करून जाण्याचे धाडस दाखवले असेल का असा प्रश्न मनात आला होता. कालांतराने मला ब्रिटिश म्युझियममधील अलेक्झांडरचे नाणे दिसले आणि त्यावर चित्रित हा प्रसंगही दिसला. तरीही विश्वास ठेवण्यास काहीतरी कमी पडते आहे असे वाटले म्हणून अलेक्झांडरचा सर्वात विश्वासार्ह इतिहास, एरियनचा "ऍनाबेसिस ऑफ अलेक्झांडर" चाळला.

लढाईकडे वळण्यापूर्वी एरियन आणि त्याच्या ग्रंथा विषयी थोडे.

एरियन

एरियनचा जन्म सन ८६ ते १६० दरम्यानचा. म्हणजेच अलेक्झांडर नंतर सुमारे चारशे-साडेचारशे वर्षांनंतरचा. अलेक्झांडरच्या कर्तृत्वामुळे प्रेरित होऊन त्याने स्वारीचा वृत्तांत लिहिला तरी त्यात राजाची स्तुती करणे असा हेतू दिसत नाही. अनेक संदर्भ वापरून, आपली टिप्पणी देऊन तो इतिहास समोर आणतो. त्याच्या लेखनात व्यक्तीपूजा (हिरो-वरशिप) केलेली दिसत नाही आणि तरीही अलेक्झांडरला "द ग्रेट" बनवण्यात या इसमाचा मोठा हात असल्याचे मानले जाते . अलेक्झांडरच्या काळात न जन्मता, प्रत्यक्ष इतिहासाचा साक्षीदार नसतानाही त्याने लिहिलेला इतिहास हा अलेक्झांडरविषयीचा सर्वात मोठा विश्वासार्ह स्रोत मानला जातो. हा इतिहास लिहिण्यासाठी एरियनने जे संदर्भ चाळले त्यात टोलेमीने लिहिलेला अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्तांत, ऍरिस्टोब्युलसने लिहिलेला इतिहास हे दोन अतिशय महत्त्वाचे संदर्भ आणि याशिवाय कॅलिस्थेनिसने लिहिलेला इतिहास, नीअर्कसचा इतिहास आणि अशा अनेक संदर्भांचा समावेश आहे. मेगॅस्थेनिसने लिहिलेला इंडिका हा ग्रंथ, फिलिपच्या मंत्र्याकडील नोंदी आणि अलेक्झांडरच्या पत्रांचा तो संदर्भ म्हणून वापर करतो.

टोलेमीच्या संदर्भांवर त्याचा सर्वात अधिक विश्वास आणि याचे कारण देताना एरियन म्हणतो की टोलेमी हा लहानपणापासून अलेक्झांडर सोबत वाढलेला, त्याच्या सोबत राहिलेला, स्वारीवर गेलेला आणि याहूनही महत्त्वाचे असे की टोलेमी पुढे स्वतः सम्राट झाला. अशा परिस्थितीत त्याने काही खोटे लिहून ठेवणे म्हणजे स्वतःच्या नावाला बट्टा लावून घेण्यासारखे आहे. टोलेमीने अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इतिहास लिहिला. तो लिहिण्याची त्याच्यावर जबरदस्ती नव्हती किंवा जे घडले त्यापेक्षा वेगळे लिहून त्याला त्यातून काही बक्षीस किंवा उत्पन्न मिळणार नव्हते. अशाच कारणांसाठी ऍरिस्टोब्युलसही एरियनला विश्वासार्ह वाटतो.

अर्थातच, एरियनच्या अभ्यासातील त्रुटी दाखवणारे निबंध आहेत परंतु अलेक्झांडरच्या इतिहासाचा सबळ स्रोत म्हणून आजही एरियनकडेच पाहावे लागते. त्याचे लेखन आज इतक्या कालावधीनंतर शाबूत असणे ही सर्वात महत्त्वाची बाब.

दुसर्‍या भागात युद्धाचे त्रोटक वर्णन केले आहे. या युद्धातील एरियनने दिलेले मनुष्यबळ किंवा मनुष्यहानी यांच्या आकड्यांविषयी अनेकांना शंका वाटते. किंबहुना, एरियनला स्वतःलाही शंका वाटते म्हणून तो टोलेमीवर विश्वास प्रकट करतो. मीही केवळ एरियनचे संदर्भ वाचून आकडे दिले आहेत. ते योग्य आहेत असा दावा नाही.



काही संदर्भः

टोलेमी - हा अलेक्झांडरचा लहानपणीपासूनचा मित्र. टोलेमी हा अलेक्झांडरचा अनौरस सावत्र भाऊ असावा असा अंदाज बांधला जातो. अलेक्झांडरच्या सर्व स्वार्‍यांत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याचे जे ४ मोठे भाग झाले त्यात टोलेमीने इजिप्तचे राज्य हस्तंगत केले. टोलेमीने अलेक्झांडरच्या स्वार्‍यांचा विस्तृत इतिहास लिहून ठेवला.

ऍरिस्टोब्युलस - अलेक्झांडरचा मित्र आणि विश्वासू. सैन्यात स्थापत्यशास्त्री किंवा अभियंता असे त्याचे पद होते. त्याने अलेक्झांडरला अनेक स्वार्‍यांत सोबत केली आणि इतिहासही लिहून ठेवला.

नीअर्कस - अलेक्झांडरचा सेनापती. भारतीय युद्धात त्याचा समावेश होता. भारताबद्दल त्याने लिहून ठेवलेल्या नोंदींचा एरियनने आपल्या इंडिका या ग्रंथात उपयोग केला.

मेगॅस्थेनिस
- चंद्रगुप्ताच्या दरबारातील सेल्युकस निकेटरचा राजदूत. त्यानेही भारतावर इंडिका हा ग्रंथ लिहिला होता.

कॅलिस्थेनिस - हा ऍरिस्टॉटलचा नातू. त्याने अलेक्झांडरवर लिहिलेला इतिहास हा इतिहास कमी आणि भाटगिरी अधिक प्रकारचा आहे. मात्र अलेक्झांडरने पर्शियन रीतीरिवाजांचा स्वीकार केल्यावर कॅलिस्थेनिसची भाषा बदलते. बहुधा यावरूनच त्याचे आणि अलेक्झांडरचे संबंध बिघडले आणि त्याला राज्यद्रोहाच्या आरोपांखाली तुरुंगात टाकण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.

ऑलिवर स्टोनच्या चित्रपटात वर्णन केलेला प्रसंग असा दिसतो.



चित्र क्र. १ विकीपिडीयावरून घेतलेले असून चित्र क्र. २ allmovietrivia.info येथून घेतले आहे.

भारतीय स्वारीचा वृत्तांत

एरियनच्या मते सिंधू नदी ही भारतातील महत्त्वाची नदी होय. त्याला गंगा नदीचीही माहिती आहे परंतु भारतात प्रवेश करतेवेळी सिंधू ही विस्तृत नदी लागत असल्याने किंवा अलेक्झांडर गंगेपर्यंत न पोहोचल्याने सिंधू नदीच त्याला महत्त्वाची वाटणे साहजिक आहे. सिंधू नदी ही नाइल आणि युफ्रेटिसपेक्षाही अधिक गाळ-माती वाहून नेते, तिला चांगला वेग आहे असे एरियन म्हणतो. सिंधू नदीचा वेग आणि खोली पाहता ग्रीक सैन्याने इतक्या कमी वेळात कायमस्वरुपी पूल बांधला नसावा असे त्याला वाटते. तसे ठोस संदर्भ त्याला मिळत नाहीत म्हणून तो म्हणतो की होड्यांना होड्या जोडून, बहुधा त्या रश्शींनी एकत्र बांधून त्यावरून सैन्य नदी ओलांडून गेले असावे.

सिंधू नदी ओलांडून अलेक्झांडर तक्षशीलेला पोहोचल्यावर तेथे त्याचे मानाने स्वागत झाले. आजूबाजूच्या प्रदेशातील अनेक राजांनी कोणतीही खळखळ न करता शरणागती पत्करली. त्यात अभिसार हा झेलमच्या पलीकडल्या डोंगरी प्रदेशातील राजा आणि त्याचा भाऊ यांची गणती होते. (अभिसार हा कश्मीर प्रांतातील राजा असावा. ) दक्षराज नावाचा राजाही अलेक्झांडरला सामील झाल्याचे दिसते. इथे तक्षशीलेचा पाहुणचार स्वीकारून, ग्रीक प्रथेप्रमाणे खेळांचे आयोजन करून आणि जनावरांचे बळी देऊन पूजा करून अलेक्झांडर झेलमच्या दिशेने पुढे निघाला. हे करताना त्याने शरणागत तक्षशीलेत आपला प्रांताधिकारी (व्हॉइसरॉय) नेमला आणि जखमी सैनिकांना सुश्रूषेसाठी मागे ठेवले. एव्हाना सुमारे पाच हजारी भारतीय सेना त्याला सामील झाली होती.

अलेक्झांडरच्या आगमनाची खबर लागल्याने झेलमच्या पैलतिरावर पुरुची सेना जमली होती. अलेक्झांडरला झेलम ओलांडू न देता, किंबहुना, तो त्या प्रयत्नांत असताना त्यावर हल्ला करायचा अशी पुरुची रणनीती होती. अलेक्झांडरने झेलम किनारी आपला तळ ठोकला. पैलतिरावर पुरुची प्रचंड सेना आणि हत्ती उभे ठाकलेले दिसत होते. पुरुने जेथून जेथून नदी पार करणे सहज शक्य आहे तेथे तेथे आपले तळ ठोकले होते. अलेक्झांडरच्या हे लक्षात आल्यावर त्याने सैन्याच्या लहान फळ्या करून सर्व बाजूने पसरण्याचा आदेश दिला. असे केल्याने पुरू चकीत होईल आणि आपली निश्चित निती पुरुला कळून येणार नाही असे त्याला वाटले पण पुरू सावध होता. अलेक्झांडरने सिंधू नदीत पुलासाठी वापरलेल्या आपल्या होड्या झेलमपाशी मागवल्या. हे करताना त्याने त्यातील मोठ्या होड्या कापून त्यांच्या लहान होड्या बनवाव्यात अशी सूचना दिली. ती अंमलात आणून मोठ्या होड्यांचे दोन किंवा तीन तुकडे करण्यात आले.

समोरासमोरून झेलममध्ये घोडे टाकून नदी पार करणे अलेक्झांडरला शक्य नव्हतेच. एकतर पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी दुथडी भरून वाहत होती आणि पुरुचे हत्ती समोर तयार होते. घोडे पाण्यात शिरल्यावर या हत्तींनी त्यांच्यावर चाल केली असती आणि ग्रीक सैन्याची तेथेच धूळधाण उडाली असती हे अलेक्झांडर जाणून होता. त्याने आपण पावसाळा संपून थंडी सुरू झाल्यावरच हालचाल करू अशी अफवा पसरवली परंतु या अफवेचा पुरुच्या सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही. नंतर अलेक्झांडरने वेगळी निती अवलंबली. ती म्हणजे, रात्रीच्या पोटात त्याने आपले थोडे घोडदळ नदीच्या वेगवेगळ्याठिकाणी पसरवणे पण मोठमोठ्याने प्रचंड आवाज आणि गाजावाजा करणे सुरू केले. असे केल्याने पुरुला वाटावे की अलेक्झांडर स्वारीला सज्ज झाला आहे आणि त्याचे सर्व घोडदळ नदी ओलांडायच्या प्रयत्नात आहे म्हणून त्यानेही आपले सैन्य त्या दिशेने पाठवावे आणि त्यामुळे अलेक्झांडरला मूळ ठिकाणी नदी पार करता यावी. परंतु पुरुला हा कावा कळून आल्याने ही नितीही फसली.

लवकरच अलेक्झांडरला सुगावा लागला की त्याच्या सैन्यतळापासून सुमारे १७ मैलांवर झेलम नदीत एक बेट आहे. तिथे नदी थोडी उथळ होते आणि बेटाच्या आडोशाने नदी ओलांडणे सोपे आहे. पुरुच्या नजरेसमोरून सैन्य हलवणे सोपे नव्हते. अलेक्झांडरने हळूहळू त्याचे अंगरक्षक, काही सेनापती आणि काही चिवट सैनिकांची फळी बाजूला काढली आणि मागे नेली. क्रेटेरस या आपल्या सेनापतीच्या आधिपत्याखाली मुख्य सैन्य ठेवून त्याने स्वतः लहान फळीचे नेतृत्व केले. किनाऱ्यापासून बरेच अंतर ठेवून ही फळी पुढे सरकू लागली. सिंधू नदीतून आणलेल्या ३० वल्ह्यांच्या होड्यांचे तीन तुकडे करण्यात आले होते. हे तुकडेही या फळीसोबत पाठवण्यात आले. झेलम काठच्या दाट झाडीचा उपयोग त्यांना आडोशासाठी झाला. झेलमच्या त्या बेटामागे ईप्सित स्थळी पोहोचण्याच्या आदल्या रात्री विजांचा चकचकाट आणि गडगडाट होऊन वादळी पाऊस झाला. या पावसामुळे पुरुचे सैन्य गाफील राहिले आणि अलेक्झांडरच्या सैन्याला सुखरूप वाटचाल करण्यास जागा मिळाली.

बेटापलीकडून सैन्य जेव्हा नदीत उतरले तेव्हा नदी उथळ असूनही झालेल्या पावसाने भरून वाहत होती. छातीपर्यंत येणाऱ्या पाण्यातून वाट काढत सैन्याने आगेकूच केली. हे करताना बेटालाच दुसरा किनारा समजून सैन्य बेटावर जमा झाले पण लवकरच चूक कळल्याने त्यांनी पुन्हा किनाऱ्याकडे वाटचाल सुरू ठेवली. या सैन्यात पर्डिकस, कोएनस आणि सेल्युकसचा समावेश होता. पुरुला ही बातमी कळताच त्याने आपल्या मुलाला सैन्यानिशी अलेक्झांडरचा सामना करण्यास पाठवले. येथील युद्धात नेमके काय झाले याबाबत एरियन साशंक दिसतो परंतु टोलेमीच्या संदर्भांवर तो अधिक विश्वास ठेवतो. टोलेमीच्या संदर्भाप्रमाणे १२० रथ आणि दोन हजारांचे घोडदळ घेऊन पुरुपुत्र अलेक्झांडरचा पाडाव करण्यास रवाना झाला. परंतु अतिवृष्टीमुळे चिखल झाला होता त्यात रथ रुतले आणि गोंधळ झाला. येथे पुरुला अलेक्झांडर स्वतः नदी पार करण्याचे वेडे साहस करेल अशी कल्पना नव्हती. अशा गदारोळात पुरुच्या मुलाचा पराभव झाला.

पुरुपुत्राला अलेक्झांडरच्या सैन्याने कापून काढले आणि पुरुच्या मुख्य तळाकडे मोर्चा वळवला. याचवेळी क्रेटेरसही नदीत उतरू लागला. पुत्राच्या मृत्यूची बातमी आणि दोन्ही बाजूंनी सरकणारे अलेक्झांडरचे सैन्य पाहून नेमकी कोणती युद्धनिती वापरावी हे पुरुला कळेना. शेवटी त्याने अलेक्झांडरच्या रोखाने सैन्य वळवण्याचे आदेश दिले. वळवलेल्या सैन्यात ३०, ००० चे पायदळ, ४००० चे घोडदळ, सुमारे ३०० रथ आणि २०० हत्ती होते. बाकीची सेना त्याने क्रेटेरसशी सामना करण्यासाठी ठेवली. जेथे चिखल झालेला नाही अशा ठिकाणी थांबून त्याने व्यूहरचना केली. या रचनेत हत्ती सर्वांत पुढे होते. या हत्तींना घाबरून शत्रूचे घोडदळ किंवा पायदळ पुढे सरकणार नाही असा पुरुचा अंदाज होता. हत्तींच्या मागे पायदळ होते. पायदळाला कोट करण्यासाठी बाजूने घोडदळ उभे केलेले होते. त्याच्या बाजूने रथ उभे होते. अलेक्झांडरचे घोडदळ पुरुपेक्षा मोठे होते परंतु हत्तींवर हल्ला करणे अशक्य होते त्यामुळे अलेक्झांडरने स्वतःच्या नेतृत्वाखाली उजवीकडून आणि कोएनसने डावीकडून हल्ला चढवला. तसेच ग्रीक तिरंदाजांनी हत्तीच्या माहुतांचा वेध घेण्यास सुरुवात केली. पलीकडून क्रेटेरसनेही पुढे सरकण्यास प्रारंभ केला. अनेक दिशांनी झालेल्या हल्ल्यांमुळे पुरुचे सैन्य अडचणीत सापडले. हत्ती बिथरून मागे फिरले आणि पुरूच्या सैन्याला चिरडून जाऊ लागले. ग्रीक सैन्याने यानंतर चोहोबाजूंनी हल्ला चढवला. या युद्धात पुरूचे बरेचसे घोडदळ मारले गेले आणि अगदी क्षुल्लक पायदळ जिवंत राहिले.

एरियनच्या सांगण्यावरून भारतीयांचे सुमारे २०,००० च्या आसपास पायदळ आणि ३ हजारांच्या आसपास घोडदळ युद्धात कामी आले. रथांची मोडतोड झाली. पुरुचे दोन पुत्र कामी आले. पुरुचे सर्व सेनापती, युद्धभूमीवरील प्रांताधिकारी, अनेक माहुत वगैरे कामी आले. अलेक्झांडरच्या सैन्यातील कामी आलेल्यांची संख्या मात्र एरियन अतिशय क्षुल्लक (काही शेकड्यांत) देतो. या गणितात एरियनचे काहीतरी निश्चितच चुकलेले आहे हे सहज लक्षात येते. तज्ज्ञांच्या मते टोलेमीचे संदर्भ एरियन वापरतो. यापेक्षा ऍरिस्टोब्युलसचे संदर्भ खरे वाटतात.

एरियन पुढे म्हणतो की अलेक्झांडर तीक्ष्ण नजरेने पुरुवर लक्ष ठेवून होता. आपल्या सैन्याचा पराभव होतो आहे हे कळून चुकल्यावरही पुरू माघारी फिरला नाही. तो आपल्या सैन्यासह शौर्याने लढत राहिला. सैन्य माघार घेते म्हटल्यावर काढता पाय घेणाऱ्या पर्शियाचा सम्राट दरायुषसारखा पुरू नाही हे लक्षात आल्याने अलेक्झांडरच्या मनात या राजाविषयी आदर निर्माण झाला. सरतेशेवटी पुरुच्या उजव्या खांद्याला मोठी जखम झाली आणि त्याचा हत्ती माघारी फिरला. अलेक्झांडरने हे पाहिल्यावर तत्काळ हुकूम सोडले की माघारी फिरणाऱ्या पुरुला कुणीही अधिक इजा पोहोचवू नये. पुरुशी वाटाघाटी व्हाव्यात म्हणून त्याने तक्षशीलेचा एक घोडेस्वार पुरुच्या हत्तीच्या दिशेने पाठवला. घोडेस्वाराने पुरुचा हत्ती गाठला तसे त्याला पाहून पुरुचा राग उफाळून आला आणि त्याने पुन्हा शस्त्र उचलले परंतु बरीच विनवणी केल्यावर तो शरण येण्यास तयार झाला.


पुरुरवा

पुरुरवाचा नेमका वंश इतिहासात नमूद नाही. त्याचे राज्य झेलमच्या पूर्वेला पसरलेले होते त्यावरून तो पूर्व पंजाबातील राजा मानला जातो. तक्षशीलेच्या राजा अंभीशी त्याचे शत्रुत्व असल्याने अलेक्झांडर तक्षशीलेस पोहोचला असता त्याला नजराणे पाठवण्याची किंवा मैत्रीचा हात पुढे करण्याची तसदी त्याने घेतलेली नव्हती. उलट, अलेक्झांडर पूर्वेला कूच करेल या अंदाजाने त्याने सैन्याची जमवाजमव केली होती. पावसाळा आणि ग्रीकांना हत्तीशी लढण्याचा अनुभव नाही या अंदाजांवर तो गाफील राहिला आणि ग्रीक सैन्याने संधी साधली. लढाईत पुरुच्या सैन्याची संख्या पाहिली (एरियनने ती वाढवून-चढवून सांगितली नसेल तर) तर तो कुणी मोठा राजा असावा असा अंदाज बांधता येतो. त्याच्या बाजूने इतर कोणते राजे लढले हे कळत नाही. त्याचे प्रमुख सेनापती कोण होते ते कळत नाही.

एरियन पुरुचे वर्णन करताना त्याची उंची "पाच क्युबिट" होती असे म्हणतो. यावरून पुरु सुमारे ६ फुटांपेक्षा अधिक उंच असावा असे वाटते. त्याचे दोन पुत्र युद्धात कामी आले यावरून तो किमान मध्यमवयीन असावा असे दिसते. एरियनच्या सांगण्यावरून पुरू दिसायला अतिशय रुबाबदार असून शरणागत पुरू अलेक्झांडरला भेटायला आला असता त्याच्या चेहऱ्यावर भीती किंवा पराभव दिसत नव्हता. ते पाहून ग्रीक सैन्य अचंबित झाले. पुरुला येताना पाहून अलेक्झांडर स्वतः सैन्याच्या पुढे जाऊन स्वागतासाठी उभा राहिला. अलेक्झांडरने स्वतःहून बोलायला सुरुवात केली आणि पुरुला प्रसिद्ध प्रश्न विचारला.

"राजा, मी तुला कसे वागवू? " पुरुने बाणेदार उत्तर दिले, "हे अलेक्झांडर, मला राजासारखेच वागव. "
यावर अलेक्झांडर उत्तरला, " मी माझ्या मनाच्या समाधानासाठी तुला राजासारखेच वागवेन पण तू तुझे समाधान व्हावे म्हणून काहीतरी माग. "
त्यावर पुरू म्हणाला, "मी प्रथमतः जे मागितले त्यातच सर्व आले. "

अलेक्झांडरने पुरुला त्याचे जेवढे राज्य होते ते मानाने परत करून राज्याचे क्षत्रप बनवले तसेच कश्मीरचा भागही पुरुच्या आधिपत्याखाली दिला.

---------


या युद्धातील अलेक्झांडरच्या हानीची संख्या एरियनने दिलेल्या आकड्यांपेक्षा बरीच अधिक असावी. ग्रीक सैन्याला भारतीय भूमीवर युद्ध लढायचा अनुभव नसणे, पावसाळी वाईट हवामान, हत्तींचा सैन्यातील समावेश वगैरेंने त्रस्त होऊन त्यांनी कोएनसतर्फे परतण्याची विनंती अलेक्झांडरला केली. ती नाराजीने का होईना अलेक्झांडरला मानावी लागली. या युद्धानंतर (किंवा युद्धात) झालेला ब्युसाफलसचा मृत्यू वगैरे अलेक्झांडरचा निग्रह तोडण्यास हातभार लावून गेले असावेत.


अलेक्झांडर आणि पुरुच्या लढाईत अलेक्झांडर ऐवजी पुरुचाच विजय झाला असे तर्क अनेकांनी मांडलेले आढळतात. या तर्कांना अद्यापतरी तज्ज्ञांच्या लेखी अधिष्ठान मिळालेले नाही परंतु लढाईत पराभव होऊनही स्वतःचे राज्य परत मिळणे, सोबत दुसरे राज्यही पदरात पडणे, ज्या परदेशी सम्राटाने विजय मिळवला त्याचा त्या राज्यात/ देशात स्थायिक होण्याचा हेतू नसणे, इथपासून अलेक्झांडरचे माघारी फिरणे, पुढील काही वर्षांत त्याचा मृत्यू इ. मधून पुरुचा पराभव झाला तरी अंतिम विजय पुरुचाच झाला असे वाटणे शक्य आहे असे वाटते.
---------


वरील लेखात विस्तार भयास्तव युद्धाचे वर्णन त्रोटक केले आहे. हा लेख लिहिताना एरियन खेरीज इतर कोणत्याही इतिहासकाराचे भारतीय युद्धाविषयक संदर्भ तपासलेले नाहीत. लेखासंबंधात प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांतून देता येतीलच. वाचकांकडे अधिक माहिती असल्यास अवश्य पुरवावी. एरियनने लिहिलेला अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्तांत गूगलबुक्स वरून उतरवून घेता येईल.

लेखातील चित्रे विकीपीडीयावरून घेतली आहेत.

Wednesday, June 16, 2010

कॉटिंग्लीच्या पर्‍यांचे प्रकरण

आजवरच्या देशी-विदेशी साहित्यातील सर्वोत्कृष्ट सत्यान्वेशी कोण - याचे उत्तर साहित्य रसिकांकडून वेगवेगळे आले तरी बहुमताचा मान शेरलॉक होम्सला मिळेल असे वाटते. गेल्या एका शतकाहून अधिक काळापर्यंत वाचकांना मोहवून ठेवण्यात शेरलॉक होम्सला घवघवीत यश मिळाले आहे. थोडासा तिरसट, सामाजिक शिष्टाचारांपासून चार हात दूर पण चलाख आणि धूर्त अशा शेरलॉक होम्सच्या यशाचा खरा धनी मात्र त्याचा जनक आर्थर कॉनन डॉयल मानायला हवा. हुशार, धूर्त आणि प्रचंड निरीक्षण दृष्टी असणारा चिकित्सक शेरलॉक होम्स, पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉयलच्या वैद्यकीय ज्ञानातून उभा राहिला असावा असे म्हटले जाते. शेरलॉक होम्सच्या कथांना प्रसिद्धी मिळाली 'द स्ट्रँड मॅगझिन' या मासिकातून. डॉयलच्या कथांनी गुन्हेगारी-सत्यान्वेशी आणि चातुर्य कथांना फार मोठी प्रसिद्धी आणि वाचकवर्ग दिला. आजही सर आर्थर कॉनन डॉयल यांचे नाव एक उत्कृष्ट लेखक म्हणून घेतले जाते. परंतु, हाच डॉयल प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या मानसपुत्रापेक्षा कसा भिन्न होता याची जाणीव खालील लेखातून वाचकांना व्हावी.

ही घटना आहे सुमारे पहिल्या महायुद्धाच्या नंतरची. कॉटींग्ली या इंग्लंडमधील एका गावात दोघा मुलींना काहीतरी अविस्मरणीय दिसून येण्याची. १६ वर्षीय एल्सी राइट आणि तिच्याकडे राहायला आलेली तिची एक १० वर्षीय बहीण फ्रान्सीस ग्रिफिथ्स यांना घरामागील एका ओढ्यावर खेळताना पऱ्या दिसल्या. नाजूक, पंखधारी, चिमुकल्या पऱ्यांना या बहिणींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केले आणि एका अविस्मरणीय कहाणीचा जन्म झाला.

एल्सी राईट ही एका सुशिक्षित घरातील मुलगी. तिचे वडील पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. एकदा वडलांचा कॅमेरा घेऊन तिने आणि फ्रान्सीसने घरामागील ओढ्यावर काही छायाचित्रे काढली. ही चित्रे डेवलप करताना एल्सीच्या वडलांना त्यात पऱ्या दिसल्या. प्रथमतः त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही आणि त्यांनी एल्सीला कॅमेरा वापरण्यास बंदी घातली. तिच्या आईला मात्र ही छायाचित्रे पाहता क्षणीच त्यांच्या खरेपणाविषयी विश्वास वाटला. याचे कारण असे की एल्सीची आई गूढ-आध्यात्मवादावर विश्वास ठेवणारी होती. पऱ्या, देवदूत, जादू आणि इतर गोष्टींवर तिचा विश्वास होता त्यामुळे आपल्या मुलीने यात कोणताही बनाव केलेला नाही अशी तिची खात्री झाली. "थिऑसॉफिकल सोसायटीच्या" एका सभेत तिने या प्रकरणाची वाच्यता केली आणि दोन लहान मुलींनी पऱ्या पाहिल्या. एवढेच नाही तर त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे ही गोष्ट सर्वश्रुत झाली.
थिऑसॉफिकल सोसायटीच्या एका सदस्याने ही छायाचित्रे तपासणीसाठी तज्ज्ञाकडे पाठवली असता या तज्ज्ञाने छायाचित्रांच्या छायाप्रती (निगेटिव्हज) विश्वसनीय असल्याची ग्वाही दिली. ही माहिती फिरत फिरत सर आर्थर कॉनन डॉयल यांच्यापर्यंत पोहोचली. स्ट्रँड मासिकाने आपल्या ख्रिसमसच्या अंकात या पऱ्यांवर लेख लिहिण्याचे आवाहन डॉयल यांना केले. डॉयल यांनी या प्रकरणाला प्रसिद्धी देणाऱ्या थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य एडवर्ड गार्डनर यांच्याशी आणि एल्सिच्या वडलांशी संपर्क साधला. तोपर्यंत या प्रकरणाबाबत साशंक असणारे एल्सीचे वडील सर आर्थर कॉनन डॉयल छायाचित्रांच्या प्रकाशनाची परवानगी मागत आहेत या मागणीने सुखावले आणि त्यांनी छायाचित्रे वापरण्याची परवानगी डॉयल यांना दिली. यानंतर गार्डनर आणि डॉयल यांनी हे फोटो छाननीसाठी कोडॅक आणि इलफोर्ड या छायाचित्रीकरणासाठी प्रसिद्ध कंपन्यांकडे पाठवले. पैकी कोडॅक कंपनीतील अनेक तज्ज्ञांना ही छायाचित्रे विश्वसनीय वाटल्याचे सांगितले जाते. इलफोर्डला या छायाचित्रांत बनाव असल्याचे वाटले. दोन्ही कंपन्यांनी जाहीरपणे या छायाचित्रांना विश्वसनीय करार देण्यास नकार दिला पण डॉयल यांनी हार मानली नाही.

एडवर्ड गार्डनर यांनी एल्सीच्या घरी जाऊन पऱ्यांची आणखी चित्रे मिळवण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही मुलींनी खूप लोक गोळा झाले तर पऱ्या संपर्कात येणार नाहीत असे कारण दिल्याने गार्डनर यांनी चांगले कॅमेरे या मुलींच्या हाती देऊन स्वच्छ सूर्यप्रकाशात त्यांना छायाचित्रे घेण्याचे सुचवले. त्यानुसार या मुलींनी घेतलेल्या अनेक छायाचित्रांतून केवळ दोन छायाचित्रांत पऱ्यांचे दर्शन झाले. गार्डनर यांनी ही बातमी ताबडतोब डॉयल यांना कळवली. त्या वेळेस डॉयल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते. बातमी कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. या लेखाच्या निमित्ताने अतींद्रिय शक्तींवर लोकांचा विश्वास बसेल असा त्यांचा ग्रह झाला.

१९२० सालच्या डिसेंबर महिन्यात सर आर्थर कॉनन डॉयल यांनी आपला लेख स्ट्रँड मासिकात प्रसिद्ध केला. गोपनीयता राखण्यासाठी लेखातील नावे बदलून टाकण्यात आली. मासिकाच्या प्रती रातोरात खपल्या. डॉयल हे प्रसिद्ध लेखक असल्याने सुरुवातीला संमिश्र प्रतिक्रिया आल्या पण नंतर लेखावर उलट-सुलट प्रतिक्रियांना उधाण आले. या लेखाचे खंडन करणाऱ्यांनी आपापल्या लेखांतून डॉयल यांची आणि या प्रकरणाची खिल्ली उडवली तर डॉयल यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्यावर विश्वासही दाखवला. १९२२ साली डॉयल यांनी या प्रकरणावर "द कमिंग ऑफ द फेअरिज" नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. काही काळानंतर या प्रकरणाने उडालेला धुरळा खाली बसला.

पुढील अनेक वर्षे आपल्याला पऱ्या दिसल्या होत्या या विधानावर या दोन्ही मुली ठाम राहिल्या. या छायाचित्रांत पऱ्यांची कात्रणे वापरली होती हे त्यांनी कबूल करण्यास १९८३ साल उजाडले.

आज या छायाचित्रांवर नजर टाकली तर चित्रातील पऱ्या मानवांप्रमाणे त्रिमित नाहीत हे सहज ध्यानात येते. या मुलींनी लहान मुलांच्या पुस्तकातून कापून त्या छायाचित्रांसाठी उभ्या केल्या असाव्यात आणि पिन किंवा पातळ धाग्याने लटकवल्या असा अंदाज सहज बांधता येतो. एल्सीच्या वडिलांनी स्वतःही असे म्हटले होते की ही छायाचित्रे पाहिल्यावर त्यांना ही ठकबाजी वाटली आणि त्यांनी मुलींच्या खोल्यांची झडती घेतली होती परंतु त्यांना कुठलीही कात्रणे, चित्रे मिळाली नाहीत. तरीही, छायाचित्रांकडे निरखून पाहिले तर ही ठकबाजी आहे हे सहज लक्षात येते. १९२० साली छायाचित्रण ही कला नवी असली तरीदेखील ही ठकबाजी आहे असे अनेकांच्या लक्षात आले होतेच परंतु अशी ठकबाजी इतक्या लहान निष्पाप मुली करतील हा विचार अनेकांना रुचला नसावा. सर आर्थर कॉनन डॉयल हे त्यापैकीच एक.

आपल्या बायकोच्या आणि मुलाच्या अकाली मृत्यूनंतर डॉयल यांना अतिशय नैराश्य आले होते असे सांगितले जाते. नैराश्यातून सुटका करून घेताना डॉयल यांचा गूढ-आध्यात्मवाद आणि अतींद्रिय शक्तींवर विश्वास वाढला. "द घोस्ट क्लब" नावाच्या अतींद्रिय शक्तींचा पाठपुरावा करणाऱ्या संघटनेचे ते सदस्यही होते. त्यांच्या या वेडापायी हॅरी हुडिनी या प्रसिद्ध जादुगाराशी त्यांची घनिष्ठ मैत्री फाटली होती कारण हुडिनीच्या अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचा त्यांना विश्वास होता आणि हुडिनीचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता; तो अशा फसवणुकीचा पर्दाफाश करण्यास उत्सुक असे. डॉयल यांच्या काही मित्रांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष आयुष्यात डॉयल हे अतिशय सरळ आणि साधे गृहस्थ होते. गूढ गोष्टींवरील विश्वास आणि लहान वयाच्या निष्पाप मुली अशी फसवणूक करूच शकत नाहीत अशी त्यांची धारणा यामुळे त्यांची फसवणूक झाली असावी.

कारणे काहीही असतील, आपल्या लेखनातून बारीकसारीक निरीक्षणांवर भर देणारा चिकित्सक लेखक दोन लहान पोरींच्या खेळात सहज गंडला गेला असेच म्हणावे लागेल.

पूरक माहिती आणि अन्य छायाचित्रे:

विकीवर कॉटिंग्ली पर्‍या
कॉटिंग्ली. नेट
द कमिंग ऑफ फेअरीज - आर्थर कॉनन डॉयल

लेखातील सर्व चित्रे विकीपिडीयावरून साभार.